मुख्यपृष्ठ › दैनंदिन बायबल पाठ › एप्रिल 2027 › 27 एप्रिल
ऑर्थोडॉक्स दिनदर्शिका · 14 एप्रिल (जुनी पद्धत)
ऑर्थोडॉक्स दैनंदिन पाठ — 27 एप्रिल 2027
मंगळवार · पवित्र आठवडा
सण आणि संत
महान आणि पवित्र मंगळवार
महान लेंत
कडक उपवास (कोरडे अन्न: भाकर, भाज्या, फळे)
हे मठाच्या नियमानुसार आहे. पॅरिशमध्ये उपवासाचे प्रमाण आपल्या पापकबुलीच्या धर्मगुरूसोबत, आरोग्य, वय आणि परिस्थितीनुसार ठरवले जाते.
दिवसाची वाचने
शुभवर्तमान (वराची प्रातःप्रार्थना)
15मग परूशी गेले आणि येशूला कसे पकडावे याचा कट करू लागले. त्यास शब्दात पकडण्याचा प्रयत्न करू लागले. 16परूश्यांनी त्यांचे शिष्य हेरोद्यांसह त्याच्याकडे पाठवून. ते म्हणाले, “गुरुजी, आम्हास माहीत आहे की आपण खरे आहात आणि तुम्ही देवाचा मार्ग खरेपणाने शिकवता व दुसरे काय विचार करतात याची तुम्ही पर्वा करीत नाही आणि तुम्ही लोकांमध्ये पक्षपात दाखवत नाही. 17म्हणून तुमचे मत आम्हास सांगा, कैसराला कर देणे योग्य आहे की नाही?” 18येशूला त्यांचा दुष्ट उद्देश माहीत होता, म्हणून तो म्हणाला, “ढोंग्यांनो, तुम्ही माझी परीक्षा का घेत आहात? 19कर भरण्यासाठी जे नाणे वापरले जाते ते मला दाखवा.” त्या लोकांनी येशूला चांदीचे एक नाणे दाखविले. 20तेव्हा येशूने विचारले, “या नाण्यावर कोणाचे चित्र आणि नाव लिहिलेले आहे?” 21त्या लोकांनी उत्तर दिले, “कैसराचे.” यावर येशू त्यांना म्हणाला, “जे कैसराचे आहे ते कैसराला द्या आणि जे देवाचे आहे ते देवाला द्या.” 22येशू जे म्हणाला ते त्या लोकांनी ऐकले तेव्हा ते आश्चर्यचकित झाले आणि तेथून निघून गेले. 23पुनरुत्थान होत नाही, असे म्हणणाऱ्या काही सदूक्यांनी त्याच दिवशी त्याच्याकडे येऊन त्यास विचारले, 24ते म्हणाले, “गुरूजी, मोशेने शिकविले की, जर एखादा मनुष्य मरण पावला आणि त्यास मूलबाळ नसेल, तर त्याच्या भावाने त्याच्या पत्नीशी लग्न करावे, म्हणजे मरण पावलेल्या भावाचा वंश चालेल. 25आता, आमच्यामध्ये सात भाऊ होते. पहिल्याने लग्न केले आणि नंतर तो मरण पावला आणि त्यास मूल नसल्याने त्याच्या भावाने त्याच्या पत्नीशी लग्न केले. 26असेच दुसऱ्या व तिसऱ्या भावाच्या बाबतीतही घडले व सातही भावांनी तिच्याशी लग्न केले आणि मरण पावले. 27शेवटी ती स्त्री मरण पावली. 28आता प्रश्न असा आहे की, पुनरुत्थानाच्या वेळेस ती कोणाची पत्नी असेल, कारण सर्व सातही भावांनी तिच्याशी लग्न केले होते.” 29येशूने त्यांना उत्तर देऊन म्हटले, “तुम्ही चुकीची समजूत करून घेत आहात, कारण तुम्हास शास्त्रलेख व देवाचे सामर्थ्य माहीत नाही. 30तुम्हास समजले पाहिजे की, पुनरुत्थानानंतरच्या जीवनात लोक लग्न करणार नाहीत किंवा करून देणार नाहीत, उलट ते स्वर्गात देवदूतासारखे असतील. 31तरी, मरण पावलेल्यांच्या पुनरुत्थानाविषयी देवाने तुम्हास जे सांगितले ते तुम्ही अजूनपर्यंत वाचले नाही काय? 32ते असे की, ‘मी अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव आणि याकोबाचा देव आहे,’ तो मरण पावलेल्यांचा देव नाही तर जिवंताचा देव आहे.” 33जेव्हा जमावाने हे ऐकले तेव्हा त्याच्या शिकवणीने आश्चर्यचकित झाले. 