Bible Explorer अ‍ॅप मिळवा

शोधा › राजे आणि इतिहास शेजारी शेजारी › हिज्कीयापासून योशीयापर्यंत

राजे आणि इतिहास शेजारी शेजारी · हिज्कीयापासून योशीयापर्यंत

सन्हेरीब यरूशलेमेला धमकावतो

2 राजे 18:13–37; 19:1–37 · 2 इति 32:1–23 · यश 36:1–22; 37:1–38

2 राजे

2 राजे 18:13–37; 19:1–37

18:13हिज्कीया राजा ह्याच्या चौदाव्या वर्षी, अश्शूरचा राजा सन्हेरीब याने यहूदातील सर्व तटबंदी नगरांवर हल्ला चढवून त्यांचा ताबा घेतला.

18:14तेव्हा यहूदाचा राजा हिज्कीया याने अश्शूराच्या राजाला लाखीश येथे निरोप पाठवला की, “माझ्याकडून अपराध झाला आहे, तर आता माझ्या पासून निघून जा. तू जे माझ्यावर लादशील ते मी सहन करीन.” यावर अश्शूराच्या राजाने यहूदाचा राजा हिज्कीया याला तिनशे किक्कार चांदी व तीस किक्कार सोने अशी खंडणी मागितली.

18:15तेव्हा हिज्कीयाने परमेश्वराच्या घरात व राजाच्या राजवाड्यातील भांडारात असणारी सर्व चांदी त्यास दिली.

18:16मग हिज्कीयाने परमेश्वराच्या मंदिराचे दरवाजे आणि सोन्याच्या पल्याने मढवलेले खांब काढून घेतले आणि अश्शूरच्या राजाला हे सोने दिले.

18:17पण अश्शूरच्या राजाने तर्तान व रब-सारीस व रब-शाके यांना मोठ्या सैन्यासोबत लाखीशाहून यरूशलेमामध्ये हिज्कीया राजा कडे पाठवले. तेव्हा ते यरूशलेमेस चढून आले, आणि वरच्या तलावाच्या पाटाजवळ परिटाच्या शेताच्या रस्त्यावर उभे राहिले.

18:18त्यांनी राजाला निरोप पाठवला तेव्हा, हिल्कीयाचा मुलगा एल्याकीम जो घरावरचा कारभारी, व शेबना चिटणीस आणि नोंदणी लेखक व आसाफचा मुलगा यवाह हे त्यांना भेटावयास पुढे आले.

18:19तेव्हा रबशाके त्यांना म्हणाला, “अश्शूराचा महान राजा हिज्कीयास काय म्हणतो हे सांगा; तुझ्या आत्मविश्वासाविषयी कसली शिष्टता बाळगतोस?

18:20तू म्हणतोस, लढाईसाठी पुरेशी मसलत आणि सामर्थ्य तुझ्याजवळ आहेत, परंतू ते केवळ पोकळ व अर्थहीन शब्द आहेत. आता तू कोणावर भरवसा ठेवतोस. माझ्याविरूद्ध बंड करण्यासाठी तुला कोणी धैर्य दिले आहे?

18:21पाहा, तू ठेचलेल्या बोरूच्या काठीवर म्हणजे मिसर देशावर भरवसा ठेवतोस, अशा काठीवर कोणी मनुष्य विसंबून राहिला तर ती मोडून पडेल व हातात रुतेल. जे कोणी मिसराचा राजा फारो ह्यावर विश्वास ठेवतात त्या सर्वांना तो तसाच आहे.

18:22तू कदाचित् असे म्हणशील, आम्ही परमेश्वर देवावर भरवसा ठेवतो. पण हिज्कीयाने परमेश्वराची उंचस्थाने आणि वेद्या काढून टाकल्या आणि यहूदा व यरूशलेमेला म्हटले की, फक्त यरूशलेममधील याच वेदीपुढे आराधना करावी तोच तो आहे की नाही?

18:23तर आता अश्शूराचा राजा माझा धनी याच्यावतीने, तुझ्याकडे घोड्यांवर स्वार व्हायला माणसे असतील तर तुला दोन हजार घोडे देण्याचा चांगला प्रस्ताव मांडतो.

18:24माझ्या स्वामीच्या सर्वात कनिष्ठ सेवकाचा देखील तू पराभव करु शकणार का? रथ आणि घोडेस्वार यांच्यासाठी तू मिसरवर अवलंबून आहेस.

18:25मी यरूशलेमचा संहार करायला चाल करून आलोय, तो काही परमेश्वराचा पाठिंबा असल्याशिवाय आलो काय? परमेश्वर मला म्हणाला, या देशावर स्वारी करून त्याचा पूर्ण पाडाव कर.”

18:26तेव्हा हिल्कीयाचा मुलगा एल्याकीम, शेबना आणि यवाह हे सेनापतीला म्हणाले, “तू आपल्या सेवकाशी अरामी भाषेत बोल. आम्हास ती भाषा कळते. आमच्याशी यहूदी भाषेत बोलू नको. कारण तटबंदीवरील लोक आपले बोलणे ऐकतील.”

18:27पण रब-शाके त्यांना म्हणाला, “प्रभूने काही मला फक्त तुझ्याशी आणि तुझ्या राजाशी बोलायला पाठवलेले नाही, तटबंदीवरील लोकांशीही मी बोलतो आहे. तुमच्याबरोबरच त्यांनाही स्वत:चे मलमूत्र चाटायची वेळ येणार आहे.”

