दैनंदिन जीवन
बायबलमध्ये नृत्य
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी मधील 21 उतारे, ओळीनुसार.
- समुद्र पार केल्यावर मिर्याम आणि स्त्रिया डफ घेऊन नाचतातनिर्ग 15:20
वचने
निर्ग 15:20त्यानंतर अहरोनाची बहीण मिर्याम संदेष्टी हिने हाती डफ घेतला आणि ती व इतर स्त्रिया नाचू लागल्या. मिर्याम हे गीत पुन्हा पुन्हा गात होती;
- मोशे वासरू आणि नाचणे पाहतोनिर्ग 32:19
वचने
निर्ग 32:19मोशे छावणीजवळ येऊन पोहोचल्यावर त्याने ते सोन्याचे वासरू व लोकांच्या नाचगाण्यांचा धिंगाणा पाहिला आणि तो भयंकर संतापला; त्याने आपल्या हातातल्या दगडी पाट्या खाली डोंगराच्या पायथ्याशी फेकून फोडून टाकल्या.
- इफ्ताहाची मुलगी नाचत त्याला भेटायला बाहेर येतेशास्ते 11:34
वचने
शास्ते 11:34मग इफ्ताह मिस्पात आपल्या घरी आला; तेव्हा पाहा, त्याची कन्या त्यास भेटायला डफ व नाचणारे यांच्यासह बाहेर आली; ती तर त्याचे एकुलते एक मूल होती; तिच्याशिवाय त्यास पुत्र किंवा कन्या नव्हती.
- वार्षिक सणात शिलोच्या मुली नाचतातशास्ते 21:19–21
वचने
शास्ते 21:19–21नंतर ते म्हणाले, “शिलोम छावणीमध्ये परमेश्वर देवासाठी दरवर्षी सण असतो, ते बेथेलच्या उत्तरेस, जो रस्ता बेथेलापासून शखेमास चढून जातो, त्याच्या पूर्वेकडे आणि लबानोच्या दक्षिणेस आहे.” त्यांनी बन्यामिनी लोकांस अशी आज्ञा दिली की, “तुम्ही द्राक्षमळ्यांमध्ये जा आणि लपून राहा. मग जेव्हा शिलोतल्या मुली नाचायला निघतील, तेव्हा तुम्ही द्राक्षमळ्यांतून बाहेर निघून प्रत्येकाने आपल्यासाठी शिलोतल्या कन्येतून पत्नी करून घ्यावी, आणि मग बन्यामिनाच्या देशास परत मागे जावे.
- स्त्रिया नाचत गातात: “शौलाने हजारास मारले”1 शमु 18:6–7, 1 शमु 21:11
वचने
1 शमु 18:6–7मग असे झाले की, ते त्या पलिष्ट्याला मारून माघारी आले, तेव्हा स्त्रिया इस्राएलच्या सर्व नगरातून गात व नाचत, डफ व झांज वाजवीत शौल राजाची भेट घ्यावयास निघाल्या. त्या स्त्रिया नाचत असता एकमेकीस उत्तर देऊन असे गात होत्या की, “शौलाने हजारास मारले आणि दावीदाने दहा हजारास मारले.”
1 शमु 21:11तेव्हा आखीशाचे दास त्यास म्हणाले, “हा दावीद देशाचा राजा आहे की नाही: शौलाने हजार व दावीदाने दहा हजार मारले आहेत; असे ते त्याच्याविषयी एकमेकांना गाऊन म्हणत नाचत होते की नाही?”
- दावीद कोशापुढे आपल्या सर्व शक्तीने नृत्य करतो2 शमु 6:14–16
वचने
2 शमु 6:14–16सुती एफोद घालून दावीद परमेश्वरापुढे नृत्य करत होता. दावीद आणि सर्व इस्राएल लोक आनंदाने बेभान झाले होते. नगरात परमेश्वराचा कोश आणताना ते जयजयकार करत होते. शिंग वाजवत होते. शौलाची कन्या मीखल हे सर्व खिडकीतून पाहत होती. परमेश्वराचा कोश नगरात आणत असताना दावीद त्याच्यापुढे नाचत उड्या मारत होता. मीखलने हे पाहिले तेव्हा तिला त्याचा विट वाटला. दावीद स्वतःचे हसे करून घेत आहे असे तिला वाटले.
- मीखल राजा दावीदाला नाचताना पाहते आणि त्याला तुच्छ लेखते1 इति 15:29
वचने
1 इति 15:29पण परमेश्वराच्या कराराचा कोश दावीद नगरात पोहचला तेव्हा शौलाची कन्या मीखल हिने खिडकीतून बाहेर पाहिले. तिने दावीद राजाला नाचताना, जल्लोष करताना पाहून तिने आपल्या अंतःकरणात त्यास तुच्छ लेखले.
