आश्चर्यकारक तपशील
बायबलमध्ये स्वप्ने
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी मधील 36 उतारे, ओळीनुसार.
- भुकेलेला मनुष्य आपण खात आहोत असे स्वप्न पाहतो, मग भुकेलाच जागा होतोयश 29:8
वचने
यश 29:8हे असे असणार की एक भुकेला मनुष्य आपण खात आहे असे स्वप्न पाहतो, पण जेव्हा तो जागा होतो तर त्याचे पोट रिकामेच असते. हे असे असणार की तान्हेला स्वप्न पाहतो की तो पीत आहे, पण तो जागा होतो आणि पाहा तो मूर्छित आहे व त्याचा जीव त्रासलेला आहे, होय, जे राष्ट्र समुदाय सियोन पर्वताविरूद्ध लढतात त्यांची अशीच स्थिती होईल.
- पुष्कळ काळजीमुळे स्वप्न पडतेउप 5:3
वचने
उप 5:3जर तुम्हास पुष्कळ गोष्टी करायच्या आहेत तर तुम्ही त्याबद्दल काळजी करता, तुम्हास बहुतकरून वाईट स्वप्ने पडतात. आणि तुम्ही पुष्कळ शब्द बोलता, संभाव्यता अधिक मूर्ख गोष्टी बोलत जाता.
- दुसऱ्या देवांकडे वळवू पाहणाऱ्या स्वप्न पाहणाऱ्याविषयी नियमशास्त्रअनु 13:1–5
वचने
अनु 13:1–5स्वप्नांचा अर्थ सांगणारा एखादा संदेष्टा तुमच्याकडे एखाद्या वेळी येईल. आपण काही चिन्ह, किंवा चमत्कार दाखवतो असे तो म्हणेल. कदाचित् त्या चिन्हाचा तुम्हास पडताळा येईल किंवा चमत्कार खराही ठरेल. मग तो, तुम्हास अपरिचित अशा इतर दैवतांची सेवा करायला सुचवेल. तरी त्या संदेष्टयाचे किंवा स्वप्न पाहणाऱ्याचे ऐकू नका. कारण तुम्ही आपला देव परमेश्वर ह्यांच्यावर संपूर्ण मनाने व संपूर्ण जिवाने प्रीती करता कि नाही हे पाहण्यासाठी तुमचा देव परमेश्वर तुमची परीक्षा पाहत असेल. तेव्हा तुम्ही आपल्या परमेश्वर देवालाच अनुसरा. त्याचे भय बाळगा त्याच्या आज्ञा पाळा. त्याची वाणी ऐका, त्याची सेवा करा आणि त्यालाच बिलगूण राहा. तसेच त्या संदेष्ट्याला किंवा स्वप्न सांगणाऱ्याला ठार मारा. कारण तुमचा देव परमेश्वर याने तुम्हास मिसर देशात तुम्ही गुलाम होता तेव्हा तेथून सोडवले आहे. परमेश्वर देवाने आज्ञा देऊन नेमून दिलेल्या जीवनमार्गापासून हा मनुष्य तुम्हास दूर नेतो म्हणून आपल्यामधून तुम्ही या दुष्टाईचे निर्मूलन करा.
- सतत “मला स्वप्न पडले आहे!” म्हणणाऱ्या संदेष्ट्यांविषयी यिर्मयायिर्म 23:25–28
वचने
यिर्म 23:25–28संदेष्टे माझ्या नावाने खोटे भविष्य करतात, ते म्हणतात, मला स्वप्न पडले आहे! मला स्वप्न पडले आहे! मी त्याना असे म्हणताना ऐकले आहे. संदेष्ट्ये जे खोटे भविष्य सांगतात आणि आपल्या हृदयाच्या दुष्टपणाने विचार करतात हे किती काळ चालणार? हे संदेष्टे, ऐकमेकांना खोट्या स्वप्नाबद्दल सांगून माझ्या लोकांस माझ्या नामाचा विसर व्हावा असा प्रयत्न करीत आहेत. जसे ह्यांचे पूर्वज बालामुळे माझे नाव विसरले. संदेष्ट्याला स्वप्न सांगायचे असेल, तर त्यास सांगू द्या. पण ज्या कोणाला मी काही घोषीत करतो, त्याने माझे वचन सत्याने सांगावे. गव्हा पुढे गवत ते काय? परमेश्वर असे म्हणतो.
बायबलमध्ये सांगितलेली स्वप्ने
- सारेविषयी अबीमलेखाला स्वप्नात इशारा मिळतोउत्प 20:3
वचने
उत्प 20:3परंतु देव रात्री अबीमलेखाच्या स्वप्नात येऊन म्हणाला, “पाहा जी स्त्री तू घेऊन आलास तिच्यामुळे तू मेलाच म्हणून असे समज, कारण ती एका मनुष्याची पत्नी आहे.”
