मुख्यपृष्ठ › दैनंदिन बायबल पाठ › एप्रिल 2027 › 26 एप्रिल
ऑर्थोडॉक्स दिनदर्शिका · 13 एप्रिल (जुनी पद्धत)
ऑर्थोडॉक्स दैनंदिन पाठ — 26 एप्रिल 2027
सोमवार · पवित्र आठवडा
सण आणि संत
महान आणि पवित्र सोमवार
महान लेंत
कडक उपवास (कोरडे अन्न: भाकर, भाज्या, फळे)
हे मठाच्या नियमानुसार आहे. पॅरिशमध्ये उपवासाचे प्रमाण आपल्या पापकबुलीच्या धर्मगुरूसोबत, आरोग्य, वय आणि परिस्थितीनुसार ठरवले जाते.
दिवसाची वाचने
शुभवर्तमान (वराची प्रातःप्रार्थना)
18दुसऱ्या दिवशी सकाळी तो शहराकडे पुन्हा येत असता त्यास भूक लागली. 19रस्त्याच्या कडेला त्यास अंजिराचे एक झाड दिसले. ते पाहून तो जवळ गेला. पण पानाशिवाय त्यास एकही अंजीर दिसले नाही. येशू त्या झाडाला म्हणाला, “यापुढे तुला, कधीही फळ न येवो!” आणि ते झाड लगेच वाळून गेले. 20शिष्यांनी हे पाहिले, तेव्हा त्यांना फार आश्चर्य वाटले. त्यांनी विचारले, “हे अंजिराचे झाड इतक्या लवकर वाळून कसे गेले?” 21येशू त्यांना म्हणाला, “मी तुम्हास खरे सांगतो, जर तुम्हास विश्वास असेल आणि तुम्ही संशय धरला नाही तर मी जे अंजिराच्या झाडाबाबतीत केले तेच नव्हे, तर या डोंगराला उपटून समुद्रात पड असे म्हणालात तरी ते घडेल. 22जर तुमचा विश्वास असेल तर जे काही तुम्ही प्रार्थनेत विश्वासाने मागाल ते तुम्हास मिळेल.” 23येशू परमेश्वराच्या भवनात गेला, येशू तेथे शिक्षण देत असताना मुख्य याजक लोक व वडीलजन येशूकडे आले. ते येशूला म्हणाले, “तुम्ही कोणत्या अधिकाराने या गोष्टी करता? हा अधिकार तुम्हास कोणी दिला?” 24येशू म्हणाला, “मीसुद्धा तुम्हास एक प्रश्न विचारतो. जर तुम्ही मला उत्तर दिले तर मी कोणत्या अधिकाराने या गोष्टी करतो, हे मी तुम्हास सांगेन. 25‘योहानाचा बाप्तिस्मा कोठून होता? स्वर्गाकडून की मनुष्यांकडून?’” येशूच्या या प्रश्नावर ते चर्चा करू लागले. ते म्हणाले, “योहानाचा बाप्तिस्मा देवाकडून होता असे म्हणावे तर येशू म्हणेल, ‘मग तुम्ही त्याच्यावर विश्वास का ठेवला नाही?’ 26पण जर तो मनुष्यांकडून होता असे आपण म्हणालो आपल्याला लोकांची भीती आहे कारण योहान हा एक संदेष्टा होता असे ते सर्वजण मानतात.” 27म्हणून त्यांनी येशूला उत्तर दिले, “आम्हास माहीत नाही.” तेव्हा येशू म्हणाला, “तर मग मी कोणत्या अधिकाराने या गोष्टी करतो, हे मीही तुम्हास सांगणार नाही.” 28याविषयी तुम्हास काय वाटते ते मला सांगा; “एका मनुष्यास दोन पुत्र होते. तो आपल्या पहिल्या मुलाकडे गेला आणि म्हणाला, ‘माझ्या मुला, आज तू द्राक्षाच्या मळ्यात जा आणि काम कर.’ 29मुलाने उत्तर दिले, ‘मी जाणार नाही.’ परंतु नंतर त्या मुलाने मन बदलले व तो गेला. 