Bible Explorer अ‍ॅप मिळवा

मुख्यपृष्ठ › दैनंदिन बायबल पाठ › मार्च 2027 › 26 मार्च

ऑर्थोडॉक्स दिनदर्शिका · 13 मार्च (जुनी पद्धत)

ऑर्थोडॉक्स दैनंदिन पाठ — 26 मार्च 2027

शुक्रवार · महान लेंतचा दुसरा आठवडा · स्वर 1

सण आणि संत

Translation of the relics of St Nicephorus the Patriarch of Constantinople (846)

महान लेंत

कडक उपवास (कोरडे अन्न: भाकर, भाज्या, फळे)

हे मठाच्या नियमानुसार आहे. पॅरिशमध्ये उपवासाचे प्रमाण आपल्या पापकबुलीच्या धर्मगुरूसोबत, आरोग्य, वय आणि परिस्थितीनुसार ठरवले जाते.

दिवसाची वाचने

सहावा तास

यश 7:1–14

1यहूदाचा राजा आहाज, जो योथामाचा पुत्र व योथाम हा उज्जीयाचा पुत्र, त्याच्या कारकीर्दित अरामाचा राजा रसीन व इस्राएलाचा राजा पेकह, जे रमाल्याचा पुत्र, हे यरूशलेमावर लढाई करण्याकरीता चालून गेले, परंतु त्यांची त्यावर सरशी झाली नाही. 2दावीदाच्या घराण्याला कळविण्यात आले की, अराम आणि एफ्राईम हे एक झाले आहेत. तेव्हा रानातील वृक्ष वाऱ्याने कापतात तसे आहाज आणि त्याच्या लोकांची मने भीतीने कंपीत झाली. 3मग परमेश्वर यशयाला म्हणाला, “आहाजाला भेटण्यासाठी तू तुझा मुलगा शआरयाशूब याजबरोबर धोब्याच्या शेताकडे जाणाऱ्या रस्त्यावर जेथे वरच्या तळ्याचे पाणी मिळते तेथे जा. 4त्यास सांग, सावध हो, शांत रहा, भिऊ नको किंवा या दोन जळत्या कोलीतांमुळे रसीन, अराम, आणि रमाल्याचा पुत्र पेकह यांच्या उग्र क्रोधामुळे खचून जाऊ नको. 5अराम, एफ्राईम, व रमाल्याच्या पुत्राने तुमच्या विरूद्ध दुष्ट योजना केली आहे, ते म्हणतात, 6आपण यहूदावर चालून जाऊ व त्यास घाबरे करू, त्याची तटबंदी फोडून तेथे ताबेलाच्या पुत्राला राजा करु. 7प्रभू परमेश्वर म्हणतो, असे काही होणार नाही; असे काही घडणार नाही, 8कारण अरामाचे शीर दिमिष्क व दिमिष्काचे शीर रसीन आहे. पासष्ट वर्षांच्या आत एफ्राईम भंग पावेल व तेथील लोक एक राष्ट्र म्हणून राहणार नाहीत. 9एफ्राईमाचे शीर शोमरोन आणि शोमरोनाचे शीर रमाल्याचा पुत्र आहे. तू जर विश्वासात स्थिर राहिला नाहीस तर खात्रीने तू सुरक्षीत राहणार नाहीस.” 10परमेश्वर पुन्हा आहाजाशी बोलला, 11“तुझा देव परमेश्वर याला चिन्ह माग, खाली पाताळात माग किंवा वर आकाशात माग.” 12परंतु आहाज म्हणाला, “मी मागणार नाही किंवा परमेश्वराची परीक्षा पाहणार नाही.” 13मग यशयाने उत्तर दिले, “दावीदाच्या घराण्या, ऐक लोकांच्या धीराला तुम्ही कसोटीला लावले ऐवढे पुरे नाही काय? माझ्या देवाच्या सहनशीलतेला पण तुम्ही कसोटीला लावावे काय? 14म्हणून प्रभू स्वतः तुम्हास एक चिन्ह देईल, पहा, एक तरुण स्त्री गर्भवती होऊन मुलाला जन्म देईल, आणि त्यास इम्मानुएल हे नाव देईल.