- याकोबाला स्वर्गापर्यंत पोहोचणाऱ्या शिडीचे स्वप्न पडतेउत्प 28:12
वचने
उत्प 28:12तेव्हा त्यास स्वप्न पडले आणि त्याने पाहिले, एक शिडी पृथ्वीवर उभी आहे. तिचे टोक वर स्वर्गापर्यंत पोहचलेले आहे आणि देवाचे दूत तिच्यावरून चढत व उतरत आहेत.
- याकोबाला बांडी, ठिपकेदार आणि करडी कळपांचे स्वप्न पडतेउत्प 31:10–13
वचने
उत्प 31:10–13एकदा शेळ्यामेंढ्यांचा कळप निपजण्याच्या वेळेस मी आपली दृष्टी वर करून स्वप्नात पाहिले, तो पाहा, कळपातल्या माद्यांवर नर उडत होते ते फक्त ठिपकेदार व बांडे, करडे होते.” देवाचा दूत मला स्वप्नात म्हणाला, “याकोबा,” मी म्हणालो, “काय आज्ञा आहे?” तो म्हणाला, “आपले डोळे वर करून पाहा, ‘फक्त ठिपकेदार व बांडे, करडे असलेलेच नर माद्यांवर उडत आहेत. लाबान तुला काय करीत आहे ते सर्व मी पाहिले आहे. बेथेलचा मी देव आहे. जेथे तू एका स्मारकस्तंभास अभिषेक केलास, जेथे नवस करून तू मला वचन दिले, आणि आता तू हा देश सोड आणि आपल्या जन्मभूमीस परत जा.’”
- याकोबाला इजा करू नये असा लाबानाला स्वप्नात इशारा मिळतोउत्प 31:24
वचने
उत्प 31:24त्या रात्री देव अरामी लाबानाच्या स्वप्नात येऊन म्हणाला, “तू याकोबाला बरे किंवा वाईट बोलू नये म्हणून काळजी घे.”
- योसेफाला आपल्या पेंढीला इतर पेंढ्या नमन करतात असे स्वप्न पडतेउत्प 37:5–8
वचने
उत्प 37:5–8योसेफास एक स्वप्न पडले. त्याने ते स्वप्न आपल्या भावांना सांगितले. त्यानंतर तर त्याचे भाऊ त्याचा अधिकच द्वेष करू लागले. तो त्यांना म्हणाला, “मला पडलेले स्वप्न कृपा करून ऐका: पाहा, आपण सर्वजण शेतात गव्हाच्या पेंढ्या बांधण्याचे काम करीत होतो, तेव्हा माझी पेंढी उठून उभी राहिली आणि तुम्हा सर्वांच्या पेंढ्या तिच्या भोवती गोलाकार उभ्या राहिल्या व त्यांनी माझ्या पेंढीला खाली वाकून नमन केले.” हे ऐकून त्याचे भाऊ त्यास म्हणाले, “तू आमचा राजा होऊन आमच्यावर राज्य करणार काय? आणि खरोखर तू आम्हावर अधिकार करशील काय?” त्याच्या या स्वप्नामुळे व त्याच्या बोलण्यामुळे तर त्याचे भाऊ त्याचा अधिकच द्वेष करू लागले.
- योसेफाला सूर्य, चंद्र आणि अकरा तारे नमन करतात असे स्वप्न पडतेउत्प 37:9–10
वचने
उत्प 37:9–10नंतर योसेफाला आणखी एक स्वप्न पडले. तेही त्याने आपल्या भावांना सांगितले. तो म्हणाला, “पाहा, मला आणखी एक स्वप्न पडले: सूर्य, चंद्र व अकरा तारे यांनी मला खाली वाकून नमन केले.” त्याने आपल्या पित्यासही या स्वप्नाविषयी सांगितले. परंतु त्याच्या वडिलाने त्यास दोष देऊन म्हटले, “असले कसले हे स्वप्न आहे? तुझी आई, तुझे भाऊ व मी आम्ही भूमीपर्यंत लवून तुला नमन करू काय?”
