मुख्यपृष्ठ › दैनंदिन बायबल पाठ › एप्रिल 2027 › 28 एप्रिल
ऑर्थोडॉक्स दिनदर्शिका · 15 एप्रिल (जुनी पद्धत)
ऑर्थोडॉक्स दैनंदिन पाठ — 28 एप्रिल 2027
बुधवार · पवित्र आठवडा
सण आणि संत
महान आणि पवित्र बुधवार
महान लेंत
कडक उपवास (कोरडे अन्न: भाकर, भाज्या, फळे)
हे मठाच्या नियमानुसार आहे. पॅरिशमध्ये उपवासाचे प्रमाण आपल्या पापकबुलीच्या धर्मगुरूसोबत, आरोग्य, वय आणि परिस्थितीनुसार ठरवले जाते.
दिवसाची वाचने
शुभवर्तमान (वराची प्रातःप्रार्थना)
17त्याने लाजराला कबरेतून बोलावून मरण पावलेल्यातून उठवले, त्यावेळेस जो लोकसमुदाय त्याच्याबरोबर होता त्यांने त्याच्याविषयी साक्ष दिली. 18त्याने हे चिन्ह केले होते असे त्यांनी ऐकले म्हणूनही लोक त्यास भेटावयास गेले. 19मग परूशी एकमेकांस म्हणाले, “तुमचे काहीच चालत नाही, हे तुम्ही पाहता; पाहा, जग त्याच्यामागे चालले आहे.” 20सणांत उपासना करावयास आलेल्या लोकांपैकी काही लोक ग्रीक होते. 21त्यांनी गालील प्रांतातील बेथसैदाकर फिलिप्प याच्याजवळ येऊन विनंती केली की, “साहेब, येशूला भेटावे अशी आमची इच्छा आहे.” 22फिलिप्पाने येऊन अंद्रियाला सांगितले; अंद्रिया व फिलिप्प यांनी येऊन येशूला सांगितले. 23येशूने त्यांना म्हटले, “मनुष्याच्या पुत्राचे गौरव होण्याची वेळ आली आहे. 24मी तुम्हास खरे खरे सांगतो, गव्हाचा दाणा जमिनीत पडून मरण पावला नाही, तर तो एकटाच राहतो; आणि मरण पावला तर तो पुष्कळ पीक देतो. 25जो आपल्या जीवावर प्रीती करतो तो त्यास मुकेल आणि जो या जगांत आपल्या जीवाचा द्वेष करतो तो त्याचे सार्वकालिक जीवनासाठी रक्षण करील. 26जर कोणी माझी सेवा करतो तर त्याने मला अनुसरावे, म्हणजे जेथे मी आहे तेथे माझा सेवकही असेल. जर कोणी माझी सेवा करतो तर पिता त्यास मान करील. 27आता माझा जीव अस्वस्थ होत आहे आणि मी काय बोलू? हे पित्या, तू या घटकेपासून माझे रक्षण कर. पण मी या कारणासाठीच या घटकेत आलो आहे. 28हे पित्या, तू आपल्या नावाचे गौरव कर” तेव्हा आकाशवाणी झाली, “मी ते गौरविले आहे आणि पुन्हाही गौरवीन.” 29तेव्हा जे लोक सभोवती उभे होते आणि ज्यांनी हे ऐकले ते म्हणाले, “मेघगर्जना झाली.” दुसरे म्हणाले, “त्याच्याशी देवदूत बोलला.” 30येशूने त्यांना उत्तर देऊन म्हटले, “ही वाणी माझ्यासाठी झाली नाही तर तुमच्यासाठी झाली आहे. 31आता या जगाचा न्याय होतो, आता या जगाचा शासक बाहेर टाकला जाईल. 32आणि मला जर पृथ्वीपासून उंच केले तर मी सर्वांना माझ्याकडे आकर्षून घेईन.” 33तो तर आपण कोणत्या मरणाने मरणार पाहिजे हे सुचविण्याकरिता हे बोलला. 34लोकांनी त्यास विचारले, ख्रिस्त सर्वकाळ राहील असे आम्ही नियमशास्त्रांतून ऐकले आहे, तर “मनुष्याच्या पुत्राला उंच केले पाहिजे” असे आपण कसे म्हणता? हा मनुष्याचा पुत्र आहे तरी कोण? 35यावरुन येशू त्यांना म्हणाला, “आणखी थोडा वेळ तुमच्याबरोबर प्रकाश आहे; तुम्हास प्रकाश आहे तोपर्यंत चाला; यासाठी कि अंधकाराने तुम्हास गाठू नये; कारण जो अंधकारात चालतो त्यास आपण कोठे जातो हे कळत नाही. 36तुम्ही प्रकाशाचे पुत्र व्हावे म्हणून तुम्हाजवळ प्रकाश आहे तोपर्यंत प्रकाशावर विश्वास ठेवा.” येशू या गोष्टी बोलला आणि तेथून निघून जाऊन त्यांच्यापासून गुप्त राहिला. 37त्याने त्यांच्यासमोर इतकी चिन्हे केली असतांही त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही; 38हे यासाठी झाले की, यशया संदेष्ट्याने जे वचन सांगितले होते ते पूर्ण व्हावे, ते असेः “प्रभू, आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला आहे? परमेश्वराचा भूज कोणास प्रकट झाला आहे?” 