18:28मग रब-शाके यहूदी भाषेत मोठ्याने ओरडून म्हणाला, “अश्शूराचा थोर राजा काय म्हणतो ते ऐका”

18:29राजा असे म्हणतो, हिज्कीयाच्या भूलथापांना बळी पडू नका. माझ्यापासून तो तुम्हास वाचवू शकणार नाही.

18:30तो म्हणतो परमेश्वरावर विसंबून राहू नका. हिज्कीया तुम्हास सांगतो, परमेश्वर आपल्याला वाचवील. अश्शूराचा राजा आपल्या शहराचा पराभव करु शकणार नाही.

18:31पण हिज्कीयाचे ऐकू नका. “कारण अश्शूराचा राजा म्हणतो माझ्याशी तह करा आणि माझ्याकडे या. तसे केलेत तर आपापल्या द्राक्षवेलीवरची, अंजिराच्या झाडावरची फळे तुम्हास खायला मिळतील. स्वत:च्या विहिरीचे पाणी प्यायला मिळेल.

18:32पुढे मी तुमच्या देशासारख्याच दुसऱ्या देशात, धान्याचा व द्राक्षरसाचा देश, अन्नाचा व द्राक्षीच्या मळ्याचा देश, जैतून तेलाचा व मधाचा देश यामध्ये मी तुम्हास घेऊन जाईपर्यंत तुम्ही असे वागा. तरच तुम्ही जगाल; मरणार नाही. आणि हिज्कीयाचे ऐकू नका. तो तुमचे हृदयपरिवर्तन करु पाहत आहे, ‘परमेश्वर आपल्याला वाचवेल’ असे तो म्हणतो.

18:33इतर दैवतांनी आपले देश अश्शूराच्या राजाच्या तावडीतून सोडवले आहेत असे अजून झाले आहे काय? कधीच नाही.

18:34कुठे आहेत हमाथ आणि अर्पद यांची दैवतं? सफरवाईम, हेना, इव्वा यांची दैवते कुठे गेले? त्यांनी शोमरोनचे माझ्यापासून रक्षण केले का?

18:35इतर राष्ट्राच्या दैवतांनी आपापली भूमी माझ्यापासून सुरक्षित ठेवली का? नाही माझ्याकडून परमेश्वर यरूशलेम वाचवणार का?”

18:36पण लोक गप्पच होते. ते सेनापतीला काहीही बोलले नाहीत. कारण “त्यांनी काहीही उत्तर द्याचये नाही” अशी राजा हिज्कीयाची त्यांना आज्ञा होती.

18:37हिल्कीयाचा मुलगा एल्याकीम, जो राजवाड्याचा कारभारी, व चिटणीस शेबना आणि आसाफचा मुलगा यवाह हा नोंदी करणारा होता हे शोकाकुल होऊन आपली वस्त्रे फाडून हिज्कीयाकडे आले. अश्शूराचा सेनापती रब-शाके काय म्हणाला ते त्यांनी हिज्कीयाला सांगितले.

19:1हे ऐकून राजा हिज्कीयाने त्याच्या अंगावरची वस्त्रे फाडली आणि गोणताट घालून तो परमेश्वराच्या मंदिरात गेला.

19:2त्याने आपला घरकारभारी एल्याकीम व चिटणीस शेबना आणि वडिलधारे याजक यांना गोणताट पांघरलेले असे आमोजचा मुलगा यशया या संदेष्ट्यांकडे पाठवले.

19:3ते यशयाला म्हणाले, “हिज्कीया म्हणतो, ‘हा संकटाचा मानहानीचा व धिक्काराचा दिवस आहे. मूल जन्माला येत आहे पण प्रसूतीची शक्ती नसावी तसे झाले आहे.

19:4परमेश्वर तुझा देव कदाचित रब-शाकेचे सगळे शब्द ऐकेल, त्याचा स्वामी अश्शूराचा राजा याने त्यास जिवंत देवाची निंदा करायला पाठवले आहे. आणि जी वचने परमेश्वर तुझा देव याने ऐकली आहेत, त्यांचा कदाचित तो निषेध करील. म्हणून जे शेष राहिले आहेत त्याच्यासाठी प्रार्थना करा.”

19:5तेव्हा हिज्कीया राजाचे सेवक यशयाकडे गेले.

19:6आणि यशया त्यांना म्हणाला, “तुझ्या स्वामीला हा निरोप द्या; की परमेश्वर असे म्हणतो ‘माझ्यासाठी जे अपमानकारक उद्गार अश्शूरच्या राजाच्या सेनापतींनी काढले त्याने घाबरुन जाऊ नका.’

19:7पाहा, मी आता त्याच्यात एक आत्मा घालीन आणि तो वर्तमान ऐकून स्वदेशी परत जाईल आणि आपल्या देशातच त्यास तलवारीने मरण येईल असे मी करणार.”

19:8नंतर रबशाके परत गेला तेव्हा त्यास अश्शूराचा राजा लिब्नाविरुध्द लढाई करताना आढळला, कारण तो लाखीशाहून निघून गेला असल्याचे त्याने ऐकले.

19:9मग कूशाचा राजा तिऱ्हाका आपल्याशी लढायला येत आहे असे सन्हेरीब याने ऐकले. तेव्हा त्याने राजा हिज्कीयाकडे पुन्हा दूताकरवी निरोप पाठवून म्हटले,

19:10यहूदाचा राजा हिज्कीयाला तुम्ही सांगा, “तुम्ही ज्या परमेश्वरावर विसंबून आहात तो, ‘अश्शूरचा राजाच्या हाती यरूशलेम दिले जाणार नाही, असे बोलून तुला न फसवो.’