- प्यालेबरदाराला तीन फांद्यांच्या द्राक्षवेलीचे स्वप्न पडतेउत्प 40:9–13
वचने
उत्प 40:9–13तेव्हा राजाला प्याला देणाऱ्या प्यालेबरदाराने योसेफाला आपले स्वप्न सांगितले. तो म्हणाला, “मी माझ्या स्वप्नात पाहिले की, माझ्यासमोर एक द्राक्षवेल आहे. द्राक्षवेलाला तीन फाटे होते. त्या फाट्यांना पाने फुटली व त्यास फुलवरा आला व नंतर त्याच्या घडास पिकलेली द्राक्षे आली. फारो राजाचा प्याला माझ्या हातात होता. तेव्हा मी ती द्राक्षे घेतली आणि फारोच्या त्या प्याल्यात पिळली आणि द्राक्षरसाचा तो प्याला मी फारोच्या हातात दिला.” योसेफ त्यास म्हणाला, “तुझ्या स्वप्नाचा अर्थ मी तुला उलगडून सांगतो. ते तीन फाटे म्हणजे तीन दिवस आहेत. तीन दिवसानी फारो राजा तुझे मस्तक उंचावील व तुला पुन्हा तुझ्या पूर्वीच्या कामावर परत घेईल. तू आतापर्यंत फारोच्या प्यालेबरदाराचे जे काम करीत होतास तेव्हाच्या त्या पहिल्या रीतीप्रमाणे तू फारोचा प्याला त्याच्या हातात देशील.
- भटाऱ्याला डोक्यावर भाकरीच्या तीन टोपल्यांचे स्वप्न पडतेउत्प 40:16–19
वचने
उत्प 40:16–19स्वप्नाचा अर्थ चांगला आहे हे पाहून मुख्य आचाऱ्याने योसेफाला म्हटले, “मलाही एक स्वप्न पडले. आणि पाहा, माझ्या डोक्यावर भाकरीच्या तीन टोपल्या होत्या. सगळ्यात वरच्या टोपलीत फारो राजासाठी भट्टीत भाजलेली सर्व प्रकारची पक्वान्ने होती, परंतु माझ्या डोक्यावरील त्या टोपलीतील पदार्थ पक्षी खात होते.” योसेफाने उत्तर दिले, “तुझ्या स्वप्नाचा अर्थ मी उलगडून सांगतो, त्या तीन टोपल्या म्हणजे तीन दिवस आहेत. तीन दिवसात फारो राजा तुझे शीर वर करून उडवून टाकील आणि तुला झाडाला टांगील आणि पक्षी तुझे मांस तोडून खातील.”
- फारोला सात पुष्ट आणि सात रोड गाईंचे स्वप्न पडतेउत्प 41:1–4
वचने
उत्प 41:1–4साधारणपणे दोन वर्षे पूर्ण झाल्यानंतर फारो राजाला स्वप्न पडले. ते असे की, पाहा तो नाईल नदीच्या काठी उभा राहिला होता. तेव्हा पाहा, त्याने सात गाई नाईल नदीतून बाहेर येताना पाहिल्या. त्या धुष्टपुष्ट व सुंदर होत्या. त्या तेथे उभ्या राहून गवतात चरत होत्या. त्यानंतर आणखी सात दुबळ्या व कुरुप गाई नदीतून बाहेर आल्या व नदीच्या किनारी त्या सात धष्टपुष्ट व सुंदर गाईंच्या बाजूला उभ्या राहिल्या. आणि त्या सात दुबळ्या व कुरुप गाईंनी त्या सात सुंदर व धष्टपुष्ट गाईंना खाऊन टाकले. त्यानंतर फारो राजा जागा झाला.
- मग सात भरीव आणि सात खुरटलेल्या कणसांचेउत्प 41:5–7
वचने
उत्प 41:5–7मग फारो राजा पुन्हा झोपल्यावर त्यास दुसऱ्यांदा स्वप्न पडले. त्यामध्ये त्याने पाहिले की, एकाच ताटाला सात भरदार कणसे आली. त्यानंतर पाहा, त्या ताटाला सात खुरटलेली व पूर्वेच्या वाऱ्याने करपलेली अशी सात कणसे आली. नंतर त्या सात खुरटलेल्या व करपलेल्या कणसांनी ती सात चांगली व टपोऱ्या दाण्यांची भरदार कणसे गिळून टाकली. तेव्हा फारो पुन्हा जागा झाला आणि ते तर स्वप्न असल्याचे त्यास समजले.
- एका मिद्यान्याला जवाची भाकर तंबू उलथवते असे स्वप्न पडतेशास्ते 7:13–14
वचने
शास्ते 7:13–14मग गिदोन गेला आणि पाहा, कोणी आपल्या सोबत्याला असे स्वप्न सांगत होता की, “पाहा, मी एक स्वप्न पाहिले, सातूची गोल भाकर मिद्यानी तळात घरंगळत येऊन एका तंबूपर्यंत आली आणि तिने असा जोराचा धक्का दिला की, तो तंबू पडला आणि उलटून भुई सपाट झाला.” तेव्हा त्याच्या सोबत्याने उत्तर दिले की, “इस्राएली मनुष्य योवाशाचा पुत्र गिदोन याची ही तलवार! तिच्याशिवाय हे दुसरे काही नाही; देवाने मिद्यान व सर्व तळ त्याच्या हाती दिला आहे.”
