Bible Explorer अ‍ॅप मिळवा

मुख्यपृष्ठ › दैनंदिन बायबल पाठ › मार्च 2027 › 26 मार्च

कॅथलिक दिनदर्शिका

दैनंदिन बायबल पाठ (कॅथलिक) — 26 मार्च 2027

शुक्रवार · पास्काचे त्रिदिन

सण आणि संत

पवित्र शुक्रवार (गुड फ्रायडे)

पास्काचे त्रिदिन · उपासनेचा रंग: लाल

उपवास आणि प्रायश्चित्त

उपवास आणि मांसत्याग

प्रत्येक शुक्रवार प्रायश्चित्ताचा दिवस आहे; तो कसा पाळायचा ते प्रत्येक बिशप परिषद ठरवते: मांसत्याग किंवा प्रायश्चित्ताचे दुसरे एखादे कृत्य. उपवास 18 ते 59 वयासाठी बंधनकारक आहे, मांसत्याग 14 वर्षांपासून.

दिवसाची वाचने

पहिले वाचन

यश 52:13–53:12

13माझ्या सेवकाकडे पाहा. तो सुज्ञपणे व्यवहार करणार आणि यशस्वी होणार. तो उंचावला जाईल आणि उंच व थोर होईल. 14“माझ्या सेवकाला पाहून खूप लोकांस धक्का बसला. त्याचे रुप कोणाही मनुष्यापेक्षा बिघडलेले होते, म्हणून त्याचे रुप दुसऱ्या मनुष्यांपेक्षा फार वेगळे होते. 15तो पुष्कळ राष्ट्रांस शिंपडील, त्याच्याकडे पाहून राजे आपली तोंडे बंद करतील, कारण जे त्यांना सांगितले नव्हते ते पाहतील, आणि जे त्यांनी ऐकले नव्हते ते समजतील.” 53:1आम्ही जे ऐकले त्यावर कोणी विश्वास ठेवला आहे? आणि परमेश्वराचा भुज कोणास प्रगट झाला आहे? 2कारण तो एखाद्या रोपट्याप्रमाणे परमेश्वरासमोर वाढला आणि शुष्क भूमीवर अंकुराप्रमाणे वाढला; त्याच्यात उल्लेखनीय रुप किंवा सौंदर्य नव्हते. जेव्हा आम्ही त्यास पाहीले, आम्हास आकर्षित करून घेईल अशी सुंदरता त्याच्यात नव्हती. 3लोकांनी तुच्छ मानलेला आणि नाकारलेला; दुःखी आणि यातनेशी परिचित तो मनुष्य होता. ज्याच्यापासून लोक आपले तोंड लपवत, असा तो तुच्छ होता; आणि आम्ही त्यास किरकोळ मानले. 4पण खरोखर त्याने आमचे विकार आणि आमचे दुःख आपल्यावर घेऊन वाहिले; तरी आम्ही देवाने त्यास शिक्षा केलेली, देवाने त्यास हाणलेला आणि पीडलेला असा आम्ही विचार केला. 5पण आमच्या बंडखोर कृत्यांच्या कारणांमुळे तो भोसकला गेला; आमच्या अपराधांमुळे तो चिरडला गेला. आमच्या शांतीसाठी त्याच्यावर शिक्षा आली, त्याच्या जखमांनी आम्हास आरोग्य मिळाले. 6पण आम्ही मेंढराप्रमाणे बहकून दूर गेलो होतो; आम्ही सर्व आपापल्या मार्गात फिरलो होतो, आणि परमेश्वराने आमचे सर्व अपराध त्याच्यावर ठेवले. 7त्याच्यावर अत्याचार झाले; तरी जेव्हा त्याने आपल्या स्वतःला नम्र केले तेव्हा त्याने आपले तोंडही उघडले नाही; जसे कोकरू कापणाऱ्यापुढे आणि मेंढी लोकर कातणाऱ्यासमोर शांत राहते, तसे त्याने आपले तोंड उघडले नाही. 8बळजबरी करून आणि निवाडा करून त्यास दोषी ठरवून, पण त्यास जिवंतांच्या भूमीतून काढून नेले; कारण माझ्या लोकांच्या अपराधांमुळे त्याच्यावर दंड ठेवण्यात आला. त्या पिढीपासून कोणी त्याच्याबद्दल असा विचार केला काय? 9त्याची कबर दुष्टांबरोबर करण्याचा त्यांचा बेत होता, त्याच्या मृत्यूनंतर त्यास श्रीमंताबरोबर पुरले. तरी त्याने काही हिंसा केली नव्हती किंवा त्याच्या मुखात काही कपट नव्हते. 10तरी परमेश्वराची इच्छा होती त्यास जखमी अवस्थेत ठेचावे; जर तुम्ही लोक त्याचे जीवन पापार्पण करता, तो त्याची संतती पाहील, तो आपले दिवस दीर्घ करील आणि परमेश्वराचा उद्देश त्याच्याद्वारे परिपूर्ण होईल. 11तो आपल्या जिवाच्या दुःखसहनानंतर, तो पाहील व त्याच्या आपल्या ज्ञानाने समाधानी होईल. माझा आपला नितीमान सेवक पुष्कळांचा न्याय करील; तो त्यांच्या अन्यायाचा भार आपल्यावर घेईल. 12ह्यामुळेच मी त्यास त्याचा वाटा मोठ्या जमावामध्ये देईल, आणि तो अनेक बिघडलेल्याबरोबर विभागून घेईल, कारण त्याने आपले जीवन मरणापर्यंत उघडे केले आणि तो अपराध्यात गणलेला होता. त्याने बहुतांचे पाप आपल्यावर घेतले आणि अपराध्यांसाठी मध्यस्थी केली.