30नंतर वडील आपल्या दुसऱ्या मुलाकडे गेले आणि म्हटले, ‘माझ्या मुला, आज तू जाऊन माझ्या द्राक्षाच्या मळ्यात काम कर.’ त्या मुलाने उत्तर दिले, ‘होय बाबा, मी जातो.’ पण तो गेला नाही. 31त्या दोघांपैकी कोणत्या मुलाने वडीलांची आज्ञा पाळली?” ते म्हणाले, “पहिल्या मुलाने.” येशू त्यांना म्हणाला, “मी खरे सांगतो, जकातदार व वेश्या तुमच्या अगोदर स्वर्गाच्या राज्यात जातील. 32कारण योहान नीतिमत्त्वाच्या मार्गाने तुम्हाकडे आला, परंतु तुम्ही त्यावर विश्वास ठेवला नाही, पण जकातदार व वेश्या यांनी त्यावर विश्वास ठेवला आणि हे तुम्ही पाहिले पण तरी देखील तुम्ही आपले मन बदलण्यास आणि त्यावर विश्वास ठेवण्यास तयार झाला नाही.” 33“हा दुसरा दाखला ऐकाः एक मनुष्य होता, त्याचे शेत होते. त्याने आपल्या शेतात द्राक्षे लावली. त्याभोवती कुंपण घातले आणि द्राक्षरसाकरिता कुंड तयार केले आणि माळा बांधला, मग त्याने आपला मळा काही शेतकऱ्यांना खंडाने करायला दिला, मग तो दुसऱ्यादेशी निघून गेला. 34जेव्हा द्राक्षे तोडणीचा हंगाम जवळ आला, तेव्हा त्या मनुष्याने आपला वाटा आणण्याकरिता काही चाकर शेतकऱ्याकडे पाठवले. 35परंतु शेतकऱ्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. एकाला मार दिला तर दुसऱ्या चाकराला जिवे मारले. नंतर तिसऱ्याला दगडमार करून ठार केले. 36मग शेतकऱ्यांकडे त्या मनुष्याने आणखी एकदा चाकर पाठवले. पहिल्यापेक्षा त्याने जास्त चाकर पाठवले पण त्या शेतकऱ्यांनी त्यांना तशीच वागणूक दिली. 37नंतर, त्याने त्याच्या स्वतःच्या मुलाला त्यांच्याकडे पाठवले, तो म्हणाला, ‘निश्चितच ते माझ्या मुलाचा मान राखतील.’ 38पण जेव्हा शेतकऱ्यांनी त्याच्या मुलाला पाहिले तेव्हा ते एकमेकास म्हणू लागले, ‘हा तर मालकाचा मुलगा आहे. तो वारस आहे. चला आपण त्यास ठार करू व त्याचे वतन घेऊ.’ 39त्यांनी त्यास धरले व द्राक्षमळ्याच्या बाहेर फेकले व त्यास ठार मारले. 40मग द्राक्षमळ्याचा मालक परत येईल तेव्हा या शेतकऱ्यांचे काय करील?” 41यहूदी मुख्य याजक लोक आणि पुढारी म्हणाले, “तो त्या लोकांस खात्रीने मरणदंड देईल कारण ते दुष्ट होते. नंतर तो आपला द्राक्षमळा दुसऱ्यास खंडाने देईल. हंगामाच्या दिवसात जे त्याच्या पिकाची वाटणी देतील, अशांना तो ते देईल.” 42येशू त्यांना म्हणाला, “तुम्ही शास्त्रलेखात कधी वाचले नाही काय? ‘बांधणाऱ्यांनी नाकारलेला दगड कोनशिला झाला आहे. हे प्रभूने केले आणि आमच्या दृष्टीने हे अद्भूत आहे.’ 43म्हणून मी तुम्हास सांगतो की, देवाचे राज्य तुमच्याकडून काढून घेण्यात येईल आणि जे राष्ट्र त्यातली फळे देईल त्यास ते दिले जाईल.
