Bible Explorer अ‍ॅप मिळवा

मुख्यपृष्ठ › दैनंदिन बायबल पाठ › एप्रिल 2027 › 29 एप्रिल

ऑर्थोडॉक्स दिनदर्शिका · 16 एप्रिल (जुनी पद्धत)

ऑर्थोडॉक्स दैनंदिन पाठ — 29 एप्रिल 2027

गुरुवार · पवित्र आठवडा

सण आणि संत

महान आणि पवित्र गुरुवार

महान लेंत

उपवास: तेलासह

हे मठाच्या नियमानुसार आहे. पॅरिशमध्ये उपवासाचे प्रमाण आपल्या पापकबुलीच्या धर्मगुरूसोबत, आरोग्य, वय आणि परिस्थितीनुसार ठरवले जाते.

दिवसाची वाचने

शुभवर्तमान (वराची प्रातःप्रार्थना)

लूक 22:1–39

1नंतर बेखमीर भाकरीचा सण ज्याला वल्हांडण म्हणतात, तो जवळ आला. 2मुख्य याजक लोक आणि नियमशास्त्राचे शिक्षक, येशूला कसे मारता येईल या बाबतीत चर्चा करीत होते कारण त्यांना लोकांची भीती वाटत होती. 3तेव्हा बारा प्रेषितांपैकी एकात, म्हणजे यहूदात इस्कर्योतामध्ये सैतान शिरला. 4यहूदा मुख्य याजक लोक व परमेश्वराच्या भवनाचे अधिकारी यांच्याकडे गेला आणि त्यांच्या हाती येशूला कसे धरुन देता येईल याविषयीची बोलणी केली. 5त्यांना फार आनंद झाला व त्यांनी त्यास पैसे देण्याचे मान्य केले. 6म्हणून त्याने संमती दर्शविली आणि तो येशूला गर्दी नसेल तेव्हा धरुन त्यांच्या हाती देण्याची संधी शोधू लागला. 7बेखमीर भाकरीचा सण, ज्या दिवशी वल्हांडणाचे कोकरु मारावयाचे तो दिवस आला. 8तेव्हा त्याने पेत्र व योहान यांना सांगून पाठवले की, “जा आणि आपणासाठी वल्हांडण सणाचे भोजन तयार करा म्हणजे आपण ते खाऊ.” 9पेत्र व योहान येशूला म्हणाले, “आम्ही त्याची तयारी कोठे करावी अशी तुमची इच्छा आहे?” 10तो त्यांना म्हणाला, “तुम्ही नगरात प्रवेश कराल तेव्हा पाण्याचे भांडे घेऊन जाणारा एक मनुष्य तुम्हास भेटेल. तो ज्या घरात जाईल तेथे जा. 11आणि त्या घरमालकास सांगा, ‘गुरुजींनी तुम्हास विचारले आहे की, माझ्या शिष्यांसह वल्हांडण सणाचे भोजन करता येईल ती पाहुण्यांची खोली कोठे आहे?’ 12तो मनुष्य तुम्हास माडीवरील सजविलेली खोली दाखवील तेथे तयारी करा.” 13तेव्हा पेत्र व योहान तेथून निघाले. जसे येशूने सांगितले तसेच सर्व घडले तेव्हा त्यांनी वल्हांडणाच्या भोजनाची तयारी केली. 14वेळ झाली तेव्हा येशू त्याच्या प्रेषितांसह भोजनास बसला. 15तो त्यांना म्हणाला, “मी दुःख भोगण्यापूर्वी तुमच्याबरोबर वल्हांडण सणाचे भोजन घ्यावे अशी माझी फार इच्छा होती. 16कारण मी तुम्हास सांगतो की, देवाच्या राज्यात हे परिपूर्ण होईपर्यंत मी पुन्हा हे भोजन करणार नाही.” 17नंतर येशूने पेला घेऊन व उपकारस्तुती करून तो म्हणाला, “हा घ्या आणि आपसात याची वाटणी करा. 18कारण मी तुम्हास सांगतो की, देवाचे राज्य येईपर्यंत यापुढे मी द्राक्षरस घेणार नाही.” 19नंतर त्याने भाकर घेऊन व उपकारस्तुती करून ती मोडली आणि त्यांना देऊन म्हटले, “हे माझे शरीर आहे जे तुम्हासाठी दिले जात आहे. माझ्या आठवणीसाठी हे करा.” 20त्याचप्रमाणे त्यांचे भोजन झाल्यावर त्याने प्याला घेतला आणि म्हणाला, “हा प्याला माझ्या रक्तात नवा करार आहे, जो तुमच्यासाठी ओतला जात आहे. 21परंतु पाहा! माझा विश्वासघात करणाऱ्याचा हात माझ्याबरोबरच मेजावर आहे. 22कारण मनुष्याचा पुत्र ठरल्याप्रमाणे जातो खरा पण ज्याच्या हातून तो धरून दिला जातो त्या मनुष्याची केवढी दुर्दशा होणार.” 23आणि ते आपापसात एकमेकाला प्रश्न विचारु लागले, “हे करणारा आपणापैकी कोण असावा?” 24तसेच, त्यांच्यामध्ये अशासंबंधी वाद निर्माण झाला की, त्यांच्यामध्ये सर्वांत मोठा कोण आहे. 25तेव्हा त्याने त्यांना म्हटले, “परराष्ट्रीयांचे राजे त्यांच्यावर प्रभूत्व करतात आणि जे त्यांच्यावर अधिकार गाजवतात त्यांना ते परोपकारी असे वाटतात. 26परंतु तुम्ही तसे नाही. त्याऐवजी तुमच्यातील सर्वांत मोठा असलेल्याने सर्वांत लहान व्हावे व जो अधिकारी आहे त्याने सेवक व्हावे. 27तेव्हा मोठा कोण जो मेजावर बसतो तो की जो सेवा करतो तो? जो मेजावर बसतो तो नाही का? परंतु मी तुम्हामध्ये सेवा करणाऱ्यासारखा आहे. 28परंतु माझ्या परीक्षेमध्ये माझ्या पाठीशी उभे राहिलेले असे तुम्हीच आहात. 29ज्याप्रमाणे माझ्या पित्याने माझी नियुक्ती केली तशी मी तुमची नियुक्ति राज्यावर करतो. 30म्हणून तुम्ही माझ्या राज्यात माझ्या मेजावर खावे व प्यावे आणि आसनावर बसून इस्राएलाच्या बारा वंशाचा न्याय करावा. 31शिमोना, शिमोना, ऐक! सैतानाने तुम्हास गव्हासारखे चाळावे म्हणून मागितले आहे. 32परंतु शिमोना, तुझा विश्वास ढळू नये, म्हणून मी तुझ्यासाठी प्रार्थना केली आहे आणि तू पुन्हा माझ्याकडे वळलास म्हणजे तुझ्या भावांस स्थिर कर.” 33परंतु शिमोन पेत्र त्यास म्हणाला, “प्रभू, मी तुझ्याबरोबर तुरुंगात जाण्यासाठी व मरण्यासाठी तयार आहे.” 34पण येशू म्हणाला, “पेत्रा, मी तुला सांगतो, तू मला ओळखतोस हे तीन वेळा नाकारशील तोपर्यंत आज कोंबडा आरवणार नाही.” 35येशू शिष्यांना म्हणाला, “जेव्हा मी तुम्हास थैली, पिशवी व वहाणांशिवाय पाठवले, तेव्हा तुम्हास काही कमी पडले का?” ते म्हणाले, “काहीही नाही.” 36तो त्यांना म्हणाला, “पण आता, ज्याच्याजवळ थैली आहे त्याने ती घ्यावी व त्याने पिशवीसुद्धा घ्यावी आणि ज्याच्याजवळ तलवार नाही त्याने आपला झगा विकावा आणि ती विकत घ्यावी. 37मी तुम्हास सांगतो, तो अपराध्यांत गणलेला होता, असा जो शास्त्रलेख आहे तो माझ्याठायी पूर्ण झाला पाहिजे कारण माझ्या विषयीच्या गोष्टी पूर्ण होत आहेत.” 38ते म्हणाले, “प्रभू, पहा, येथे दोन तलवारी आहेत.” तो त्यांना म्हणाला, “तेवढे पुरे!” 39मग तो निघून आपल्या रीतीप्रमाणे जैतूनाच्या डोंगराकडे गेला व शिष्यही त्याच्या मागोमाग गेले.