34येशूने सदूकी लोकांस निरूत्तर केले. असे ऐकून परूश्यांनी एकत्र येऊन मसलत केली. 35एक परूशी नियमशास्त्राचा जाणकार होत, त्याने त्याची परीक्षा पाहावी म्हणून प्रश्न केला. 36त्याने विचारले, “गुरूजी, नियमशास्त्रातील कोणती आज्ञा सर्वांत महत्त्वाची आहे?” 37येशूने उत्तर दिले, “‘प्रभू आपला देव याजवर तू आपल्या पूर्ण अंतःकरणाने, आपल्या पूर्ण जिवाने, आपल्या पूर्ण मनाने प्रीती कर.’ 38ही पहिली आणि मोठी आज्ञा आहे. 39हिच्यासारखी दुसरी एक आहे ‘जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर.’ 40सर्व नियमशास्त्र आणि संदेष्ट्यांचे लिखाण या दोन आज्ञांवरच अवलंबून आहे.” 41म्हणून परूशी एकत्र जमले असताना, येशूने त्यांना प्रश्न केला. 42येशू म्हणाला, “ख्रिस्ताविषयी तुमचे काय मत आहे? तो कोणाचा पुत्र आहे?” परूश्यांनी उत्तर दिले, “ख्रिस्त हा दाविदाचा पुत्र आहे.” 43त्यावर येशू त्यांना म्हणाला, “तर दावीद देवाच्या आत्म्याद्वारे, त्याला प्रभू असे कसे म्हणतो? तो म्हणतो, 44‘परमेश्वराने माझ्या प्रभूला सांगितले की, “मी तुझे वैरी तुझे पादासन करीपर्यंत, माझ्या उजव्या बाजूला बैस.” 45आता, मग जर दावीद त्यास प्रभू म्हणतो तर तो दाविदाचा पुत्र कसा होऊ शकतो? 46तेव्हा कोणाला एका शब्दानेही त्यास उत्तर देता येईना आणि त्या दिवसानंतर त्यास आणखी प्रश्न विचारण्याचे धाडस कोणीही केले नाही. 23:1येशू लोकांशी व त्याच्या शिष्यांशी बोलला, 2तो म्हणाला, “नियमशास्त्राचे शिक्षक व परूशी हे मोशेच्या आसनावर बसले आहेत. 3म्हणून ते जसे सांगतात तसे तुम्ही करा आणि पाळा. पण तुम्ही त्यांच्या कृतीप्रमाणे तसे करू नका. याचे कारण ते सांगतात पण त्याप्रमाणे करत नाहीत. 4वाहावयास अवघड असे ओझे ते बांधतात व लोकांच्या खांद्यांवर देतात पण स्वतः ते ओझे उचलायला एक बोटदेखील लावत नाहीत. 5ते त्यांचे सर्व कामे लोकांनी पाहावे म्हणून करतात कारण ते आपली स्मरणपत्रे रूंद करतात आणि आपल्या झग्यांचे काठ मोठे करतात. 6मेजवानीच्या ठिकाणी आपल्याला विशेष मानाची जागा मिळावी असे त्यांना वाटते. तसेच यहूद्यांच्या सभास्थानात मोक्याच्या जागी बसायला त्यांना फार आवडते. 7बाजारातील मुख्य रस्त्याने जाता येता लोकांनी आपल्याला मान द्यावा याची त्यांना फार आवड असते आणि लोकांनी त्यांना ‘रब्बी’ म्हणावे असे त्यांना वाटते. 8परंतु तुम्ही स्वतःला ‘रब्बी’ म्हणवून घेऊ नका. तुम्ही सर्व एकमेकांचे भाऊ आहात, तुमचा गुरू एकच आहे. 9आणि जगातील कोणालाही पिता म्हणू नका कारण तुमचा पिता एकच आहे व तो स्वर्गात आहे. 10तुम्ही स्वतःला मालक म्हणून घेऊ नका. तुमचा मालक ख्रिस्त आहे. 