Bible Explorer अ‍ॅप मिळवा

शोधा › शुभवर्तमाने शेजारी शेजारी › येशूचे दुःखसहन

शुभवर्तमाने शेजारी शेजारी · येशूचे दुःखसहन

येशूला पुरणे

मत्त 27:57–61 · मार्क 15:42–47 · लूक 23:50–56 · योहा 19:38–42

मत्तय

मत्त 27:57–61

57संध्याकाळ झाल्यावर योसेफ नावाचा अरिमथाईचा, एक धनवान मनुष्य तेथे आला. तो येशूचा अनुयायी होता.

58तो पिलाताकडे गेला आणि त्याने येशूचे शरीर मागितले. तेव्हा पिलाताने ते देण्याचा हुकूम केला.

59नंतर योसेफाने ते शरीर घेतले आणि स्वच्छ तागाच्या कपड्यात ते गुंडाळले.

60आणि ते एका खडकात खोदलेल्या नव्या कबरेत ठेवले. नंतर कबरेच्या तोंडावर एक मोठी धोंड लोटून ती कबर बंद केली आणि तो निघून गेला.

61मग्दालीया नगराची मरीया आणि याकोब व योसेफ यांची आई मरीया कबरेसमोर बसल्या होत्या.

मार्क

मार्क 15:42–47

42त्या सुमारास संध्याकाळ झाली होती आणि तो तयारीचा म्हणजे शब्बाथाच्या आधीचा दिवस होता.

43योसेफ अरिमथाईकर न्यायसभेचा माननीय सभासद होता व तो सुद्धा देवाचे राज्य येण्याची वाट पाहत होता. तो योसेफ धैर्याने पिलाताकडे गेला आणि त्याने येशूचे शरीर मागितले.

44येशू इतक्या लवकर कसा मरण पावला याचे पिलाताला आश्चर्य वाटले. मग त्याने सेनाधिकारी बोलावले आणि त्यांना विचारले. येशूला मरून बराच वेळ झाला की काय?

45सेनाधिकाऱ्याकडून ते कळाल्यावर, तेव्हा त्याने ते शरीर योसेफाला दिले.

46मग योसेफाने तागाचे वस्त्र विकत आणले आणि येशूला वधस्तंभावरुन खाली काढले व त्यास तागाच्या वस्त्रात गुंडाळून ते त्याने खडकात खोदलेल्या कबरेत ठेवले. नंतर त्याने कबरेच्या तोंडावर दगड बसविला.

47येशूला कोठे ठेवले हे मग्दालीया नगराची मरीया आणि याकोब व योसेफ यांची आई मरीया पाहत होत्या.

लूक

लूक 23:50–56

50तेथे योसेफ नावाचा एक मनुष्य होता. तो यहूदी सभेचा सभासद व चांगला आणि नीतिमान मनुष्य होता.

51त्याने त्याच्या कामाला व विचारला संमती दिली नव्हती. तो यहूदीया प्रांतातील अरिमथाई नगराचा होता. तो देवाच्या राज्याची वाट पाहत होता.

52हा मनुष्य पिलाताकडे गेला आणि त्याने येशूचे शरीर मागितले.

53ते त्याने वधस्तंभावरुन खाली काढले आणि तागाच्या वस्त्रात गुंडाळले. नंतर ते खडकात खोदलेल्या कबरेत ठेवले. ही कबर अशी होती की, जिच्यात तोपर्यंत कोणालाही ठेवले नव्हते.

54तो तयारीचा दिवस होता आणि शब्बाथ सुरु होणार होता.

55गालील प्रांताहून येशूबरोबर आलेल्या स्त्रिया योसेफाच्या मागे गेल्या. त्यांनी ती कबर व तिच्यामध्ये ते शरीर कसे ठेवले ते पाहिले.

56नंतर त्या घरी गेल्या व त्यांनी सुगंधी मसाले आणि लेप तयार केला. शब्बाथ दिवशी त्यांनी आज्ञेप्रमाणे विसावा घेतला.

योहान

योहा 19:38–42

38यानंतर, जो अरिमथाईकर योसेफ याने आपल्याला येशूचे शरीर नेता यावे अशी पिलाताला विनंती केली. तो येशूचा शिष्य असून पण यहूद्यांच्या भीतीमुळे गुप्त शिष्य होता, पिलाताने त्यास परवानगी दिल्यावरून त्याने जाऊन येशूचे शरीर नेले.

39आणि, त्याच्याकडे पहिल्याने रात्रीचा आलेला निकदेमही गंधरस व अगरू यांचे सुमारे शंभर मापे मिश्रण घेऊन आला.

40मग त्यांनी येशूचे शरीर घेतले आणि यहूद्यांच्या उत्तरकार्याच्या रीतीप्रमाणे त्यांनी ते सुगंधी मसाल्यांसहित तागाच्या वस्त्रात गुंडाळले.

41त्यास ज्याठिकाणी वधस्तंभावर खिळले होते तेथे एक बाग होती; आणि त्या बागेत एक नवी कबर होती; त्यामध्ये कोणाला कधीही ठेवलेले नव्हते.

42तो यहूद्यांचा तयारीचा दिवस असल्यामुळे व ती कबर जवळ असल्यामुळे, त्यांनी येशूला तेथे ठेवले.

खूण केलेले: प्रत्येक वृत्तांतात असलेले शब्द, तुम्ही वाचता त्या भाषांतरात. सर्वात वारंवार येणारे शब्द (“आणि”, “तो”) खूण केलेले नाहीत; दुसऱ्या रूपातील शब्दाची खूण कदाचित होणार नाही.

स्रोत: OpenBible.info, CC BY 4.0 · इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क