पहिला तास

यिर्म 11:18–12:5, 9–11, 14–15

18परमेश्वराने मला या गोष्टींचे ज्ञान दिले. म्हणून मला त्या समजल्या. परमेश्वरा, तू मला त्यांची कृत्ये दाखवली. 19ते माझ्याविरूद्ध योजना आखत आहेत हे मला माहीत नव्हते. मी कत्तल होण्याची वाट पाहणाऱ्या गरीब कोकरासारखा होतो. “आपण या झाडाचा आणि त्याच्या फळांचा नाश करु. आपण त्यास जीवंताच्या देशातून तोडून टाकू म्हणजे त्याचे नाव आठवणीत राहणार नाही.” 20पण सेनाधीश परमेश्वर, जो तू सत्याने न्याय करतोस, जो तू हृदय व मन पारखतोस. तू त्यांच्यावर केलेला प्रतिकार मी साक्ष देईन, कारण मी आपला वाद तुझ्याजवळ उघड केला आहे. 21अनाथोथच्या लोकांबद्दल परमेश्वर या गोष्टी म्हणतो, जे तुझा जीव घेण्यास पाहत आहेत. ते म्हणातात, “परमेश्वराच्या नावावर भविष्यकथन करु नकोस, नाहीतर आम्ही तुला आमच्या हाताने ठार करु.” 22यास्तव सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, पाहा! “त्यांना मी शिक्षा करीन. त्यांचे तरुण तलवारीने मरण पावतील. त्यांची मुले आणि त्यांच्या मुली दुष्काळाने मरतील. 23त्यांच्यातील एकही मनुष्य शिल्लक राहणार नाही. कारण मी अनाथोथच्या लोकांवर वाईट, म्हणजे त्यांच्या शासनाचे वर्ष आणतो.” 12:1परमेश्वरा, मी तुझ्याकडे वादविवाद घेऊन येतो, तू नितीमान ठरतोस, मी निश्चितपणे माझ्या तक्रारीचे कारण तुला सांगितले पाहिजे. दुष्ट लोकच यशस्वी का होतात? सर्व जे अविश्वासू लोक ते यशस्वी आहेत. 2तू त्यांना लावले आणि ते मुळावले. ते वाढतात आणि फळे देतात. तू त्यांच्या मुखात त्यांच्या जवळ आहे, पण त्यांच्या मनापासून तू फार दूर आहेस. 3पण, परमेश्वरा, तू मला जाणतोस. तू मला पाहतोस आणि माझ्या मनाला पारखतोस. कत्तल करण्यासाठी मेंढ्यांना जसे फरपटत आणतात, तसे त्यांना फरपटत आण. कत्तलीच्या दिवसासाठी त्यांना तयार कर. 4किती काळ राष्ट्र शोक करणार? आणि साऱ्या देशाचे गवत सुकून जाईल? त्यामध्ये राहणाऱ्यांच्या दुष्टाई मुळे पशू व पक्षी मरुन गेले आहेत. कारण ते लोक म्हणाले “आमचे काय होईल हे देवाला माहीत नाही.” 5कारण तू “यिर्मया, पायदळाबरोबर धावलास आणि त्यांनी तुला दमवले, तर मग घोड्यांबरोबर तू कसा धावशील? जर तू सुरक्षित आणि उघड्या देशात पडतोस तर यार्देन नदीकिनारी वाढणाऱ्या काटेरी झुडुंपात तू काय करशील? 9माझे वतन मला तरस आहे, आणि पक्षी तिच्याभोवती घिरट्या घालत आहेत. जा आणि भूमीवरील सर्व जिवंत प्राण्यांना गोळा करा, आणि त्यांनी खाऊन टाकावे म्हणून त्यास आण. 10पुष्कळ मेंढपाळांनी माझ्या द्राक्षमळ्याचा नाश केला आहे. त्यांनी माझा वाटा पायदळी तुडविला आहे, त्यांनी माझा आनंददायक भाग वैराण व वाळवंटात पालटवला आहे. 11त्यांनी तिला उजाड केले आहे, मी तिच्या करिता शोक करत आहे. ती उजाड झाली आहे. सर्व भूमी उजाड करण्यात आली आहे. कारण कोणी हे मनावर घेत नाही. 14परमेश्वर माझ्या सर्व शेजाऱ्यांविरूद्ध असे म्हणतो. जे वतन मी आपल्या इस्राएल लोकांस वतन म्हणून दिले त्यास जे दुष्ट शेजारी हात लावतात, पाहा! त्यांना मी त्याच्या भूमीतून उपटून काढीन आणि त्यांच्यामधून यहूदाचे घराणे उपटून काढीन. 15पण अशा रीतीने त्यांना उपटून काढल्यानंतर असे होईल की परतून त्यांच्यावर दया करीन, आणि मी प्रत्येकाल्या त्याच्या वतनास आणि प्रत्येकाला त्याच्या देशास परत आणीन.