- गिबोन येथे शलमोन स्वप्नात ज्ञान मागतो1 राजे 3:5–15
वचने
1 राजे 3:5–15शलमोन गिबोन येथे असतानाच परमेश्वराने एका रात्री त्यास स्वप्नात दर्शन दिले तो म्हणाला, माग! “तुला काय हवे ते माग मी ते देईन.” तेव्हा शलमोन म्हणाला, “तुझा सेवक म्हणजेच माझे वडिल दावीद यांच्यावर तुझी कृपा होती. ते तुझ्या म्हणण्याप्रमाणे वागले. ते विश्वासूपणाने आणि न्यायाने वागले. त्यानंतर आज त्याच्या मुलालाच गादीवर बसवून तू तुझ्या महान कराराबद्दल मोठाच दयाळूपणा दाखवला आहेस. माझे वडिल दावीदानंतर, परमेश्वर देवा, तू मला राजा केले आहेस. पण मी लहान मुलासारखाच आहे. मला बाहेर जायला व आत यायला समजत नाही. तू निवडलेल्या लोकांमध्ये तुझा सेवक राहत आहे, त्यांचा जमाव मोठा आहे ते असंख्य व अगणित आहेत. म्हणून तुझ्या सेवकास लोकांचा न्याय करण्यास शहाणपणाचे मन दे, त्यामुळे मला बऱ्यावाईटामधील फरक समजेल. त्याखेरीज तुझ्या एवढ्या लोकांचा न्याय करणे कोणास शक्य आहे?” शलमोनाने हा वर मागितला याचा परमेश्वरास फार आनंद झाला म्हणून देव त्यास म्हणाला, “तू स्वत:साठी दीर्घायुष्य किंवा सुखसमृध्दी मागितली नाहीस. तसेच शत्रूंचा नि:पात व्हावा असे म्हणाला नाहीस. तू फक्त न्यायबुध्दी आणि विवेक याची मागणी केलीस. तेव्हा तुझे मागणे मी मान्य करतो. तुला ज्ञानी आणि शहाणपणाचे मन देतो, तुला एवढे शहाणपण लाभेल की तुझ्यासारखा भूतकाळात कधी झाला, नाही आणि पुढे कधी होणार नाही. आणखी तू जे मागीतले नाही तेही मी तुला देत आहे धन आणि वैभव ही तुला देत आहे. तुझ्या आयुष्यभर तुझ्यासारखा कोणी दुसरा राजा असणार नाही. जर तू माझ्या दाखवलेल्या मार्गांने चाललास आणि माझ्या आज्ञा आणि नियम पाळलेस, जसा तुझा पिता दावीद चालला, तर तुलाही मी दीर्घायुषी करीन.” शलमोन जागा झाला. परमेश्वर स्वप्नात येऊन आपल्याशी बोलला हे त्याच्या लक्षात आले. त्यानंतर शलमोन यरूशलेमेला जाऊन परमेश्वराच्या कराराच्या कोशापुढे उभा राहिला. शलमोनाने परमेश्वरासाठी होमार्पण केले. त्यामध्ये त्याने परमेश्वरास शांत्यर्पणे वाहिली. मग आपल्या सर्व सेवकांना मेजवानी दिली.
