अश्शूरचा शल्मनेसेर तिसरा याने सिरियातील ओरोंटिस नदीवरील कर्कर येथे राजांच्या एका आघाडीशी लढाई केली. आज ब्रिटिश संग्रहालयात असलेल्या कुर्ख एकाश्मस्तंभावरील त्याच्या शिलालेखात 2,000 रथ आणि 10,000 सैनिकांसह “इस्राएली अहाब” याची नोंद आहे. शल्मनेसेरने विजयाचा दावा केला, पण पुढील अनेक वर्षे तो पुढे सरकला नाही.
बायबलमध्ये · सुमारे इ.स.पू. 860 · कर्मेल पर्वत
कर्मेल पर्वतावर एलीया
अहाब राजाच्या दिवसांत एलीया भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावर उंच असलेल्या कर्मेल पर्वतावर बआलाच्या संदेष्ट्यांना आव्हान देतो.
तेव्हा, सर्व इस्राएलींना आणि संदेष्ट्यांना अहाबाने निरोप पाठवून कर्मेल पर्वतावर बोलावून घेतले. तेव्हा एलीया सर्व लोकांजवळ येऊन म्हणाला, “तुम्ही कोठवर आपले मन बदलत राहणार? जर परमेश्वर खरा देव असेल तर त्यास अनुसरा. पण बआल खरा देव असेल तर त्यास अनुसरा.” लोक यावर एका शब्दानेही त्यास उत्तर देऊ शकले नाही. मग एलीया लोकांस म्हणाला, “मी, मीच फक्त परमेश्वराचा संदेष्टा असा राहलो आहे, पण बआलाचे चारशेपन्नास संदेष्टे आहेत. तेव्हा त्यांनी आम्हांला दोन गोऱ्हे द्यावे, त्यांनी आपणासाठी त्यातून एक गोऱ्हा निवडून त्याचे तुकडे करावे व लाकडे रचून त्यावर ठेवावे, मात्र त्याखाली विस्तव पेटवू नये. मग मी दुसरा गोऱ्हा तयार करून ठेवीन व विस्तव लावणार नाही. तेव्हा तुम्ही आपल्या देवाचे नाव घ्या व मी परमेश्वराचे नाव घेईन, आणि जो देव अग्नीच्या द्वारे उत्तर देईल तोच खरा देव.” तेव्हा सर्व लोकांनी उत्तर देऊन म्हटले, “हे चांगले आहे.” मग एलीया बआलाच्या संदेष्ट्यांना म्हणाला, “तुम्ही बरेचजण आहात, तेव्हा पहिल्याने तुम्ही आपणासाठी एक गोऱ्हा निवडून घेऊन तयार करा आणि विस्तव न लावता आपल्या देवाचे नाव घ्या.” तेव्हा त्यांना दिलेला गोऱ्हा त्यांनी घेऊन तयार केला, आणि सकाळ पासून दुपारपर्यंत त्यांनी बआलाचे नाव घेऊन त्यास हाक मारून म्हटले, “हे बाला, आमच्या हाकेला उत्तर दे.” पण कसलीही वाणी नव्हती आणि उत्तर देणाराही कोणी नव्हता. जी वेदी त्यांनी बांधली होती तिच्या भोवती ते नाचू लागले. दुपारी एलीया त्यांची थट्टा करायला लागला. तो त्यांना म्हणाला, “बाल खरच देव असेल तर तुम्ही आणखी मोठ्याने प्रार्थना करा. कदाचित् तो अजून विचारात असेल. किंवा कदाचित् कामात गुंतलेला असेल. एखादयावेळी प्रवासात किंवा झोपेत असले. तेव्हा आणखी मोठ्याने प्रार्थना करून त्यास उठवा.” तेव्हा त्या संदेष्ट्यांनी मोठमोठ्याने प्रार्थना केली. भाल्यांनी आणि सुऱ्यांनी स्वत:वर वार करून घेतले. (ही त्यांची पूजेची पध्दत होती) त्यांचे अंग रक्ताळले. दुपार उलटली पण लाकडे पेटली नाहीत. संध्याकाळच्या यज्ञाची वेळ होत आली तोपर्यंत ते भविष्य सांगत होते. पण काहीही घडले नाही बालाकडून प्रतिसाद मिळाला नाही. कुठलाही आवाज आला नाही. कारण ऐकणारेच कोणी नव्हते! मग एलीया सर्व लोकांस उद्देशून म्हणाला, “आता सगळे माझ्याजवळ या.” तेव्हा सगळे त्याच्याभोवती जमले. परमेश्वराच्या वेदीची मोडतोड झालेली होती. तेव्हा एलीयाने आधी ते सर्व नीट केले. एलीयाने बारा दगड घेतले. प्रत्येकाच्या नावाचा एकेक याप्रमाणे बारा वंशांचे ते बारा दगड होते. याकोबाच्या बारा मुलांच्या नावाचे ते वंश होते. याकोबालाच परमेश्वराने इस्राएल या नावाने संबोधले होते. परमेश्वराच्या सन्मानार्थ हे दगड वेदीच्या डागडुजीसाठी एलीयाने वापरले. मग त्याने वेदीभोवती एक चर खणला. सात गंलन पाणी मावण्याइतकी त्याची खोली आणि रुंदी होती. एलीयाने मग वेदीवर लाकडे रचली. “गोऱ्हा कापला. त्याचे