संध्याप्रार्थना: वाचन

निर्ग 19:10–19

10परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू जाऊन आज आणि उद्या लोकांस पवित्र कर; त्यांनी आपले कपडे स्वच्छ धुवावेत. 11तिसऱ्या दिवशी त्यांनी तयार रहावे, कारण तिसऱ्या दिवशी सर्व लोकांदेखत परमेश्वर सीनाय पर्वतावर उतरेल. 12परंतु लोकांसाठी तेथे सीमारेषा आखून लोकांनी ती ओलांडू नये, त्यांना बजावून सांग; पर्वतावर कोणीही चढू नये जो कोणी पर्वताला स्पर्श करेल तो खास आपल्या जिवाला मुकेल. 13कोणीही त्यास हात लावू नये. हात लावला तर त्यास दगडमार करावी किंवा बाणांनी विंधावे, तो पशू असो किंवा मनुष्य असो, त्यास जिवंत ठेवू नये. शिंगाचा दीर्घ आवाज होईल तेव्हा लोकांनी पर्वताजवळ यावे.” 14मग मोशे पर्वतावरून खाली उतरला; तो लोकांकडे गेला व देवाच्या भेटीसाठी त्याने त्यांना पवित्र केले. लोकांनी आपले कपडे धुवून स्वच्छ केले. 15मग मोशे लोकांस म्हणाला, “तीन दिवस तुम्ही देवाची भेट घेण्यासाठी तयार राहा. तोपर्यंत स्त्रीस्पर्श करू नका.” 16तिसरा दिवस उजडताच मेघगर्जना झाली व विजा चमकू लागल्या, पर्वतावर दाट ढग आले आणि प्रचंड शिंगाचा फार आवाज होऊ लागला. तेव्हा छावणीत राहणारे सर्व लोक थरथर कापू लागले. 17नंतर मोशेने लोकांस छावणीतून बाहेर काढून देवाच्या दर्शनाला बाहेर आणले आणि ते पर्वताच्या तळाजवळ उभे राहिले. 18परमेश्वर सीनाय पर्वतावर अग्नीतून उत्तरला म्हणून तो पर्वत धुराने झाकून गेला. भट्टीतून येणाऱ्या धुरासारखा त्याचा धूर वर आला, आणि सर्व पर्वत थरथरू लागला. 19शिंगाचा आवाज मोठमोठा होऊ लागला. तेव्हा मोशे बोलू लागला आणि देव त्यास आपल्या वाणीने उत्तर देत गेला.

संध्याप्रार्थना: वाचन

ईयो 38:1–23; 42:1–5

1नंतर परमेश्वर वावटळीतून ईयोबाशी बोलला आणि तो म्हणाला, 2कोण आहे जो माझ्या योजनांवर अंधार पाडतो, म्हणजे ज्ञानाविना असलेले शब्द? 3आता तू पुरूषासारखी आपली कंबर बांध, मी तुला प्रश्न विचारील, आणि तू मला उत्तर दे. 4मी पृथ्वी निर्माण केली तेव्हा तू कुठे होतास? तू स्वत:ला इतका शहाणा समजत असशील तर मला उत्तर दे. 5जग इतके मोठे असावे हे कोणी ठरवले ते सांग? मोजण्याच्या दोरीने ते कोणी मोजले का? 6तीचा पाया कशावर घातला आहे? तिची कोनशिला कोणी ठेवली? 7जेव्हा ते घडले तेव्हा पहाटेच्या ताऱ्यांनी गायन केले आणि देवपुत्रांनी आनंदाने जयजयकार केला. 8जेव्हा समुद्र पृथ्वीच्या पोटातून बाहेर पडला तेव्हा दरवाजे बंद करून त्यास कोणी अडवला? 9त्यावेळी मी त्यास मेघांनी झाकले आणि काळोखात गुंडाळले. 10मी समुद्राला मर्यादा घातल्या आणि त्यास कुलुपांनी बंद केलेल्या दरवाजाबाहेर थोपविले. 11मी म्हणालो, तू इथपर्यंतच येऊ शकतोस या पलिकडे मात्र नाही. तुझ्या उन्मत्त लाटा इथेच थांबतील. 12तुझ्या आयुष्यात तू कधीतरी पहाटेला आरंभ करायला आणि दिवसास सुरु व्हायला सांगितलेस का? 13तू कधीतरी पहाटेच्या प्रकाशाला पृथ्वीला पकडून दुष्ट लोकांस त्यांच्या लपायच्या जागेतून हुसकायला सांगितलेस का? 14पहाटेच्या प्रकाशात डोंगरदऱ्या नीट दिसतात. दिवसाच्या प्रकाशात या जगाचा आकार अंगरख्याला असलेल्या घडीप्रमाणे ठळक दिसतात 15दुष्टांपासून त्यांचा प्रकाश काढून घेतला आहे आणि त्यांचा उंच भूज मोडला आहे. 16सागराला जिथे सुरुवात होते तिथे अगदी खोल जागेत तू कधी गेला आहेस का? समुद्राच्या तळात तू कधी चालला आहेस का? 17मृत्युलोकात नेणारे दरवाजे तू कधी पाहिलेस का? काळोख्या जगात नेणारे दरवाजे तू कधी बघितलेस का? 18ही पृथ्वी किती मोठी आहे ते तुला कधी समजले का? तुला जर हे सर्व माहीत असेल तर मला सांग. 19प्रकाश कुठून येतो? काळोख कुठून येतो? 20तू प्रकाशाला आणि काळोखाला ते जिथून आले तेथे परत नेऊ शकशील का? तिथे कसे जायचे ते तुला माहीत आहे का? 21तुला या सर्व गोष्टी नक्कीच माहीत असतील तू खूप वृध्द आणि विद्वान आहेस मी तेव्हा या गोष्टी निर्माण केल्या तेव्हा तू जिवंत होतास होय ना? 22मी ज्या भांडारात हिम आणि गारा ठेवतो तिथे तू कधी गेला आहेस का? 23मी बर्फ आणि गारांचा साठा संकटकाळासाठी, युध्द आणि लढाईच्या दिवसांसाठी करून ठेवतो. 42:1नंतर ईयोबने परमेश्वरास उत्तर दिले, तो म्हणाला: 2“परमेश्वरा सर्वकाही तूच करु शकतोस ते मला माहीत आहे, तू योजना आखतोस त्या प्रत्यक्षात कोणीही थांबवू शकत नाही. 3तू मला विचारलेस, हा अज्ञानी मनुष्य कोण आहे जो असे मूर्खासारखे बोलतो आहे? तरीही मला ज्या गोष्टी कळत नव्हत्या त्या गोष्टी मी बोललो, त्यांच्याविषयीच मी बोलत होतो. ज्या गोष्टी समजणे माझ्या आवाक्याबाहेरचे होते त्यांच्याविषयी मी बोलत होतो. 4परमेश्वरा, तू मला म्हणालास, ईयोब, तू ऐक, मी बोलेन, मी तुला प्रश्न विचारेन, आणि तू मला उत्तर दे. 5परमेश्वरा, मी तुझ्याबद्दल पूर्वी ऐकले होते, परंतु आता मी माझ्या डोळ्यांनी तुला बघतो आहे.