सहावा तास
1माझ्या आयुष्याच्या तिसाव्या वर्षाच्या चौथ्या महिन्याच्या पाचव्या दिवशी, मी खबार नदीच्या तीरी दास्यात गेलेल्या लोकांसोबत राहत होतो. तेव्हा स्वर्ग उघडला आणि मी देवाचा दृष्टांत पाहिला. 2तो त्या महिन्याच्या पाचवा दिवस होता, आणि ते यहोयाखीन राजाच्या बंदिवासाचे पाचवे वर्ष होते. 3खबार नदिच्या जवळ, खास्द्यांच्या देशात बूजीचा मुलगा यहेज्केल याजकाकडे परमेश्वर देवाचे वचन सामर्थ्याने आले व परमेश्वर देवाचा हात त्याच्यावर आला. 4तेव्हा मी पाहिले उत्तरेकडून तुफानाचा वारा सुटला, तो एक अग्नीने धुमसणारा, मध्य भागात विजांचा पिवळसर प्रकाश मध्यभागी चमकत असलेला विशाल मेघ होता. 5मध्यभागी चार जिवंत प्राण्याच्या आकाराचे काही नजरेस पडले; ते माणसासारखे दिसत होते, 6पण त्यांना चार तोंडे होती, आणि प्रत्येक प्राण्याला चार पंख होते. 7त्यांचे पाय सरळ होते पण तळवे वासरांच्या तळव्यासारखे आणि पितळेसारखे चकाकणारे होते. 8त्यांच्या चोहोबाजूंना पंखाखाली त्यांना मनुष्याचे हात होते. त्या चौघांना त्यांचे मुखे व पंख याप्रमाणे होतेः 9त्यांचे पंख त्यांच्या बाजूच्या प्राण्याच्या पंखांना स्पर्श करीत आणि पुढे जाण्यासाठी ते वळत नव्हते; त्याऐवजी त्यांच्यापैकी प्रत्येक आपल्यापुढे नीट सरळ चालत असे. 10त्या चौघांच्या मुखापैकी एकाचे मुख मनुष्याच्या तोंडासारखे दिसत होते, दुसऱ्याचे मुख सिंहाच्या तोंडासारखे, तिसऱ्याचे मुख बैलासारखे आणि चौथ्याचे मुख गरुडाच्या तोंडासारखे होते. 11त्यांची मुखे अशाप्रकारची होती आणि त्यांचे पंख एकमेकापासून वेगळे होते, प्रत्येक प्राण्याचे पंख दुसऱ्या प्राण्याच्या पंखांना स्पर्श करत होते. 12प्रत्येक जण सरळ जात होता, जसा आत्मा त्यांना जाण्यासाठी सांगत तसे ते न वळता, सरळ पुढे जात. 13ते जिवंत प्राणी जळत्या कोलीतासमान किंवा मशालीसमान दिसत होते; त्यांच्यातून प्रखर अग्नी निघत होता व विजा चकाकत होत्या. 14हे जिवंत प्राणी चपळतेने पुढे मागे हालचाल करीत होते आणि ते विजेसारखे दिसत होते! 15मग मी त्या प्राण्यांकडे पाहिले त्या जिवंत प्राण्यांच्या बाजूला भूमीवर एक एक चाक होते. 16त्या चाकांचे स्वरूप असे दिसत होतेः चारही चाके एक समान व वैडूर्य मण्यांसारखी होती; आणि जणूकाही चाकात चाक घातलेले असून त्यांना एकमेकांस छेदलेले असावे असा त्यांचा आकार होता. 17जेव्हा चाक चालत तेव्हा ते कोणत्याही दिशेने वळण न घेता चालत. 18त्यांच्या धावा या भयावह व उंच होत्या, कारण त्या धावांसभोवती सर्वत्र डोळे होते! 19जेव्हा ते जिवंत प्राणी चालत तेव्हा त्याच्या सोबत चाके चालत जेव्हा ते प्राणी पृथ्वीपासून उंच उडत तेव्हा त्यांची चाकेही त्यांच्या सोबत उंचावत होती. 20जेथे जिवंत प्राण्यांचा आत्मा त्यांना नेऊ इच्छित होता ते तिकडे जात होते. आत्मा त्यांना उंचावत होता आणि त्यांच्या चाकात त्यांचा आत्मा होता.
