Bible Explorer अ‍ॅप मिळवा

मुख्यपृष्ठ › दैनंदिन बायबल पाठ › एप्रिल 2027 › 25 एप्रिल

ऑर्थोडॉक्स दिनदर्शिका · 12 एप्रिल (जुनी पद्धत)

ऑर्थोडॉक्स दैनंदिन पाठ — 25 एप्रिल 2027

रविवार

सण आणि संत

झावळ्यांचा रविवार. आपल्या प्रभूचा यरूशलेमात प्रवेश

महान लेंत

मासे चालतात

हे मठाच्या नियमानुसार आहे. पॅरिशमध्ये उपवासाचे प्रमाण आपल्या पापकबुलीच्या धर्मगुरूसोबत, आरोग्य, वय आणि परिस्थितीनुसार ठरवले जाते.

दिवसाची वाचने

संध्याप्रार्थना: वाचन

उत्प 49:1–2, 8–12

1त्यानंतर याकोबाने आपल्या सर्व मुलांना आपल्याजवळ बोलावले, तो म्हणाला, “माझ्या मुलांनो, माझ्याजवळ या म्हणजे पुढील काळी तुमचे काय होईल, ते मी तुम्हास सांगतो.” 2“याकोबाच्या मुलांनो, तुम्ही सर्व एकत्र या आणि ऐका, तुमचा बाप इस्राएल याचे ऐका. 8यहूदा, तुझे भाऊ तुझी स्तुती करतील. तुझा हात तुझ्या शत्रूंच्या मानेवर राहील. तुझ्या पित्याची मुले तुला लवून नमन करतील. 9यहूदा सिंहाचा छावा आहे. माझ्या मुला, तू शिकारीपासून वरपर्यंत गेलास. तो खाली वाकला आहे, तो सिंहासारखा, सिंहिणीसारखा दबा धरून बसला आहे. त्यास उठवण्याचे धाडस कोण करील? 10शिलो येईपर्यंत यहूदाकडून राजवेत्र जाणार नाही, किंवा अधिकाराची काठी त्याच्या पायामधून निघून जाणार नाही. राष्ट्रे त्याच्या आज्ञा पाळतील. 11तो त्याचा तरुण घोडा द्राक्षवेलीस, आणि त्याचे शिंगरु खास द्राक्षवेलीस बांधेल. त्याने त्याचे वस्त्र द्राक्षरसात आणि आपला झगा द्राक्षांच्या रक्तात धुतला आहे. 12त्याचे डोळे द्राक्षरसापेक्षा अधिक लालबुंद होतील. त्याचे दात दूधापेक्षा अधिक सफेद होतील.

संध्याप्रार्थना: वाचन

सफ 3:14–19

14सियोन कन्ये, गा आणि हे इस्राएल, आनंदाने जल्लोष कर! यरूशलेमेच्या कन्ये, आनंद व उल्लास कर! 15कारण परमेश्वराने तुझा दंड दूर केला आहे; त्यांने तुझ्या शत्रूला घालवून दिले आहे! इस्राएलचा राजा, परमेश्वर तुझ्यामध्ये आहे. आता तुला कोणत्याही अरिष्टाची भीती बाळगण्याचे कारण नाही! 16त्या दिवशी ते यरूशलेमेला असे म्हणतील, “घाबरू नको! हे सियोना तुझे हात लटपटू देऊ नको. 17परमेश्वर तुझा देव, तुझ्यामध्ये आहे, तो तुला वाचवायला पराक्रमी असा आहे; तो हर्षाने तुझ्याविषयी आनंद करील, तो त्याच्या प्रेमासोबत तुझ्याकडे शांती घेऊन येईल. तो गायनाने तुझ्याविषयी आनंद करील. 18जे लोक सणाच्या वेळेकरता दु:ख करीत आहेत त्यांना मी एकत्र करीन. मी तुझी निंदा आणि नाश होण्याची भीती तुझ्यापासून दूर करेन. 19त्यावेळी, तुला जे पीडतात त्यांचा मी नायनाट करीन, जी लंगडी आहे तिला मी वाचवीन, आणि ज्यांना घालवून दिले आहे त्यांना गोळा करीन, आणि ज्या प्रत्येक देशात त्यांची अप्रतिष्ठा झाली, त्यामध्ये मी त्यांना प्रशंसा व कीर्ती मिळवून देईन.