संध्याप्रार्थना: वाचन

यश 50:4–11

4थकलेल्यांना बोलून धीर कसा द्यावा म्हणून प्रभू परमेश्वराने, मला सुशिक्षितांची जीभ दिली आहे. तो मला सकाळी सकाळी जागे करतो; तो मला शिकविल्याप्रमाणे माझे कान उघडतो. 5प्रभू परमेश्वराने माझा कान उघडला आहे, आणि मीही बंडखोर झालो नाही किंवा मागे वळलो नाही. 6ज्यांनी मला मारले त्यांच्यापुढे मी पाठ केली आणि ज्यांनी माझ्या दाढीचे केस उपटले त्यांच्यापुढे मी आपले गाल केले. लज्जा व थुंकणे यांपासून मी आपले तोंड लपवले नाही. 7कारण प्रभू परमेश्वर मला मदत करील; म्हणून मी लज्जित झालो नाही; माझा प्रभू मला मदत करील. म्हणून मी माझे तोंड गारगोटीसारखे केले, कारण मला माहीत आहे माझी फजिती होणार नाही. 8मला नितीमान ठरवणारा परमेश्वर जवळ आहे. मला कोण विरोध करणार? उभे राहा आणि एक दुसऱ्यास धैर्याने तोंड द्या. 9पाहा, प्रभू परमेश्वर मला मदत करील. मला कोण दोषी ठरविल? पाहा, ते सर्व वस्त्राप्रमाणे जीर्ण होतील; कसर त्यांना खाऊन टाकील. 10परमेश्वराचे भय धरणारे तुमच्यात कोण आहेत? त्याच्या सेवकाची वाणी ऐकणारे कोण आहेत? प्रकाशाविना गहन काळोखात कोण चालतो? त्याने परमेश्वराच्या नावावर विश्वास ठेवावा आणि आपल्या देवावर अवलंबून रहावे. 11पाहा, जे सर्व तुम्ही अग्नी पेटवता, जे तुम्ही स्वतःला मशालीसह सुसज्ज करता; ते तुम्ही आपल्या अग्नीच्या प्रकाशात आणि तुम्ही पेटविलेल्या ज्योतीत चाला. परमेश्वर म्हणतो, माझ्या हातून, हे तुमच्याकडे येईलः तुम्ही वेदनेच्या जागी खाली पडून रहाल.

प्रेषितांचे पत्र

1 करिं 11:23–32

23कारण प्रभूपासून जे मला मिळाले तेच मी तुम्हास दिले. प्रभू येशूचा, ज्या रात्री विश्वासघात करण्यात आला. त्याने भाकर घेतली, 24आणि उपकार मानल्यावर ती मोडली आणि म्हणाला, “हे माझे शरीर आहे, जे मी तुमच्यासाठी देत आहे. माझी आठवण करण्यासाठी हे करा.” 25त्याचप्रमाणे त्यांनी भोजन केल्यावर त्याने प्याला घेतला आणि म्हणाला, “हा प्याला माझ्या रक्ताने झालेला नवीन करार आहे. जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझी आठवण करण्यासाठी हे करा.” 26कारण जितक्यांदा तुम्हीही भाकर खाता व हा प्याला पिता, तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करीता. 27म्हणून जो कोणी अयोग्य रीतीने प्रभूची भाकर खाईल किंवा प्याला पिईल तो प्रभूच्या शरीराविषयी आणि रक्ताविषयी दोषी ठरेल. 28म्हणून मनुष्याने स्वतःची परीक्षा करावी आणि नंतर त्या भाकरीतून खावे व त्या प्याल्यातून प्यावे. 29कारण जर तो प्रभूच्या शरीराचा अर्थ न जाणता ती भाकर खातो व पितो तर तो खाण्याने आणि पिण्याने स्वतःवर दंड ओढवून घेतो. 30याच कारणामुळे तुम्हातील अनेक जण आजारी आहेत आणि काहीजण मरण पावले आहेत. 31परंतु जर आम्ही आमची परीक्षा करू तर आमच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही. 32परंतु प्रभूकडून आमचा न्याय केला जातो तेव्हा आम्हास शिस्त लावण्यात येते, यासाठी की, जगातील इतर लोकांबरोबर आम्हासही शिक्षा होऊ नये.