प्रतिसाद स्तोत्र

स्तोत्र 31:1, 5, 11–12, 14–16, 24

1मुख्य गायकासाठी; दाविदाचे स्तोत्र. हे परमेश्वरा, तुझ्यामध्ये मी आश्रय धरिला आहे, कधीच माझी निराशा होऊ देऊ नकोस. तुझ्या न्यायात मला वाचव. 5मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो, हे परमेश्वरा, सत्याच्या देवा, तू मला खंडून घेतले आहे. 11माझ्या शत्रूंमुळे लोक माझा तिरस्कार करतात माझ्या शेजाऱ्यास माझी परिस्थिती भयावह आहे, आणि जे मला ओखळतात त्यांना मी भय असा झालो आहे. 12मृत पावलेल्या मनुष्यासारखा मी झालो आहे, ज्याची कोणी आठवण करत नाही. मी फुटलेल्या भांड्यासारखा झालो आहे. 14परंतु परमेश्वरा माझा तुझ्यावर विश्वास आहे. तूच माझा देव आहेस, असे मी म्हणतो. 15माझे वेळ तुझ्या हातात आहे. मला माझ्या शत्रूंच्या आणि जे माझा पाठलाग करतात त्यांच्या हातातून सोडव. 16तुझ्या सेवकावर तुझ्या मुखाचा प्रकाश चमकू दे. तुझ्या प्रेमदयेत मला तार. 24जे तुम्ही परमेश्वरावर विश्वास करता, बलवान व धैर्यवान व्हा.

