दैनंदिन जीवन
बायबलमध्ये भाऊ
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी मधील 42 उतारे, ओळीनुसार.
- अब्राम आपला पुतण्या लोट याला: “शेवटी आपण एक कुटुंब आहोत”उत्प 12:5, उत्प 13:8
वचने
उत्प 12:5अब्रामाने त्याची पत्नी साराय, त्याच्या भावाचा मुलगा लोट आणि हारान प्रदेशामध्ये त्यांनी जमा केलेली सर्व मालमत्ता, आणि हारानात विकत घेतलेले लोक या सर्वांना बरोबर घेतले. ते कनान देशात जाण्यासाठी निघाले आणि कनान देशात आले.
उत्प 13:8तेव्हा अब्राम लोटाला म्हणाला, “तुझ्यामध्ये व माझ्यामध्ये, तसेच तुझे गुराखी व माझे गुराखी यांच्यामध्ये भांडण नसावे. शेवटी आपण एक कुटुंब आहोत.
- काइन हाबेलाला मारतो: “मी माझ्या भावाचा राखणदार आहे काय?”उत्प 4:8–9
वचने
उत्प 4:8–9काइन आपला भाऊ हाबेल याच्याशी बोलला, आणि असे झाले की ते शेतात असता, काइन आपला भाऊ हाबेल ह्याच्या विरूद्ध उठला व त्यास त्याने ठार मारले. परमेश्वर काइनास म्हणाला, “तुझा भाऊ हाबेल कोठे आहे?” काइनाने उत्तर दिले, “मला माहीत नाही; मी माझ्या भावाचा राखणदार आहे काय?”
- एसाव वरणासाठी आपला ज्येष्ठत्वाचा हक्क याकोबाला विकतोउत्प 25:29–34
वचने
उत्प 25:29–34याकोबाने वरण शिजवले. एसाव शिकारीहून परत आला, आणि तो भुकेने व्याकुळ झाला होता. एसाव याकोबास म्हणाला, “मी तुला विनंती करतो, मला थोडे तांबडे डाळीचे वरण खायला घेऊ दे. मी फार दमलो आहे!” म्हणून त्याचे नाव अदोम पडले. याकोब म्हणाला, “पहिल्यांदा तुझ्या ज्येष्ठपणाचा हक्क मला विकत दे.” एसाव म्हणाला, “पाहा, मी मरायला लागलो आहे. या ज्येष्ठपणाच्या हक्काचा मला काय उपयोग आहे?” याकोब म्हणाला, “प्रथम, तू माझ्याशी शपथ घे.” तेव्हा एसावाने तशी शपथ घेतली आणि अशा रीतीने त्याने आपल्या ज्येष्ठपणाचा हक्क याकोबाला विकला. याकोबाने त्यास भाकर व मसुरीच्या डाळीचे वरण दिले. त्याने ते खाल्ले व पाणी पिऊन झाल्यावर उठला व तेथून त्याच्या मार्गाने निघून गेला. अशा रीतीने एसावाने त्याच्या ज्येष्ठपणाचा हक्क तुच्छ मानला.
- वडिलांच्या मृत्यूनंतर याकोबाला मारण्याचा एसाव बेत करतोउत्प 27:41
वचने
उत्प 27:41त्यानंतर आपल्या वडिलाने त्यास जो आशीर्वाद दिला होता त्यामुळे एसाव याकोबाचा द्वेष करू लागला. एसाव त्याच्या मनात म्हणाला, “माझ्या पित्याकरिता शोक करण्याचे दिवस जवळ आले आहेत. त्यानंतर मी माझा भाऊ याकोब याला ठार मारीन.”
- याकोबाला एसावाची आणि त्याच्या चारशे माणसांची भीती वाटतेउत्प 32:6–7
वचने
उत्प 32:6–7निरोपे याकोबाकडे परत आले आणि म्हणाले, “आम्ही आपला भाऊ एसाव याच्याकडे गेलो व त्यास भेटलो. तो आपणाला भेटावयास येत आहे. त्याच्या बरोबर चारशे माणसे आहेत.” तेव्हा याकोब घाबरला आणि अस्वस्थ झाला. त्याने आपल्या सोबत असणाऱ्या लोकांच्या दोन टोळ्या केल्या, तसेच शेरडेमेंढरे, गुरेढोरे आणि उंट व गाढवे यांच्याही त्याने दोन टोळ्या केल्या.