शुभवर्तमान (संयुक्त वाचन)

मत्त 26:1–20 · योहा 13:3–17 · मत्त 26:21–39 · लूक 22:43–45 · मत्त 26:40–27:2

1मग येशूने ही सर्व वचने सांगण्याचे संपविल्यानंतर तो आपल्या शिष्यांना म्हणाला, 2“दोन दिवसानी वल्हांडणाचा सण आहे हे तुम्हास माहीत आहे आणि मनुष्याचा पुत्र वधस्तंभावर खिळून जिवे मारला जाण्यासाठी धरून दिला जाईल.” 3मग मुख्य याजक लोक आणि वडीलवर्ग, महायाजकाच्या महलात जमले. मुख्य याजकाचे नाव कयफा होते. 4सभेत त्यांनी मिळून मसलत केली की, येशूला कपटाने अटक करून आणि जिवे मारावे. 5तरीही ते म्हणत होते, “सणाच्या दिवसात नको, नाही तर लोकांमध्ये दंगा होईल.” 6तेव्हा येशू बेथानी गावामध्ये शिमोन जो कुष्ठरोगी होता त्याच्या घरात होता. 7येशू तेथे असताना एक स्त्री त्याच्याकडे आली. अतिमौल्यवान सुवासिक तेलाची अलाबास्त्र कुपी तिच्याजवळ होती आणि तो जेवणास टेकून बसला असता तिने ते त्याच्या डोक्यावर ओतले. 8पण त्याच्या शिष्यांनी ते पाहिले, तेव्हा त्यांना राग आला. शिष्य विचारू लागले, असा नाश कश्याला? 9ते पुष्कळ पैशांना विकता आले असते आणि ते पैसे गोरगरिबांना देता आले असते. 10पण येशूला ते काय म्हणत आहेत हे माहीत होते, त्याने त्यांना विचारले, “तुम्ही त्या स्त्रीला का त्रास देत आहात? तिने माझ्यासाठी फार चांगले काम केले आहे. 11गरीब लोक तुमच्याबरोबर नेहमीच असतील पण मी तुमच्याबरोबर नेहमी असणार नाही. 12कारण तिने माझ्या शरीरावर हे सुवासिक तेल ओतले ते मला पुरण्याच्या तयारीसाठी हिने केले. 13मी तुम्हास खरे सांगतो, सर्व जगात जेथे सुवार्ता गाजवली जाईल तेथे तेथे या स्त्रीने जे केले त्याचे वर्णन तिची आठवण म्हणून सांगण्यात येईल.” 14बारा शिष्यांपैकी एक यहूदा इस्कार्योत मुख्य याजकांकडे गेला. 15यहूदा म्हणाला, “मी येशूला धरून तुमच्या हाती दिले तर तुम्ही मला काय द्याल?” तेव्हा त्यांनी त्यास चांदीची तीस नाणी दिली. 16तेव्हापासून यहूदा येशूला धरून देण्याच्या संधीची वाट पाहू लागला. 17बेखमीर भाकरीच्या सणाच्या पहिल्या दिवशी येशूचे शिष्य त्याच्याकडे आले. ते म्हणाले, “आम्ही आपल्यासाठी वल्हांडणाचे जेवण कोठे करावे अशी आपली इच्छा आहे?” 18येशू म्हणाला, “तुम्ही नगरात अमुक मनुष्याकडे जा आणि त्यास सांगा; ‘गुरूजी म्हणतात, माझी वेळ जवळ आली आहे. तुझ्या घरी मी माझ्या शिष्यांसह वल्हांडण साजरा करणार आहे.” 19येशूने जे सांगितले होते ते त्याच्या शिष्यांनी केले आणि त्यांनी वल्हांडण सणाचे जेवण तयार केले. 20संध्याकाळ झाल्यावर येशू आपल्या शिष्यांबरोबर जेवावयास बसला. 13:3येशू जाणत होता की, पित्याने त्याच्या हातात सर्व दिले होते आणि तो देवाकडून आला होता व देवाकडे जात होता; 4येशू भोजनावरून उठला, त्याने आपली बाह्यवस्त्रे एकीकडे ठेवली आणि एक कापड घेऊन आपल्या कमरेला बांधला. 5त्यानंतर येशू एका गंगाळात पाणी ओतून आणि तो शिष्यांचे पाय धुऊ लागला व कमरेला बांधलेल्या कापडाने पुसू लागला. 6मग तो शिमोन पेत्राकडे आला, तेव्हा तो त्यास म्हणाला, “प्रभूजी, आपण माझे पाय धुता काय?” 7येशूने त्यास उत्तर दिले, “मी काय करतो ते तुला आता कळत नाही, पण ते तुला पुढे कळेल.” 8पेत्र त्यास म्हणाला, “तुम्हास माझे पाय कधीही धुवावयाचे नाहीत.” येशूने त्यास उत्तर दिले, “मी तुला धुतले नाही, तर तुला माझ्याबरोबर वाटा नाही.” 9शिमोन पेत्र त्यास म्हणाला, “प्रभूजी, माझे केवळ पायच धुऊ नका, तर हात आणि डोकेही धुवा.” 10येशूने त्यास म्हटले, “ज्याचे स्नान झाले आहे त्यास पायांशिवाय दुसरे काही धुवायची गरज नाही, तर तो सर्वांगी शुद्ध आहे; तुम्ही शुद्ध आहा, पण सगळे जण नाही.” 11कारण आपणाला विश्वासघाताने शत्रूच्या हाती कोण धरून देणार आहे हे त्यास ठाऊक होते, म्हणून तो म्हणाला, “तुम्ही सगळे जण शुद्ध नाही.” 12मग त्याने त्यांचे पाय धुतल्यावर आपली बाह्यवस्त्रे घालून व तो पुन्हा खाली बसल्यावर त्यांना म्हणाला, “मी तुम्हास काय केले ते तुम्हास समजले काय? 13तुम्ही मला ‘गुरू’ आणि ‘प्रभू’ म्हणता आणि ते ठीक म्हणता, कारण मी तसाच आहे. 14मग मी जर तुमचा प्रभू आणि गुरू असता तुमचे पाय धुतले तर तुम्हीपण एकमेकांचे पाय धुवावेत. 15कारण मी तुम्हास केले तसे तुम्हीही करावे म्हणून मी तुम्हास उदाहरण दिले आहे. 16मी तुम्हास खरे खरे सांगतो, दास आपल्या धन्यापेक्षा मोठा नाही; आणि पाठवलेला पाठवणाऱ्यापेक्षा मोठा नाही. 17या गोष्टी तुम्हास समजतात तर त्याप्रमाणे वागल्याने तर तुम्ही धन्य आहात. 26:21जेवण करीत असता येशू म्हणाला, “मी तुम्हास खरे सांगतो तुमच्यातला एकजण माझा विश्वासघात करील.” 22ते खूप दुःखी झाले आणि त्यांच्यातील प्रत्येकजण त्यास विचारु लागला, प्रभूजी, तो मी तर नाही? 