नबुखद्नेस्सरने बाबेल भव्य प्रमाणात पुन्हा बांधले. निळ्या चकचकीत विटांनी मढवलेले आणि बैल व ड्रॅगन यांच्या रांगांनी सजलेले त्याचे इश्तार द्वार उत्खननात सापडलेल्या तुकड्यांतून बर्लिनमध्ये पुन्हा उभारले गेले.
बायबलमध्ये · इ.स.पू. 587/586 · यरूशलेम
यरूशलेमेचा पाडाव
नबुखद्नेस्सराचे बाबेली सैन्य यरूशलेमेत घुसते, मंदिर जाळते आणि लोकांना बंदिवासात नेते.
सिद्कीयाने बाबेलाच्या राजाविरुध्द बंड केले आणि त्याच्या आज्ञा पाळण्याचे त्याने नाकारले. त्यामुळे बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर आपल्या सैन्यासह यरूशलेमेवर चाल करून गेला. सिद्कीयाच्या कारकिर्दीचे ते नववे वर्ष, दहावा महिना, दहावा दिवस होता. नबुखद्नेस्सरच्या सैन्याने यरूशलेमेला वेढा देऊन लोकांचे येणे जाणे रोखले. मग त्याने नगराभोवती कचऱ्याचे अडसर निर्माण केले. सिद्कीया राजाच्या कारकिर्दीचे अकरावे वर्ष उजाडेपर्यंत या नगराला वेढा चालू राहिला. दुष्काळाने परिस्थिती बिकट झाली होती. चौथ्या महिन्याच्या नवव्या दिवसापर्यंत नगरातील सामान्य मनुष्याची अन्नान्नदशा झाली. मग नगराच्या तटाला एक खिंड पाडण्यात आली; दोन्ही तटांच्यामध्ये जी वेस राजाच्या बागेजवळ होती त्या वाटेने सर्व योद्धे रातोरात पळून गेले; नगरास खास्द्यांचा वेढा पडलाच होता; इकडे राजाने अराबाचा रस्ता धरला. खास्दी सैन्याने राजाचा पाठलाग केला आणि त्यांना यरीहोजवळ गाठले. तेव्हा सिद्कीयाचे सैन्य त्यास एकटा सोडून पळून गेले. बाबेल देशाच्या लोकांनी राजा सिद्कीयाला धरुन रिब्ला येथे आपल्या राजाकडे नेले. या लोकांनी सिद्कीयाला जबर शासन करण्याचे ठरवले. त्यांनी सिद्कीयाच्या मुलांना त्याच्या नजरेसमोर जिवे मारले. नंतर सिद्कीयाचे डोळे काढले आणि त्यास जेरबंद करून बाबेलला नेले. बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर याच्या कारकिर्दीच्या एकोणिसाव्या वर्षी, पाचव्या महिन्यात सातव्या दिवशी नबूजरदान यरूशलेमेवर चाल करून आला. नबुजरदान हा राजाच्या उत्तम, निवडक सैन्याचा नायक होता. या नबुजरदानने परमेश्वराचे मंदिर, राजवाडा आणि यरूशलेममधील सर्व घरे जाळून टाकली. मोठमोठे वाडेही त्याने उद्ध्वस्त केले. मग खास्दी सैन्याने यरूशलेमची तटबंदी पाडली. नगरात अजून असलेले लोक बाबेलाच्या राज्याकडे फितून गेलेले लोक व उरलेले लोक यांना गारद्यांचा नायक नबूजरदानाने ताब्यात घेतले आणि त्यांच्यापैकी जे शरण यायला तयार होते त्यांच्यासह सर्वांना कैदी म्हणून नेले. अगदीच दरिद्री लोकांस तेवढे त्याने तेथेच राहू दिले. द्राक्षमळे आणि शेतीची देखभाल करण्यासाठी त्याने त्यांना तिथे ठेवले. परमेश्वराच्या मंदिरातील सर्व पितळी पात्रांची खास्दी सैन्याने मोडतोड केली. पितळी खांब, ढकलगाड्या, मोठमोठी पितळी घंगाळी यांची मोडतोड करून ते पितळ त्यांनी बाबेलला नेले. इतर पात्रे, फावडी, वाती कापण्याच्या कात्र्या, पळ्या, पितळी थाळ्या ही परमेश्वराच्या मंदिरातली सर्व उपकरणेही त्यांनी घेतली. अग्नीपात्रे, वाडगे, सोने-चांदीच्या