- एसाव याकोबाला मिठी मारायला धावतो, आणि दोघेही रडतातउत्प 33:4
वचने
उत्प 33:4एसावाने जेव्हा याकोबाला पाहिले तेव्हा त्यास भेटण्यास तो धावत गेला आणि त्यास आलिंगन दिले. त्याने गळ्यात गळा घालून याकोबाला मिठी मारली. त्याचे चुंबन घेतले, आणि ते दोघे रडले.
- शिमोन आणि लेवी आपली बहीण दीना हिचा सूड घेतातउत्प 34:25, उत्प 34:31
वचने
उत्प 34:25तीन दिवसानंतर, सुंता केलेले लोक जखमांच्या वेदनांनी बेजार झालेले असताना, याकोबाची दोन मुले शिमोन व लेवी म्हणजे दीनाचे भाऊ यांनी आपआपली तलवार घेतली व ते नगर बेसावध असता त्यांनी तेथील सर्व पुरुषांना ठार मारले.
उत्प 34:31परंतु शिमोन आणि लेवी म्हणाले, “शखेमाने आमच्या बहिणीशी वेश्येशी वागतात तसे वागावे काय?”
- रऊबेन योसेफाला खड्ड्यातून सोडवण्याचा प्रयत्न करतोउत्प 37:21–22, उत्प 37:29
वचने
उत्प 37:21–22रऊबेनाने ते ऐकले आणि त्यास त्यांच्या हातातून सोडवले. तो म्हणाला, “आपण त्यास ठार मारू नये.” रऊबेन त्यांना म्हणाला, “रक्त पाडू नका. त्यास रानातल्या या खड्ड्यात टाका, परंतु त्याच्यावर हात टाकू नका.” आपल्या भावांच्या हातातून सोडवून त्यास त्याच्या बापाकडे परत पाठवून द्यावयाचे असा त्याचा बेत होता.
उत्प 37:29रऊबेन त्या खड्ड्याकडे परत गेला, तेव्हा पाहा, त्यामध्ये त्यास योसेफ दिसला नाही. त्याने आपली वस्त्रे फाडली.
- यहूदा: “आपण त्यास या इश्माएली लोकांस विकून टाकू” — “कारण तो आपला भाऊ आहे”उत्प 37:26–27
वचने
उत्प 37:26–27तेव्हा यहूदा त्याच्या भावांना म्हणाला, “आपल्या भावाला ठार मारून आणि त्याचा खून लपवून ठेवून आपल्याला काय फायदा? चला, आपण त्यास या इश्माएली लोकांस विकून टाकू, आपण आपल्या भावावर हात टाकू नये. कारण तो आपला भाऊ आहे, आपल्याच हाडामांसाचा आहे.” त्याच्या भावांनी त्याचे ऐकले.
- “आम्ही तुमचे दास, बारा भाऊ” — “आमच्यातला एक जिवंत नाही”उत्प 42:13
वचने
उत्प 42:13ते म्हणाले, “आम्ही तुमचे दास, बारा भाऊ, कनान देशातील एकाच मनुष्याचे बारा पुत्र आहोत. पाहा, आमचा सर्वांत धाकटा भाऊ घरी बापाजवळ आहे आणि आमच्यातला एक जिवंत नाही.”
- बन्यामिनाला पाहून योसेफ रडण्यासाठी खासगी खोलीत जातोउत्प 43:30
वचने
उत्प 43:30मग योसेफ घाईघाईने खोलीबाहेर निघून गेला. आपला भाऊ बन्यामीन याच्यासाठी त्याची आतडी तुटू लागली आणि कोठे तरी जाऊन रडावे असे त्यास वाटले. तो आपल्या खोलीत गेला व तेथे रडला.
- बन्यामिनाऐवजी आपण दास म्हणून राहू असे यहूदा म्हणतोउत्प 44:33–34
वचने
उत्प 44:33–34म्हणून आता, मी तुम्हास विनंती करतो, मला, तुमच्या या सेवकाला या मुलाच्याऐवजी माझ्या धन्याचा गुलाम म्हणून ठेवून घ्या. मुलाला त्याच्या भावांबरोबर जाऊ द्या. माझ्या बापाकडे मी माघारी कसा जाऊ? माझ्या बापाचे वाईट होईल ते मला पाहावे लागेल याची मला भयंकर भीती वाटते.”