दुसरे वाचन

इब्री 4:14–16; 5:7–9

14म्हणून, ज्याअर्थी आम्हास येशू देवाचा पुत्र हा महान महायाजक लाभला आहे व जो स्वर्गात गेला आहे, असा जो विश्वास आपण गाजवितो तो अखंडपणे भक्कम धरून राहू या. 15कारण आपल्याला लाभलेला महायाजक असा नाही, जो आपल्या अशक्तपणाबद्दल सहानुभूती दर्शवण्यास असमर्थ आहे. पण आपल्याला असा याजक लाभला आहे की, जो आमच्यासारखाच सर्व प्रकारच्या मोहाच्या अनुभवातून गेला. तरीही तो पूर्णपणे पापविरहीत राहिला. 16तर मग आपण देवाच्या कृपेच्या राजासनाजवळ निर्धाराने जाऊ या. यासाठी की, आमच्या गरजेच्या वेळी साहाय्य मिळावे म्हणून आम्हास दया व कृपा प्राप्त व्हावी. 5:7येशूने आपल्या देहाच्या दिवसात देवाकडे मोठ्याने ओरडून आणि रडून प्रार्थना व विनंत्या केल्या. जो देव त्यास मृत्युपासून वाचवू शकत होता आणि देवाविषयीच्या त्याच्या सदभक्तीमुळे येशूच्या प्रार्थना ऐकण्यात आल्या. 8जरी तो देवाचा पुत्र होता, तरी त्याने जे दुःख सोसले त्यापासून तो आज्ञाधारकपणा शिकला. 9आणि नंतर त्यास परिपूर्ण केल्यावर. जे त्याच्या आज्ञा पाळतात त्यांच्यासाठी सार्वकालिक तारणाकर्ता तो झाला

