मातीच्या प्रिझमांवर लिहिलेल्या सन्हेरीबच्या इतिवृत्तांत तो बढाई मारतो की त्याने हिज्कीयाला यरूशलेमेत “पिंजऱ्यातील पक्ष्याप्रमाणे” कोंडले आणि खंडणी घेतली — पण नगर पडल्याचा दावा ते करत नाहीत. निनवे येथील त्याच्या राजवाड्याच्या भिंतींवर लाखीशचा वेढा दाखवला होता.
बायबलमध्ये · इ.स.पू. 701 · यरूशलेम
यरूशलेम वाचते
अश्शूरचा राजा सन्हेरीब यरूशलेमेला धमकावतो, तेव्हा हिज्कीया राजा मंदिरात प्रार्थना करतो. सन्हेरीबच्या स्वतःच्या इतिवृत्तांतही या मोहिमेचे वर्णन आहे.
हिज्कीयाने जासूदांच्या हातून पत्र घेऊन ते वाचले. मग परमेश्वराच्या मंदिरात जाऊन परमेश्वरापुढे ते उघडून ठेवले. परमेश्वराची प्रार्थना करून हिज्कीया म्हणाला. “परमेश्वर देवा, करुबांच्यावर राजासनी बसणारा तूच इस्राएलचा देव आहेस. पृथ्वीच्या पाठीवरील सर्व राज्यांचा तू आणि एकमेव तूच नियंता आहेस. आकाश आणि पृथ्वीचा तू निर्माता आहेस, परमेश्वरा, माझे म्हणणे ऐक आपले डोळे उघड आणि हे पत्र पाहा. सन्हेरीबची जिवंत परमेश्वराचा अवमान करणारी वचने पाहा. खरोखरच परमेश्वराचा अवमान करणारी वचने पाहा. खरोखरच परमेश्वरा असे घडले आहे. अश्शूरच्या राजाने ही सर्व राष्ट्रे नामशेष केली आहेत. तिथले दैवत त्याने आगीच्या भक्ष्यस्थानी टाकले. पण ते काही खरे देव नव्हते. मनुष्याने केलेल्या लाकडाच्या आणि दगडाच्या मूर्ती होत्या. म्हणून तर अश्शूरच्या राजाला त्या नष्ट करता आल्या. तेव्हा परमेश्वर देवा आता आम्हास या राजापासून वाचव. म्हणजे तूच खरा परमेश्वर आहेस हे जगातील सर्व राजांना कळेल.” आमोजचा मुलगा यशया याने हिज्कीयाला निरोप पाठवला की, “इस्राएलचा परमेश्वर देव असे म्हणतो, ‘अश्शूरचा राजा सन्हेरीब याच्या विषयी तू केलेले गाऱ्हाणे मी ऐकले आहे.” “सन्हेरीबबद्दल परमेश्वराचा असा निरोप आहे. सीयोनच्या (म्हणजेच यरूशलेमच्या) कुमारी कन्येने तुला तुच्छ लेखून तुझा अपमान केला आहे. यरूशलेम कन्या तुझी पाठ वळली की तुझा उपहास करते.” पण तू कोणाचा अपमान केलास? कोणाला दुर्भाषण केलेस? तू हे कोणाविरुध्द बोललास? इस्राएलच्या पवित्र परमेश्वराविरुध्द तू गेलास. त्याच्यापेक्षा वरचढ असल्याच्या आवेशात तू असा वागलास. परमेश्वराचा अवमान करायला तू दूत पाठवलेस. तू म्हणालास, “माझे बहुसंख्य रथ घेऊन मी या उंच पर्वतावर, लबानोनाच्या अंतर्भागात आलो आहे. त्यांचे उंच गंधसरु आणि उत्तम देवदारु मी तोडीन. लबानोन मध्ये सर्वात उंचावर असलेल्या घनदाट अरण्यात मी पोचलो आहे. मी विहिरी खणल्या आणि नव्या नव्या ठिकाणांचे पाणी प्यालो. मिसरमधील नद्या सुकवून तो प्रदेश मी पादाक्रांत केला.” तू असे म्हणालास खरा, पण परमेश्वर काय म्हणाला ते तू ऐकले नाहीस काय? “पूर्वी, फार पूर्वीच मी हे सर्व योजले होते आणि आता त्याप्रमाणेच घडत आहे. मजबूत नगर उद्ध्वस्त होऊन तिथे नुसती दगडांची रास उरली आहे, हे तुझ्याहातून घडले ते माझ्यामुळेच. तेथील लोक समर्थ नव्हते. ते घाबरलेले आणि गोंधळलेले होते. शेतातले गवत आणि पीक सरसकट कापले जावे तसे ते होते. घराच्या धाब्यावरच गवत पूर्ण वाढण्याआधीच करपून जावे तशी त्यांची स्थिती होती. तू कधी स्वस्थ बसतोस, कधी लढाईवर जातोस आणि कधी घरी परततोस, तसेच माझ्याविरुध्द कधी उठतोस ते मला माहित आहे. माझ्याविरुध्द तू उठलास, तुझे उन्मत्त बोलणे मी ऐकले. तेव्हा, मी आता तुझ्या नाकात वेसण