- “तुमचा भाऊ योसेफ मीच आहे. ज्याला तुम्ही मिसरी लोकांस विकले”उत्प 45:3–4
वचने
उत्प 45:3–4मग योसेफ आपल्या भावांना म्हणाला, “मी योसेफ आहे. माझा बाप अजून जिवंत आहे काय?” परंतु त्याचे भाऊ त्यास काही उत्तर देऊ शकले नाहीत. त्याच्या समोर ते फार घाबरले होते. तेव्हा योसेफ आपल्या भावांना म्हणाला, “मी विनंती करतो जरा इकडे माझ्याजवळ या.” तेव्हा ते त्याच्या जवळ गेले. आणि तो त्यांना म्हणाला, “तुमचा भाऊ योसेफ मीच आहे. ज्याला तुम्ही मिसरी लोकांस विकले.
- योसेफ बन्यामिनाला मिठी मारतो आणि आपल्या सर्व भावांचे चुंबन घेतोउत्प 45:14–15
वचने
उत्प 45:14–15मग त्याने आपला भाऊ बन्यामीन याला मिठी मारली आणि गळ्यात पडून रडला, आणि बन्यामीनही त्याच्या गळ्यात पडून रडला. मग त्याने आपल्या प्रत्येक भावाला मिठी मारली व त्यांचे मुके घेतले आणि तो रडला. यानंतर त्याचे भाऊ त्याच्याबरोबर बोलू लागले.
- योसेफ: “रस्त्यात एकमेकांशी भांडू नका”उत्प 45:24
वचने
उत्प 45:24मग योसेफाने आपल्या भावांना निरोप दिला आणि ते निघाले. तो त्यांना म्हणाला, “रस्त्यात एकमेकांशी भांडू नका.”
- याकोबाच्या मृत्यूनंतर योसेफ आपल्या घाबरलेल्या भावांना धीर देतोउत्प 50:15–21
वचने
उत्प 50:15–21याकोब मरण पावल्यावर योसेफाचे भाऊ चिंतेत पडले, फार पूर्वी आपण योसेफाबरोबर दुष्टपणाने वागलो त्यावरून आता आपल्यावर त्याचा राग भडकेल अशी त्यांना भीती वाटली. ते स्वतःशीच म्हणाले, “कदाचित योसेफ अजूनही आपला तिरस्कार करत असेल आणि आपण त्याच्याशी वाईट वागलो त्याचा तो बदला घेईल.” तेव्हा त्या भावांनी योसेफाला येणेप्रमाणे निरोप पाठवला, “तुझ्या वडिलाने मरण्यापूर्वी आम्हांला अशी आज्ञा दिली, तो म्हणाला, ‘योसेफाला सांगा की, तुझ्या भावांनी तुझ्याशी जे वाईट वर्तन केले त्याबद्दल तू त्यांची क्षमा करावीस अशी मी विनंती करतो.’ तेव्हा हे योसेफा, आम्ही तुला अशी विनंती करतो की, आम्ही तुझ्याशी वाईट रीतीने वागलो त्याबद्दल कृपया तू आमची क्षमा कर. आम्ही देवाचे, तुझ्या वडिलाच्या देवाचे दास आहोत.” योसेफाचे भाऊ वरीलप्रमाणे बोलले त्यामुळे योसेफाला फार दुःख झाले व तो रडला. योसेफाचे भाऊ त्याच्याकडे गेले व ते त्याच्या पाया पडले. मग ते म्हणाले, “आम्ही आपले दास आहोत.” मग योसेफ त्यांना म्हणाला, “भिऊ नका. मी काय देवाच्या स्थानी आहे काय? तुम्ही माझे वाईट करण्याचा कट केला, पण देव माझ्यासाठी चांगली योजना करीत होता. असंख्य लोकांचे प्राण वाचविण्यासाठी माझा उपयोग करावा अशी देवाची योजना होती. आज तुम्ही ते पाहत आहात. तेव्हा आता तुम्ही भिऊ नका. मी तुमची व तुमच्या मुलाबाळांची काळजी घेईन, तुमचे पोषण करीन.” अशा रीतीने त्याने त्यांचे समाधान केले आणि त्यांच्याशी ममतेने बोलला.
