Bible Explorer अ‍ॅप मिळवा

शोधा › राजे आणि इतिहास शेजारी शेजारी › यहूदाचे राजे

राजे आणि इतिहास शेजारी शेजारी · यहूदाचे राजे

अथल्या आणि बालक योवाश

2 राजे 11:1–21 · 2 इति 22:10–12; 23:1–21

2 राजे

2 राजे 11:1–21

1अहज्याची आई अथल्या हिने आपला मुलगा मरण पावला हे पाहिल्यावर, ती उठली आणि सर्व राजसंतानाची हत्या केली.

2पण यहोशेबा, ही राजा योरामाची मुलगी आणि अहज्याची बहीण. योवाश हा राजाच्या अनेक मुलांपैकी एक. इतर मुलांची हत्या होत असताना यहोशेबाने योवाशाला बाजूला घेतले आणि आपल्या झोपायच्या खोलीत लपवून ठेवले. तिने योवाश आणि त्याची दाई यांना लपवले. यहोशेबा आणि ती दाई यांनी योवाशाला अथल्याच्या तावडीतून सोडवले म्हणून तो मारला गेला नाही.

3योवाश आणि यहोशेबा परमेश्वराच्या मंदिरात सहा वर्षे लपून राहिले. आणि यहूदावर अथल्याचे राज्य होते.

4सातव्या वर्षी महायाजक यहोयादाने अधिकाऱ्यांना त्यांच्या हुजरे आणि पहारेकरी यांच्यासुद्धा बोलावून घेतले. आणि त्यांना आपल्याबरोबर परमेश्वराच्या मंदिरात नेले. यहोयादाने त्यांच्याशी शपथ व करार करून घेऊन, मग योवाश या राजपुत्राला त्यांच्यापुढे आणले.

5यहोयादाने त्यांना एक आज्ञा केली. तो म्हणाला, “तुम्हास आता मी सांगतो तसे करायचे आहे. प्रत्येक शब्बाथला तुमच्यापैकी एकतृतीयांश लोकांनी आत यायचे. राजाचे त्याच्या घरात तुम्ही संरक्षण करायचे.

6आणि दुसरे एकतृतीयांश लोकांच्या गटाने सूर वेशीवर थांबायचे आणि तिसऱ्या एकतृतीयांश गटाने पहारेकऱ्यांच्या मागे राहायचे.

7आणि शब्बाथ दिवसास जे सेवा करत नाही, असे दोन गट परमेश्वराच्या मंदिराचे रक्षण करतील आणि राजा योवाशाला संरक्षण देतील.

8राजा योवाश बाहेर जाईल व आत येईल, तिथे सतत तुम्ही त्याच्याबरोबर राहिले पाहिजे. तुम्ही त्याच्याभोवती कडे करावे व प्रत्येक पहारेकऱ्याच्या हातात शस्त्र असेल आणि कोणीही आपल्या फार जवळ आल्यास तुम्ही त्यास मारुन टाकावे.”

9याजक यहोयादाने ज्या ज्या आज्ञा दिल्या त्या सर्वांचे त्या शताधीपतींनी पालन केले. प्रत्येक अधिकाऱ्याने आपल्या मनुष्यांना बरोबर घेतले. जी शब्बाथात आत येणारी होती आणि जी शब्बाथात बाहेर जाणारी होती हे सर्व लोक यहोयादाकडे गेले.

10याजक यहोयादाने शेकडो भाले आणि ढाली अधिकाऱ्यांच्या हवाली केल्या. दावीद राजाची परमेश्वराच्या मंदिरात ठेवलेली शस्त्रे ती हीच.

11मंदिराच्या डाव्या टोकापासून उजव्या टोकापर्यंत हे रखवालदार हातात आपापली शस्त्रे घेऊन उभे राहिले. ते वेदी आणि मंदिर यांच्याभोवती तसेच राजा मंदिरात येई तेव्हा त्याच्या भोवती उभे राहत.

