Bible Explorer अ‍ॅप मिळवा

शोधा › शुभवर्तमाने शेजारी शेजारी › येशूचे दुःखसहन

शुभवर्तमाने शेजारी शेजारी · येशूचे दुःखसहन

येशूला अटक

मत्त 26:47–56 · मार्क 14:43–52 · लूक 22:47–53 · योहा 18:1–11

मत्तय

मत्त 26:47–56

47येशू हे बोलत असतानाच बारा जणांपैकी एक जो यहूदा, तो तेथे आला. त्याच्याबरोबर बरेच लोक होते. मुख्य याजक लोक आणि वडीलजन यांनी त्यांना पाठवले होते. ते लोक तलवारी व सोटे घेऊन आले होते.

48आणि त्यास धरून देणार्‍याने त्यांना खूण देऊन म्हणले होते की, मी ज्याचे चुंबन घेईन तोच तो आहे, त्यास तुम्ही धरा,

49मग यहूदा येशूकडे गेला आणि म्हणाला, “रब्बी,” आणि यहूदाने येशूचे चुंबन घेतले.

50येशू त्यास म्हणाला, “मित्रा, जे करण्यास आलास ते कर.” मग ते येशूकडे आले. त्यांनी येशूवर हात टाकले व त्यास धरले.

51हे झाल्यावर येशूबरोबर असलेल्या एका अनुयायाने तलवारीला हात घातला आणि ती उपसली. त्याने महायाजकाच्या सेवकाचा कान कापला.

52येशू त्या मनुष्यास म्हणाला, “तू आपली तलवार म्यानात ठेव. जे तलवारीचा वापर करतात ते तलवारीनेच मरतात.

53मी माझ्या पित्याला सांगितले तर तो देवदूतांच्या सहा हजार सैन्याची एक अशा बारा पेक्षा अधिक पलटणी पाठवील, हे तुम्हास कळत नाही काय?

54परंतु हे अशाच रीतीने झाले पाहिजे असा जो शास्त्रलेख आहे तो कसा काय पूर्ण होईल?”

55यानंतर येशू सर्व लोकसमुदायाला म्हणाला, “जसा मी कोणी गुन्हेगार आहे, अशा रीतीने तुम्ही तलवारी व सोटे हाती घेऊन मला धरायला माझ्यावर चाल करून आला काय? मी दररोज परमेश्वराच्या भवनात शिक्षण देत असता तुम्ही मला धरले नाही.

56परंतु या सर्व गोष्टी अशासाठी झाल्या आहेत की, संदेष्ट्यांनी जे लिहिले होते ते पूर्ण व्हावे.” नंतर येशूचे सर्व शिष्य त्यास सोडून पळून गेले.

मार्क

मार्क 14:43–52

43आणि येशू बोलत आहे तोपर्यंत बारा जणांपैकी एक यहूदा तेथे आला. त्याच्याबरोबर मुख्य याजक लोक व नियमशास्त्राचे शिक्षक आणि वडील यांनी पाठवलेले अनेक लोक तलवारी व सोटे घेऊन आले.

44घात करून देणाऱ्याने त्यांना अशी खूण दिली होती की, “मी ज्या कोणाचे चुंबन घेईन तोच तो आहे, त्यास धरा आणि सांभाळून न्या.”

45मग यहूदा आल्याबरोबर तो येशूकडे गेला आणि म्हणाला, “रब्बी!” आणि असे म्हणून यहूदाने येशूचे चुंबन घेतले.

46नंतर त्यांनी त्याच्यावर हात टाकले आणि त्यास अटक केली.

47तेथे जवळ उभे असलेल्यांपैकी एकाने आपली तलवार काढली आणि महायाजकाच्या नोकरावर वार करून त्याचा कान कापून टाकला.

48नंतर येशू त्यांना म्हणाला, “मी लुटारू असल्याप्रमाणे तुम्ही तलवारी आणि सोटे घेऊन मला पकडायला बाहेर पडलात काय?

49मी दररोज परमेश्वराच्या भवनात शिकवीत असता तुम्हाबरोबर होतो आणि तुम्ही मला अटक केली नाही. परंतु शास्त्रलेख पूर्ण झालाच पाहिजे.”

50सर्व शिष्य त्यास सोडून पळून गेले.