- अहरोन आपला भाऊ मोशे याच्या वतीने लोकांशी बोलणार आहेनिर्ग 4:14–16
वचने
निर्ग 4:14–16मग परमेश्वर मोशेवर रागावला. तो त्यास म्हणाला, “लेवी अहरोन हा तुझा भाऊ आहे ना? त्यास चांगले बोलता येते हे मला माहीत आहे. तो तुला भेटायला येत आहे. तुला पाहून त्यास मनात आनंद होईल. तू त्याच्याबरोबर बोलून त्याच्या मुखात शब्द घाल. मी त्याच्या व तुझ्या मुखांना साहाय्य होईल आणि तुम्ही काय करावे हे तुम्हास शिकवीन. आणि तो तुझ्यासाठी लोकांशी बोलेल; तो तुझे मुख होईल आणि त्याने काय बोलावे हे सांगणारा तू त्यास देवासारखा होशील.
- अबीमलेख आपल्या भावांचा खून करतो; सर्वांत धाकटा योथाम लपतोशास्ते 9:5
वचने
शास्ते 9:5तो आपल्या वडिलाच्या घरी अफ्रासास गेला, आणि त्याने आपले भाऊ म्हणजे यरूब्बालाचे सत्तर मुले एका दगडावर मारले; तरी यरूब्बालाचा धाकटा पुत्र योथाम राहिला, कारण तो लपलेला होता.
- इफ्ताहाचे भाऊ त्याला आपल्या वडिलांच्या घरातून हाकलून देतातशास्ते 11:2–3
वचने
शास्ते 11:2–3गिलादाच्या पत्नीने त्यापासून दुसऱ्या पुत्रांना जन्म दिला, आणि जेव्हा त्या स्त्रीचे पुत्र मोठे झाले, तेव्हा त्यांनी इफ्ताहाला घालवून दिले आणि म्हटले, “आमच्या वडिलाच्या घरी तुला वतन प्राप्त होणार नाही; कारण तू दुसऱ्या स्त्रीचा पुत्र आहेस.” यास्तव इफ्ताह आपल्या भावांपुढून पळाला, आणि टोब देशात जाऊन राहिला; तेव्हा रिकामटेकडी माणसे इफ्ताहाजवळ मिळून त्याच्याबरोबर चालली.
- इशायाचे मुलगे: दावीद सातवा आहे1 इति 2:13–15
वचने
1 इति 2:13–15इशायास ज्येष्ठ पुत्र अलीयाब, दुसरा अबीनादाब आणि तिसरा शिमा, चौथा नथनेल, पाचवा रद्दाय, सहावा ओसेम, सातवा दावीद यांचा पिता झाला.
- सर्वांत थोरला अलीयाब आपला भाऊ दावीद याला रागावतो1 शमु 17:28
वचने
1 शमु 17:28त्याचा भाऊ अलीयाब याने त्यास या लोकांशी बोलताना ऐकले; तेव्हा अलीयाब दावीदावर रागावून म्हणाला, “तू इकडे का आला आहेस? तू तो कळप रानात कोणाच्या जवळ ठेवला? तुझा गर्व आणि तुझ्या अंतःकरणाची दुष्टाई मी जाणत आहे लढाई पाहावी म्हणून तू आला आहेस.
- यवाब, अबीशय आणि असाएल — सरुवेचे तीन मुलगे2 शमु 2:18
वचने
2 शमु 2:18यवाब, अबीशय आणि असाएल हे सरुवेचे तीन पुत्र. त्यापैकी असाएल हा वेगवान धावपटू होता. अगदी रानातल्या हरीणासारखा चपळ होता.
- आपली बहीण तामार हिची बेअब्रू केल्याबद्दल अबशालोम अम्नोनाला मारवतो2 शमु 13:22, 2 शमु 13:28–29
वचने
2 शमु 13:22अबशालोमला अम्नोनाचा तिरस्कार वाटू लागला. तो अम्नोनाशी एक चकार शब्द बोलेना. अम्नोनाने आपली बहिण तामार हिच्याशी जो अतिप्रसंग केला त्याने अबशालोम द्वेषाने पेटून उठला होता.