संध्याप्रार्थना: वाचन
1याकोबाबरोबर जे इस्राएलाचे पुत्र व त्यांची कुटुंबे मिसर देशात गेली, त्यांची नावे हीः 2रऊबेन, शिमोन, लेवी, यहूदा 3इस्साखार, जबुलून, बन्यामीन; 4दान, नफताली, गाद व आशेर. 5याकोबाच्या वंशाचे एकूण सत्तरजण होते. योसेफ हा आधीच मिसर देशात होता. 6नंतर योसेफ, त्याचे भाऊ व त्या पिढीतील सर्व मरण पावले. 7इस्राएल लोक फार फलदायी होऊन त्यांची संख्या अतिशय वाढत गेली; ते महाशक्तीशाली झाले आणि सर्व देश त्यांनी भरून गेला. 8नंतर मिसर देशावर नवीन राजा राज्य करू लागला. त्यास योसेफाच्या स्मरणाची काही काळजी नव्हती. 9तो आपल्या लोकांस म्हणाला, “इस्राएली वंशाच्या लोकांकडे पाहा, ते पुष्कळ अधिक आहेत व आपल्यापेक्षा शक्तीमानही झाले आहेत; 10चला, आपण त्यांच्याशी चतुराईने वागू, नाहीतर त्यांची निरंतर अधिक वाढ होईल आणि जर एखादा युद्धाचा प्रसंग आला तर हे लोक आपल्या शत्रूला जाऊन मिळतील; आणि मग ते आपल्याविरुद्ध लढतील आणि देशातून निघून जातील.” 11म्हणून त्याने त्यांना कामाच्या ओझ्याने जाचण्यासाठी त्यांच्यावर मुकादम नेमले. त्यांनी फारोकरता पिथोम व रामसेस ही दोन शहरे इस्राएल लोकांकडून बांधून घेतली; 12पण मिसऱ्यांनी त्यांना जसजसे जाचले तसतसे ते संख्येने अधिकच वाढत गेले व अधिकच पसरले, म्हणून इस्राएल लोकांची त्यांना भीती वाटू लागली. 13आणि मग मिसऱ्यांनी इस्राएल लोकांवर अधिक कष्टाची कामे लादली. 14अशाप्रकारे त्यांनी इस्राएल लोकांचे जीवन फारच कठीण काबाडकष्टांचे व हाल अपेष्टांचे केले; त्यांनी त्यांना विटा बनविण्याची, बांधकामासाठी चुना बनविण्याची तसेच शेतीची व इतर अतिशय कठीण व कष्टाची कामे बळजबरीने करायला लावली. 15मग मिसराचा राजा इब्री सुइणींशी बोलला. त्यांच्यातल्या एकीचे नाव शिप्रा व दुसरीचे पुवा असे होते. 16तो म्हणाला, “तुम्ही इब्री स्त्रियांचे बाळंतपण करत असता, त्या प्रसूत होण्याच्या जागी त्या बसल्या म्हणजे नीट पाहा, आणि त्या स्त्रियांना मुलगी झाली तर तिला जिवंत ठेवा; परंतु त्यांना मुलगा झाला तर त्यास अवश्य मारून टाका.” 17परंतु त्या इब्री सुइणी देवाचे भय व आदर धरून त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या होत्या, म्हणून त्यांनी मिसरी राजाची आज्ञा मानली नाही; तर त्यांनी जन्मणाऱ्या मुलांनाही जिवंत ठेवले. 18तेव्हा मिसराच्या राजाने त्या सुइणींना बोलावून विचारले, “तुम्ही असे का केले? तुम्ही जन्मलेल्या मुलांना का जिवंत ठेवले?” 19त्या सुइणी फारोला म्हणाल्या, “या इब्री स्त्रिया मिसरच्या स्त्रियांपेक्षा फार ताकदवान आहेत; आम्ही सुइणी त्यांच्याकडे जाऊन पोहचण्यापूर्वीच त्या प्रसूत होतात.” 20त्याबद्दल देवाने त्या सुइणींचे कल्याण केले. इस्राएल लोक तर अधिक वाढून फार बलवान झाले.