लोभापायी सोन्यारुप्याची भांडीही नबुजरदानने हस्तगत केली. अशाप्रकारे, नबुजरदानने बळकावलेल्या वस्तू दोन पितळी स्तंभ. एक मोठे पितळी घंगाळ परमेश्वराच्या मंदिरासाठी शलमोनने करवून घेतलेल्या ढकलगाड्या, यांत इतके पितळ होते की त्याचे वजन करणे शक्य नव्हते. प्रत्येक स्तंभाची उंची सत्तावीस फूट त्यावरील कळस साडेचार फूट उंचीचे तेही पितळी असून त्यावर जाळीकाम आणि डाळिंबाची नक्षी होती, दोन्ही स्तंभ अगदी सारखेच होते. नबुजरदानने लोकांस मंदिरातून खाली नेले व मुख्य याजक सराया दुय्यम याजक सफन्या आणि तीन द्वारपाल आणि शहरातून एक सैन्याधिकारी अजूनही नगरात असलेले राजाचे पांच सल्लागार सैन्याधिकाऱ्याचा सचिव. हा जनगणना प्रमुख असून सैनिकांची निवड करत असे. शहरात सापडलेली साठ माणसेही त्याने घेतली. बाबेलातील रिब्ला येथे नबूजरदानाने या सर्वांना राजासमोर हजर केले. बाबेलाच्या राजाने त्या सर्वांची हमाथ देशातील रिब्ला येथे हत्या केली. अशाप्रकारे यहूदी यांना आपल्या भूमीतून बंदीवान म्हणून जावे लागले.त्याच वेळी जगात
बाबेलच्या नबुखद्नेस्सरने इ.स.पू. 597 मध्ये यरूशलेम घेतले आणि इ.स.पू. 587 किंवा 586 मध्ये ते नष्ट केले (स्रोत दोन्ही तारखांना वाव देतात). एक बाबेली इतिवृत्त-पाटी पहिल्यांदा नगर घेतल्याचा दिवसही देते: अदारचा 2रा दिवस, इ.स.पू. 597 च्या मार्चच्या मध्यात. हे आहे त्या वर्षांतील जग.
हेरोडोटस सांगतो की मिलेतचा तत्त्वज्ञ थेल्स याने सूर्यग्रहणाचे भाकीत केले होते, आणि त्या ग्रहणाने लिडियन आणि माद्य यांच्यातील लढाई थांबली; खगोलशास्त्रज्ञ ते 28 मे इ.स.पू. 585 रोजी झाल्याचे ठरवतात. थेल्सने खरोखर ते भाकीत केले होते का, याबद्दल मतभेद आहेत.
आजच्या पश्चिम तुर्कस्तानातील लिडियामध्ये पहिली नाणी इलेक्ट्रमपासून — सोने आणि चांदी यांच्या नैसर्गिक मिश्रणापासून — पाडली गेली, आणि त्यांच्यावर सिंहाच्या डोक्याचा ठसा होता. त्यापूर्वी चांदी तोलून दिली जात असे, याची आठवण शेकेल, म्हणजे “वजन”, हा शब्द करून देतो.
मगिद्दो येथे राजा योशीयाला ठार मारणाऱ्या फारो नखो दुसरा याने (2 राजे 23:29) नाईलपासून तांबड्या समुद्रापर्यंत कालवा खोदण्यास सुरुवात केली. हेरोडोटस असेही सांगतो की त्याने पाठवलेल्या खलाशांनी आफ्रिकेभोवती प्रदक्षिणा केली.
मिलेतहून आलेल्या ग्रीकांनी काळ्या समुद्राच्या उत्तर किनाऱ्यावर व्यापारी नगरे स्थापली: सुमारे इ.स.पू. 600 मध्ये पँटिकापेयम — आजचे क्रिमियातील केर्च — आणि आजच्या युक्रेनमधील दक्षिण बुगच्या मुखाजवळ ओल्बिया. ते धान्य आणि मासे यांच्या बदल्यात द्राक्षारस आणि जैतुनाचे तेल देत.
उत्तर भारतात गंगा आणि तिच्या उपनद्यांवरील नव्या नगरांभोवती सोळा राज्ये आणि गणराज्ये, म्हणजे महाजनपदे (Mahajanapadas), उदयाला आली. त्यांपैकी एक, मगध, पुढे भारतातील पहिल्या मोठ्या साम्राज्यांचा गाभा बनले.
स्रोत: Theographic Bible Metadata, CC BY-SA 4.0 · OpenBible.info, CC BY 4.0 · इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क