12मग यहोयादाने योवाशाला बाहेर काढले. त्यास त्यांनी मुकुट घातला आणि आज्ञापट दिला. मग त्यांनी त्यास राजा करून त्याचा अभिषेक केला व टाळ्या वाजवून त्यांनी “राजा चिरायू होवो” म्हणून जयघोष केला.

13हुजऱ्यांचा आणि लोकांचा हा गलबला राणी अथल्याच्या कानावर गेला. तेव्हा ती परमेश्वराच्या मंदिरापाशी गेली.

14राजाची रीतीप्रमाणे स्तंभाजवळ उभे रहायची जी जागा तिथे अथल्याने राजाला उभे असलेले पाहिले. नेते आणि लोक कर्णे वाजवीत आहेत हे ही तिने पाहिले. लोकांस खूप आनंद झालेला आहे हे तिच्या लक्षात आले. कर्ण्यांचा आवाज ऐकून तिने नाराजी प्रदर्शित करण्याकरता आपली वस्त्रे फाडली आणि ती “फितुरी! फितुरी!” म्हणून ओरडू लागली.

15हुजऱ्यांवरील अधिकाऱ्यांना याजक यहोयादाने आज्ञा दिली, “अथल्याला मंदिराच्या आवाराबाहेर काढावे. तिच्या अनुयायांचा तलवारीने वध करावा. मात्र परमेश्वराच्या मंदिरात तो करु नये.”

16मग तिला जाण्यासाठी त्यांनी वाट केली व राज मंदीराकडे घोडे ज्या दारातून आत येत असत त्या दाराने तिला बाहेर काढून तिचा त्यांनी वध केला.

17यहोयादाने नंतर परमेश्वर, राजा आणि लोक यांच्यात करार केला. राजा आणि लोक या दोघांवरही परमेश्वराची सत्ता आहे, असे त्या करारात होते. यहोयादाने या खेरीज राजा आणि लोक यांच्यातही एक करार केला. राजाची लोकांबाबत असलेली कर्तव्ये त्यामध्ये होती. तसेच लोकांनी राजाचे आज्ञापालन आणि अनुयायित्व करावे असे त्यामध्ये म्हटले होते.

18यानंतर लोक बाल या देवतेच्या देवळात गेले. त्यांनी बआलाच्या मूर्तीची तसेच तेथील वेद्यांची नासधूस, मोडतोड केली. त्यांचे तुकडे तुकडे केले बालाचा याजक मत्तान याला वेद्यांसमोरच लोकांनी ठार केले. याजक यहोयाद याने परमेश्वराच्या मंदिरावर पहारेकरी नेमले.

19सर्व लोकांस घेऊन तो परमेश्वराच्या मंदिराकडून राजाच्या निवासस्थानी गेला. राजाचे विशेष हुजरे, सुरक्षा सैनिक आणि अधिकारी राजाबरोबर होते. त्यांच्यापाठोपाठ बाकीचे लोक गेले. राजमहालाच्या प्रवेशद्वारापर्यंत ते गेले. राजा योवाश मग सिंहासनावर बसला.

20लोक आनंदात होते आणि नगरात शांतता नांदत होती. राणी अथल्याला राजाच्या महालात तलवारीने मारले.

21योवाश राजा झाला तेव्हा सात वर्षांचा होता.

2 इतिहास

2 इति 22:10–12; 23:1–21

22:10अथल्या ही अहज्याची आई. तिने आपला पुत्र मरण पावला आहे हे पाहिल्यावर तीने यहूदाच्या सर्व राजवंशाचा संहार केला.

22:11पण राजाची कन्या यहोशबाथ हिने अहज्याचा पुत्र योवाश याला लपवले. योवाश आणि त्याची दाई यांना तिने आतल्या शयनगृहात ठेवले. यहोशबाथ ही राजा यहोरामाची कन्या आणि यहोयादा या याजकाची पत्नी. अहज्या तिचा भाऊ यहोशबाथाने योवाशाला लपवल्यामुळे अथल्या त्यास मारु शकली नाही.