शुभवर्तमान

योहा 18:1–19:42

1हे बोलल्यानंतर येशू आपल्या शिष्यांबरोबर किद्रोन ओहळाच्या पलीकडे गेला. तेथे एक बाग होती; तेथे तो व त्याचे शिष्य गेले. 2ही जागा त्यास धरून देणाऱ्या यहूदालाही माहीत होती कारण येशू पुष्कळ वेळा आपल्या शिष्यांबरोबर तेथे जात असे. 3तेव्हा सैनिकांची तुकडी व मुख्य याजक लोक व परूशी यांच्याकडचे कामदार मिळाल्यावर, दिवे, मशाली व शस्त्रे घेऊन यहूदा तेथे आला. 4येशू आपणावर जे काही येणार हे सर्व जाणून बाहेर आला आणि त्यांना म्हणाला, “तुम्ही कोणाला शोधत आहात?” 5त्यांनी त्यास उत्तर दिले, “नासरेथकर येशूला.” तो त्यांना म्हणाला, “तो मी आहे.” आणि ज्या यहूदाने त्यास धरून दिले देखील त्यांच्याबरोबर उभा होता, 6“तो मीच आहे,” असे म्हणताच ते मागे सरकून जाऊन जमिनीवर पडले. 7मग त्याने त्यांना पुन्हा विचारले, “तुम्ही कोणाला शोधता?” आणि ते म्हणाले, “नासरेथकर येशूला.” 8येशूने उत्तर दिले, “मीच तो आहे; असे मी तुम्हास सांगितले, तुम्ही मला शोधीत असला तर यांना जाऊ द्या.” 9“जे तू मला दिले आहेत त्यांतून मी एकही हरविला नाही,” असे जे वचन तो बोलला होता ते पूर्ण व्हावे म्हणून हे झाले. 10तेव्हा शिमोन पेत्राजवळ तलवार असल्याने त्याने ती उपसली व महायाजकाच्या दासावर चालविली आणि त्याचा उजवा कान कापून टाकला. त्या दासाचे नाव मल्ख होते. 11तेव्हा येशू पेत्राला म्हणाला, “तरवार म्यानात घाल. पित्याने मला जो प्याला दिला आहे तो मी पिऊ नये काय?” 12मग सैनिकांची तुकडी व हजारांचा सरदार आणि यहूद्यांचे अधिकारी हे येशूला धरून बांधले. 13आणि त्यास प्रथम हन्नाकडे नेले कारण, त्या वर्षी महायाजक असलेल्या कयफाचा हा सासरा होता, 14एका मनुष्याने लोकांसाठी मरावे हे फायद्याचे आहे. अशी मसलत यहूद्यास याच कयफाने दिली होती. 15शिमोन पेत्र व दुसरा एक शिष्य येशूच्या मागे मागे चालले; तो शिष्य महायाजकाच्या ओळखीचा होता आणि येशूबरोबर महायाजकाच्या वाड्यात गेला. 16पण पेत्र बाहेर, दाराशी उभा राहिला होता, म्हणून जो दुसरा शिष्य महायाजकाच्या ओळखीचा होता त्याने बाहेर जाऊन व द्वारपालिकेला सांगून पेत्राला आत आणले. 17यावरुन ती तरूण द्वारपालिका होती ती पेत्राला म्हणाली, “तूही या मनुष्याच्या शिष्यांपैकी आहेस काय?” तो म्हणाला, “मी नाही.” 18थंडी असल्यामुळे दास व कामदार कोळशाचा विस्तव पेटवून शेकत उभे राहिले होते आणि पेत्र पण त्यांच्याबरोबर शेकत उभा होता. 19तेव्हा महायाजकाने येशूला त्याच्या शिष्यांविषयी व त्याच्या शिक्षणाविषयी प्रश्न केले. 20येशूने त्यास उत्तर दिले, “मी जगासमोर उघडपणे बोललो आहे, सभास्थानात आणि परमेश्वराच्या भवनात, सर्व यहूदी जमतात, तेथे मी नेहमी शिक्षण दिले आणि गुप्तपणे मी काही बोललो नाही. 21मला का विचारता? मी काय बोलतो ते. ज्यांनी ऐकले आहे त्यांना विचारा. पाहा, मी जे बोललो ते त्यांना माहीत आहे.” 22त्याने असे म्हटल्याबरोबर जवळ उभा राहणारा एक कामदार येशूला चापट मारून म्हणाला, “तू महायाजकाला असे उत्तर देतोस काय?” 23येशूने त्यास उत्तर दिले, “मी वाईट रीतीने बोललो असलो तर कसे वाईट बोललो ते सिद्ध कर; योग्य रीतीने बोललो असलो तर मला का मारतोस?” 24तेव्हा हन्नाने त्यास महायाजक कयफा याच्याकडे बांधलेलेच पाठवले. 