- नबुखद्नेस्सर आपल्या ज्ञानी माणसांनी स्वप्नच सांगावे असा आग्रह धरतोदानि 2:1–9
वचने
दानि 2:1–9नबुखद्नेस्सर राजाच्या कारर्कीदीच्या दुसऱ्या वर्षी त्यास स्वप्न पडले तो बेचैन झाला आणि झोपू शकला नाही. तेव्हा राजाने फर्मान काढला की, जादूगार आणि ज्योतिषी जाणणारे तसेच मांत्रिक आणि ज्ञानी लोक ह्यांनी यावे आणि राजाला ते स्वप्न सांगावे, म्हणून ते राजासमोर हजर झाले. राजा त्यांना म्हणाला, “मला एक स्वप्न पडले आहे आणि त्याचा अर्थ जाणण्यास माझे मन व्याकूळ झाले आहे.” तेव्हा ज्ञानी लोक राजाशी आरामी भाषेत बोलले “महाराज चिरायू असा! तुमच्या सेवकांना तुमचे स्वप्न सांगा आणि आम्ही त्याचा अर्थ तुम्हास प्रगट करू!” राजाने खास्दी लोकांस उत्तर दिले, “हा ठराव होऊन चुकला आहे जर तुम्ही मला स्वप्न आणि त्याचा अर्थ सांगणार नाही तर तुमच्या शरीराचे तुकडे केले जातील आणि तुमच्या घरांचे उकिरडे केले जातील. पण जर तुम्ही मला स्वप्न आणि त्याचा अर्थ सांगाल तर तुम्हास माझ्याकडून भेट, पारितोषिक आणि मोठा मान मिळेल. यास्तव तुम्ही मला स्वप्न व त्याचा अर्थ सांगा.” ते पुन्हा त्यास म्हणाले, “महाराजांनी आपल्या सेवकांस स्वप्न सांगावे म्हणजे आम्ही त्याचा अर्थ सांगू.” राजाने उत्तर दिले, “मला ठाऊक आहे तुम्ही वेळ काढत आहात; पाहिजे कारण तुम्हास ठाऊक आहे की, माझा ठराव झालेला आहे. पण जर तुम्ही मला स्वप्न सांगितले नाही तर तुमच्यासाठी एकच शिक्षा आहे. म्हणून माझे मन बदलत नाही तोपर्यंत तुम्ही खोट्या आणि फसव्या गोष्टी सहमत करून मला सांगाव्या असे तुमचे ठरले आहे. म्हणून मला स्वप्न सांगा म्हणजे मला समजेल तुम्ही त्याचा उलगडा करु शकता.”
- सोने, चांदी, पितळ, लोखंड आणि माती यांच्या मोठ्या पुतळ्याचे त्याचे स्वप्नदानि 2:31–35
वचने
दानि 2:31–35राजा आपण, आपल्या डोळ्यापुढे एक मोठा पुतळा पाहिला हा पुतळा शक्तीशाली आणि तेजोमय असा तुमच्यासमोर उभा राहिला, त्याचे तेज भयावह होते. त्या पुतळ्याचे डोके उत्तम सोन्याचे होते, त्याची छाती व हात चांदीचे होते, त्यांचा मधला भाग आणि मांडया पितळेच्या. आणि त्याचे पाय लोखंडाचे होते त्याची पावले काही भाग लोखंडाची आणि काही भाग मातीची होती. तुम्ही वर पाहत होता तेव्हा कोणा मनुष्याचा हात लागल्यावाचून एक दगड छेदला गेला आणि त्याने त्या पुतळ्याच्या लोखंडाच्या व मातीच्या पावलांवर आदळून त्यांचे तुकडे तुकडे केले. त्यानंतर लोखंड, माती, पितळ, चांदी आणि सोने यांचे एकाच वेळी तुकडे झाले आणि ते उन्हाळ्यातील खेळ्यातल्या भुश्याप्रमाणे झाले. वारा त्यांना घेऊन गेला आणि त्यांचा मागमूस राहिला नाही. पण तो दगड जो पुतळयावर आदळला होता त्यांचा मोठा पर्वत होऊन त्याने सर्व पृथ्वी व्यापली.
- तोडलेल्या मोठ्या वृक्षाचे त्याचे स्वप्नदानि 4:10–17
वचने
दानि 4:10–17मी माझ्या पलंगावर पडलो असता मला दिसले ते असे, मी पाहिले, पृथ्वीच्या मधोमध एक मोठा वृक्ष होता आणि त्याची उंची खूप मोठी होती. तो वृक्ष वाढून मजबूत झाला त्याचा शेंडा आकाशात पोहचला आणि त्याचा देखावा सर्व पृथ्वीच्या सीमेपर्यंत पोहचला. त्याची पाने सुंदर होती, त्यास भरपूर फळे असून ती सर्वांना खायला पुरेशी होती. वनपशु त्याच्या सावलीत आणि आकाशातील पक्षी त्याच्या फांद्यामध्ये राहत. तो वृक्ष सर्व जिवितांचे पोषण करीत असे. मी माझ्या बिछान्यात पडलो असता माझ्या मनात पाहिले आणि एक पवित्र देवदूत आकाशातून खाली उतरला. तो मोठ्याने ओरडून म्हणाला हा वृक्ष तोडून टाका आणि त्याच्या फांद्या छाटून टाका, त्याची पाने काढून टाका आणि फळे विखरा, त्याच्या खाली राहणारे प्राणी पळून जावो आणि फांद्यांतील पाखरे उडून जावोत. पण त्याचा बुंधा जमिनीत राहू दया. त्यास लोखंड आणि पितळेच्या पट्टया बांधून, कुरणाच्या कोवळ्या गवतात राहू द्या. त्यास आकाशातील दहीवरात भिजू द्या, वनपशुंबरोबर त्यास भूमीवरील गवताचा वाटा मिळू द्या. त्याचे मानवी हृदय जावून त्यास प्राण्याचे हृदय प्राप्त होवो, तो पर्यंत सात वर्षे होऊन जातील. हा निर्णय त्या देवदुताच्या घोषणेद्वारे आणि पवित्रजनांच्या विचाराने झाला आहे, यासाठी की मनुष्याच्या राज्यात परात्पर प्रभुत्व करतो, आणि ज्या कोणाला ते द्यायला तो इच्छितो त्यास तो ते देतो, आणि त्यावर मनुष्यातल्या सर्वांहून नीच अशा मनुष्यास तो स्थापतो, असे जिवंतांनी जाणावे.