19:11अश्शूरच्या राजाने इतर देशांचे काय केले ते तुम्ही ऐकलेच आहे. आम्ही ते पूर्ण धुळीला मिळवले. तेव्हा तुम्हीच तेवढे वाचणार का? नाही.

19:12त्या राष्ट्राच्या देवतांनी त्यांचे रक्षण केले नाही. माझ्या पुर्वजांनी त्यांची धूळधाण केली. गोजान, हारान, रेसफ आणि तलस्सरातील एदेन हे त्यांनी नष्ट केले.

19:13हमाथ, अर्पद, सफरवाईम, हेना आणि इव्वा यांचे राजे कुठे आहेत? त्यांचा पार धुरळा उडाला आहे.”

19:14हिज्कीयाने जासूदांच्या हातून पत्र घेऊन ते वाचले. मग परमेश्वराच्या मंदिरात जाऊन परमेश्वरापुढे ते उघडून ठेवले.

19:15परमेश्वराची प्रार्थना करून हिज्कीया म्हणाला. “परमेश्वर देवा, करुबांच्यावर राजासनी बसणारा तूच इस्राएलचा देव आहेस. पृथ्वीच्या पाठीवरील सर्व राज्यांचा तू आणि एकमेव तूच नियंता आहेस. आकाश आणि पृथ्वीचा तू निर्माता आहेस,

19:16परमेश्वरा, माझे म्हणणे ऐक आपले डोळे उघड आणि हे पत्र पाहा. सन्हेरीबची जिवंत परमेश्वराचा अवमान करणारी वचने पाहा.

19:17खरोखरच परमेश्वराचा अवमान करणारी वचने पाहा. खरोखरच परमेश्वरा असे घडले आहे. अश्शूरच्या राजाने ही सर्व राष्ट्रे नामशेष केली आहेत.

19:18तिथले दैवत त्याने आगीच्या भक्ष्यस्थानी टाकले. पण ते काही खरे देव नव्हते. मनुष्याने केलेल्या लाकडाच्या आणि दगडाच्या मूर्ती होत्या. म्हणून तर अश्शूरच्या राजाला त्या नष्ट करता आल्या.

19:19तेव्हा परमेश्वर देवा आता आम्हास या राजापासून वाचव. म्हणजे तूच खरा परमेश्वर आहेस हे जगातील सर्व राजांना कळेल.”

19:20आमोजचा मुलगा यशया याने हिज्कीयाला निरोप पाठवला की, “इस्राएलचा परमेश्वर देव असे म्हणतो, ‘अश्शूरचा राजा सन्हेरीब याच्या विषयी तू केलेले गाऱ्हाणे मी ऐकले आहे.”

19:21“सन्हेरीबबद्दल परमेश्वराचा असा निरोप आहे. सीयोनच्या (म्हणजेच यरूशलेमच्या) कुमारी कन्येने तुला तुच्छ लेखून तुझा अपमान केला आहे. यरूशलेम कन्या तुझी पाठ वळली की तुझा उपहास करते.”

19:22पण तू कोणाचा अपमान केलास? कोणाला दुर्भाषण केलेस? तू हे कोणाविरुध्द बोललास? इस्राएलच्या पवित्र परमेश्वराविरुध्द तू गेलास. त्याच्यापेक्षा वरचढ असल्याच्या आवेशात तू असा वागलास.

19:23परमेश्वराचा अवमान करायला तू दूत पाठवलेस. तू म्हणालास, “माझे बहुसंख्य रथ घेऊन मी या उंच पर्वतावर, लबानोनाच्या अंतर्भागात आलो आहे. त्यांचे उंच गंधसरु आणि उत्तम देवदारु मी तोडीन. लबानोन मध्ये सर्वात उंचावर असलेल्या घनदाट अरण्यात मी पोचलो आहे.

19:24मी विहिरी खणल्या आणि नव्या नव्या ठिकाणांचे पाणी प्यालो. मिसरमधील नद्या सुकवून तो प्रदेश मी पादाक्रांत केला.”

19:25तू असे म्हणालास खरा, पण परमेश्वर काय म्हणाला ते तू ऐकले नाहीस काय? “पूर्वी, फार पूर्वीच मी हे सर्व योजले होते आणि आता त्याप्रमाणेच घडत आहे. मजबूत नगर उद्ध्वस्त होऊन तिथे नुसती दगडांची रास उरली आहे, हे तुझ्याहातून घडले ते माझ्यामुळेच.

19:26तेथील लोक समर्थ नव्हते. ते घाबरलेले आणि गोंधळलेले होते. शेतातले गवत आणि पीक सरसकट कापले जावे तसे ते होते. घराच्या धाब्यावरच गवत पूर्ण वाढण्याआधीच करपून जावे तशी त्यांची स्थिती होती.

19:27तू कधी स्वस्थ बसतोस, कधी लढाईवर जातोस आणि कधी घरी परततोस, तसेच माझ्याविरुध्द कधी उठतोस ते मला माहित आहे.

19:28माझ्याविरुध्द तू उठलास, तुझे उन्मत्त बोलणे मी ऐकले. तेव्हा, मी आता तुझ्या नाकात वेसण घालतो आणि तोंडात लगाम अडकवतो. मग तुला माघारे वळवून ज्या रस्त्याने आलास त्याच वाटेने तुला परत फिरवतो.”