25शिमोन पेत्र शेकत उभा राहिला होता; त्यास इतर म्हणाले, “तूही त्याच्या शिष्यांतला आहेस काय?” त्याने नाकारले व म्हटले, “मी नाही.” 26पेत्राने ज्याचा कान कापला होता त्याचा नातलग असलेला, महायाजकाच्या दासांपैकी एक होता, तो त्यास म्हणाला, “मी तुला त्याच्याबरोबर बागेत नाही का पाहिले?” 27पेत्राने पुन्हा नाकारले आणि, लागलाच, कोंबडा आरवला. 28तेव्हा त्यांनी येशूला कयफाकडून सरकारवाड्यांत नेले; तेव्हा सकाळ होती आणि आपण अशुद्ध होऊ नये, पण वल्हांडणाचे भोजन करता यावे म्हणून ते स्वतः सरकारवाड्यांत गेले नाहीत. 29यास्तव पिलात त्यांच्याकडे बाहेर येऊन म्हणाला, “तुम्ही या मनुष्यावर काय आरोप ठेवता?” 30त्यांनी त्यास उत्तर दिले, “तो दुष्कर्मी नसता तर आम्ही त्यास आपल्या हाती दिले नसते.” 31पिलाताने त्यांना म्हटले, “त्याला तुम्हीच आपल्या नियमशास्त्राप्रमाणे त्याचा न्याय करा.” यहूदी अधिकारी त्यास म्हणाले, “आम्हास कोणाचा जीव घेण्याचा अधिकार नाही.” 32आपण कोणत्या मरणाने मरणार हे सुचवितांना येशूने जे वचन सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले. 33म्हणून पिलात पुन्हा सरकारवाड्यांत गेला; आणि त्याने येशूला बोलावून म्हणाला, “तू यहूद्यांचा राजा आहेस काय?” 34येशूने उत्तर दिले, “आपण स्वतः हे म्हणता किंवा दुसर्‍यांनी आपणाला माझ्याविषयी हे सांगितले?” 35पिलाताने उत्तर दिले, “मी यहूदी आहे काय? तुझ्याच लोकांनी आणि मुख्य याजकांनी तुला माझ्या हाती दिले; तू काय केले.” 36येशूने उत्तर दिले, “माझे राज्य या जगाचे नाही. माझे राज्य या जगाचे असते तर यहूद्यांच्या हाती मी दिला जाऊ नये म्हणून माझ्या सेवकांनी लढाई केली असती; पण माझे राज्य येथले नाही.” 37म्हणून पिलात त्यास म्हणाला, “तर तू राजा आहेस काय?” येशूने उत्तर दिले, “मी राजा आहे असे आपण म्हणता. मी यासाठी जन्मलो आहे आणि यासाठी मी जगात आलो आहे. मी सत्याची साक्ष द्यावी. जो कोणी सत्याचा आहे तो माझी वाणी ऐकतो.” 38पिलात त्यास म्हणाला, “सत्य काय आहे?” आणि हे बोलून तो पुन्हा यहूद्यांकडे बाहेर गेला आणि त्यांना म्हणाला, “मला त्याच्यात काही अपराध दिसत नाही. 39पण तुमच्यासाठी वल्हांडण सणांत मी एकाला सोडावे अशी तुमच्यात रीत आहे; तर तुमच्यासाठी मी यहूद्यांच्या राजाला सोडावे अशी तुमची इच्छा आहे काय?” 40तेव्हा पुन्हा ते ओरडून म्हणाले, “ह्याला सोडू नका, तर बरब्बाला सोडा” आता बरब्बा हा एक लुटारू होता. 19:1नंतर पिलाताने येशूला नेऊन फटके मारवले. 2तेव्हा शिपायांनी एक काट्यांचा मुकुट गुंफून त्याच्या डोक्यात घातला आणि त्यास एक जांभळा झगा घातला. 3आणि ते त्याच्यापुढे येऊन म्हणाले, “हे यहूद्यांच्या राजा, तुझा जयजयकार असो!” मग त्यांनी त्यास चापटा मारल्या. 4म्हणून पिलाताने पुन्हा बाहेर येऊन, म्हटले, “पाहा, मला त्याच्यात काही अपराध दिसत नाही, हे तुम्हास समजावे म्हणून मी त्यास तुमच्याकडे बाहेर आणतो.” 