11तुमच्यातील जो सेवक बनून तुमची सेवा करतो तो तुमच्यात सर्वात मोठा होय. 12जो स्वतःला मोठा समजेल त्यास कमी लेखले जाईल. स्वतःला लहान समजणारा प्रत्येकजण मोठा गणला जाईल. 13अहो, परूश्यांनो आणि नियमशास्त्राच्या शिक्षकांनो, तुम्हास हाय, तुम्ही ढोंगी आहात! तुम्ही स्वर्गाच्या राज्याचा रस्ता लोकांसाठी बंद करता, तुम्ही स्वतः तर आत जात नाहीच, पण जे आत जाण्याचा प्रयत्न करतात त्यांनाही आत जाऊ देत नाहीत. 14अहो परूश्यांनो व नियमशास्त्राच्या शिक्षकांनो, ढोंग्यांनो तुमची केवढी दुर्दशा होणार कारण तुम्ही विधवांची घरे खाऊन टाकता व ढोंगाने लांब लांब प्रार्थना करता; यामुळे तुम्हास अधिक शिक्षा होइल. 15परूश्यांनो व नियमशास्त्राच्या शिक्षकांनो, तुम्ही दुःखी व्हाल. तुम्ही ढोंगी आहात कारण तुम्ही एक मतानुसारी करण्यासाठी समुद्र व भूमी पालथी घालता आणि तुम्हास तो मिळाला म्हणजे तुम्ही त्यास आपल्याहून दुप्पट नरकपुत्रासारखे करून टाकता. 16तुम्हास दुःख होईल. आंधळ्या वाटाड्यांनो, जे तुम्ही म्हणता, जर कोणी परमेश्वराच्या भवनाची शपथ घेतो तर काही नाही; पण जर एखादा त्या भवनातील सोन्याची शपथ घेऊन बोलतो, तर तो बांधलेला आहे. 17तुम्ही मूर्ख आंधळे आहात. सोने आणि परमेश्वराचे भवन यांपैकी कोणते अधिक महत्त्वाचे आहे? ते सोने किंवा भवन, जे त्या सोन्याला पवित्र बनवते. 18आणि तुम्ही असे म्हणता. जर एखादा वेदीची शपथ घेतो तर त्यामध्ये काही वावगे नाही. पण जर एखादा वेदीवरील अर्पणाची शपथ घेतो तर तो बांधलेला आहे. 19तुम्ही आंधळे आहात कारण मोठे काय आहे? ते अर्पण की अर्पणाला पवित्र करणारी वेदी? 20म्हणून जो वेदीची शपथ घेतो तो त्या वेदीबरोबर त्यावरच्या सर्वांची शपथ घेतो. 21तसेच जो परमेश्वराच्या भवनाची शपथ घेतो तो भवन व त्यामध्ये राहणाऱ्या देवाची देखील शपथ घेतो. 22जो स्वर्गाची शपथ घेतो तो देवाच्या आसनाची व त्यावर बसणाऱ्याचीही शपथ घेतो. 23परूश्यांनो, नियमशास्त्राच्या शिक्षकांनो, तुम्ही दुःखी व्हाल. तुम्ही ढोंगी आहात! तुमचे जे काही आहे त्याचा दशांश तुम्ही देवाला देता; पुदिना, शेप, जिरे यांचा देखील दशांश देता. पण नियमशास्त्राच्या महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे: न्याय, दया व विश्वास या गोष्टी तुम्ही सोडल्या आहेत; पण तुम्ही या करायच्या होत्या आणि त्या सोडावयाच्या नव्हत्या. 24तुम्ही आंधळे वाटाडे आहात. तुम्ही डास गाळून काढता व उंट गिळून टाकता. 25अहो परूश्यांनो, नियमशास्त्राच्या शिक्षकांनो, तुम्ही दुःखी व्हाल, तुम्ही ढोंगी आहात! तुम्ही आपल्या ताट व वाट्या बाहेरून साफ करता पण ते आतून अपहार आणि असंयम यांनी त्या आतून भरल्या आहेत. 26अहो परूश्यांनो, तुम्ही आंधळे आहात! अगोदर तुमची वाटी आतून घासा व धुवा म्हणजे ती बाहेरून देखील खरोखर साफ होईल. 27अहो परूश्यांनो नियमशास्त्राच्या शिक्षकांनो, तुम्ही दुःखी व्हाल. तुम्ही ढोंगी आहात! रंगसफेदी केलेल्या कबरांसारखे तुम्ही आहात. त्या वरून चांगल्या दिसतात पण आतून मरण पावलेल्या मनुष्यांच्या हाडांनी भरल्या आहेत. 28तुम्ही सर्व लोकांस बाहेरून नीतिमान दिसता पण तुम्ही आतून ढोंग व दुष्टपणा यांनी भरलेले आहात. 29अहो परूश्यांनो, नियमशास्त्राच्या शिक्षकांनो, तुम्ही दुःखी व्हाल. तुम्ही ढोंगी आहात! तुम्ही संदेष्ट्यांच्या कबरा बांधता आणि जे लोक नीतिमान जीवन जगले त्यांच्या कबरा सजवता. 30आणि तुम्ही म्हणता जर आम्ही आमच्या वाडवडिलांच्या काळात जिवंत असतो तर संदेष्ट्यांच्या रक्तात त्यांचे भागीदार झालो नसतो. 