19:29“मी तुझ्या साहाय्यासाठी येणार आहे याची खात्री पटावी म्हणून हे चिन्ह देतो. या वर्षी आपोआप धान्य उगवेल ते तुम्ही खाल. दुसऱ्या वर्षी त्याच्या बियाणातून उगवेल ते खाल. पण तिसऱ्या वर्षी मात्र तुम्ही स्वत: पेरणी कराल त्यातून धान्य काढा. द्राक्षाची लागवड करा आणि द्राक्षे खा.”

19:30यहूदाच्या घराण्यातील उरल्यासुरल्या लोकांचा वंश वाढेल.

19:31कारण काहीजण बचावतील. ते यरूशलेमेतून बाहेर पडतील. सीयोन डोंगरातून काहीजण येतील. परमेश्वराच्या तीव्र आवेशामुळे असे घडेल.

19:32“अश्शूरच्या राजाबद्दल परमेश्वर असे म्हणतो, तो या शहरात पाऊल टाकणार नाही या नगरावर तो बाण सोडणार नाही आपल्या ढाली तो येथे आणणार नाही. या शहरच्या तटबंदीवर हल्ला करण्यासाठी तो कचऱ्याचे ढीग रचणार नाही.

19:33तो आल्या वाटेने परत जाईल. या शहरात तो येणार नाही असे परमेश्वर म्हणतो.

19:34या नगराचे रक्षण करून त्यास मी वाचवीन. माझ्यासाठी आणि माझा सेवक दावीद याच्यासाठी मी हे करीन.”

19:35त्या रात्री परमेश्वराचा दूत बाहेर पडला आणि त्यांने अश्शूरांच्या छावणीतली एक लक्ष पंच्याऐंशी हजार माणसे मारली. सकाळी लोक उठून पाहतात तर सर्वत्र प्रेतांचा खच पडलेला.

19:36तेव्हा अश्शूरचा राजा सन्हेरीब निनवे येथे, जिथे तो अगोदर होता तिथे निघून गेला.

19:37एक दिवस सन्हेरीब आपले दैवत निस्रोख याच्या देवळात पूजा करत होता. तेव्हा त्याचीच मुले अद्रम्मेलेक आणि शरेसर यांनी त्यास तलवारीने मारले. मग ते अरारात देशात निघून गेले. सन्हेरीबच्या जागी त्याचा मुलगा एसरहद्दोन राज्य करु लागला.

2 इतिहास

2 इति 32:1–23

1हिज्कीयाने परमेश्वरावर भरवंसा ठेवून केलेल्या सगळ्या गोष्टी प्रत्यक्षात उतरल्यावर अश्शूरचा राजा सन्हेरीब यहूदावर चाल करून आला. नगराच्या तटबंदी बाहेर त्याने आपल्या सैन्यासह तळ ठोकला. आतील नगरांचा पाडाव करून ती जिंकून घ्यायचा त्याने बेत केला.

2यरूशलेमेवर हल्ला करायला सन्हेरीब आला आहे हे हिज्कीयाला कळले.

3तेव्हा तो आपल्या सरदारांशी आणि सैन्याच्या अधिकाऱ्यांशी बोलला. त्यांच्या साहाय्याने व त्यांच्याशी मसलत करून राजाने नगराबाहेरच्या झऱ्यांचे पाणी अडवायचा एकमताने निर्णय घेतला. त्या सर्वांनी त्यास मदत केली.

4झरे आणि आपल्या प्रांतामधून वाहणारी नदी लोकांनी एकत्र येऊन अडवली. ते म्हणाले, “अश्शूरच्या राजाला आत्ता इथवर आल्यावर त्यास मुबलक पाणी का मिळावे?”

5हिज्कीयाने पुढील उपाययोजनेने यरूशलेमची मजबुती वाढवली. तटबंदीची भिंत ज्याठिकाणी ढासळली होती तिथे बांधून काढली. भिंतीवर बुरुज बांधले. तटबंदी बाहेर दुसरा मजबूत कोट केला. दावीद नगरातील मिल्लो नावाच्या बूरूजाची मजबूती केली. शस्त्रे आणि ढाली आणखी करवून घेतल्या.

6हिज्कीयाने प्रजेवर सेना नायकांच्या नेमणुका केल्या, आणि नगराच्या वेशीजवळच्या चौकात त्यांची सभा घेऊन त्यांच्याशी उत्तेजनपर बातचीत केली.

7हिज्कीया त्यांना म्हणाला, “हिंमत बाळगा आणि द्दढ राहा. अश्शूरच्या राजाची किंवा त्याच्या विशाल सेनेची धास्ती घेऊ नका. आपली ताकद त्यांच्यापेक्षा जास्त आहे.

8अश्शूरच्या राजाजवळ फक्त मनुष्यबळ आहे. आपल्या बाजूला तर साक्षात परमेश्वर देव आहे. तोच आपल्याला मदत करील.” आपल्या युध्दात तोच लढेल अशाप्रकारे यहूदाचा राजा हिज्कीयाचे धीराचे बोलणे ऐकून लोकांचा त्यावर विश्वास बसला आणि त्यांना हुरुप आला.

9अश्शूरचा राजा सन्हेरीब याने लाखीशाचा पराभव करण्याच्या हेतूने आपल्या सैन्यासह लाखीश नगराजवळ तळ दिला होता. तेथून त्याने यहूदाचा राजा हिज्कीया आणि यरूशलेममधील यहूदी लोक यांच्यासाठी आपल्या सेवकांमार्फत निरोप पाठवला.