5तेव्हा येशू काट्यांचा मुकुट व जांभळा झगा घातलेला बाहेर आला आणि पिलात त्यांना म्हणाला, “पाहा, हा मनुष्य!” 6मुख्य याजक लोक व त्यांचे कामदार त्यास बघून ओरडून म्हणाले, याला “वधस्तंभावर खिळा, वधस्तंभावर खिळा.” पिलात त्यांना म्हणाला, “तुम्हीच त्यास नेऊन, वधस्तंभावर खिळा; कारण मला त्याच्यात काही अपराध दिसत नाही.” 7यहूदी लोकांनी त्यास उत्तर दिले, “आम्हास नियमशास्त्र आहे आणि त्या शास्त्राप्रमाणे हा मरण पावला पाहिजे; कारण याने स्वतःला देवाचा पुत्र केले.” 8पिलात हे बोलणे ऐकून अधिकच भ्याला; 9आणि तो पुन्हा जाऊन व येशूला म्हणाला, “तू कोठला आहेस?” पण येशूने त्यास उत्तर दिले नाही. 10पिलाताने त्यास म्हटले, “माझ्याबरोबर तू बोलत नाहीस काय? तुला सोडण्याचा अधिकार मला आहे आणि तुला वधस्तंभावर खिळण्याचा अधिकार मला आहे हे तुला माहीत नाही काय?” 11येशूने उत्तर दिले, “आपणाला तो अधिकार वरून दिलेला नसता तर माझ्यावर मुळीच चालला नसता, म्हणून ज्याने मला आपल्या हाती दिले त्याचे पाप अधिक आहे.” 12यावरुन पिलाताने त्यास सोडायचा प्रयत्न केला, पण यहूदी ओरडून म्हणाले, “आपण जर याला सोडिले तर आपण कैसराचे मित्र नाही; जो कोणी स्वतःला राजा करतो तो कैसराला नाकारतो.” 13म्हणून पिलाताने हे बोलणे ऐकल्यावर येशूला बाहेर आणले आणि तो फरसबंदी नावाच्या जागी न्यायासनावर बसला. इब्री भाषेत या जागेला गब्बाथा म्हणतात. 14तो वल्हांडणाच्या तयारीचा दिवस होता, तेव्हा सुमारे दुपारचे बारा वाजले होते आणि तो यहूद्यांना म्हणाला, “पाहा, तुमचा राजा!” 15यावरुन ते ओरडले, “ह्याला संपवून टाका, त्यास वधस्तंभावर खिळा.” पिलात त्यांना म्हणाला, “मी तुमच्या राजाला वधस्तंभावर खिळावे काय?” मुख्य याजकांनी उत्तर दिले, “आम्हास कैसराशिवाय राजा नाही.” 16मग, त्याने येशूला वधस्तंभावर खिळण्याकरिता त्यांच्या हाती दिले. 17तेव्हा त्यांनी येशूला आपल्या ताब्यात घेतले आणि तो आपला वधस्तंभ स्वतः वाहत ‘कवटीचे’ स्थान म्हटलेल्या जागी गेला. या जागेला इब्री भाषेत गुलगुथा म्हणतात. 18तेथे त्यांनी त्यास व त्याच्याबरोबर दुसर्‍या दोघांना, एकाला एका बाजूस व दुसऱ्याला दुसऱ्या बाजूस आणि येशूला मध्ये असे वधस्तंभांवर खिळले. 19आणि पिलाताने एक फलक लिहून तो वधस्तंभावर लावला; ‘यहूद्यांचा राजा नासोरी येशू’ असे लिहिले होते. 20येशूला वधस्तंभावर खिळले होते ते ठिकाण नगराच्या जवळ होते. म्हणून पुष्कळ यहूद्यांनी तो फलक वाचला. तो इब्री, रोमी व ग्रीक भाषांत लिहिला होता. 21तेव्हा यहुद्यांचे मुख्य याजक लोक पिलाताला म्हणाले, “यहूद्यांचा राजा असे लिहू नका तर याने म्हणले ‘मी यहूद्यांचा राजा आहे’ असे लिह.” 22पिलाताने उत्तर दिले, “मी लिहिले ते लिहिले.” 23मग शिपायांनी येशूला वधस्तंभावर खिळल्यावर त्याचे कपडे घेतले आणि प्रत्येक शिपायाला एक वाटा असे चार वाटे केले; आणि झगाही घेतला. या झग्याला शिवण नव्हती; तो वरपासून सरळ विणलेला होता. 24म्हणून ते एकमेकांना म्हणाले, “आपण हा फाडू नये; पण तो कोणाला मिळेल हे ठरवण्याकरता चिठ्ठ्या टाकून पाहावे.” हे यासाठी झाले की, ‘त्यांनी माझे कपडे आपसात वाटून घेतले आणि माझ्या झग्यावर त्यांनी चिठ्ठ्या टाकिल्या,’ असा हा शास्त्रलेख पूर्ण व्हावा; म्हणून शिपायांनी या गोष्टी केल्या. 