22:12परमेश्वराच्या मंदिरात त्यास याजकांच्या सहवासात सहा वर्षे लपवून ठेवले होते. या काळात अथल्याने त्या जागेवर राज्य केले.

23:1यहोयादाने सातव्या वर्षांनंतर आपले सामर्थ्य दाखवले. त्याने यरोहामाचा पुत्र अजऱ्या यहोहानानाचा पुत्र इश्माएल, ओबेदचा पुत्र अजऱ्या, अदायाचा पुत्र मासेया आणि जिख्रीचा पुत्र अलीशाफाट या मुख्य अधिकाऱ्यांशी करार केला.

23:2त्यांनी यहूदाभर फिरुन यहूदाच्या नगरात विखुरलेल्या लेवींना आणि इस्राएलच्या कुलप्रमुखांना एकत्र आणले. मग ते सर्व यरूशलेम येथे गेले.

23:3तेथे देवाच्या मंदिरात सर्व समुदायाने राजाशी करार केला. यहोयादा या लोकांस म्हणाला, “परमेश्वर दावीदाच्या संततीविषयी जे बोलला आहे त्यास अनुसरुन राजाचा पुत्र गादीवर येईल.

23:4आता तुम्ही करायचे ते असे: तुमच्यापैकी जे एक-तृतीआंश याजक आणि लेवी शब्बाथाच्या दिवशी कामाला येतात त्यांनी मंदिरावर पहारा करावा.

23:5एकतृतीयांश लोकांनी राजमहालावर पहारा करावा, आणि उरलेल्या एकतृतीयांश लोकांनी वेशीपाशी असावे. यांच्याखेरीज बाकी सर्व लोकांनी परमेश्वराच्या मंदिराच्या दालनात रहावे.

23:6कोणालाही परमेश्वराच्या मंदिरात येऊ देऊ नये, याजक व सेवा करणारे लेवी यांनीच मात्र आत यावे कारण ते याच कामासाठी नेमलेले आहेत. पण इतरांनी परमेश्वराने नेमून दिलेली आपआपली कामे करायची आहेत.

23:7लेवींनी राजाला सर्व बाजूंनी घेराव घालावा. प्रत्येकाजवळ आपली तलवार सज्ज असावी. कोणी मंदिरात घुसायचा प्रयत्न केल्यास त्यास ठार करावे. सर्वांनी राजाची सावलीसारखी सोबत करावी.

23:8लेवी आणि यहूदा या सर्व लोकांनी यहोयादा या याजकाने ज्या आज्ञा केल्या त्या सर्वांचे पालन केले. यहोयादाने याजकांपैकी कोणाचीही गय केली नाही. त्यामुळे शब्बाथाच्या दिवशी आळीपाळीने आत येणाऱ्या व कामावरुन बाहेर जाणाऱ्या सर्वाची व्यवस्था केली.”

23:9दावीद राजाचे भाले, छोट्या आणि मोठ्या ढाली ही शस्त्रे देवाच्या मंदिरामध्ये ठेवलेली होती. यहोयादा याजकाने शंभर सैनिकांच्या तुकड्यांच्या प्रमुखांना त्या दिल्या.

23:10आणि त्यांनी कुठे, कसे उभे राहायचे ते सांगितले. प्रत्येकाजवळ आपआपले शस्त्र होते. मंदिराच्या सरळ उजव्या कोपऱ्यापासून डाव्या बाजूपर्यंत ही शस्त्रधारी माणसे उभी राहिली. वेदी, मंदिर आणि राजा यांच्याजवळ ती उभी होतीच.