39म्हणून त्यांना विश्वास ठेवता आला नाही; या कारणाने यशया पुन्हा म्हणाला, 40“त्यांनी डोळ्यांनी पाहू नये, अंतःकरणाने समजू नये, वळू नये व मी त्यांना बरे करू नये म्हणून त्याने त्यांचे डोळे आंधळे केले व अंतःकरण कठीण केले आहे.” 41यशयाने त्याचे गौरव पाहिले म्हणून त्याने या गोष्टी सांगितल्या आणि तो त्याच्याविषयी बोलला. 42तरी यहूदी अधिकार्यांतूनही पुष्कळांनी त्याच्यावर विश्वास ठेवला, परंतु आपणांस सभास्थानाच्या बाहेर घालवू नये म्हणून परूश्यांमुळे ते तसे कबूल करीत नव्हते. 43कारण त्यांना देवाकडील गौरवापेक्षा मनुष्याकडील गौरव अधिक प्रिय वाटले. 44आणि येशू मोठ्याने म्हणाला, “जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो माझ्यावर नाही, तर ज्याने मला पाठवले त्याच्यावर विश्वास ठेवतो. 45आणि जो मला पाहतो तो ज्याने मला पाठवले त्यास पाहतो. 46जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो त्याने अंधकारात राहू नये म्हणून मी जगात प्रकाश असा आलो आहे. 47कोणी जर माझी वचने ऐकतो पण ती पाळीत नाही, त्याचा न्याय मी करीत नाही; कारण मी जगाचा न्याय करण्यासाठी नव्हे, तर मी जगाचे तारण करायला आलो आहे. 48जो माझा अवमान करतो आणि माझी वचने स्वीकारीत नाही त्याचा न्याय करणारे कोणी आहे. जे वचन मी सांगितले, तेच शेवटल्या दिवशी, त्याचा न्याय करील. 49कारण मी आपल्या मनाचे बोललो नाही, तर मी काय सांगावे आणि काय बोलावे याविषयी ज्या पित्याने मला पाठवले त्यानेच मला आज्ञा दिली आहे. 50त्याची आज्ञा सार्वकालिक जीवन आहे. हे मला ठाऊक आहे. म्हणून जे काही मी बोलतो ते पित्याने मला सांगितल्याप्रमाणे बोलतो.”
सहावा तास
3इस्राएलाच्या लोकांजवळ मानवाच्या मुला, मी तुला पाठवत आहे ती वाणी मला म्हणाली. बंडखोर देशाजवळ ज्या राष्ट्रांनी माझ्याशी बंड केले, पहिल्यापासून त्यांनी आणि त्यांच्या पुर्वीच्या पिढ्यांनी माझ्या विरुध्द पाप केले आहे. 4त्यांच्या पूर्व पिढीचे लोक हट्टी आणि कठीण मनाचे होते, मी तुला त्यांच्या जवळ पाठवत आहे. आणि हे परमेश्वर देव त्यांच्याशी बोलत आहे. असे त्यांना तू सांग. 5ते तुझे ऐकतील किंवा ऐकणार नाही, ते फितुर झालेले आहेत. परंतू संदेष्टा त्यांच्याकडे आला होता असे त्यांना कदाचित कळून येईल. 6त्यांच्या भोवती काटे विंचवांना व त्यांच्या शब्दांना मानवाच्या मुला भयभीत होऊ नको; त्यांच्या तोंडाकडे बघून तू गोंधळून जाऊ नको; पहील्यापासून ते फितुर आहेत. 7पण तू माझा शब्द त्यांना सांग; ते तुझे ऐको किंवा न ऐको कारण ते फार फितुर आहेत. 8परंतू मी जे तुला मानवाच्या मुला बोलायला सांगत आहे ते ऐक त्या फितुर जातीच्या लोकांसारखे फितुर होऊ नको. आपले तोंड उघड आणि मी देतो ते खा! 9माझ्याकडे एक हात येत आहे असे मी पाहिले; आणि पाहा, पुस्तकाची एक गुंडाळी त्यामध्ये होती. 10तो माझ्या पुढे लांबवर पसरत आला; त्यांच्या मागे पुढे दुःख, आकांताचा लेख लिहिलेला होता. 3:1तो मला म्हणाला, “मानवाच्या मुला, जो ग्रंथ तुला प्राप्त झाला आहे तो ग्रंथ तू खाऊन टाक! आणि जा इस्राएलाच्या घराण्याशी बोल.” 2म्हणून तेव्हा मी आपले तोंड उघडले व त्याने मला तो ग्रंथ खाऊ घातला. 3तो मला म्हणाला, “मानवाच्या मुला, मी तुला दिलेल्या ग्रंथपटाने आपले पोट भरुन टाक!” मग मी ते खाल्ले, आणि ते माझ्या तोंडाला मधासारखे गोड वाटले.