- दानीएल चार पशूंचे स्वप्न लिहून ठेवतोदानि 7:1–3
वचने
दानि 7:1–3बाबेलाचा राजा बेलशस्सर याच्या राज्याच्या पहिल्या वर्षी दानीएल आपल्या पलंगावर पडलेला असता त्यास स्वप्न पडले आणि दृष्टांत त्याच्या मनात फिरू लागले मग त्याने ते स्वप्न आणि त्यातील महत्वाच्या घटना लिहून काढत्या. दानीएलाने म्हटले, “रात्रीच्या माझ्या दृष्टांतात मी पाहीले स्वर्गातील चार वारे महासागरावर घोळत होते. चार मोठी श्वापदे जी एकमेकांपासून वेगळी होती, अशी समुद्रातून बाहेर आली.
- मरीयेला पत्नी म्हणून स्वीकारावे असे योसेफाला स्वप्नात सांगितले जातेमत्त 1:20–21
वचने
मत्त 1:20–21तो या गोष्टींविषयी विचार करीत असता त्यास स्वप्नात प्रभूच्या दूताने दर्शन देऊन म्हटले; “योसेफा, दावीदाच्या पुत्रा, तू मरीयेला आपली पत्नी म्हणून स्वीकार करण्यास घाबरू नकोस, कारण जो गर्भ तिच्या पोटी राहीला आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे. ती पुत्राला जन्म देईल आणि तू त्याचे नाव येशू ठेव, तो आपल्या लोकांस त्यांच्या पापांपासून तारील.”
- हेरोदाकडे परत जाऊ नये असा ज्ञानी लोकांना स्वप्नात इशारा मिळतोमत्त 2:12
वचने
मत्त 2:12देवाने त्यांना स्वप्नात हेरोदाकडे परत जाऊ नका, अशी सूचना दिल्यामुळे ते दुसर्या मार्गाने आपल्या देशास निघून गेले.
- योसेफाला स्वप्नात मिसरात पळून जाण्यास, मग परत येण्यास सांगितले जातेमत्त 2:13, मत्त 2:19–22
वचने
मत्त 2:13ते गेल्यावर, प्रभूचा दूत योसेफास स्वप्नात दर्शन देऊन म्हणाला, “ऊठ, बालक व त्याची आई यांना घेऊन मिसर देशात पळून जा आणि मी तुला सांगेपर्यंत तेथेच राहा कारण बालकाचा घात करण्यासाठी हेरोद राजा त्याचा शोध करणार आहे.”
मत्त 2:19–22पुढे हेरोद राजा पावल्यावर, पाहा प्रभूचा दूत मिसर देशात योसेफास स्वप्नात दर्शन देऊन म्हणाला, “उठ, बालकास व त्याच्या आईस घेऊन इस्राएल देशास जा, कारण बालकाचा जीव घ्यावयास जे पाहत होते ते मरून गेले आहेत.” तेव्हा तो उठला आणि बालकाला व त्याच्या आईला घेऊन इस्राएल देशात आला. परंतु अर्खेलाव हा आपला पिता हेरोद याच्या जागी यहूदीया प्रांतात राज्य करीत आहे असे ऐकून तो तेथे जाण्यास घाबरला, आणि स्वप्नात देवाने सूचना केल्यानंतर तो गालील प्रांतास निघून गेला,
- येशूमुळे पिलाताच्या पत्नीला स्वप्नात त्रास होतोमत्त 27:19
वचने
मत्त 27:19तो न्यायासनावर बसला असतानाच त्याच्या पत्नीने त्यास एक निरोप पाठवून कळवले, “या मनुष्याविषयी सावध राहा; कारण तो दोषी नाही. त्याच्यामुळे स्वप्नात मला आज दिवसभर फार दुःखसहन करावे लागले आहे.”