10सेवक म्हणाले की, “अश्शूरचा राजा सन्हेरीब याचा संदेश असा आहे. यरूशलेमेला वेढा पडला असताना कशाच्या भरवंशावर तुम्ही तिथे राहता?”

11हिज्कीयाचा हा तुम्हास फसवण्याचा डाव आहे. यरूशलेमामध्ये अडकून तुम्ही तहानभुकेने व्याकुळ होऊन मरावे असा त्याचा अंतताः हेतू आहे. तो तुम्हास म्हणतो, “अश्शूरच्या राजापासून आपला देव परमेश्वर आपले रक्षण करील.”

12पण त्यानेच परमेश्वराची उंचस्थाने आणि वेद्या काढून टाकल्या. तुम्हा यहूदी आणि यरूशलेमेच्या लोकांस त्याने सांगितले की तुम्ही फक्त एकाच वेदीवर उपासना केली पाहिजे आणि धूप जाळला पाहिजे.

13माझ्या पूर्वजांनी आणि मी इतर देशांतल्या लोकांची कशी अवस्था करून टाकली ती तुम्हास माहीत आहे. त्या देशांतले दैवते काही आपल्या लोकांस वाचवू शकले नाहीत. मलाही ते त्यांचा नाश करण्यापासून परावृत्त करु शकले नाहीत.

14माझ्या पूर्वजांनी इतर देशांचा नाश केला. त्यांच्या सर्व देवांपैकी आपल्या लोकांस विनाशातून सोडवणारा असा कोणी देव होता काय? तर तुमचा देव तरी तुम्हास माझ्या सामर्थ्यापासुन वाचवू शकेल असे वाटते का?

15हिज्कीयाच्या बतावणीला बळी पडू नका व त्याच्यावर विश्वास ठेऊ नका. आमच्या पासून आपल्या प्रजेचे रक्षण करण्यात कोणत्याच राष्ट्राच्या दैवताला अद्यापि यश आलेले नाही. तेव्हा तुमचा संहार करण्याला तुमचे दैवत माझ्या हातून तुम्हास वाचवू शकेल असे समजू नका.

16अश्शूरच्या राजाच्या सेवकांनी परमेश्वर देवाची आणि देवाचा सेवक हिज्कीया याची निंदानालस्ती केली.

17सन्हेरीबनच्या दासांनी पत्रांमध्ये इस्राएलाचा देव परमेश्वर याविषयी अपमानकारक मजकूरही लिहिला. तो असा होता. “इतर देशांच्या दैवतांना मी केलेल्या संहारापासून आपल्या प्रजेला वाचवता आले नाही. तसेच हिज्कीयाचा देवही मला त्याच्या प्रजेचा नाश करण्यापासून थोपवू शकणार नाही.”

18मग अश्शूरच्या राजाच्या सेवकांनी तटबंदीवर उभ्या असलेल्या यरूशलेमेच्या लोकांस घाबरवण्यासाठी हिब्रू भाषेत मोठ्याने आरडाओरडा केला. असे करून यरूशलेम नगर ताब्यात घ्यायचा त्यांचा विचार होता.

19जगभरचे लोक ज्या दैवतांची पूजा करतात त्या दैवतांविषयी हे सेवक वाईटसाईट बोलत राहिले. हांतानी बनवीलेल्या मुर्तीच्या व यरूशलेमेच्या परमेश्वरासही या सेवकांनी त्या देवतांच्याच रांगेला बसवले.

20यामुळे राजा हिज्कीया आणि आमोजचा पुत्र यशया संदेष्टा यांनी या प्रश्नावर स्वर्गाकडे तोंड करून मोठ्याने प्रार्थना केली.

21तेव्हा अश्शूरच्या राजाच्या छावणीवर परमेश्वराने आपला दूत पाठवला. या दूताने अश्शूरांचे सगळे सैन्य, त्यातील सरदार आणि अधिकारी यांना मारुन टाकले. एवढे झाल्यावर अश्शूरचा राजा माघार घेऊन आपल्या देशात परत गेला. त्याच्या प्रजेला त्याची शरम वाटली. राजा त्याच्या दैवताच्या देवळात गेला. तिथे त्याच्या पोटच्या पुत्रांना तलवारीने त्याने ठार केले.

22अशाप्रकारे परमेश्वराने अश्शूरचा राजा सन्हेरीब आणि त्याचे सैन्य यांच्यापासून हिज्कीया आणि यरूशलेमचे लोक यांचे संरक्षण केले. परमेश्वरास हिज्कीयाची आणि यरूशलेमेच्या प्रजेची काळजी होती.

23बऱ्याच जणांनी परमेश्वरास वाहण्यास भेटवस्तू यरूशलेमेत आणल्या. यहूदाचा राजा हिज्कीया याच्यासाठी ही नजराणे आणले. या घटनेपासून सर्व राष्ट्रांना हिज्कीयाबद्दल आदर वाटू लागला.

यशया

यश 36:1–22; 37:1–38

36:1हिज्कीया राजाच्या कारकिर्दीच्या चौदाव्या वर्षी अश्शूरचा राजा सन्हेरीब याने यहूदाच्या सर्व तटबंदी नगरांवर हल्ला केला, आणि त्यांचा ताबा घेतला.

36:2नंतर अश्शूरच्या राजाने रब-शाके याला आपल्या मोठ्या सैन्यासह लाखीशाहून यरूशलेमेमध्ये हिज्कीया राजाकडे पाठवले, तो वरच्या तळ्याच्या नळाजवळ परटाच्या शेताच्या रस्त्यावर येऊन पोहचला, आणि उभा राहीला.