संध्याप्रार्थना: वाचन

जख 9:9–15

9हे सियोनकन्ये, आनंदोत्सव कर! यरूशलेम कन्यांनो, आनंदाने जल्लोश करा! पाहा! तुमचा राजा तुमच्याकडे नीतिमत्त्वाने येत आहे; आणि तो तारण घेवून येत आहे. तो विनम्र आहे आणि एका गाढवीवर, गाढवीच्या शिंगरावर तो स्वार झाला आहे. 10त्यानंतर मी एफ्राईममधील रथांचा आणि यरूशलेमेतील घोडदळाचा नाश करीन आणि युध्दातील धनुष्यबाण मोडतील; कारण तो शांतीची वार्ता राष्ट्रांशी बोलेल, त्याचे राज्य सर्व समुद्रांवर आणि महानदीपासून ते पृथ्वीच्या शेवटापर्यंत असेल. 11आणि तुझ्याविषयी म्हटले तर, तुझ्याशी मी केलेल्या माझ्या कराराच्या रक्तामुळे, निर्जल खड्ड्यांतून तुझ्या बंधकांना मुक्त केले आहे. 12आशावान कैद्यांनो, मजबूत दुर्गांकडे परत या! मी आजही जाहीर करतो की मी तुम्हास दुप्पटीने प्रतिफळ देईन 13कारण मी यहूदाला धनुष्य म्हणून वाकवले आहे. एफ्राईमरूपी बाणांनी मी आपला भाता भरला आहे. हे सियोने, ग्रीसच्या पुत्रांशी लढायला मी तुझ्या पुत्रांना उत्तेजित केले आहे. त्यांना योद्ध्याच्या तलवारीप्रमाणे मी ग्रीसाच्याविरूद्ध वापरीन. 14परमेश्वर त्यांना दर्शन देईल आणि विजेप्रमाणे आपले बाण सोडील. माझा प्रभू परमेश्वर, तुतारी फुंकेल आणि दक्षिणेकडून वावटळीप्रमाणे तो चालून येईल. 15सेनाधीश परमेश्वर त्यांचे रक्षण करील आणि ते दगड व गोफणीचा उपयोग करून शत्रूंचा पराभव करतील व त्यांना गिळतील व मद्यप्राशन केल्याप्रमाणे आरोळी करतील आणि ते वेदीच्या कोपऱ्यावरील कटोऱ्यांसारखे भरुन वाहतील.

प्रातःप्रार्थना: शुभवर्तमान

मत्त 21:1–11, 15–17

1येशू व त्याचे शिष्य यरूशलेम शहराजवळ आले असता ते जैतूनाचा डोंगराजवळ बेथफगे या जागी थांबले. नंतर येशूने त्याच्या दोन शिष्यांना पाठवले, 2त्यांना असे सांगितले की, “तुम्ही समोरच्या गावात जा आणि लागलीच एक गाढवी बांधलेली व तिच्याबरोबर एक शिंगरु असे तुम्हास आढळेल. त्यांना सोडून माझ्याकडे घेऊन या. 3जर कोणी तुम्हास काही विचारले, तर त्यास सांगा की, प्रभूला यांची गरज आहे, तो ती लगेच माझ्याकडे पाठवील.” 4हे यासाठी घडले की संदेष्ट्यांच्या द्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावेः ते असे की, 5“सियोनेच्या कन्येला सांगा, पाहा, तुझा राज लीन होऊन गाढवावर म्हणजे गाढवीच्या शिंगरावर बसून तुझ्याकडे येत आहे.” 6तेव्हा शिष्यांनी जाऊन येशूच्या आज्ञेप्रमाणे केले. 7शिष्यांनी गाढवी व शिंगरु आणून त्यांनी त्यावर आपले अंगरखे घातले आणि येशू त्यावर बसला. 8पुष्कळ लोकांनी आपले अंगरखे वाटेवर अंथरले. दुसऱ्यांनी झाडांच्या फांद्या तोडल्या आणि त्या रस्त्यावर पसरल्या. 9येशूच्या पुढे चालणारा लोकसुदाय आणि मागे चालणारे. मोठ्याने जयघोष करू लागले, “दाविदाच्या पुत्राला होसान्ना. प्रभूच्या नावाने येणारा धन्यवादित आहे. परम उंचामध्ये होसान्ना!” 10जेव्हा येशूने यरूशलेम शहरामध्ये प्रवेश केला तेव्हा संपूर्ण शहर गजबजून निघाले व लोक विचारत होते, “हा कोण आहे?” 11जमावाने उत्तर दिले, “हा गालील प्रांतातील नासरेथ नगरातून आलेला, येशू संदेष्टा आहे.” 15परंतु जेव्हा मुख्य याजकांना व नियमशास्त्राचे शिक्षक यांनी येशूने केलेल्या आश्चर्यकारक गोष्टी आणि परमेश्वराच्या भवनाच्या आवारात लहान मुलांना, “दाविदाच्या पुत्राला होसान्ना.” अशी घोषणा देताना पाहिले, तेव्हा त्यांना संताप आला. 16त्यांनी त्यास विचारले, “ही मुले काय म्हणत आहे हे तुम्ही ऐकता ना?” येशूने त्यांना उत्तर दिले, “होय. परंतु तू बालके व तान्हुली यांच्या मुखातून स्तुती पूर्ण करवली आहे. हे तुमच्या वाचण्यात कधी आले नाही काय?” 17नंतर येशू त्यास सोडून शहराबाहेर बेथानीस गेला. तो रात्रभर तेथे राहिला.