2 शमु 13:28–29अबशालोमने आपल्या नोकरांना आज्ञा दिली. तो म्हणाला, अम्नोनावर नजर ठेवा. मद्याचा आनंद घेत त्यास जेव्हा त्याची नशा चढेल, तेव्हा मी तुम्हास संकेत करीन. मग त्याच्यावर हल्ला करून तुम्ही त्यास ठार करा शिक्षेची भीती बाळगू नका. अखेर तुम्ही माझ्या आज्ञेचे पालन करत आहात. धैर्याने आणि खंबीरपणाने वागा. तेव्हा अबशालोमच्या नोकरांनी त्याचा शब्द पाळला. अम्नोनाला त्यांनी ठार केले. पण दावीदाची बाकीची सर्व मुले निसटली. आपापल्या खेचरावर बसून ती पळाली.
- शलमोन आपला थोरला भाऊ अदोनीया याला ठार मारवतो1 राजे 2:22–25
वचने
1 राजे 2:22–25राजा शलमोन आपल्या आईला म्हणाला, “अदोनीयासाठी केवळ शुनेमकरीण अबीशगेची मागणी कशाला करतेस? त्याच्यासाठी राज्यदेखील का मागत नाहीस, तो माझा मोठा भाऊ आहे म्हणून आणि याजक अब्याथार आणि यवाब, सरुवेचा यांच्यासाठी देखील राज्य माग.” मग परमेश्वराची शपथ घेऊन शलमोन राजा म्हणाला, “अदोनीयाने ही मागणी करून आपल्या जीवावर संकट आणले आहे; तसे न घडले तर परमेश्वर तसेच त्यापेक्षा अधिक माझे करो. इस्राएलचा राजा म्हणून परमेश्वराने माझी निवड केली आहे. माझे वडिल दावीद यांच्या गादीवर त्याने मला बसवले आहे. आपण दिलेला शब्द पाळून राज्याची सत्ता परमेश्वराने आमच्या घराण्यात ठेवली आहे. तेव्हा आता त्याची शपथ घेऊन सांगतो की अदोनीयाला आज मृत्युदंड होईल.” राजा शलमोनाने यहोयादाचा पुत्र बनायाला आज्ञा दिली; आणि बनायाने बाहेर जाऊन अदोनीयाला ठार केले.
- यहोराम आपल्या सर्व भावांना तलवारीने मारतो2 इति 21:4
वचने
2 इति 21:4यहोराम आपल्या पित्याच्या जागी गादीवर आला आणि सत्ताधीश बनला. त्याने आपल्या सर्व भावांचा तसेच इस्राएलमधील काही वडिलधाऱ्यांचा तलवारीने वध केला.
- गालील समुद्राजवळ कोळी भावांच्या दोन जोड्यामत्त 4:18, मत्त 4:21
वचने
मत्त 4:18नंतर तो गालीलच्या सरोवराजवळून जात असता, पेत्र म्हटलेला शिमोन व त्याचा भाऊ अंद्रिया या दोघांना त्याने जाळे टाकतांना पाहिले कारण ते मासे पकडणारे होते.
मत्त 4:21येशू तेथून पुढे चालत जात असता त्याने दुसरे दोघे भाऊ; जब्दीचा मुलगा याकोब व त्याचा भाऊ योहान यांना त्यांचे वडील जब्दी याच्याबरोबर होडीत पाहीले. ते जाळे नीट करत होते. त्याने त्यांना बोलावले,
- अंद्रिया आधी आपला भाऊ शिमोन याला शोधतो आणि त्याला येशूकडे आणतोयोहा 1:40–42
वचने
योहा 1:40–42योहानाचे बोलणे ऐकून त्याच्यामागे जे दोघे जण गेले, त्यांच्यापैकी एक शिमोन पेत्राचा भाऊ अंद्रिया हा होता. त्यास त्याचा सख्खा भाऊ शिमोन पहिल्याने भेटला व त्यास म्हणाला, “आम्हास मसीहा (म्हणजे ख्रिस्त) सापडला आहे.” त्याने त्यास येशूकडे आणले; येशूने त्याच्याकडे न्याहाळून पाहून म्हटले, “तू योहानाचा पुत्र शिमोन आहेस. तुला केफा (म्हणजे पेत्र किंवा खडक) म्हणतील.”