36:3मग हिल्कीयाचा मुलगा एल्याकीम, घरावरचा कारभारी व शेबना चिटणीस व आसाफचा मुलगा यवाह इतिहास लेखक हे त्याच्याकडे भेटण्यास गेले.

36:4रब-शाके त्यांना म्हणाला, “तुम्ही जाऊन हिज्कीयाला सांगा, अश्शूरचा महान राजा म्हणतो, तुझ्या विश्वासाचा स्त्रोत काय आहे?

36:5तेथे युद्धासाठी मसलत आणि सामर्थ्य आहे, असे सांगून, तू फक्त निरर्थक शब्द बोलतो, आता तू कोणावर विश्वास ठेवतो? माझ्याविरूद्ध बंड करण्यासाठी तुला कोण धैर्य देतो?

36:6पाहा, तू या मिसराच्या ठेचलेल्या बोरूच्या चालण्याच्या काठीवर विश्वास ठेवतोस, पण जर मनुष्य आपल्या हातातील काठीवर टेकतो, तर तो भेदून जाईल; जे कोणी एक मिसराचा राजा फारो याच्यावर भरवसा ठेवतात, तो त्यांना तसाच आहे.”

36:7पण जर तू मला म्हणशील, आम्ही आमचा देव परमेश्वर ह्यांवर भरवसा ठेवतो, तर हिज्कीयाने ज्यांची उच्चस्थाने व वेद्या पूजेसाठी काढून टाकल्या आणि यहूदाला आणि यरूशलेमेला म्हटले, “तुम्ही यरूशलेमेत याच वेदीपुढे उपासना करा, तोच तो आहे की नाही?”

36:8तर आता मी माझा धनी अश्शूरचा राजा याच्यापासून एक चांगला प्रस्ताव तुझ्याशी करण्याची इच्छा आहे, मी तुला दोन हजार घोडे देईन, जर तू त्यांच्यासाठी घोडेस्वार शोधण्यास समर्थ असलास तर.

36:9माझ्या धन्याच्या कनिष्ठ सेवकांतील एक नायकाचा तरी प्रतिकार तू कसा करू शकशील? तुम्ही रथ व घोडेस्वारांसाठी तुमचा भरवसा मिसरावर ठेवता?

36:10तर आता, मी येथपर्यंत प्रवास करून आलो, ते या देशाविरूद्ध लढण्यास आणि नाश करण्यास, ते परमेश्वराशिवाय काय? परमेश्वर मला म्हणाला, या देशावर हल्ला कर आणि त्यांचा नाश कर.

36:11मग हिल्कीयाचा मुलगा एल्याकीम आणि शेबना व यवाह हे रब-शाकेला म्हणाले, “कृपया आपल्या सेवकाशी अरामी भाषेत बोल, कारण ती आम्हास समजते. कोटावरील लोकांस तुमचे बोलणे समजेल म्हणून तुम्ही आमच्याशी यहूदी भाषेत बोलू नका.”

36:12पण रब-शाके म्हणाला “माझ्या धन्याने, मला तुझ्या धन्याशी व तुजशी हे शब्द बोलण्यास मला पाठवले आहे काय? कोटावर बसलेल्या मनुष्यांनी तुम्हाबरोबर आपली स्वतःची विष्ठा खावी आणि आपल्या स्वतःचे मूत्र प्यावे हे सांगण्यासाठी मला पाठवले नाही काय?”

36:13नंतर रब-शाके उभा राहिला व खूप मोठ्या आवाजात यहूदी भाषेत म्हणाला, “महान राजा, अश्शूरचा राजा याचे शब्द ऐका.”

36:14राजा म्हणाला, “हिज्कीयास तुम्हास भुरळ घालू देऊ नका; कारण तो तुमचे रक्षण करण्यास समर्थ नाही.

36:15परमेश्वर आम्हास खात्रीने सोडवील; हे नगर अश्शूर राजाच्या हाती दिले जाणार नाही, असे बोलून हिज्कीयाने तुम्हास परमेश्वरावर भरवसा ठेवायला लावू नये.”

36:16हिज्कीयाचे ऐकू नका, कारण अश्शूरचा राजा असे म्हणतोः माझ्याशी शांतीचा करार करा आणि माझ्याकडे बाहेर या, नंतर प्रत्येकजण आपापल्या द्राक्षवेलाचे व आपापल्या अंजिराचे फळ खा आणि प्रत्येकजण आपल्या स्वत:च्या टाकीतले पाणी प्या.

36:17मी येईन आणि जो देश तुमच्या स्वतःच्या देशासारखा आहे, धान्याचा व नव्या द्राक्षरसाचा देश, भाकरीचा व द्राक्षमळ्याचा देश, त्यामध्ये मी तुम्हास नेईपर्यंत तुम्ही असे करा.

36:18परमेश्वर आपल्याला सोडवील असे सांगून हिज्कीयाने तुम्हास चुकीचा मार्ग दाखवू नये. अश्शूर राज्याच्या सामर्थ्यापासून कोणत्या राष्ट्रातील देवाने आपल्या लोकांस सोडवीले आहे काय?

36:19हमाथ आणि अर्पद यांचे देव कोठे आहेत? सफरवाईमचे देव कोठे आहेत? त्यांनी शोमरोनाला माझ्या सामर्थ्यापासून सोडविले काय?

36:20ज्यांनी आपला देश माझ्या सामर्थ्यापासून सोडवला आहे, असे या देशांच्या सर्व देवांपैकी कोण आहेत, तर परमेश्वर माझ्या हातून यरूशलेम सोडवील काय?