23मग येशूने उत्तर दिले, “ज्याने माझ्याबरोबर ताटात हात घातला तोच माझा विश्वासघात करील. 24जसे मनुष्याच्या पुत्राविषयी पवित्र शास्त्रात लिहिले आहे, तसा तो जातो खरा; पण जो त्याचा विश्वासघात करतो त्यास धिक्कार असो! तो मनुष्य जर जन्मला नसता तर त्याच्यासाठी ते बरे झाले असते.” 25मग यहूदा, जो त्याचा विश्वासघात करणार होता, तो येशूकडे वळून म्हणाला, “रब्बी, तो मी आहे का?” येशू त्यास म्हणाला, “तू म्हणालास, तसेच आहे.” 26ते जेवण करीत असताना येशूने भाकर घेतली. तिच्याबद्दल देवाचे उपकार मानले आणि ती मोडली. त्याने ती भाकर आपल्या शिष्यांना दिली. तो म्हणाला, “घ्या, खा. हे माझे शरीर आहे.” 27नंतर येशूने प्याला घेतला. त्याबद्दल देवाचे उपकार मानले आणि तो त्यांना दिला. येशू म्हणाला, “तुम्ही सर्वांनी यातून प्यावे. 28कारण हे माझे कराराचे रक्त आहे. हे पुष्कळांच्या पापक्षमेसाठी ओतले जात आहे. 29परंतु मी तुम्हास सांगतो की, मी आपल्या पित्याच्या राज्यांत तुम्हाबरोबर नवा द्राक्षरस पिईन त्या दिवसापर्यंत द्राक्षाचा हा उपज मी पिणारच नाही.” 30मग त्यांनी एक स्तोत्रगीत गाईल्यावर ते जैतूनाच्या डोंगरावर निघून गेले. 31येशूने सांगितले, “आज रात्री माझ्यामुळे, तुम्ही सर्व अडखळाल; कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, ‘मी मेंढपाळाचा वध करीन, कळपातील मेंढरांची दाणादाण होईल.’ 32पण मी मरणातून उठल्यानंतर, तुमच्या अगोदर गालील प्रांतात जाईन.” 33पेत्र उत्तर देत म्हणाला, “इतर सर्व जरी आपणाविषयी अडखळले तरी मी कधीही अडखळणार नाही.” 34येशू त्यास म्हणाला, “मी तुला खरे सांगतो आज रात्री कोंबडा आरवण्यापूर्वी तू तीन वेळा मला नाकारशील.” 35पेत्र म्हणाला, “मला तुझ्याबरोबर मरावे लागले तरी मी तुला नाकारणार नाही.” आणि इतर शिष्यसुद्धा तसेच म्हणाले. 36नंतर गेथशेमाने नावाच्या जागी येशू आपल्या शिष्यांसह गेला. येशू त्यांना म्हणाला, “मी थोडा पुढे जाऊन प्रार्थना करीपर्यंत येथेच थांबा.” 37येशूने पेत्र आणि जब्दीचे दोन पुत्र यांना आपल्याबरोबर यायला सांगितले. यानंतर येशू फार दुःखी व कासावीस होऊ लागला. 38येशू पेत्राला व जब्दीच्या दोघा पुत्रांना म्हणाला, “माझा जीव फार दुःखीत व मरणप्राय झाला आहे. येथे थांबा व माझ्याबरोबर जागे राहा.” 39तो थोडे अंतर पुढे गेला आणि जमिनीवर ओणवून प्रार्थना करू लागला, “हे माझ्या पित्या, शक्य झाले तर हा दुःखाचा प्याला माझ्यापुढून जाऊ दे, तथापि, माझ्या इच्छेप्रमाणे नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे.” 22:43स्वर्गातून एक देवदूत आला व तो त्यास सामर्थ्य देत राहिला 44दु:खाने ग्रासलेला असतांना त्याने अधिक कळकळीने प्रार्थना केली आणि त्याचा घाम रक्ताच्या थेंबासारखा जमिनीवर पडत होता. 45आणि जेव्हा प्रार्थना करून तो उठला आणि शिष्यांकडे आला तो पाहा ते खिन्न झाल्यामुळे झोपी गेलेले त्यास आढळले. 26:40मग तो शिष्यांकडे परत गेला तेव्हा ते झोपी गेले आहेत असे त्यास आढळले. येशू पेत्राला म्हणाला, “तुम्हा लोकांस माझ्याबरोबर एखादा तासही जागे राहता येत नाही काय? 41तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागे राहा आणि प्रार्थना करीत राहा. आत्मा खरोखर उत्सुक आहे खरा पण देह अशक्त आहे.” 42नंतर दुसऱ्यांदा जाऊन येशू प्रार्थना करू लागला, “हे माझ्या पित्या, जर दुःखाचा हा प्याला मी प्याल्याशिवाय टळून जात नाही तर तुझी इच्छा असेल तसे होवो.” 43नंतर येशू शिष्यांकडे परत गेला तेव्हा त्यास आढळून आले की, त्यांचे डोळे जड झाले होते व ते झोपी गेले आहेत कारण जागे राहणे त्यांना शक्य होत नव्हते. 44नंतर येशू शिष्यांना पुन्हा सोडून तसाच पुढे गेला आणि तिसऱ्या वेळी प्रार्थना करताना त्याने पुन्हा तेच शब्द बोलून प्रार्थना केली. 45यानंतर येशू परत शिष्याकडे गेला आणि त्यांना म्हणाला, “तुम्ही अजून झोप आणि विसावाच घेत आहात का? पाहा! मनुष्याचा पुत्र पापी लोकांच्या हाती धरून दिला जात आहे. 46उठा, चला. पाहा, मला धरून देणारा जवळ आला आहे.” 47येशू हे बोलत असतानाच बारा जणांपैकी एक जो यहूदा, तो तेथे आला. त्याच्याबरोबर बरेच लोक होते. मुख्य याजक लोक आणि वडीलजन यांनी त्यांना पाठवले होते. ते लोक तलवारी व सोटे घेऊन आले होते. 48आणि त्यास धरून देणार्‍याने त्यांना खूण देऊन म्हणले होते की, मी ज्याचे चुंबन घेईन तोच तो आहे, त्यास तुम्ही धरा, 49मग यहूदा येशूकडे गेला आणि म्हणाला, “रब्बी,” आणि यहूदाने येशूचे चुंबन घेतले. 