23:11मग त्यांनी राज पुत्राला बाहेर आणले आणि त्याच्या मस्तकावर मुकुट चढवला. त्याच्या हाती आज्ञापट दिला. योवाशाला त्यांनी राजा केले. यहोयादा आणि त्याचे पुत्र यांनी त्यास अभिषेक केला. “राजा चिरायु होवो” असे ते सर्वजण म्हणाले.

23:12लगबगीने जाणाऱ्या लोकांचा गलबला आणि राजाचा जयजयकार अथल्याने ऐकला. तेव्हा ती लोकांकडे परमेश्वराच्या मंदिरात आली.

23:13पाहते तो तिला राजा दिसला. प्रवेशद्वाराशी तो राजस्तंभाजवळ उभा होता. कर्णे वाजवणारे कारभारी आणि लोक राजाजवळ उभे होते. देशभरचे लोक कर्णे वाजवून आनंद व्यक्त करत होते. गाणारे वाद्ये वाजवत होते आणि त्यांनी म्हटलेल्या स्तवनगीतापाठोपाठ लोक गात होते. तेव्हा आपली तीव्र नापसंती दाखविण्यासाठी अथल्याने आपले कपडे फाडले आणि “फितुरी! फितुरी!” असे ती ओरडली.

23:14याजक यहोयादा याने सेनापतींना पुढे आणले. त्यांना तो म्हणाला, “तिला सैन्याच्या रांगांमधून बाहेर काढा. तिच्या मागे जो जाईल त्यास तलवारीने मारुन टाका.” मग याजकाने सैन्याला आज्ञा दिली कि, “परमेश्वराच्या मंदिरात अथल्याचा वध करु नका.”

23:15राजमहालाच्या घोडावेशीजवळ अथल्या पोहोचताच सैनिकांनी तिला पकडले आणि त्याठिकाणी तिला जिवे मारले.

23:16यहोयादाने मग सर्व लोक आणि राजा यांच्याबरोबर एक करार केला. आपण सर्व परमेश्वराचे लोक आहोत असा तो करार होता.

23:17मग सर्वजण बआल देवतेच्या मंदिरात गेले आणि त्या मूर्तीची त्यांनी नासधूस केली. तिथल्या इतर मूर्ती आणि वेदीदेखील मोडून तोडून टाकल्या. बआलच्या वेदीपुढेच त्यांनी बआलचा याजक मत्तान याला ठार केले.

23:18यहोयादाने मग परमेश्वराच्या मंदीरातील याजकांची नेमणूक केली. हे याजक लेवी होते आणि दावीदाने त्यांना मंदिराचे मुखत्यारपद दिले होते. मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे परमेश्वरास होमबली अर्पण करणे, हे त्यांचे काम होते. दावीदाच्या आज्ञेनुसार आनंदाने गायन करत त्यांनी होमबली अर्पण केले

23:19कोणीही अशुद्धतेने मंदिराच्या आत येवू नये, म्हणून यहोयादाने परमेश्वराच्या मंदिराच्या प्रवेशद्वाराशीच द्वारपाल नेमले

23:20सर्व सैन्याधिकारी, लोकनायक, सरदार आणि सर्व प्रजा यांना यहोयादाने आपल्याबरोबर घेतले. मग त्याने राजाला परमेश्वराच्या मंदिराबाहेर काढले. तिथून वरच्या वेशीतून ते राजमहालात पोचले. तेथे त्यांनी राजाला सिंहासनावर बसवले.

23:21अथल्याचा तलवारीने वध झाला त्यानंतर यहूदातील लोकांमध्ये आनंदी आनंद पसरला आणि यरूशलेम नगर शांत झाले.

खूण केलेले: प्रत्येक वृत्तांतात असलेले शब्द, तुम्ही वाचता त्या भाषांतरात. सर्वात वारंवार येणारे शब्द (“आणि”, “तो”) खूण केलेले नाहीत; दुसऱ्या रूपातील शब्दाची खूण कदाचित होणार नाही.

स्रोत: OpenBible.info, CC BY 4.0 · इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क