31पण ज्यांनी ज्यांनी संदेष्ट्यांना जिवे मारले, त्यांचेच तुम्ही वंशज आहात असा स्वतःविषयी पुरावा तुम्ही देता. 32पुढे व्हा आणि तुमच्या वाडवडिलांनी सुरू केलेली पापी कामे पूर्ण करा. 33तुम्ही साप व विषारी सापाची पिल्ले आहात. तुम्ही नरकाच्या शिक्षेपासून कसे पळाल? 34मी तुम्हास सांगतो की मी तुमच्याकडे संदेष्टे, ज्ञानी लोक आणि शिक्षक पाठवत आहे. त्यांच्यातील काहींना तुम्ही जिवे माराल. त्यांपैकी काहींना वधस्तंभावर खिळाल. त्यांच्यातील काहींना तुमच्या सभास्थानात फटके माराल आणि एका नगरातून दुसऱ्या नगरात तुम्ही त्यांचा पाठलाग कराल. 35म्हणजे नीतिमान हाबेल याच्या रक्तापासून तुम्ही ज्याला वेदी आणि पवित्रस्थान यांच्यामध्ये ठार मारले तो बरख्याचा पुत्र जखऱ्या याच्या रक्तापर्यंत, सर्व नीतिमान लोकांचे रक्त पृथ्वीवर पाडण्यात आले आहे त्यांचा दोष तुमच्यावर यावा. 36मी तुम्हास खरे सांगतो; या सर्व गोष्टीची शिक्षा तुमच्या पिढीवर येईल.” 37“हे, यरूशलेमे, यरूशलेमे, संदेष्ट्यांना ठार मारणाऱ्या, देवाने तुझ्याकडे पाठवलेल्यांना दगडमार करणाऱ्या, कोंबडी जशी आपल्या पिल्लांना पंखाखाली एकवटते तसे तुझ्या मुलांबाळांना एकवटण्याची पुष्कळ वेळा माझी इच्छा होती, पण तुमची इच्छा नव्हती. 38पाहा, आता तुमचे घर तुमच्यासाठी ओसाड होईल. 39मी तुला सांगतो, प्रभूच्या नावाने येणारा धन्यवादित असो. असे म्हणेपर्यंत तू मला पाहणारच नाहीस.”
सहावा तास
21जेव्हा केव्हा ते प्राणी चालत चाकेही हालचाल करीत, जेव्हा ते थांबत चाकेही थांबत, जेव्हा ते उंच उडत त्यांच्या सोबत चाकेही उंच उडत होती कारण त्यांचा आत्मा त्यांच्या चाकांत वास करीत होता. 22त्या जिवंत प्राण्यांच्या मस्तकावर महागड्या घुमटासारखे चकाकणारे दिसत होते, त्यांच्या कपाळावर स्फटिकासारखे चमकत होते. 23घुमटाखाली प्राणी आपले पंख सरळ लांब पसरवत होते आणि एकमेकांच्या पंखांना ते स्पर्श करीत होते. प्रत्येक प्राण्याच्या पंखांच्या जोडीने आपले शरीर झाकीत आणि दोन-दोन पंखांनी स्वतःला आवरण करीत. 24तेव्हा मी त्यांच्या पंखांचा पाण्याच्या धबधब्यासारखा मोठा आवाज ऐकला. तो सर्वसामर्थ्य देवाच्या वाणीसारखा होता. ते चालत तेव्हा जोरदार पर्जन्यवृष्टीयुक्त वादळासमान ध्वनी होता. तो ध्वनी मोठ्या सेनेसारखा होता. जेव्हा ते थांबत असे तेव्हा ते आपले पंख खाली करत होते. 25जेव्हा ते थांबत व आपले पंख खाली स्तब्ध ठेवीत तेव्हा त्यांच्या माथ्यावरील घुमटातून आवाज येत होता. 26त्यांच्या माथ्याच्या वरील घुमटाच्या भागात नीलरत्न जडीत सिंहासन दिसत होते, आणि सिंहासनावर मनुष्याच्या चेहऱ्या समान कोणी असल्याची जाणीव होत होती. 27त्याच्या ठायी सर्वत्र तृणमण्याच्या तेजासारखा प्रकाश मी पाहिला, त्याच्या कमरेपासून खाली अग्नीचा भास झाला, व त्याच्या भोवती प्रभा चमकत होती. 28पाऊस पडतांना दिसणाऱ्या मेघधनुष्यासारखा तो भासत होता त्याच्या भोवती प्रखर तेजोमय प्रकाश होता. हे परमेश्वर देवाचे गौरवयुक्त तेज दिसत होते. जेव्हा मी हे पाहिले व माझ्यासोबत बोलणारी वाणी ऐकली तेव्हा मी उपडा पडलो.