संध्याप्रार्थना: वाचन
11काही दिवसानी असे झाले की, मोशे मोठा झाल्यावर आपल्या लोकांकडे गेला आणि त्याने त्यांची कष्टाची कामे पहिली. कोणी एक मिसरी आपल्या इब्री मनुष्यास मारत असताना त्याने पाहिले. 12तेव्हा आपल्याकडे पाहणारा आजूबाजूला कोणीही नाही हे जाणून मोशेने त्या मिसराच्या मनुष्यास जिवे मारले व वाळूत पुरून टाकले. 13दुसऱ्या दिवशी तो बाहेर गेला, तेव्हा पाहा दोन इब्री माणसे मारामारी करत होती. त्यांच्यामध्ये जो दोषी होता त्यास तो म्हणाला, “तू आपल्या सोबत्याला का मारत आहेस?” 14पण त्या मनुष्याने उत्तर दिले, “तुला आम्हांवर अधिकारी व न्यायाधीश कोणी नेमले? तू काल जसे त्या मिसऱ्यास जिवे मारलेस, तसे मला मारायला पाहतोस का?” तेव्हा मोशे घाबरला. तो विचार करीत स्वत:शीच म्हणाला, “मी काय केले ते आता खचीत सर्वांना माहीत झाले आहे.” 15आणि फारोने याविषयी ऐकले तेव्हा त्याने मोशेला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. परंतु मोशे फारोपासून दूर पळून गेला. तो मिद्यान देशात गेला आणि तेथे एका विहिरीजवळ बसला. 16मिद्यानी याजकाला सात मुली होत्या; आपल्या वडिलाच्या कळपाला पाणी पाजण्यासाठी त्या विहिरीवर आल्या. त्या हौदात पाणी भरत होत्या; 17परंतु काही मेंढपाळांनी त्यांना पाणी भरू न देता हुसकून लावण्याचा प्रयत्न केला. पण मोशेने उठून त्यांना मदत केली. त्याने त्यांच्या कळपाला पाणी पाजले. 18मग त्या मुली आपला बाप रगुवेल याच्याकडे गेल्या; तेव्हा त्यांचा बाप त्यांना म्हणाला, “तुम्ही आज इतक्या लवकर घरी कशा आला आहात?” 19त्या म्हणाल्या, “एका मिसरी मनुष्याने आम्हांला मेंढपाळाच्या हातून सोडवले. त्याने आम्हांसाठी पाणी देखील काढून कळपाला पाजले.” 20तेव्हा तो आपल्या मुलींना म्हणाला, “तो कोठे आहे? तुम्ही त्या मनुष्यास का सोडले? त्यास बोलावून आणा म्हणजे तो आपल्याबरोबर भोजन करेल.” 21त्या मनुष्यापाशी राहायला मोशे कबूल झाला. त्याने आपली मुलगी सिप्पोरा हिचा विवाह देखील त्याच्याशी करून दिला. 22तिला एक मुलगा झाला. मोशेने त्याचे नाव गेर्षोम ठेवले, तो म्हणाला, “मी परदेशात वस्ती करून आहे.”