36:21पण लोक शांत राहीले, आणि त्यांनी काहीच उत्तर दिले नाही, कारण त्यास उत्तर देऊ नका अशी राजाची आज्ञा होती.

36:22नंतर हिल्कीयाचा मुलगा एल्याकीम जो घरावरचा कारभारी होता, शेबना चिटणीस व आसाफाचा मुलगा यवाह इतिहास लेखक हे आपले कपडे फाडून हिज्कीयाकडे आले व त्यांनी त्यास रब-शाकेचे शब्द सांगितले.

37:1मग असे झाले की, जेव्हा हिज्कीया राजाने त्यांचा निरोप ऐकून, त्याने आपले कपडे फाडले, स्वतःला गोणपाटाने झाकून आणि परमेश्वराच्या मंदिरात गेला.

37:2त्याने एल्याकीम जो घरावर कारभारी होता, आणि शेबना चिटणीस आणि याजकातील वडील यांना गोणपाट घातलेले असे आमोजाचा मुलगा यशया संदेष्ट्याकडे पाठवले, त्या सगळ्यांनी खास शोकप्रदर्शक कपडे घातले.

37:3ते त्यास म्हणाले, हिज्कीया असे म्हणतो, हा दिवस यातनेचा, धिक्काराचा व अपमानाचा दिवस आहे, कारण जसे बालक जन्मायला तयार आहे, पण आईला तिच्या बालकाला जन्म देण्यास शक्ती नाही.

37:4परमेश्वर तुझा देव रब-शाकेचे शब्द ऐकेल, त्याचा धनी अश्शूरचा राजा याने त्यास जिवंत देवाची निंदा करायला पाठवले आहे, आणि जे शब्द तुझा देव परमेश्वर याने ऐकली आहेत त्यांचा तो कदाचित निषेध करील, म्हणून जे उरलेले आहेत त्यांच्यासाठी आपली प्रार्थना उंच कर.

37:5तेव्हा हिज्कीया राजाचे सेवक यशयाकडे आले.

37:6आणि यशया त्यांना म्हणाला, तुझ्या धन्याला सांग; परमेश्वर म्हणतो, अश्शूरी राजाच्या सेवकांनी ज्या शब्दांनी माझा अपमान केला आहे, ते शब्द तू ऐकले आहेस, त्याने तू घाबरून जाऊ नको.

37:7पाहा, मी एक आत्मा त्याच्यात घालीन आणि तो काही बातमी ऐकून आपल्या देशात परत जाईल, तो आपल्याच देशात तलवारीने पडेल, असे मी करीन.

37:8मग रब-शाके माघारी आला आणि त्यास अश्शूराचा राजा लिब्नाविरूद्ध लढाई करताना सापडला, कारण त्याने राजा लाखीशाहून गेला आहे, हे त्याने ऐकले.

37:9मग सन्हेरीबाने ऐकले की, कूशाचा व मिसराचा राजा तिऱ्हाका आपणाशी लढावयास गेला आहे, असे बोलताना कोणी ऐकले, ते ऐकून त्याने हिज्कीयाकडे पुन्हा निरोप घेऊन जासूद पाठवले की,

37:10यहूदाचा राजा हिज्कीया, याला सांगा, तू ज्या देवावर भरवसा ठेवतोस तो यरूशलेम अश्शूराच्या राजाच्या हाती दिले जाणार नाही, असे म्हणून तुला न फसवो.

37:11पाहा, तू ऐकले आहेस अश्शूराच्या राजांने त्यांच्या सर्व देशांचा पूर्णपणे कसा नाश केला आहे, तर तू सुटशील काय?

37:12गोजान, हारान, रेसफ व तलस्सारातले एदेनाचे लोक या ज्या राष्ट्रांचा माझ्या वाडवडीलांनी नाश केला त्यांच्या देवांनी त्यांना वाचवले का?

37:13हमाथाचा राजा आणि अर्पदचा राजा सफरवाईम नगराचा राजा, हेनाचा व इव्वाचा राजा हे कोठे आहेत?

37:14हिज्कीयाने जासूदाकडून हे पत्र स्विकारुन त्याने ते वाचले, नंतर तो परमेश्वराच्या मंदिरात गेला आणि त्याने ते परमेश्वरापुढे पसरले.

37:15हिज्कीयाने परमेश्वराकडे प्रार्थना केली

37:16हे सैन्यांच्या परमेश्वरा, इस्राएलाच्या देवा, जो तू करुबावर बसतो, तो तूच मात्र सर्व राज्यांचा देव आहेस, तूच स्वर्ग आणि पृथ्वी निर्माण केलीस.

37:17हे परमेश्वरा, कान लाव व ऐक! हे परमेश्वरा तुझे डोळे उघड आणि पाहा, आणि सन्हेरीबाचे शब्द ऐक, जी त्याने जिवंत देवाची निंदा करण्यासाठी पाठवली आहेत.

37:18हे सत्य आहे, परमेश्वरा, अश्शूरच्या राजाने सर्व राष्ट्राचा व त्यांच्या भूमीचा नाश केला आहे.

37:19त्यांनी त्यांचे देव अग्नीत टाकले, कारण ते देव नव्हते परंतु मनुष्यांच्या हाताचे काम होते, फक्त लाकूड व दगड होते, म्हणून अश्शूऱ्यांनी त्यांना नष्ट केले.