संध्याप्रार्थना: वाचन
5त्या वेळी फारोची मुलगी आंघोळ करण्यासाठी नदीवर आली. तिच्या दासी नदीच्या किनाऱ्यावर फिरत होत्या. तिने लव्हाळ्यात ती पेटी पाहिली; आणि एका दासीला तिकडे जाऊन ती पेटी आणण्यास सांगितले. 6तिने ती पेटी उघडली तेव्हा तिला तिच्यात एक लहान बाळ दिसले. ते बाळ रडत होते. तिला त्याचा कळवळा आला, ती म्हणाली, “खात्रीने हे इब्र्याच्या मुलांपैकी आहे.” 7मग ती बाळाची बहीण फारोच्या मुलीला म्हणाली, “या बाळाला दूध पाजण्यासाठी मी जाऊन तुझ्यासाठी इब्री स्त्रियांमधून एखादी दाई शोधून आणू का?” 8फारोची मुलगी तिला म्हणाली, जा. तेव्हा ती मुलगी गेली व त्या बाळाच्या आईलाच घेऊन आली. 9फारोच्या मुलीने त्या बाळाच्या आईला म्हटले, “या बाळाला घरी घेऊन जा, व माझ्याकरिता त्यास दूध पाज; त्याबद्दल मी तुला वेतन देईन.” तेव्हा ती स्त्री बाळाला घेऊन त्यास दूध पाजू लागली. 10ते मूल वाढून मोठे झाले. तेव्हा तिने त्यास फारोच्या मुलीकडे आणले; आणि तो तिचा मुलगा झाला; तिने त्याचे नाव मोशे ठेवले, ती म्हणाली, “कारण मी त्यास पाण्यातून बाहेर काढले.”
संध्याप्रार्थना: वाचन
13एक दिवस असा आला की, जेव्हा त्याची मुले आणि त्याच्या मुली त्यांच्या मोठ्या भावाच्या घरात जेवत होते व द्राक्षरस पीत होते. 14तेव्हा एक निरोप्या ईयोबाकडे आला आणि म्हणाला, “बैल नांगरीत होते आणि त्यांच्याबाजुस गाढवी चरत होत्या, 15शबाई लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांना घेवून गेले. खरोखर, त्यांनी तलवारीच्या धारेने नोकरांना मारुन टाकले, हे तुला सांगण्यासाठी मीच निभावून आलो आहे.” 16पहिला हे सांगत असतांनाच दुसरा आला आणि म्हणाला, “आकाशातून दैवी अग्नीचा वर्षाव झाल्यामुळे मेंढरे आणि चाकर जळून गेले, आणि मीच तेवढा बचावून तुला सांगायला आलो आहे.” 17तो बोलत असतांनाच, आणखी दुसरा आला आणि म्हणाला, “खास्द्यांनी तीन टोळ्या करून, त्यांनी उंटावर हल्ला केला, आणि ते त्यांना घेवून गेले. होय, आणि त्यांनी तलवारीच्या धारेने नोकरांना मारुन टाकले, आणि हे तुला सांगावयास मीच निभावून आलो आहे.” 18आत्तापर्यंत तो हे सांगत असतांनाच, आणखी एक आला आणि म्हणाला, “तुझी मुले आणि मुली त्यांच्या मोठ्या भावाच्या घरात खात होते व द्राक्षरस पीत होते. 19तेव्हा रानाकडून वादळी वारे आले आणि त्या घराच्या चार कोपऱ्यास धडकले, आणि ते त्या तरूणावर पडले आणि ते मरण पावले, केवळ मीच त्यातून बचावलो व तुला सांगण्यास इथे आलो.” 20तेव्हा ईयोबाने ऊठून, त्याचा झगा फाडला, त्याने डोक्याचे मुंडन केले, भूमीकडे तोंड करून पालथा पडला आणि देवाची उपासना केली. 21तो म्हणाला, “मी माझ्या मातेच्या ऊदरातून नग्न आलो, आणि पुन्हा तेथे नग्न जाईल. परमेश्वराने दिले, व परमेश्वराने नेले, परमेश्वराचे नाव धन्य असो.” 22या सर्व स्थितीतही, ईयोबाकडून पाप घडले नाही, देवाने चूक केली आहे असे काही तो मुर्खासारखा बोलला नाही.
