Bible Explorer अ‍ॅप मिळवा

बायबल › यिर्मया › 11

IRV · अध्याय 11 / 52

यिर्मया 11

1यिर्मयाला परमेश्वराकडून मिळालेले वचन, ते म्हणाले:

2“यिर्मया, या कराराची वचने ऐक, आणि यहूदाच्या प्रत्येक मनुष्यास आणि यरूशलेममध्ये राहणाऱ्या हे घोषीत कर.

3त्यांना असे सांग की, परमेश्वर, इस्राएलचा देव असे म्हणतो ‘जो कोणी या कराराची वचने ऐकत नाही, तो शापित असो.’

4तुमच्या पूर्वजांना मिसर देशातून, लोखंडाच्या भट्टीतून बाहेर काढून आणले, त्यावेळी मी त्यांना हा करार आज्ञापिला आणि ही वचने आचरनात आणा, तर तुम्ही माझे व्हाल व मी तुमचा देव होईन.

5तुमच्या पूर्वजांना दिलेल्या वचनाकरिता मी हे करीन, दूध व मध यांची रेलचेल असलेली सुपीक भूमी द्यायचे मी त्यांना कबूल केले होते. त्याच भूमीवर तुम्ही आता राहत आहात.” तेव्हा मी म्हणालो होय, परमेश्वरा!

6परमेश्वर मला म्हणाला, “यहूदाच्या शहरांतून व यरूशलेमेच्या रस्त्यांतून हे वचन घोषीत कर, कराराची वचने ऐका आणि त्यांचे पालन करा.

7कारण मी त्यांना मिसरच्या बाहेर काढले त्या दिवसापासून या दिवसापर्यंत मी तुमच्या पूर्वजांना इशारा देत आलो आहे की माझा शब्द ऐका.

8पण त्यांनी माझे ऐकले नाही आणि लक्ष दिले नाही. ते दुराग्रही हृदयाचे बनले आणि आवडेल तेच त्यांनी केले. म्हणून मी त्यांना माझ्या आज्ञा पाळण्यास सांगितले, पण त्यांनी ते ऐकले नाही, म्हणून करारात उल्लेखलेल्या सर्व शापित गोष्टी मला त्यांच्याबाबत कराव्या लागल्या.”

9नंतर परमेश्वर मला म्हणाला, “यहूदातील आणि यरूशलेममधील लोकांमध्ये कट सापडला आहे.

10ते त्यांच्या पूर्वजांनी केलेल्या पापांकडे वळले आहेत. त्यांच्या पूर्वजांनी माझे ऐकण्याचे नाकारले. त्यांनी दुसऱ्या देवांचे अनुसरण केले. त्यांची पूजा केली. इस्राएल व यहूदाच्या वंशजांनी, त्यांच्या पूर्वजांनी माझ्याशी केलेल्या, कराराचा भंग केला आहे.”

11म्हणून परमेश्वर म्हणतो, मी त्यांना भयंकर संकटात टाकीन, ज्यातून त्यांना सुटका करून घेता येणार नाही. तेव्हा ते मदतीसाठी माझा धावा करतील, पण मी त्यांचे ऐकणार नाही.

12यहूदातील शहरे व यरूशलेममधील रहिवासी ज्यांना ते अर्पणे देत असत, आणि धूप जाळीत असत, असे ते त्यांच्या देवांकडे आरोळी करतील, पण त्या भयंकर संकटकाळी लोकांस मदत करणे त्या मूर्तीना शक्य होणार नाही.

13कारण यहूदा तुझ्या नगरा इतकेच तुझे देव झाले आहेत, आणि तू लज्जास्पद बाल देवाच्या वेद्या, बाल देवाच्या धूप वेद्या, यरूशलेमामधल्या रस्त्यांच्या संख्येइतक्याच केल्या आहेत.

14यिर्मया, तू या लोकांसाठी प्रार्थना करु नकोस आणि त्यांच्यासाठी विनंती करु नकोस. कारण जेव्हा ते दु:खात माझा धावा करतील, तेव्हा मी त्यांचे ऐकणार नाही.

15“माझ्या प्रिय लोकांनी, ज्यांनी इतके दुष्ट हेतू धरले आहेत, ते माझ्या घरात का आहेत? कारण तुझ्या अर्पणाचे मांस तुझा बचाव करु शकणार नाही, कारण तू वाईट केले आणि नंतर आनंद केला.”

16“दिसावयास देखणे असणाऱ्या हिरव्यागार फळाचे जैतूनाचे झाड असे नाव परमेश्वराने तुला दिले होते. पण आता मोठ्या गर्जनेच्या आवाजासहित त्याने त्यावर अग्नी पेटवला आहे. आणि त्याच्या फांद्या तोडल्या आहेत.

17कारण सेनाधीश परमेश्वर, ज्याने तुला लावले आहे, तो तुझ्या विरूद्ध अरिष्ट बोलला आहे. कारण इस्राएल आणि यहूदाच्या लोकांनी कुकर्मे केली. त्यांनी ‘बाल’ देवाला यज्ञ अर्पण केले म्हणून मला राग आला.”

18परमेश्वराने मला या गोष्टींचे ज्ञान दिले. म्हणून मला त्या समजल्या. परमेश्वरा, तू मला त्यांची कृत्ये दाखवली.

19ते माझ्याविरूद्ध योजना आखत आहेत हे मला माहीत नव्हते. मी कत्तल होण्याची वाट पाहणाऱ्या गरीब कोकरासारखा होतो. “आपण या झाडाचा आणि त्याच्या फळांचा नाश करु. आपण त्यास जीवंताच्या देशातून तोडून टाकू म्हणजे त्याचे नाव आठवणीत राहणार नाही.”

20पण सेनाधीश परमेश्वर, जो तू सत्याने न्याय करतोस, जो तू हृदय व मन पारखतोस. तू त्यांच्यावर केलेला प्रतिकार मी साक्ष देईन, कारण मी आपला वाद तुझ्याजवळ उघड केला आहे.

21अनाथोथच्या लोकांबद्दल परमेश्वर या गोष्टी म्हणतो, जे तुझा जीव घेण्यास पाहत आहेत. ते म्हणातात, “परमेश्वराच्या नावावर भविष्यकथन करु नकोस, नाहीतर आम्ही तुला आमच्या हाताने ठार करु.”

22यास्तव सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, पाहा! “त्यांना मी शिक्षा करीन. त्यांचे तरुण तलवारीने मरण पावतील. त्यांची मुले आणि त्यांच्या मुली दुष्काळाने मरतील.

23त्यांच्यातील एकही मनुष्य शिल्लक राहणार नाही. कारण मी अनाथोथच्या लोकांवर वाईट, म्हणजे त्यांच्या शासनाचे वर्ष आणतो.”

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRV, 2019) · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. (मजकूर बदललेला नाही; तळटीपा आणि शीर्षके वगळली आहेत) · eBible.org