37:20तर आता, हे परमेश्वरा, आमच्या देवा, आम्हास त्यांच्या हातातून सोडीव, म्हणजे तूच मात्र परमेश्वर आहेस हे पृथ्वीतल्या सर्व राजांनी जाणावे.

37:21नंतर आमोजाचा मुलगा यशया याने हिज्कीयाला निरोप पाठवून म्हणाला, “इस्राएलाचा देव परमेश्वर म्हणतो, ‘कारण अश्शूराचा राजा सन्हेरीब याच्याबद्दल तू माझी प्रार्थना केली.

37:22त्याच्याबद्दल परमेश्वर हे शब्द बोलला आहे. सियोनेची कुमारी तुला तुच्छ मानून तिरस्काराने तुला हसते, यरूशलेमेची कन्या, तुला डोके हलवून दाखवते.

37:23तू कोणाची निंदा आणि अपमान केलास? आणि कोणाविरूद्ध आवाज उंच केलास आणि आपले डोळे गर्वाने उंचावले? इस्राएलाच्या पवित्र प्रभूच्या विरुध्द.

37:24तू आपल्या सेवकांकडून प्रभूची अवज्ञा करून म्हटले, मी आपल्या पुष्कळशा रथाबरोबर मी पर्वताच्या उंचावर, लबानोनाच्या अगदी आतल्या भागावर चढून आलो आहे, त्याचे उंच गंधसरू, व त्याचे निवडक देवदारू मी तोडीन आणि मी त्याच्या अगदी दूरच्या उंचीवर त्याच्या फळझाडांच्या जंगलात प्रवेश करीत आलो

37:25मी विहिरी खणल्या व विदेशी पाणी प्यालो; मी आपल्या पायाच्या तळव्यांनी मिसरच्या सर्व नद्या सुकवून टाकीन.

37:26मी हे मागच्या काळात कसे केले आणि प्राचीन दिवसात हे कसे योजिल्याप्रमाणे केले, हे तू ऐकले नाही काय? आता हे मी घडवून आणले आहे. तू अजिंक्य नगरे घटवून त्यांचे नासाडीचे ढीग करण्यास येथे आहे.

37:27त्यामध्ये राहणारे, अल्प शक्तीचे होते, ते मोडून गेले व फजीत झाले. ते शेतात लावलेल्या रोपासारखे, हिरवे गवत, छतावरचे किंवा शेतातले गवत, वाढ होण्यापूर्वी पूर्वेच्या वाऱ्यापुढे करपले आहे.

37:28पण तुझे बसणे, बाहेर जाणे, आत येणे आणि माझ्याविरूद्धचा तुझा क्रोध मला ठाऊक आहे.

37:29कारण माझ्याविरूद्धच्या तुझ्या क्रोधामुळे आणि व तुझा उद्धटपणा माझ्या कानी पोहचला आहे, मी आपले वेसण तुझ्या नाकात व आपला लगाम तुझ्या तोंडात घालीन; तू ज्या मार्गाने आलास त्यानेच मी तुला मागे फिरवीन.

37:30तुझ्यासाठी हे चिन्ह होईलः या वर्षी तुम्ही जे काही आपोआप उगवेल ते खाल आणि दुसऱ्या वर्षी जे त्यातून उगवेल ते खाल, परंतु तिसऱ्या वर्षी तुम्ही पेरणी करा व कापा, द्राक्षमळे लावा आणि त्याचे फळ खा.

37:31यहूदाच्या घराण्यातील वाचलेले अवशिष्ट पुन्हा मूळ धरतील आणि फळ धारण करतील.

37:32कारण यरूशलेमेमधून अवशेष बाहेर येतील; सियोनाच्या डोंगरावरून वाचलेले येतील, सेनाधीश परमेश्वराचा आवेश हे करील.

37:33म्हणून अश्शूरच्या राजाविषयी परमेश्वर हे म्हणतोः तो या नगरात येणार नाही, किंवा येथे एकही बाण मारणार नाही, तो या समोर ढालीसह येणार नाही किंवा याविरूद्ध वेढा रचून थैमान घालणार नाही.

37:34तो ज्या मार्गाने आला त्याच मार्गाने निघून जाईल; तो या नगरात प्रवेश करणार नाही, ही परमेश्वराची घोषणा आहे.

37:35कारण मी आपल्यासाठी व माझा सेवक दावीद याच्यासाठी या नगराचे रक्षण करीन.

37:36मग परमेश्वराच्या देवदूताने जाऊन अश्शूराच्या तळावरील एक लक्ष पंचाऐंशी हजार सैनिकांना ठार मारले, जेव्हा पहाटेस माणसे उठली, तेव्हा सर्वत्र प्रेते पडलेली होती.

37:37मग अश्शूरचा राजा सन्हेरीबाने इस्राएल सोडले व घरी गेला व आणि निनवेत जाऊन राहिला.

37:38तेव्हा असे झाले की, तो आपला देव निस्रोख याच्या घरात पूजा करीत असताना, त्याची मुले अद्रम्मेलेक व शरेसर यांनी त्यास तलवारीने ठार मारले, मग ते अरारात देशात पळून गेले, नंतर त्याचा मुलगा एसरहद्दोन त्याच्या जागी राज्य करू लागला.

खूण केलेले: प्रत्येक वृत्तांतात असलेले शब्द, तुम्ही वाचता त्या भाषांतरात. सर्वात वारंवार येणारे शब्द (“आणि”, “तो”) खूण केलेले नाहीत; दुसऱ्या रूपातील शब्दाची खूण कदाचित होणार नाही.

स्रोत: OpenBible.info, CC BY 4.0 · इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क