संध्याप्रार्थना: वाचन
1ऊस देशात एक पुरूष राहत होता त्याचे नाव ईयोब होते, तो सात्वीक व सरळ होता, तो देवाचा आदर करीत असे व वाईटापासून दूर राही. 2ईयोबाला सात मुले आणि तीन मुली झाल्या. 3ईयोबाजवळ सात हजार मेंढरे, तीन हजार उंट, बैलांच्या पाचशे जोड्या, आणि पाचशे गाढवी होती. त्याच्याकडे पुष्कळ चांगले सेवकही होते. पूर्वेमधील सर्व लोकांमध्ये तो अतिशय थोर पुरूष होता. 4प्रत्येकाने ठरवलेल्या दिवशी त्याची मुले आपापल्या घरी भोजन समारंभ करीत असत आणि त्या सर्वांसोबत खाणे आणि पिणे करावयास त्यांच्या तिन्ही बहिणींनाही बोलवत असत. 5जेव्हा भोजनसमारंभाचे दिवस पूर्ण झाल्यावर, ईयोब त्यांना बोलवून त्यांची देवासाठी पुन्हा शुद्धी करी. तो मोठ्या पहाटेस लवकर ऊठे आणि त्याच्या प्रत्येक मुलासाठी होमार्पण करीत असे, तो म्हणत असे, “कदाचित माझ्या मुलांनी पाप केले असेल आणि त्यांच्या मनात देवाचा तिरस्कार केला असेल.” ह्याप्रमाणे ईयोब नित्य करीत असे. 6एक दिवस असा आला कि त्या दिवशी देवपुत्र परमेश्वरासमोर येऊन उभे राहीले, त्यांच्यामध्ये सैतानही तेथे आला. 7परमेश्वर सैतानास म्हणाला, “तू कोठून येत आहेस?” नंतर सैतानाने परमेश्वरास उत्तर दिले आणि म्हणाला, “पृथ्वीवर हिंडून फिरून आणि तिच्यावर खाली-वर चालत जाऊन आलो आहे.” 8परमेश्वर सैतानास म्हणाला, “तू माझा सेवक, ईयोब याच्याकडे लक्ष दिलेस काय? पृथ्वीत त्याच्यासारखा सरळ आणि सात्विक, देवभिरू व दुष्टतेपासून दूर राहणारा असा कोणीही मनुष्य नाही.” 9नंतर सैतानाने परमेश्वरास उत्तर दिले आणि म्हणाला, “ईयोब देवाचे भय ऊगीच बाळगतो काय? 10तू त्याच्या भोवती, त्याच्या घरासभोवती, आणि त्याच्या सर्वस्वाच्या प्रत्येक बाजूस कुंपण घातले आहेस ना? तू त्याच्या हातांच्या कामांस यश दिले आहेस, आणि भूमीत त्याचे धन वाढत आहे. 11पण जर तू आपला हात पुढे करून त्याच्याजवळ असणाऱ्या सर्वस्वावर टाकशील तर तो आत्ताच तुझ्या तोंडावर तुझा त्याग करील.” 12परमेश्वर सैतानास म्हणाला, “पाहा, त्याचे सर्व जे काही आहे ते तुझ्या अधिकारात आहे, फक्त त्यास तुझ्या हाताचा स्पर्श करू नको.” मग सैतान परमेश्वरापुढून निघून गेला.