तुकडे लाकडावर ठेवले.” मग तो म्हणाला, “चार घागरी भरुन पाणी घ्या आणि ते मांसाच्या तुकड्यावर आणि खालच्या होमार्पणाच्या लाकडावर ओता.” ते झाल्यावर दुसऱ्यांदा आणि मग तिसऱ्यांदा त्याने तसेच करायला सांगितले. वेदीवरुन वाहात जाऊन ते पाणी खालच्या चरात साठले. दुपारच्या यज्ञाची वेळ झाली. तेव्हा संदेष्टा एलीया वेदीपाशी गेला आणि त्याने प्रार्थना केली, “परमेश्वरा, अब्राहाम, इसहाक आणि याकोब यांच्या देवा, तूच इस्राएलचा देव आहेस हे तू आता सिध्द करून दाखवावेस अशी माझी तुला विनंती आहे. हे सर्व तूच माझ्याकडून करवून घेतलेस हे यांना कळू दे. मी तुझा सेवक आहे हे ही कळू दे. हे परमेश्वरा, माझ्या विनवणीकडे लक्ष दे. तूच खरा परमेश्वर देव आहेस हे यांना दाखव. म्हणजे तू त्यांना पुन्हा स्वत:जवळ घेत आहेस हे त्यांना पटेल.” तेव्हा परमेश्वराने अग्नी पाठवला. यज्ञ, लाकडे, दगड, वेदीभोवतीची जमीन हे सर्व पेटले. भोवतीच्या चरातले पाणी सुध्दा त्या अग्नीने सुकून गेले. सर्वांच्या देखतच हे घडले. तेव्हा लोकांनी जमीनीवर पालथे पडून “परमेश्वर हाच देव आहे, परमेश्वर हाच देव आहे” असे म्हटले. एलीया म्हणाला, “त्या बआलाच्या संदेष्ट्यांना पकडून आणा. त्यांना निसटू देऊ नका” तेव्हा लोकांनी त्या सगळ्यांना धरले एलीयाने मग त्यांना किशोन झऱ्याजवळ नेले आणि तेथे सर्व संदेष्ट्यांची हत्या केली.त्याच वेळी जगात
कर्मेल पर्वतावरील एलीयाची स्पर्धा इस्राएलचा राजा अहाब (सुमारे इ.स.पू. 874–853) याच्या कारकिर्दीत घडते. बायबलबाहेरील लेखात नाव आलेला अहाब हा इस्राएलचा पहिला राजा आहे: एक अश्शूरी शिलालेख कर्कर येथील लढाईत त्याच्या रथांची नोंद करतो. हे आहे इ.स.पू. 9व्या शतकाच्या मध्यातील जग.
मवाबचा राजा मेशा याने दीबोन येथे एक शिलास्तंभ उभारला; त्यावर इस्राएलचा राजा अम्री आणि त्याच्या मुलाने मवाबला कसे दडपले आणि त्याने त्याला कसे मुक्त केले, हे सांगितले आहे. 2 राजे 3 मेशाशी झालेल्या युद्धाची कथा इस्राएलच्या बाजूने सांगते. हा शिलास्तंभ लूव्रमध्ये आहे.
परंपरेनुसार, राजकन्या एलिसा — जी डायडो म्हणून अधिक ओळखली जाते — हिच्या नेतृत्वाखाली सोरहून आलेल्या वसाहतकऱ्यांनी इ.स.पू. 814 मध्ये आजच्या ट्युनिशियात कार्थेज स्थापले. अहाबाची राणी ईजबेल त्याच फिनिशियन किनाऱ्यावरून आली होती: ती सीदोन्यांचा राजा एथबाल याची कन्या होती (1 राजे 16:31).
अथेनै येथे कुंभार फुलदाण्यांवर वळणदार नक्षी, नागमोडी रेषा आणि वर्तुळांचे पट्टे रंगवत, आणि नंतर शोक करणारे, घोडे आणि रथ यांच्या लहान आकृत्याही. या शैलीच्या मोठ्या फुलदाण्या कबरींवर खुणा म्हणून उभ्या केल्या जात.
मिसरवर तानिस आणि बुबास्तिस येथून लिबियन वंशाचे राजे राज्य करत होते. ओसोर्कोन दुसरा याने बुबास्तिसच्या मंदिरात एक उत्सव-सभागृह बांधले; त्याचे नाव असलेल्या अलाबास्त्राच्या पात्राचा एक तुकडा शोमरोनमधील, अहाब जेथे राज्य करत होता त्या राजवाड्यात सापडला.
झोउच्या राजधानीतील लोकांनी कठोर राजा ली याच्याविरुद्ध उठाव करून त्याला हाकलून दिले. याच वर्षापासून इतिहासकार सिमा च्यान चीनच्या इतिहासाचे वर्षवार तक्ते सुरू करतो; चिनी नोंदींतील ही पहिली अचूक तारीख आहे.
पेरूच्या अँडीज पर्वतांत उंचावर चाविन दे ह्वांतारच्या लोकांनी आतून अंधाऱ्या दालनांचे दगडी मंदिर बांधले, आणि त्याच्या बाहेरील भिंतींवर हिंस्र प्राण्यांची कोरीव डोकी बसवली; दूरदूरहून यात्रेकरू तेथे येत.
स्रोत: Theographic Bible Metadata, CC BY-SA 4.0 · OpenBible.info, CC BY 4.0 · इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क