शुभवर्तमान (पूर्वपवित्रित अर्पणांची उपासना)
36पण त्या दिवसाविषयी आणि त्या घटकेविषयी पित्याशिवाय कोणीही काही जाणत नाही. स्वर्गातील देवदूतही जाणत नाही किंवा स्वतः पुत्रही जाणत नाही. 37नोहाच्या काळी घडले तसे मनुष्याच्या पुत्राच्या येण्याच्या वेळेसही होईल. 38तेव्हा जसे महापूर येण्याअगोदर लोक खातपीत होते, लोक लग्न करीत होते, लग्न करून देत होते. नोहा तारवात जाईपर्यंत लोक या गोष्टी करीत होते. 39आणि महापूर येऊन त्यांना घेऊन गेला तोपर्यंत त्यांना समजले नाही. तसेच मनुष्याच्या पुत्राचे येणे होईल. 40दोघे जण शेतात एकत्र काम करत असतील तर त्यातला एकजण वर घेतला जाईल आणि दुसरा तेथेच राहील. 41दोन स्त्रिया जात्यावर दळीत असतील तर त्या दोघीतील एक वर घेतली जाईल आणि दुसरी तेथेच राहील. 42म्हणून तुम्ही जागृत असा, कारण तुम्हास माहीत नाही की कोणत्या दिवशी तुमचा प्रभू येत आहे, 43हे लक्षात ठेवा, चोर केव्हा येईल हे जर घराच्या मालकाला माहीत असते तर तो त्यासाठी तयारीत राहिला असता आणि त्याने चोराला घर फोडू दिले नसते. 44या कारणासाठी तुम्हीसुद्धा तयार असले पाहिजे. जेव्हा तुम्हास अपेक्षा नसेल तेव्हा मनुष्याचा पुत्र येईल. 45तर ज्याला त्याच्या धन्याने आपल्या परिवाराला, त्यांना त्याचे अन्न वेळेवर द्याव म्हणून नेमल आहे तो विश्वासू आणि विचारी दास कोण आहे? 46जो दास त्याच्या धन्याला तो येईल तेव्हा तसे करताना आढळेल तो धन्य आहे! 47मी तुम्हास खरे सांगतो की, मालक आपल्या सर्व मालमत्तेवर त्या चाकराची नेमणूक करील. 48पण जर तो दुष्ट दास आपल्या मनात असे म्हणेल की, माझा धनी विलंब करीत आहे, 49तो चाकर इतर चाकरांना मारहाण करील आणि आपल्यासारख्या लोकांबरोबर जेवण करील आणि दारू पिऊन मस्त होईल. 50आणि तो चाकर तयारीत नसेल तेव्हा मालक येईल. 51मग मालक त्या चाकराचे तुकडे करील. त्या चाकराला मालक ढोंगी लोकांबरोबर राहायला पाठवील आणि त्याठिकाणी रडणे व दात खाणे चालेल. 25:1तेव्हा त्या दिवसात स्वर्गाचे राज्य दहा कुमारींसारखे असेल, त्यांनी त्यांचे दिवे घेतले व वराला भेटण्यास गेल्या. 2त्यांच्यातल्या पाच मूर्ख होत्या आणि पाच शहाण्या होत्या. 3मूर्ख कुमारींनी आपले दिवे घेतले, पण दिव्यासाठी तेल घेतले नाही. 4शहाण्या कुमारींनी दिव्याबरोबर आपल्या भांड्यात तेल घेतले. 5आता वराला उशीर झाल्याने त्या सर्वांना डुलक्या लागल्या व त्या झोपी गेल्या 6मध्यरात्री कोणीतरी घोषणा केली, वर येत आहे! बाहेर जाऊन त्यास भेटा! 7सर्व कुमारिका जाग्या झाल्या आणि त्यांनी आपले दिवे तयार केले. 8तेव्हा मूर्ख शहाण्यांना म्हणाल्या, तुमच्या तेलातून आम्हास द्या. आमचे दिवे विझत आहेत. 9पण शहाण्यांनी उत्तर देऊन म्हणले; ते तुम्हास आणि आम्हास कदाचित पुरणार नाही; त्यापेक्षा तुम्ही विकणाऱ्यांकडे जा आणि तुमच्यासाठी विकत घ्या. 10त्या तेल विकत घ्यायला गेल्या तेव्हा वर आला. तेव्हा ज्या तयार होत्या त्या मेजवानीसाठी त्याच्याबरोबर आत गेल्या. मग दरवाजा बंद झाला. 11नंतर दुसऱ्या कुमारींकाही आल्या आणि म्हणाल्या, प्रभूजी प्रभूजी आमच्यासाठी दरवाजा उघडा 12पण त्याने उत्तर देऊन म्हटले, मी तुम्हास खरे सांगतो, मी तुम्हास ओळखत नाही. 13म्हणून नेहमी तयार असा, कारण मनुष्याचा पुत्र कधी येणार तो दिवस व ती वेळ तुम्हास माहीत नाही. 14कारण हे दूरदेशी जाणाऱ्या मनुष्यासारखे आहे, ज्याने प्रवासास जाण्याअगोदर आपल्या चाकरांना बोलावून आपली मालमत्ता त्यांच्या हाती दिली. 