- मार्था आणि मरीया: “आपण येथे असता तर माझा भाऊ मरण पावला नसता”योहा 11:21, योहा 11:32
वचने
योहा 11:21तेव्हा मार्था येशूला म्हणाली, “प्रभूजी, आपण येथे असता तर माझा भाऊ मरण पावला नसता.
योहा 11:32मग येशू होता तेथे मरीया आल्यावर त्यास पाहून ती त्याच्या पाया पडली व त्यास म्हणाली, “प्रभूजी, आपण येथे असता तर माझा भाऊ मरण पावला नसता.”
- येशूचे भाऊ याकोब, योसे, यहूदा आणि शिमोनमार्क 6:3
वचने
मार्क 6:3जो सुतार, मरीयेचा मुलगा आणि याकोब, योसे, यहूदा व शिमोन यांचा जो भाऊ तोच हा आहे ना?” आणि या आपल्याबरोबर आहेत त्या याच्या बहिणी नव्हेत काय? त्याचा स्वीकार करण्याविषयी त्यांना प्रश्न पडला.
- त्याच्या भावांनी विश्वास ठेवला नाही, पण नंतर ते शिष्यांबरोबर प्रार्थना करत होतेयोहा 7:5, प्रेषि 1:14
वचने
योहा 7:5कारण त्याचे भाऊही त्याच्यावर विश्वास ठेवत नव्हते.
प्रेषि 1:14हे सर्वजण आणि त्यांच्यासह कित्येक स्त्रिया, येशूची आई मरीया, व त्याचे भाऊ एकचित्ताने एकसारखे प्रार्थना करत होते.
नियमशास्त्रात आणि वचनांत
- आपल्या भावाविषयी मनात द्वेष बाळगू नकालेवी 19:17
वचने
लेवी 19:17आपल्या मनात आपल्या भावाचा द्वेष बाळगू नका; आपल्या शेजाऱ्याने चुकीचे काही कृत्य केल्यास त्याची कान उघडणी करावी, परंतु त्याच्या अपराधामध्ये सहभागी होऊ नये.
- आपल्या भावाचा भरकटलेला बैल किंवा मेंढरू परत आणाअनु 22:1–2
वचने
अनु 22:1–2आपल्यापैकी कोणाचा बैल किंवा मेंढरू मोकाट भटकलेले आढळले तर तिकडे दुर्लक्ष न करता ते त्याच्या मालकाकडे पोचते करा. तो बंधू जर जवळपास राहत नसेल किंवा कोण आहे ते माहीत नसेल तर त्या जनावराला आपल्या घरी आणा. त्याचा मालक शोध करत आला की त्याचे त्यास परत कर.
- भाऊ एकोप्याने राहतात हे किती चांगलेस्तोत्र 133:1
वचने
स्तोत्र 133:1दाविदाचे स्तोत्र पाहा, बंधूंनी ऐक्यात एकत्र राहणे किती चांगले आणि आनंददायक आहे.
- दुखावलेल्या भावाला जिंकणे तटबंदीचे नगर जिंकण्यापेक्षा कठीणनीति 18:19
वचने
नीति 18:19दुखवलेल्या भावाची समजूत घालणे हे बळकट तटबंदी असलेले शहर जिंकण्यापेक्षा कठीण आहे. आणि भांडणे राजवाड्याच्या अडसरासारखे आहेत.
- आधी आपल्या भावाशी समेट कर, मग आपले दान अर्पण करमत्त 5:23–24
वचने
मत्त 5:23–24यास्तव तू आपले अर्पण वेदीवर अर्पिण्यास आणीत असता आपल्या भावाच्या मनात आपल्याविरूद्ध काही आहे अशी तुला तेथे आठवण झाली, तर आपले अर्पण तसेच वेदीसमोर ठेव आणि आपल्या मार्गाने परत जा व प्रथम आपल्या भावासोबत समेट कर आणि मग येऊन आपले अर्पण वेदीवर अर्पण कर.
स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क