50येशू त्यास म्हणाला, “मित्रा, जे करण्यास आलास ते कर.” मग ते येशूकडे आले. त्यांनी येशूवर हात टाकले व त्यास धरले. 51हे झाल्यावर येशूबरोबर असलेल्या एका अनुयायाने तलवारीला हात घातला आणि ती उपसली. त्याने महायाजकाच्या सेवकाचा कान कापला. 52येशू त्या मनुष्यास म्हणाला, “तू आपली तलवार म्यानात ठेव. जे तलवारीचा वापर करतात ते तलवारीनेच मरतात. 53मी माझ्या पित्याला सांगितले तर तो देवदूतांच्या सहा हजार सैन्याची एक अशा बारा पेक्षा अधिक पलटणी पाठवील, हे तुम्हास कळत नाही काय? 54परंतु हे अशाच रीतीने झाले पाहिजे असा जो शास्त्रलेख आहे तो कसा काय पूर्ण होईल?” 55यानंतर येशू सर्व लोकसमुदायाला म्हणाला, “जसा मी कोणी गुन्हेगार आहे, अशा रीतीने तुम्ही तलवारी व सोटे हाती घेऊन मला धरायला माझ्यावर चाल करून आला काय? मी दररोज परमेश्वराच्या भवनात शिक्षण देत असता तुम्ही मला धरले नाही. 56परंतु या सर्व गोष्टी अशासाठी झाल्या आहेत की, संदेष्ट्यांनी जे लिहिले होते ते पूर्ण व्हावे.” नंतर येशूचे सर्व शिष्य त्यास सोडून पळून गेले. 57त्या लोकांनी येशूला धरले, त्यांनी त्यास महायाजक कयफा याच्या घरी नेले. तेथे नियमशास्त्राचे शिक्षक आणि वडीलजन एकत्र जमले होते. 58पेत्र काही अंतर ठेवून येशूच्या मागे चालला होता. पेत्र येशूच्या मागे महायाजकाच्या आवारापर्यंत गेला आणि जाऊन शेकत बसला, काय होते ते पाहण्यासाठी कामदारांसोबत बसला. 59येशूला मरणदंड द्यावा म्हणून मुख्य याजक लोक आणि सर्व यहूदी अधिकारी सभा त्याच्याविरुध्द काही खोटे दोषारोप करता येईल काय याचा प्रयत्न करू लागले. खोटी साक्ष देणारे लोक सापडतात काय याचा शोध घेऊ लागले. 60पुष्कळ खोटे साक्षीपुढे आले आणि येशूविरूद्ध साक्ष देऊ लागले. परंतु येशूला जिवे मारण्याचे काहीही कारण यहूदी सभेला सापडेना. शेवटी दोन माणसे पुढे आली, ती म्हणू लागली, 61“हा मनुष्य असे म्हणाला की, देवाचे भवन मी पाडू शकतो आणि ते तीन दिवसात पुन्हा बांधू शकतो.” 62तेव्हा महायाजक उठून येशूला म्हणाला, “हे लोक तुझ्याविरुद्ध साक्ष देत आहेत, तुझ्यविरूद्ध जे आरोप आहेत, त्याविषयी तुला काही सांगायचे आहे का? हे सर्व खरे सांगत आहेत काय?” 63पण येशूने काहीच उत्तर दिले नाही. परत एकदा महायाजक येशूला म्हणाला, “जिवंत देवाच्या नावाची शपथ. मी तुला बजावून सांगतो की खरे काय ते तू सांग! तू देवाचा पुत्र ख्रिस्त आहेस काय?” 64येशू त्यांना म्हणाला, “होय, मी आहे. जसे तू म्हणालास. तरी मी तुम्हास सांगतोः यापुढे मनुष्याच्या पुत्राला तुम्ही सामर्थ्याच्या उजवीकडे बसलेले व आकाशातून येताना पाहाल.” 65जेव्हा महायाजकाने हे ऐकले, तेव्हा तो फार संतापला. आपले कपडे फाडून तो म्हणाला, “याने देवाविरूद्ध निंदा केली आहे! आम्हास आणखी साक्षीदारांची गरज राहिली नाही. याला देवाची निंदा करताना तुम्ही ऐकले! 66तुम्हास काय वाटते?” यहूद्यांनी उत्तर दिले, “तो अपराधी आहे आणि त्यास मरण पावलेच पाहिजे.” 67तेव्हा ते त्याच्यावर थुंकले, त्यांनी त्यास मारले. दुसऱ्यांनी चपराका मारल्या. 68ते म्हणाले, “ख्रिस्ता आमच्यासाठी भविष्य सांग! तुला कोणी मारले?” 69यावेळी पेत्र वाड्याच्या अंगणात बसला होता. महायाजकाच्या दासीपैकी एक दासी पेत्राकडे आली. ती म्हणाली, “तू सुद्धा गालील प्रांताच्या येशूबरोबर होतास.” 70पण पेत्राने सर्वांसमोर ते नाकारले. तो म्हणाला, “तू काय म्हणतेस ते मला माहीत नाही.” 71मग तो अंगणातून निघून फाटकापाशी गेला. फाटकाजवळ दुसऱ्या एका दासीने त्यास पाहिले. ती तेथे असलेल्या लोकांस म्हणाली, “नासरेथकर येशूबरोबर हा होता.” 72पुन्हा एकदा पेत्र शपथ घेऊन येशूला नाकारून, म्हणाला, “मी त्यास ओळखत नाही!” 73काही क्षणानंतर तेथे असलेले लोक पेत्राकडे वळाले आणि त्यास म्हणाले, “तू खरोखर येशूच्या शिष्यांपैकी एक आहेस, हे आम्हास माहीत आहे, तुझ्या बोलण्यावरून हे आम्हास स्पष्ट दिसून येते.” 74मग तो स्वतःला शाप देऊ लागला. तो जोराने म्हणाला, “मी देवाशपथ सांगतो, येशू हा मनुष्य कोण आहे हे मला माहीत नाही!” पेत्र असे म्हणाला तोच कोंबडा आरवला. 75नंतर येशू काय म्हणाला होता हे पेत्राला आठवले, “कोंबडा आरवण्यापूर्वी तू मला तीन वेळा नाकारशील.” यानंतर पेत्र तेथून बाहेर निघून गेला आणि मोठ्या दुःखाने रडला. 27:1जेव्हा सकाळ झाली तेव्हा सर्व मुख्य याजक लोक व वडीलजन यांनी येशूविरूद्ध कट केला आणि कशा प्रकारे येशूला ठार मारायचे याचा विचार केला. 2त्यांनी येशूला साखळदंडानी बांधून दूर नेले व शाषक पिलाताच्या स्वाधीन केले.