रात्रीचे दृष्टान्त
- मिसरात जाण्याविषयी देव रात्री याकोबाशी बोलतोउत्प 46:2–4
वचने
उत्प 46:2–4रात्री देव स्वप्नात दर्शन देऊन इस्राएलाशी बोलला, तो म्हणाला, “याकोबा, याकोबा.” त्याने उत्तर दिले, “काय आज्ञा?” तो म्हणाला “मी देव आहे, तुझ्या बापाचा देव आहे. खाली मिसर देशास जाण्यास तू भिऊ नको, कारण मी तुझ्यापासून तेथे एक मोठे राष्ट्र तयार करीन. मी तुझ्याबरोबर खाली मिसरात जाईन, आणि मी तुला मिसरमधून पुन्हा आणीन. आणि योसेफ आपल्या हातांनी तुझे डोळे झाकील.”
- रात्रीच्या दृष्टान्तांत अलीफजाला कुजबुज ऐकू येतेईयो 4:12–16
वचने
ईयो 4:12–16आता माझ्याकडे एक गुप्त निरोप आला, आणि माझ्या कानी त्याची कुजबुज पडली. जेव्हा लोक गाढ झोपेत असतात, मी रात्रीच्या दृष्टांताच्या विचारात असतो, मी घाबरलो आणि माझा थरकाप झाला. माझी सगळी हाडे थरथरा कापू लागली. एक आत्मा अगदी माझ्या चेहऱ्याजवळून गेला आणि माझ्या शरीरावरचे केस उभे राहिले. तो आत्मा निश्चल उभा राहिला, पण त्याचा आकार मला दिसू शकला नाही, माझ्या डोळ्यांसमोर एक आकार होता, तेथे शांतता होती आणि वाणी असे बोलताना मी ऐकली.
- पौलाला मासेदोनियाचा एक मनुष्य बोलावताना दिसतो: “इकडे मासेदोनियात येऊन आम्हास साहाय्य कर”प्रेषि 16:9
वचने
प्रेषि 16:9तेथे रात्री पौलाला असा दृष्टांत झाला की, मासेदोनियात कोणीएक मनुष्य उभा राहून आपणाला विनंती करीत आहे की, “इकडे मासेदोनियात येऊन आम्हास साहाय्य कर.”
- वादळात एक देवदूत पौलाला सांगतो की जहाजावरील सर्व जण वाचतीलप्रेषि 27:23–24
वचने
प्रेषि 27:23–24मी ज्या देवाचा सेवक आहे आणि ज्याची उपासना मी करतो, त्याचा दूत काल रात्री माझ्या बाजूला उभा राहीला. आणि तो दूत म्हणाला, “पौला भिऊ नको! तुला कैसरापुढे उभे राहिलेच पाहिजे, तुझ्याबरोबर प्रवास करणारे सर्व लोक देवाने त्याच्या दयेने तुला दिले आहेत.
अर्थ सांगणारे
- योसेफ प्यालेबरदार आणि भटारी यांच्या स्वप्नांचा अर्थ सांगतोउत्प 40:8, उत्प 40:12–13, उत्प 40:18–19
वचने
उत्प 40:8ते त्यास म्हणाले, “आम्हा दोघांनाही रात्री स्वप्ने पडली, परंतु त्यांचा अर्थ सांगणारा कोणी नाही.” योसेफ त्यांना म्हणाला, “स्वप्नांचा अर्थ सांगणे देवाकडे नाही काय? कृपया, आपापले स्वप्न मला सांगा.”
उत्प 40:12–13योसेफ त्यास म्हणाला, “तुझ्या स्वप्नाचा अर्थ मी तुला उलगडून सांगतो. ते तीन फाटे म्हणजे तीन दिवस आहेत. तीन दिवसानी फारो राजा तुझे मस्तक उंचावील व तुला पुन्हा तुझ्या पूर्वीच्या कामावर परत घेईल. तू आतापर्यंत फारोच्या प्यालेबरदाराचे जे काम करीत होतास तेव्हाच्या त्या पहिल्या रीतीप्रमाणे तू फारोचा प्याला त्याच्या हातात देशील.
उत्प 40:18–19योसेफाने उत्तर दिले, “तुझ्या स्वप्नाचा अर्थ मी उलगडून सांगतो, त्या तीन टोपल्या म्हणजे तीन दिवस आहेत. तीन दिवसात फारो राजा तुझे शीर वर करून उडवून टाकील आणि तुला झाडाला टांगील आणि पक्षी तुझे मांस तोडून खातील.”