संध्याप्रार्थना: वाचन
1पुन्हा एके दिवशी देवपुत्र परमेश्वरासमोर येऊन उभे राहीले, त्यांच्यामध्ये सैतानही परमेश्वरासमोर हजर झाला होता. 2परमेश्वर सैतानाला म्हणाला, “तू कोठून येत आहेस?” सैतानाने परमेश्वरास उत्तर दिले आणि म्हणाला, “पृथ्वीवर हिंडून फिरून आणि येथून तेथून चालत जाऊन परत आलो आहे.” 3नंतर परमेश्वर सैतानाला म्हणाला, “माझा सेवक ईयोब याच्याकडे तूझे लक्ष गेले का? पृथ्वीवर त्याच्यासारखा कोणीही नाही, तो सात्विक आणि सरळ मनुष्य आहे, तो देवाचे भय धरीतो आणि दुष्ट गोष्टींपासून दूर राहतो. जरी त्याच्याविरुध्द कोणतेही कारण नसतांना त्याचा नाश करण्यास तू मला तयार केले, तरीही त्याने आपली सात्विक्ता अंखड धरून ठेवली आहे.” 4सैतानाने परमेश्वरास उत्तर दिले, आणि म्हटले, “कातडीसाठी कातडी, खरोखर मनुष्य स्वतःच्या जीवासाठी आपले सर्वकाही देईल. 5परंतु जर तू तुझा हात लांब करून त्याच्या हाडांना आणि शरीराला स्पर्श केलास, तर तो तुझ्या तोंडावर तुझा नकार करील.” 6परमेश्वर सैतानाला म्हणाला, “पाहा, तो आता तुझ्या हाती आहे, मात्र त्याचा जीव राखून ठेव.” 7मग सैतान परमेश्वराच्या उपस्थितीतून निघून गेला आणि त्याने ईयोबाला तळपायांपासुन डोक्यापर्यंत वेदनांनी भरलेल्या फोडांनी पीडिले. 8ईयोबाने स्वतःचे अंग खाजविण्यासाठी खापराचा तुकडा घेतला आणि तो राखेत जाऊन बसला. 9नंतर त्याची पत्नी त्यास म्हणाली, “तुम्ही अजूनही तुमची सात्विक्ता धरून ठेवली आहे का? तुम्ही देवाचा त्याग करा आणि मरा,” 10परंतू तो तिला म्हणाला, “तू मूर्ख स्त्रीसारखी बोलत आहेस. देवाच्या हातातून आपण चांगलेच घेतले पाहीजे वाईट नाही काय?” तू असाच विचार करतेस ना? या सर्व बाबतीत ईयोबाने त्याच्या बोलण्याद्बारे पाप केले नाही.
शुभवर्तमान (पूर्वपवित्रित अर्पणांची उपासना)
6तेव्हा येशू बेथानी गावामध्ये शिमोन जो कुष्ठरोगी होता त्याच्या घरात होता. 7येशू तेथे असताना एक स्त्री त्याच्याकडे आली. अतिमौल्यवान सुवासिक तेलाची अलाबास्त्र कुपी तिच्याजवळ होती आणि तो जेवणास टेकून बसला असता तिने ते त्याच्या डोक्यावर ओतले. 8पण त्याच्या शिष्यांनी ते पाहिले, तेव्हा त्यांना राग आला. शिष्य विचारू लागले, असा नाश कश्याला? 9ते पुष्कळ पैशांना विकता आले असते आणि ते पैसे गोरगरिबांना देता आले असते. 10पण येशूला ते काय म्हणत आहेत हे माहीत होते, त्याने त्यांना विचारले, “तुम्ही त्या स्त्रीला का त्रास देत आहात? तिने माझ्यासाठी फार चांगले काम केले आहे. 11गरीब लोक तुमच्याबरोबर नेहमीच असतील पण मी तुमच्याबरोबर नेहमी असणार नाही. 12कारण तिने माझ्या शरीरावर हे सुवासिक तेल ओतले ते मला पुरण्याच्या तयारीसाठी हिने केले. 13मी तुम्हास खरे सांगतो, सर्व जगात जेथे सुवार्ता गाजवली जाईल तेथे तेथे या स्त्रीने जे केले त्याचे वर्णन तिची आठवण म्हणून सांगण्यात येईल.” 14बारा शिष्यांपैकी एक यहूदा इस्कार्योत मुख्य याजकांकडे गेला. 15यहूदा म्हणाला, “मी येशूला धरून तुमच्या हाती दिले तर तुम्ही मला काय द्याल?” तेव्हा त्यांनी त्यास चांदीची तीस नाणी दिली. 16तेव्हापासून यहूदा येशूला धरून देण्याच्या संधीची वाट पाहू लागला.
तारखा रशियन मंडळीच्या ज्युलियन दिनदर्शिकेनुसार आहेत (सर्बियन आणि जॉर्जियन मंडळ्या आणि आथोस पर्वत यांच्याप्रमाणे): मंडळीच्या दिनदर्शिकेतील 15 एप्रिल म्हणजे नागरी दिनदर्शिकेतील 28 एप्रिल. नवी दिनदर्शिका पाळणाऱ्या मंडळ्या (ग्रीस, रोमानिया, बल्गेरिया, युक्रेन…) ठरावीक तारखेचे सण आणि संत त्याच नागरी तारखेला, 13 दिवस आधी, पाळतात, आणि त्यांचे काही पाठ वेगळे आहेत; ईस्टर आणि त्यावर अवलंबून असलेले दिवस सारखेच आहेत.
स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क