15त्यांच्यातील एकाला त्याने पाच हजार सोन्याच्या नाण्याच्या थैल्या, दुसऱ्याला त्याने दोन हजार सोन्याच्या नाण्याच्या थैल्या आणि तिसऱ्याला त्याने एक हजार सोन्याच्या नाण्याच्या थैल्या दिल्या. प्रत्येकाला त्यांच्या त्यांच्या योग्यतेप्रमाणे त्याने पैसे दिले. मग तो आपल्या प्रवासास गेला. 16ज्याला पाच हजार सोन्याच्या नाण्याच्या थैल्या दिल्या होत्या त्याने त्याप्रमाणे काम करायला सुरूवात केली आणि आणखी पाच हजार सोन्याच्या नाण्याच्या थैल्या त्याने मिळविल्या. 17त्याचप्रमाणे, ज्याला दोन हजार सोन्याच्या नाण्याच्या थैल्या मिळाल्या होत्या त्याने आणखी दोन हजार सोन्याच्या नाण्याच्या थैल्या कमविल्या. 18पण ज्याला एक हजार सोन्याच्या नाण्याच्या थैल्या मिळाल्या होत्या, त्याने जमिनीत एक खड्डा खोदला आणि मालकाचे नाणे त्यामध्ये लपवले. 19बराच काळ लोटल्यानंतर त्या चाकरांचा मालक आला व त्याने त्यांचा हिशोब घ्यायला सुरुवात केली. 20ज्याला पाच हजार सोन्याच्या नाण्याच्या थैल्या मिळाल्या होत्या, त्याने मालकाकडे आणखी पाच हजार आणून दिल्या, तो म्हणाला, मालक, तुम्ही दिलेल्या नाण्यांवर मी आणखी पाच हजार नाणी मिळविली. 21त्याचा मालक म्हणाला, शाब्बास, चांगल्या आणि विश्वासू दासा, तू भरंवसा ठेवण्यायोग्य चाकर आहेस, तू थोड्या नाण्यांविषयी इमानीपणे वागलास, म्हणून मी पुष्कळावर तुझी नेमणूक करीन. आत जा आणि आपल्या मालकाच्या आनंदात सहभागी हो! 22नंतर ज्या मनुष्यास दोन हजार सोन्याच्या नाण्याच्या थैल्या मिळाल्या होत्या, तो मालकाकडे आला आणि म्हणाला; मालक, तुम्ही मला दोन हजार सोन्याच्या नाण्याच्या थैल्या दिल्या होत्या त्यापासून मी आणखी दोन हजार कमवल्या आहेत. 23मालक म्हणाला, शाब्बास, चांगल्या आणि विश्वासू दासा, तू भरंवसा ठेवण्यायोग्य चाकर आहेस, तू थोड्या नाण्यांविषयी इमानीपणे वागलास, म्हणून मी पुष्कळावर तुझी नेमणूक करीन. आत जा आणि आपल्या मालकाच्या आनंदात सहभागी हो! 24नंतर ज्याला एक हजार सोन्याच्या नाण्याच्या थैल्या मिळाल्या होत्या, तो मालकाकडे आला व म्हणाला, मालक, मला माहीत होते की आपण एक कठीण शिस्तीचे मनुष्य आहात. जेथे पेरणी केली नाही तेथे तुम्ही कापणी करता आणि जेथे बी पेरले नाही तेथे पीक घेता. 25मला आपली भीती होती. म्हणून मी जाऊन तुमच्या एक हजार सोन्याच्या नाण्याच्या थैल्या जमिनीत लपवून ठेवल्या. हे घ्या! हे तुमच्याच आहेत! 26मालकाने उत्तर दिले, अरे वाईट आणि आळशी चाकरा, मी जेथे पेरणी केली नाही तेथे कापणी करतो आणि जेथे बी पेरले नाही तेथे पीक घेतो, हे तुला माहीत होते. 27तर तू माझी नाणी सावकाराकडे ठेवायचे होतेस म्हणजे मी घरी आल्यावर मला ते व्याजासहित मिळाले असते. 28म्हणून मालकाने दुसऱ्या चाकरांना सांगितले, याच्याजवळच्या एक हजार सोन्याच्या नाण्याच्या थैल्या घ्या आणि ज्याच्याजवळ दहा हजार सोन्याच्या नाण्याच्या थैल्या आहेत त्यास द्या. 29कारण आपल्याकडे जे आहे, त्याचा वापर करणाऱ्याला आणखी देण्यात येईल आणि त्यास भरपूर होईल, पण जो आपल्याजवळ असलेल्याचा उपयोग करीत नाही त्याच्याजवळ जे काही असेल ते सर्व त्याजपासून काढून घेण्यात येईल. 30नंतर मालक म्हणाला, त्या निकामी चाकराला बाहेरच्या अंधारात टाक. तेथे रडणे व दात खाणे चालेल, मनुष्याचा पुत्र सर्वांचा न्याय करील. 31मनुष्याचा पुत्र जेव्हा त्याच्या स्वर्गीय गौरवाने आपल्या देवदूतांसह येईल तेव्हा तो त्याच्या गौरवी राजासनावर बसेल. 32मग सर्वं राष्ट्रे त्याच्यासमोर एकत्र जमतील. त्यांना तो एकमेकांपासून विभक्त करील. ज्याप्रमाणे मेंढपाळ मेंढरे शेरडांपासून वेगळी करतो. 