घालतो आणि तोंडात लगाम अडकवतो. मग तुला माघारे वळवून ज्या रस्त्याने आलास त्याच वाटेने तुला परत फिरवतो.” “मी तुझ्या साहाय्यासाठी येणार आहे याची खात्री पटावी म्हणून हे चिन्ह देतो. या वर्षी आपोआप धान्य उगवेल ते तुम्ही खाल. दुसऱ्या वर्षी त्याच्या बियाणातून उगवेल ते खाल. पण तिसऱ्या वर्षी मात्र तुम्ही स्वत: पेरणी कराल त्यातून धान्य काढा. द्राक्षाची लागवड करा आणि द्राक्षे खा.” यहूदाच्या घराण्यातील उरल्यासुरल्या लोकांचा वंश वाढेल. कारण काहीजण बचावतील. ते यरूशलेमेतून बाहेर पडतील. सीयोन डोंगरातून काहीजण येतील. परमेश्वराच्या तीव्र आवेशामुळे असे घडेल. “अश्शूरच्या राजाबद्दल परमेश्वर असे म्हणतो, तो या शहरात पाऊल टाकणार नाही या नगरावर तो बाण सोडणार नाही आपल्या ढाली तो येथे आणणार नाही. या शहरच्या तटबंदीवर हल्ला करण्यासाठी तो कचऱ्याचे ढीग रचणार नाही. तो आल्या वाटेने परत जाईल. या शहरात तो येणार नाही असे परमेश्वर म्हणतो. या नगराचे रक्षण करून त्यास मी वाचवीन. माझ्यासाठी आणि माझा सेवक दावीद याच्यासाठी मी हे करीन.” त्या रात्री परमेश्वराचा दूत बाहेर पडला आणि त्यांने अश्शूरांच्या छावणीतली एक लक्ष पंच्याऐंशी हजार माणसे मारली. सकाळी लोक उठून पाहतात तर सर्वत्र प्रेतांचा खच पडलेला. तेव्हा अश्शूरचा राजा सन्हेरीब निनवे येथे, जिथे तो अगोदर होता तिथे निघून गेला. एक दिवस सन्हेरीब आपले दैवत निस्रोख याच्या देवळात पूजा करत होता. तेव्हा त्याचीच मुले अद्रम्मेलेक आणि शरेसर यांनी त्यास तलवारीने मारले. मग ते अरारात देशात निघून गेले. सन्हेरीबच्या जागी त्याचा मुलगा एसरहद्दोन राज्य करु लागला.त्याच वेळी जगात
इ.स.पू. 701 मध्ये अश्शूरचा राजा सन्हेरीब याने यहूदावर स्वारी केली, आणि राजा हिज्कीयाच्या अधिपत्याखालील यरूशलेम वाचले. संदेष्टा यशया सुमारे इ.स.पू. 740 पासून कार्यरत होता. हे आहे यशयाच्या आयुष्यकाळातील जग.
रोमन परंपरेनुसार रोम्युलसने 21 एप्रिल इ.स.पू. 753 रोजी रोमची स्थापना केली — यशयाला पाचारण होण्याच्या काही वर्षे आधी (यशया 6:1). पुरातत्त्वशास्त्र दाखवते की पॅलेटाइन टेकडीवर त्याहूनही आधी गावे होती.
जवळजवळ याच काळात इलियड आणि ओडिसी यांना आपल्याला माहीत असलेले लिखित रूप मिळाले; विद्वान त्यांचा काळ सुमारे इ.स.पू. 750 ते 650 दरम्यान ठरवतात. ग्रीकांनी अलीकडेच फिनिशियन अक्षरे स्वीकारली होती.
लू या चिनी राज्याचे इतिवृत्त, “वसंत आणि शरद इतिवृत्त”, इ.स.पू. 722 पासून सुरू होते — ज्या वर्षी शोमरोन अश्शूरच्या हाती पडले (2 राजे 17:6). परंपरेनुसार नंतर कन्फ्यूशियसने त्याचे संपादन केले.
2 राजे 19:9 सांगते की कूशाचा राजा तिऱ्हाका सन्हेरीबशी लढायला बाहेर पडला. तहार्का इ.स.पू. 690 मध्ये फारो झाला; एका मतानुसार 701 मध्ये त्याने तरुण राजपुत्र म्हणून सैन्याचे नेतृत्व केले; तपशिलांविषयी विद्वानांमध्ये चर्चा आहे.
घोडेस्वार सिथियन पूर्वेकडून काळ्या समुद्राच्या उत्तरेकडील गवताळ प्रदेशात आले. त्यांच्या सरदारांना नंतर कुर्गान नावाच्या मोठ्या ढिगाऱ्यांखाली उत्तम सोन्याच्या कलाकृतींसह पुरले गेले; त्यांपैकी अनेक आजच्या युक्रेनमध्ये आणि दक्षिण रशियात सापडले आहेत.
स्रोत: Theographic Bible Metadata, CC BY-SA 4.0 · OpenBible.info, CC BY 4.0 · इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क