25पण येशूच्या वधस्तंभाजवळ त्याची आई, त्याची मावशी व क्लोपाची पत्नी मरीया आणि मग्दालीया नगराची मरीया या उभ्या होत्या. 26येशूने जेव्हा आपल्या आईला व तो ज्या शिष्यावर त्याची प्रीती होती त्यास जवळ उभे राहिलेले पाहून तेव्हा तो आपल्या आईला म्हणाला, “आई, पाहा, हा तुझा मुलगा.” 27मग तो त्या शिष्याला म्हणाला, “पाहा, ही तुझी आई!” आणि त्या शिष्याने तिला तेव्हापासून आपल्याकडे घेतले. 28मग, आता सर्व पूर्ण झाले आहे, हे जाणून येशूने, शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून, “मला तहान लागली आहे” असे म्हटले. 29तेथे, एक आंब भरून ठेवलेले भांडे होते, म्हणून त्यांनी आंबेने भरलेला एक बोळा एका एजोब झाडाच्या काठीवर बसवून त्याच्या तोंडाला लावला. 30येशूने आंब घेतल्यानंतर म्हटले, “पूर्ण झाले आहे.” आणि आपले मस्तक लववून आपला आत्मा समर्पण केला. 31तो तयारीचा दिवस होता आणि शब्बाथ दिवशी वधस्तंभावर शरीरे राहू नयेत, कारण तो शब्बाथ मोठा दिवस होता म्हणून यहूद्यांनी पिलाताला विनंती केली की, त्यांचे पाय तोडून त्यांना काढून घेऊन जावे. 32तेव्हा शिपाई आल्यावर त्यांनी त्याच्याबरोबर वधस्तंभावर खिळण्यात आलेल्या पहिल्याचे व दुसर्‍याचे पाय तोडले. 33परंतु ते येशूजवळ आल्यावर, तो मरून गेला आहे असे पाहून, त्यांनी त्याचे पाय तोडले नाहीत. 34तरी शिपायांपैकी एकाने भाल्याने त्याच्या कुशीत भोसकले; आणि, लगेच, रक्त व पाणी बाहेर आले. 35आणि ज्याने हे पाहिले त्याने साक्ष दिली आहे त्याची साक्ष खरी आहे व आपण खरे बोलतो हे त्यास ठाऊक आहे यासाठी की, तुम्हीही विश्वास ठेवावा. 36कारण, “त्याचे एकही हाड मोडणार नाही,” हा शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून या गोष्टी झाल्या. 37आणि दुसरा एक शास्त्रलेख पुन्हा म्हणतो, “ज्याला त्यांनी वधिले ते त्याच्याकडे पाहतील.” 38यानंतर, जो अरिमथाईकर योसेफ याने आपल्याला येशूचे शरीर नेता यावे अशी पिलाताला विनंती केली. तो येशूचा शिष्य असून पण यहूद्यांच्या भीतीमुळे गुप्त शिष्य होता, पिलाताने त्यास परवानगी दिल्यावरून त्याने जाऊन येशूचे शरीर नेले. 39आणि, त्याच्याकडे पहिल्याने रात्रीचा आलेला निकदेमही गंधरस व अगरू यांचे सुमारे शंभर मापे मिश्रण घेऊन आला. 40मग त्यांनी येशूचे शरीर घेतले आणि यहूद्यांच्या उत्तरकार्याच्या रीतीप्रमाणे त्यांनी ते सुगंधी मसाल्यांसहित तागाच्या वस्त्रात गुंडाळले. 41त्यास ज्याठिकाणी वधस्तंभावर खिळले होते तेथे एक बाग होती; आणि त्या बागेत एक नवी कबर होती; त्यामध्ये कोणाला कधीही ठेवलेले नव्हते. 42तो यहूद्यांचा तयारीचा दिवस असल्यामुळे व ती कबर जवळ असल्यामुळे, त्यांनी येशूला तेथे ठेवले.

सामान्य रोमन दिनदर्शिका; बिशपांची परिषद काही सण (प्रभूचे प्रकटीकरण, स्वर्गारोहण, ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त) रविवारी हलवू शकते किंवा स्वतःचे सण जोडू शकते. पाठसंग्रह: रविवारचे चक्र B, आठवड्याच्या दिवसांचे वर्ष I.

स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क