33तो मेंढरांना आपल्या उजवीकडे बसवील पण शेरडांना तो डावीकडे बसवील. 34मग राजा जे त्याच्या उजवीकडे आहेत त्यांना म्हणेल, या, जे तुम्ही माझ्या पित्याचे धन्यवादित आहात! हे राज्य जगाच्या स्थापनेपासून तुमच्यासाठी तयार केले आहे त्या राज्याचे वतनदार व्हा. 35हे तुमचे राज्य आहे, कारण जेव्हा मी भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला खायला दिले. मी तहानेला होतो तेव्हा तुम्ही मला प्यावयास दिले. मी परका होतो आणि तुम्ही मला आत घेतले 36मी उघडा होतो तेव्हा तुम्ही मला कपडे दिले. मी आजारी होतो, तेव्हा तुम्ही माझी काळजी घेतली. मी तुरूंगात होतो तेव्हा तुम्ही माझ्याकडे आला. 37मग जे नीतिमान आहेत ते उत्तर देतील, प्रभू आम्ही तुला केव्हा भुकेला व तहानेला पाहिले आणि तुला खायला आणि प्यायला दिले? 38आम्ही तुला परका म्हणून कधी पाहिले आणि तुला आत घेतले किंवा आम्ही तुला केव्हा उघडे पाहिले व कपडे दिले? 39आणि तू आजारी असताना आम्ही तुला कधी भेटायला आलो? किंवा तुरूंगात असताना कधी तुझ्याकडे आलो? 40मग राजा त्यांना उत्तर देईल, मी तुम्हास खरे सांगतो येथे असलेल्या माझ्या बांधवातील अगदी लहानातील एकाला तुम्ही केले, तर ते तुम्ही मलाच केले. 41मग राजा जे आपल्या डाव्या बाजूला आहेत त्यांस म्हणेल, माझ्यापासून दूर जा. तुम्ही शापित आहात, सार्वकालिक अग्नीत जा, हा अग्नी सैतान व त्याच्या दूतांसाठी तयार केला आहे. 42ही तुमची शिक्षा आहे कारण मी भुकेला होतो पण तुम्ही मला काही खायला दिले नाही, मी तहानेला होतो पण तुम्ही मला काही प्यावयास दिले नाही. 43मी प्रवासी असता माझा पाहुणचार केला नाही. मी वस्त्रहीन होतो. पण तुम्ही मला कपडे दिले नाहीत. मी आजारी आणि तुरूंगात होतो पण तुम्ही माझी काळजी घेतली नाही. 44मग ते लोकसुद्धा त्यास उत्तर देतील, प्रभू आम्ही कधी तुला उपाशी किंवा तहानेले पाहिले किंवा प्रवासी म्हणून कधी पाहिले? किंवा वस्त्रहीन, आजारी किंवा तुरूंगात कधी पाहिले आणि तुला मदत केली नाही? 45मग राजा त्यांना उत्तर देईल, मी तुम्हास खरे सांगतोः माझ्या अनुयायांतील लहानातील लहानाला काही करण्याचे जेव्हा जेव्हा तुम्ही नाकारले, तेव्हा तेव्हा ते तुम्ही मला करण्याचे नाकारले. 46“मग ते अनीतिमान लोक सार्वकालिक शिक्षा भोगण्यास जातील, पण नीतिमान सार्वकालिक जीवन उपभोगण्यास जातील.” 26:1मग येशूने ही सर्व वचने सांगण्याचे संपविल्यानंतर तो आपल्या शिष्यांना म्हणाला, 2“दोन दिवसानी वल्हांडणाचा सण आहे हे तुम्हास माहीत आहे आणि मनुष्याचा पुत्र वधस्तंभावर खिळून जिवे मारला जाण्यासाठी धरून दिला जाईल.”
तारखा रशियन मंडळीच्या ज्युलियन दिनदर्शिकेनुसार आहेत (सर्बियन आणि जॉर्जियन मंडळ्या आणि आथोस पर्वत यांच्याप्रमाणे): मंडळीच्या दिनदर्शिकेतील 14 एप्रिल म्हणजे नागरी दिनदर्शिकेतील 27 एप्रिल. नवी दिनदर्शिका पाळणाऱ्या मंडळ्या (ग्रीस, रोमानिया, बल्गेरिया, युक्रेन…) ठरावीक तारखेचे सण आणि संत त्याच नागरी तारखेला, 13 दिवस आधी, पाळतात, आणि त्यांचे काही पाठ वेगळे आहेत; ईस्टर आणि त्यावर अवलंबून असलेले दिवस सारखेच आहेत.
स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क