51एक तरूण मनुष्य अंगावर तागाचे वस्त्र पांघरून त्याच्यामागे चालत होता. त्यांनी त्यास धरले,

52परंतु तो तागाचे वस्त्र टाकून उघडाच पळून गेला.

लूक

लूक 22:47–53

47तो बोलत असतांनाच लोकांचा जमाव आला व बारा शिष्यातील यहूदा इस्कर्योत म्हटलेला एकजण त्यांच्यापुढे चालत होता. येशूचे चुंबन घेण्यासाठी तो त्याच्याजवळ आला.

48परंतु येशू त्यास म्हणाला, “यहूदा, चुंबन घेऊन मनुष्याच्या पुत्राचा विश्वासघात करतोस काय?”

49त्याच्याभोवती जे होते ते काय होणार हे ओळखून त्यास म्हणाले, “प्रभू, आम्ही तलवार चालवावी काय?”

50त्यांच्यापैकी एकाने महायाजकाच्या नोकरावर वार केला आणि त्याचा उजवा कान कापला.

51येशूने उत्तर दिले, “हे पुरेसे असू द्या.” आणि त्याने त्याच्या कानाला स्पर्श केला व त्यास बरे केले.

52नंतर येशू मुख्य याजक लोक, परमेश्वराच्या भवनाचे मुख्य अधिकारी आणि वडील जे त्याच्यावर चालून आले होते, त्यांना म्हणाला, “तुम्ही तलवारी आणि सोटे घेऊन माझ्यावर चालून आलात, जसा काय मी लुटारु आहे.

53मी तर तुम्हाबरोबर दररोज परमेश्वराच्या भवनात असे आणि तुम्ही माझ्यावर हात टाकला नाही. परंतु ही तुमची वेळ आणि अंधाराची सत्ता आहे.”

योहान

योहा 18:1–11

1हे बोलल्यानंतर येशू आपल्या शिष्यांबरोबर किद्रोन ओहळाच्या पलीकडे गेला. तेथे एक बाग होती; तेथे तो व त्याचे शिष्य गेले.

2ही जागा त्यास धरून देणाऱ्या यहूदालाही माहीत होती कारण येशू पुष्कळ वेळा आपल्या शिष्यांबरोबर तेथे जात असे.

3तेव्हा सैनिकांची तुकडी व मुख्य याजक लोक व परूशी यांच्याकडचे कामदार मिळाल्यावर, दिवे, मशाली व शस्त्रे घेऊन यहूदा तेथे आला.

4येशू आपणावर जे काही येणार हे सर्व जाणून बाहेर आला आणि त्यांना म्हणाला, “तुम्ही कोणाला शोधत आहात?”

5त्यांनी त्यास उत्तर दिले, “नासरेथकर येशूला.” तो त्यांना म्हणाला, “तो मी आहे.” आणि ज्या यहूदाने त्यास धरून दिले देखील त्यांच्याबरोबर उभा होता,

6“तो मीच आहे,” असे म्हणताच ते मागे सरकून जाऊन जमिनीवर पडले.

7मग त्याने त्यांना पुन्हा विचारले, “तुम्ही कोणाला शोधता?” आणि ते म्हणाले, “नासरेथकर येशूला.”

8येशूने उत्तर दिले, “मीच तो आहे; असे मी तुम्हास सांगितले, तुम्ही मला शोधीत असला तर यांना जाऊ द्या.”

9“जे तू मला दिले आहेत त्यांतून मी एकही हरविला नाही,” असे जे वचन तो बोलला होता ते पूर्ण व्हावे म्हणून हे झाले.

10तेव्हा शिमोन पेत्राजवळ तलवार असल्याने त्याने ती उपसली व महायाजकाच्या दासावर चालविली आणि त्याचा उजवा कान कापून टाकला. त्या दासाचे नाव मल्ख होते.

11तेव्हा येशू पेत्राला म्हणाला, “तरवार म्यानात घाल. पित्याने मला जो प्याला दिला आहे तो मी पिऊ नये काय?”

खूण केलेले: प्रत्येक वृत्तांतात असलेले शब्द, तुम्ही वाचता त्या भाषांतरात. सर्वात वारंवार येणारे शब्द (“आणि”, “तो”) खूण केलेले नाहीत; दुसऱ्या रूपातील शब्दाची खूण कदाचित होणार नाही.

स्रोत: OpenBible.info, CC BY 4.0 · इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क