- मुले डफ आणि वीणेच्या तालावर बागडतातईयो 21:11–12
वचने
ईयो 21:11–12ते आपल्या मुलांना वासराप्रमाणे बाहेर खेळायला पाठवतात. त्यांची मुले सभोवती नाचत असतात. ते डफ आणि वीणेच्या आवाजावर गातात आणि ते पावांचा नाद ऐकुण आनंदी होतात.
- “तू माझे शोक करणे, नाचण्यात पालटवला आहे”स्तोत्र 30:11
वचने
स्तोत्र 30:11तू माझे शोक करणे, नाचण्यात पालटवला आहे. तू माझे गोणताट काढून मला हर्षाचे वस्र नेसवले आहेत.
- डफ आणि नृत्याने त्याची स्तुती करास्तोत्र 149:3, स्तोत्र 150:4
वचने
स्तोत्र 149:3ते त्याच्या नावाची स्तुती नाचून करोत; ते त्याच्या स्तुतीचे गीत डफाने आणि वीणेने करो.
स्तोत्र 150:4डफ वाजवून आणि नाचून त्याची स्तुती करा; तंतुवाद्याने आणि वायुवाद्याने त्याची स्तुती करा.
- शोक करण्याचा समय आणि नाचण्याचा समयउप 3:4
वचने
उप 3:4रडण्याची वेळ आणि हसण्याचीही वेळ असते. शोक करण्याची वेळ आणि नाचण्याचीही वेळ असते.
- महनाईमचे नृत्यगीत 6:13
वचने
गीत 6:13मागे फिर, परत ये, हे शुलेमकरिणी परिपूर्ण स्त्री, मागे फिर, मागे फिर म्हणजे आम्ही तुला बघू शकू, त्या परिपूर्ण स्त्रीकडे तुम्ही टक लावून का पाहता? जसे मी दोन नृत्य करणाऱ्याच्या रांगेत नृत्य करत आहे काय?
- कुमारी नृत्याने आनंद करतात, तरुण आणि वृद्धहीयिर्म 31:4, यिर्म 31:13
वचने
यिर्म 31:4हे इस्राएलाच्या कुमारी, मी तुला पुन्हा बांधीन याकरिता तू बांधलेली होशील. तू पुन्हा आपल्या खंजिऱ्या उचलशील आणि आनंदाने नृत्य करीत बाहेर जाशील.
यिर्म 31:13मग कुमारी आनंदीत होऊन नाचतील आणि तरुण व वृद्ध एकत्र आनंद करतील. कारण मी त्यांच्या शोकाचे रुपांतर उत्सवामध्ये करीन. मी त्यांच्यावर दया करीन आणि दुःखाच्याऐवजी त्यांच्या आनंदाचे कारण होईल.
- “आमच्या नृत्याचे रूपांतर आता मृतांच्या शोकात झाले आहे”विला 5:15
वचने
विला 5:15आमच्या नृत्याचे रूपांतर आता मृतांच्या शोकात झाले आहे. आमच्या हृदयात आनंदाचा अंशही नाही.
- बाजारातील मुले: “आम्ही तुमच्यासाठी संगीत वाजवले तरी तुम्ही नाचला नाहीत”मत्त 11:17
वचने
मत्त 11:17आम्ही तुमच्यासाठी संगीत वाजवले तरी तुम्ही नाचला नाहीत. आम्ही विलाप केला तरी तुम्ही ऊर बडवून घेतले नाही.
- परत आलेल्या मुलासाठी गाणे-बजावणे आणि नृत्यलूक 15:25
वचने
लूक 15:25यावेळेस, त्याचा वडील मुलगा शेतात होता. तो घराकडे परतला आणि घराजवळ आल्यावर, त्याने गायनवादन व नाचण्याचा आवाज ऐकला.
- हेरोदाच्या वाढदिवसाच्या मेजवानीत हेरोदीयाची मुलगी नाचतेमत्त 14:6–7, मार्क 6:22
वचने
मत्त 14:6–7हेरोदाच्या वाढदिवशी हेरोदियाच्या मुलीने दरबारात नाच करून हेरोदाला खूश केले. त्यामुळे त्याने शपथ वाहून ती जे काही मागेल ते देण्याचे अभिवचन तिला दिले.
मार्क 6:22हेरोदीयाच्या मुलीने स्वतः आत जाऊन नाच करून हेरोद व आलेल्या पाहुण्यांना आनंदित केले. तेव्हा हेरोद राजा मुलीला म्हणाला, “तुला जे पाहिजे ते माग म्हणजे मी ते तुला देईन.”
स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क