शुभवर्तमान (पूर्वपवित्रित अर्पणांची उपासना)
3मग तो जैतूनाच्या डोंगरावर बसला असताना, त्याचे शिष्य त्याच्याशी एकांतात येऊन म्हणाले, “आम्हास सांगा की या गोष्टी कधी होतील? आपल्या येण्याचा आणि युगाचा शेवट होण्याचा समय जवळ आला आहे हे आम्ही कोणत्या चिन्हावरून ओळखावे?” 4येशूने त्यांना उत्तर दिले, “सांभाळ कोणीही तुम्हास फसवू नये. 5कारण माझ्या नावाने पुष्कळजण येतील आणि म्हणतील, मी ख्रिस्त आहे आणि ते पुष्कळ लोकांस फसवतील. 6सांभाळ, तुम्ही लढायांबद्दल आणि लढायांच्या अफवांबद्दल ऐकाल पण त्यामुळे तुम्ही त्यांना भिऊ नका. या गोष्टी घडल्याच पाहिजेत. तरी इतक्यात शेवट जवळ येणार नाही. 7कारण, एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रावर उठेल. अनेक ठिकाणी भूकंप व दुष्काळ येतील. 8पण या सर्व गोष्टी प्रसूतीवेदनांची सुरूवात अशा आहेत. 9ते तुम्हास छळणुकीसाठी धरून देतील आणि तुम्हास जिवे मारतील आणि माझ्या नावाकरता सर्व राष्ट्रे तुमचा द्वेष करतील. 10मग पुष्कळांना अडथळा होईल. ते एकमेकांविरुद्ध उठतील आणि एकमेकांचा द्वेष करतील. 11अनेक खोटे संदेष्टे उठतील आणि, ते पुष्कळांना फसवतील. 12सतत वाढणाऱ्या दुष्टाईमुळे पुष्कळांची प्रीती थंडावेल. 13पण जो मनुष्य शेवटपर्यंत टिकून राहिल तोच तारला जाईल. 14सर्व राष्ट्रांना साक्ष व्हावी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगभर गाजवली जाईल आणि मग शेवट होईल. 15तर दानीएल संदेष्ट्याने सांगितले होते, ओसाड करणारी अमंगळ गोष्ट, पवित्र जागी परमेश्वराच्या भवनामध्ये उभी असलेली तुम्ही पाहाल.” (वाचकाने हे ध्यानात घ्यावे.) 16त्यावेळी यहूदीया प्रांतातील लोकांनी डोंगरावर पळून जावे. 17जो कोणी छतावर असेल त्याने घरातील सामान घेण्यासाठी खाली येऊ नये. 18जर कोणी शेतात असेल तर त्याने आपला सदरा घेण्यासाठी माघारी परत जाऊ नये. 19त्याकाळी गर्भवती असलेल्या किंवा अंगावर पाजीत असतील अश्या स्त्रियांना फार कठीण जाईल. 20जेव्हा या गोष्टी होतील तेव्हा थंडीचे दिवस अथवा शब्बाथ दिवस नसावा यासाठी प्रार्थना करा. 21कारण जगाच्या आरंभापासून कधीही झाली नाही आणि पुन्हा कधी होणार नाही अशी मोठी संकट त्याकाळी येतील. 22आणखी, देवाने ते दिवस जर थोडेच ठेवले नसते तर कोणीही मनुष्य वाचला नसता. परंतु त्याच्या निवडलेल्यांसाठी तो ते दिवस थोडे करील. 23त्यावेळी जर एखाद्याने तुम्हास म्हटले, पाहा! ख्रिस्त येथे आहे किंवा तो तेथे आहे, तर त्याच्यावर विश्वास ठेवू नका. 