प्रेषितांचे पत्र

फिलि 4:4–9

4प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा; पुन्हा सांगतो, आनंद करा. 5सर्व लोकांस तुमची सहनशीलता कळून येवो; प्रभू समीप आहे. 6कशा ही विषयाची काळजी करू नका पण प्रार्थना आणि विनंती करून आभारप्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा; 7म्हणजे सर्व बुद्धीसामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाची दिलेली शांती तुमची अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठायी राखील. 8बंधूंनो, शेवटी इतके सांगतो की, जे काही खरे आहे, जे काही आदरणीय आहे, जे काही न्याय्य आहे, जे काही शुद्ध आहे, जे काही प्रशंसनीय, जे काही श्रवणीय, जो काही सद्गुण, जी काही स्तुती, त्यावर विचार करा. 9माझ्यापासून जे तुम्ही शिकला, जे स्वीकारले व माझे जे ऐकले व पाहिले ते तुम्ही आचरीत राहा आणि शांतीदाता देव तुमच्याबरोबर राहील.

शुभवर्तमान

योहा 12:1–18

1मग येशू वल्हांडणाच्या सहा दिवस आधी बेथानीस आला आणि ज्या लाजराला येशूने मरण पावलेल्यातून उठवले होते तो तेथे होता. 2म्हणून त्यांनी तेथे त्याच्यासाठी रात्रीचे भोजन केले आणि मार्था वाढीत होती. पण त्याच्याबरोबर भोजनास बसलेल्यात लाजर हा एक होता. 3तेव्हा मरीयेने अर्धा शेर, शुद्ध जटामांसीचे, अतिमोलवान सुवासिक तेल घेऊन येशूच्या पायांना लावून आपल्या केसांनी त्याचे पाय पुसले; आणि तेलाच्या सुवासाने घर भरून गेले. 4तेव्हा, त्याच्या शिष्यांतला एक, त्यास धरून देणार होता तो यहूदा इस्कार्योत म्हणाला, 5“हे सुवासिक तेल तीनशे चांदीच्या नाण्यांस विकून ते गरीबास का दिले नाही?” 6त्यास गरिबांची काळजी होती म्हणून तो हे बोलला असे नाही, तर तो चोर होता म्हणून हे बोलला. त्याच्याजवळ डबी होती आणि तिच्यात जे टाकण्यांत येई ते तो चोरून घेई, म्हणून तो असे बोलला. 7यावरुन येशूने म्हटले, “तिच्या वाटेस जाऊ नका. मला पुरण्याच्या दिवसासाठी तिने हे राखून ठेवले आहे. 8कारण गरीब नेहमी तुमच्याजवळ आहेत, पण मी नेहमी तुमच्याजवळ आहे असे नाही.” 9तो तेथे आहे असे यहूद्यातील पुष्कळ लोकांस कळले आणि केवळ येशूकरता नाही, तर ज्याला त्याने मरण पावलेल्यातून उठवले होते त्या लाजरालाही आपण पाहावे म्हणून ते आले. 10पण मुख्य याजकांनी आपण लाजरालाही ठार मारावे असा विचार केला. 11कारण त्याच्यामुळे पुष्कळ यहूदी त्यांना सोडून येशूवर विश्वास ठेवत होते. 12दुसर्‍या दिवशी सणास आलेले पुष्कळ लोक येशू यरूशलेम शहरास येत आहे असे ऐकून, 13खजुरीच्या झावळ्या घेऊन त्याच्या भेटीस घ्यायला बाहेर निघाले आणि गजर करीत म्हणाले, “होसान्ना! प्रभूच्या नावाने येणारा इस्राएलाचा राजा!” धन्यवादित असो. 14आणि येशूला एक शिंगरु मिळाल्यावर तो त्यावर बसला. 15‘हे सियोनेच्या कन्ये, भिऊ नको, पाहा, तुझा राजा गाढवीच्या शिंगरावर बसून येत आहे.’ या शास्त्रलेखाप्रमाणे हे घडले. 16या गोष्टी तर त्याच्या शिष्यांना पहिल्याने समजल्या नव्हत्या, पण येशूचे गौरव झाल्यावर, त्यांना आठवण झाली की, त्याच्याविषयी या गोष्टी लिहिल्या होत्या आणि लोकांनी त्याच्यासाठी असे केले होते. 17त्याने लाजराला कबरेतून बोलावून मरण पावलेल्यातून उठवले, त्यावेळेस जो लोकसमुदाय त्याच्याबरोबर होता त्यांने त्याच्याविषयी साक्ष दिली. 18त्याने हे चिन्ह केले होते असे त्यांनी ऐकले म्हणूनही लोक त्यास भेटावयास गेले.

तारखा रशियन मंडळीच्या ज्युलियन दिनदर्शिकेनुसार आहेत (सर्बियन आणि जॉर्जियन मंडळ्या आणि आथोस पर्वत यांच्याप्रमाणे): मंडळीच्या दिनदर्शिकेतील 12 एप्रिल म्हणजे नागरी दिनदर्शिकेतील 25 एप्रिल. नवी दिनदर्शिका पाळणाऱ्या मंडळ्या (ग्रीस, रोमानिया, बल्गेरिया, युक्रेन…) ठरावीक तारखेचे सण आणि संत त्याच नागरी तारखेला, 13 दिवस आधी, पाळतात, आणि त्यांचे काही पाठ वेगळे आहेत; ईस्टर आणि त्यावर अवलंबून असलेले दिवस सारखेच आहेत.

स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क