शुभवर्तमान (पाय धुण्याच्या वेळी)

योहा 13:1–11

1आता, वल्हांडण सणाअगोदर असे झाले की, येशूने आता या जगांतून पित्याकडे निघून जाण्याची वेळ आली आहे, हे जाणून, या जगातील स्वकीयांवर त्याची जी प्रीती होती, ती त्याने शेवटपर्यंत केली. 2शिमोनाचा पुत्र यहूदा इस्कार्योत याच्या मनात येशूला विश्वासघाताने शत्रूच्या हाती द्यावे असे सैतानाने आधीच घातले होते. 3येशू जाणत होता की, पित्याने त्याच्या हातात सर्व दिले होते आणि तो देवाकडून आला होता व देवाकडे जात होता; 4येशू भोजनावरून उठला, त्याने आपली बाह्यवस्त्रे एकीकडे ठेवली आणि एक कापड घेऊन आपल्या कमरेला बांधला. 5त्यानंतर येशू एका गंगाळात पाणी ओतून आणि तो शिष्यांचे पाय धुऊ लागला व कमरेला बांधलेल्या कापडाने पुसू लागला. 6मग तो शिमोन पेत्राकडे आला, तेव्हा तो त्यास म्हणाला, “प्रभूजी, आपण माझे पाय धुता काय?” 7येशूने त्यास उत्तर दिले, “मी काय करतो ते तुला आता कळत नाही, पण ते तुला पुढे कळेल.” 8पेत्र त्यास म्हणाला, “तुम्हास माझे पाय कधीही धुवावयाचे नाहीत.” येशूने त्यास उत्तर दिले, “मी तुला धुतले नाही, तर तुला माझ्याबरोबर वाटा नाही.” 9शिमोन पेत्र त्यास म्हणाला, “प्रभूजी, माझे केवळ पायच धुऊ नका, तर हात आणि डोकेही धुवा.” 10येशूने त्यास म्हटले, “ज्याचे स्नान झाले आहे त्यास पायांशिवाय दुसरे काही धुवायची गरज नाही, तर तो सर्वांगी शुद्ध आहे; तुम्ही शुद्ध आहा, पण सगळे जण नाही.” 11कारण आपणाला विश्वासघाताने शत्रूच्या हाती कोण धरून देणार आहे हे त्यास ठाऊक होते, म्हणून तो म्हणाला, “तुम्ही सगळे जण शुद्ध नाही.”

शुभवर्तमान (पाय धुतल्यानंतर)

योहा 13:12–17

12मग त्याने त्यांचे पाय धुतल्यावर आपली बाह्यवस्त्रे घालून व तो पुन्हा खाली बसल्यावर त्यांना म्हणाला, “मी तुम्हास काय केले ते तुम्हास समजले काय? 13तुम्ही मला ‘गुरू’ आणि ‘प्रभू’ म्हणता आणि ते ठीक म्हणता, कारण मी तसाच आहे. 14मग मी जर तुमचा प्रभू आणि गुरू असता तुमचे पाय धुतले तर तुम्हीपण एकमेकांचे पाय धुवावेत. 15कारण मी तुम्हास केले तसे तुम्हीही करावे म्हणून मी तुम्हास उदाहरण दिले आहे. 16मी तुम्हास खरे खरे सांगतो, दास आपल्या धन्यापेक्षा मोठा नाही; आणि पाठवलेला पाठवणाऱ्यापेक्षा मोठा नाही. 17या गोष्टी तुम्हास समजतात तर त्याप्रमाणे वागल्याने तर तुम्ही धन्य आहात.

तारखा रशियन मंडळीच्या ज्युलियन दिनदर्शिकेनुसार आहेत (सर्बियन आणि जॉर्जियन मंडळ्या आणि आथोस पर्वत यांच्याप्रमाणे): मंडळीच्या दिनदर्शिकेतील 16 एप्रिल म्हणजे नागरी दिनदर्शिकेतील 29 एप्रिल. नवी दिनदर्शिका पाळणाऱ्या मंडळ्या (ग्रीस, रोमानिया, बल्गेरिया, युक्रेन…) ठरावीक तारखेचे सण आणि संत त्याच नागरी तारखेला, 13 दिवस आधी, पाळतात, आणि त्यांचे काही पाठ वेगळे आहेत; ईस्टर आणि त्यावर अवलंबून असलेले दिवस सारखेच आहेत.

स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क