24खोटे ख्रिस्त आणि खोटे संदेष्टे उदयास येतील. ते महान आश्चर्यकारक चिन्हे दाखवतील. देवाच्या निवडलेल्या लोकांस ते चिन्हे दाखवतील व लोकांस एवढेच नव्हे तर देवाच्या निडवलेल्यांना फसविण्याचा प्रयत्न करतील. 25या गोष्टी होण्याअगोदरच मी तुम्हास सावध केले आहे. 26एखादा मनुष्य तुम्हास सांगेल, पाहा, ख्रिस्त अरण्यात आहे. तर तेथे जाऊ नका. किंवा जर ते म्हणाले, पाहा, तो आतल्या खोलीत आहे, तर त्याच्यावर विश्वास ठेवू नका. 27मी हे म्हणतो कारण वीज जशी पूर्वेकडून पश्चिमेकडे चमकताना सर्वांना दिसते तसेच मनुष्याच्या पुत्राचे येणे देखील होईल. 28जेथे कोठे प्रेत असेल तेथे गिधाडेही जमतील. 29सांभाळत्या दिवसातल्या छळानंतर लगेच असे घडेल; सूर्य अंधकारमय होईल व चंद्र प्रकाश देणार नाही, आकाशातील तारे गळून पडतील, आकाशातील सर्व बळे डळमळतील, आकाश गुंडाळीसारखे गुंडाळले जाईल. 30तेव्हा मनुष्याच्या पुत्राच्या येण्याचे चिन्ह आकाशात दिसेल. तेव्हा जगातील सर्व वंश आपले ऊर बडवून घेतील. मनुष्याच्या पुत्राला आकाशांतल्या मेघांवर आरूढ होऊन सामर्थ्याने आणि मोठ्या गौरवाने येताना पाहतील. 31मनुष्याचा पुत्र कर्ण्याच्या मोठ्या नादात आपले देवदूत पृथ्वीभोवती पाठवून देईल. ते पृथ्वीच्या चारही कोपऱ्यातून, आकाशाच्या एका सीमेपासून दुसऱ्या सीमेपर्यंत निवडलेल्यांना गोळा करतील. 32अंजिराच्या झाडापासून शिका; अंजिराच्या झाडाच्या फांद्या जेव्हा हिरव्या आणि कोवळ्या असतात आणि पाने फुटू लागतात तेव्हा उन्हाळा जवळ आला हे तुम्हास कळते. 33त्याचप्रमाणे तुम्ही या सर्व गोष्टी पाहाल तेव्हा हे जाणा की, तो दरवाजाजवळ आहे. 34मी तुम्हास खरे सांगतो, या सर्व गोष्टी पूर्ण होईपर्यंत ही पिढी नाहीशी होणार नाही. 35आकाश आणि पृथ्वी नाहीशी होतील पण माझी वचने कधीही नष्ट होणार नाहीत.
तारखा रशियन मंडळीच्या ज्युलियन दिनदर्शिकेनुसार आहेत (सर्बियन आणि जॉर्जियन मंडळ्या आणि आथोस पर्वत यांच्याप्रमाणे): मंडळीच्या दिनदर्शिकेतील 13 एप्रिल म्हणजे नागरी दिनदर्शिकेतील 26 एप्रिल. नवी दिनदर्शिका पाळणाऱ्या मंडळ्या (ग्रीस, रोमानिया, बल्गेरिया, युक्रेन…) ठरावीक तारखेचे सण आणि संत त्याच नागरी तारखेला, 13 दिवस आधी, पाळतात, आणि त्यांचे काही पाठ वेगळे आहेत; ईस्टर आणि त्यावर अवलंबून असलेले दिवस सारखेच आहेत.
स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क