- योसेफ फारोच्या स्वप्नांचा अर्थ सांगतो: सात वर्षे सुकाळ, सात वर्षे दुष्काळउत्प 41:25–32
वचने
उत्प 41:25–32मग योसेफ फारोला म्हणाला, “महाराज, या दोन्हीही स्वप्नांचा अर्थ एकच आहे. देव जे काही करणार आहे ते त्याने आपणांस कळविले आहे. त्या सात चांगल्या गाई आणि ती सात चांगली कणसे म्हणजे सात चांगली वर्षे आहेत. स्वप्ने सारखीच आहेत. त्या दुसऱ्या सात दुबळ्या गाई व ती सात सुकलेली व पूर्वेच्या वऱ्याने करपलेली कणसेही म्हणजे अवघ्या देशावर येणाऱ्या दुष्काळाची सात वर्षे आहेत. जी गोष्ट मी फारोला सांगितली ती हीच आहे. जे काय घडणार आहे हे देवाने आपणास दाखवले आहे. पाहा सर्व मिसर देशात सात वर्षांच्या सुबत्तेच्या काळात चांगले व भरपूर पीक येईल. परंतु सुकाळाच्या सात वर्षांनंतर सर्व देशभर दुष्काळाची अशी सात वर्षे येतील की, त्यामुळे मिसर देशाला सुकाळाचा विसर पडेल आणि हा दुष्काळ देशाचा नाश करील. आणि भरपूर धान्य असतानाचे दिवस देशात कसे होते याचा लोकांस विसर पडेल, कारण तो फार भयंकर काळ असेल. तेव्हा फारो महाराज, एकाच गोष्टीविषयी आपणाला दोनदा स्वप्ने पडली, ती यासाठी की, देव हे सर्व लवकरच व नक्की घडवून आणील हे आपणास दाखवावे.
- दानीएल नबुखद्नेस्सराला त्याचे स्वप्न सांगतो, मग त्याचा अर्थ सांगतोदानि 2:27–30, दानि 2:36, दानि 4:19–24
वचने
दानि 2:27–30दानीएलाने राजास उत्तर दिले, “राजाचे गुढ प्रकट करण्याची कुशलता, ज्ञानी, व भुतविद्या जाणणारे, जादूगार किंवा ज्योतिषी त्यांच्याकडे नाही. तथापी, एक देव आहे जो स्वर्गात राहतो तो रहस्य प्रगट करतो आणि त्याने भविष्यात होणारी घटना राजा नबुखद्नेस्सर आपणास कळविली आहे. तुम्ही आपल्या बिछान्यात पडले असता तुमचे स्वप्न आणि दृष्टांत तो असा. आपण जसे बिछान्यात पडून विचार करत होता तेव्हा आपल्या मनात हे रहस्य प्रगट करणाऱ्याने आपणास पुढे होणारी घटना कळविली. आता माझी गोष्ट, ती अशी की; हे रहस्य मला उलगडते ते यामुळे नाही की मी इतर मनुष्यांपेक्षा अधिक ज्ञानी आहे, तर हे रहस्य यासाठी उलगडले की, राजा आपण याचा अर्थ समजावा व जो आपल्या मनातील गहन विचार समजावे.
दानि 2:36हे आपले स्वप्न आहे राजा, आता आम्ही त्याचा उलगडा सांगतो.
दानि 4:19–24मग दानीएल, ज्यास बेल्टशस्सर नाव देण्यात आले होते तो काही क्षणासाठी गोंधळून गेला आणि त्याचे मन अस्वस्थ झाले. राजा म्हणाला, “बेल्टशस्सर हे स्वप्न किंवा त्याच्या अर्थाने तू घाबरू नकोस.” तेव्हा बोलटशस्सर म्हणाला, “माझ्या स्वामी हे स्वप्न तुझा द्वेष करणाऱ्यास आणि याचा अर्थ तुझा शत्रुस लागू पडो. जो वृक्ष तू पाहीला, जो वाढून मजबुत झाला आणि ज्याचा शेंडा आकाशात गेला ज्यास सर्व पृथ्वीवरून पाहता येत होते. ज्यांची पाने सुंदर आणि फळे भरपूर असून ती सर्वांसाठी पुरेशी होती. त्याच्या सावलीत वनपशू राहत आणि फांद्यांमध्ये आकाशातील पक्षी राहत होते. हे राजा तो वृक्ष तू आहेस, तू वाढून बलवान झालास तुझी थोरवी आकाशापर्यंत पोचली आहे, तुझे अधिकार पृथ्वीच्या शेवटापर्यंत पोहचतात. हे राजा, तू एक स्वर्गदूत पाहिला जो स्वर्गातून खाली येवून म्हणाला, ‘हा वृक्ष तोडून ह्याचा नाश करा, पण त्यांचा बुंधा जमिनीत राहू दया, ह्याला लोखंड आणि पितळेच्या पट्टयांनी बांधून कुरणातल्या कोवळया गवतात राहू दया त्याने आकाशाचे दव भिजवो, तो सात वर्षे वनपशुसोबत राहो.’ हे राजा ह्याचा अर्थ, असा सर्वोच्च देवाचा हा आदेश आहे. जो माझ्या राजापर्यंत पोचला आहे.
स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क