संध्याप्रार्थना: वाचन

उत्प 5:32–6:8

32नोहा पाचशे वर्षांचा झाल्यावर त्यास शेम, हाम व याफेथ नावाचे पुत्र झाले. 6:1पृथ्वीवरील मनुष्यांची संख्या वाढतच राहिली आणि त्यांना मुली झाल्या, 2तेव्हा मानवजातीच्या मुली आकर्षक आहेत असे देवपुत्रांनी पाहिले, त्यांच्यापैकी त्यांना ज्या आवडल्या त्या त्यांनी स्त्रिया करून घेतल्या. 3परमेश्वर म्हणाला, “माझा आत्मा मानवामध्ये सर्वकाळ राहणार नाही, कारण ते देह आहेत. ते एकशें वीस वर्षे जगतील.” 4त्या दिवसात आणि त्यानंतरही, महाकाय मानव पृथ्वीवर होते. देवाचे पुत्र मनुष्यांच्या मुलीपाशी गेले, आणि त्यांच्याकडून त्यांना मुले झाली, तेव्हा हे घडले. प्राचीन काळचे जे बलवान, नामांकित पुरूष ते हेच. 5पृथ्वीवर मानवजातीची दुष्टता मोठी आहे, आणि त्यांच्या मनात येणाऱ्या विचारातील प्रत्येक कल्पना केवळ एकसारखी वाईट असते, असे परमेश्वराने पाहिले. 6म्हणून पृथ्वीवर मनुष्य निर्माण केल्याबद्दल परमेश्वरास वाईट वाटले, आणि तो मनात फार दुःखी झाला. 7म्हणून परमेश्वर म्हणाला, “मी उत्पन्न केलेल्या मानवास पृथ्वीतलावरून नष्ट करीन; तसेच मनुष्य, पशू, सरपटणारे प्राणी, व आकाशातील पक्षी या सर्वांचा मी नाश करीन, कारण या सर्वांना उत्पन्न केल्याचे मला दुःख होत आहे.” 8परंतु नोहावर परमेश्वराची कृपादृष्टी झाली.

संध्याप्रार्थना: वाचन

नीति 6:20–7:1

20माझ्या मुला, तुझ्या वडिलांची आज्ञा पाळ, आणि तुझ्या आईची शिकवण विसरु नकोस. 21ती नेहमी आपल्या हृदयाशी कवटाळून धर; ती आपल्या गळ्यात बांधून ठेव. 22जेव्हा तू चालशील, ते तुला मार्गदर्शन करील; जेव्हा तू झोपशील, तेव्हा ते तुझे रक्षण करील; आणि जेव्हा तू उठशील तेव्हा ते तुझ्याशी बोलेल. 23कारण ती आज्ञा दिवा आहेत आणि शिक्षण प्रकाश आहे; शिस्तीचा दोषारोप जीवनाचा मार्ग आहे. 24ते तुला अनितीमान स्त्रीकडे जाण्यापासून परावृत्त करते, व्यभिचारी स्त्रीच्या गोडबोल्या जिभेपासून तुझे रक्षण करते. 25तू आपल्या हृदयात तिच्या सुंदरतेची लालसा धरू नकोस, आणि ती आपल्या पापण्यांनी तुला वश न करो. 26वेश्येबरोबर झोपल्याने भाकरीच्या तुकड्याची किंमत चुकवावी लागते, पण दुसऱ्याच्या पत्नीची किंमत म्हणून तुला तुझ्या स्वतःचे जीवन द्यावे लागेल. 27मनुष्याने आपल्या छातीशी विस्तव धरून ठेवला तर, त्याचे कपडे जळल्याशिवाय राहतील काय? 28जर एखादा मनुष्य निखाऱ्यांवर चालला, तर त्याचे पाय भाजल्याशिवाय राहतील काय? 29जो कोणी आपल्या शेजाऱ्याच्या पत्नीबरोबर जातो तो असाच आहे; जो कोणी तिच्याबरोबर संबंध ठेवतो त्यास शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही. 30जर चोर चोरी करताना पकडला तर लोक त्यास तुच्छ मानत नाही; तो भुकेला असताना त्याची भूक शमविण्यासाठी त्याने चोरी केली. 31पण तो पकडला गेला, तर त्याने चोरी केली त्याच्या सातपट परत देईल, तो आपल्या घरचे सर्वच द्रव्य देईल. 32जो व्यभिचार करतो तो बुद्धिहीन आहे; जो आपल्या जिवाचा नाश करू इच्छितो तो असे करतो. 33जखमा व अप्रतिष्ठा त्यास प्राप्त होतील, आणि त्याची लज्जा कधीही धुतली जाणार नाही. 34कारण ईर्ष्या मनुष्यास संतप्त करते; सूड उगविण्याच्या दिवशी तो गय करणार नाही. 35तो काही खंडणी स्वीकारणार नाही, आणि त्यास खूप दाने दिली तरी तो शांत राहणार नाही. 7:1माझ्या मुला, माझे शब्द जपून ठेव, आणि माझ्या आज्ञा आपल्याजवळ साठवून ठेव.

तारखा रशियन मंडळीच्या ज्युलियन दिनदर्शिकेनुसार आहेत (सर्बियन आणि जॉर्जियन मंडळ्या आणि आथोस पर्वत यांच्याप्रमाणे): मंडळीच्या दिनदर्शिकेतील 13 मार्च म्हणजे नागरी दिनदर्शिकेतील 26 मार्च. नवी दिनदर्शिका पाळणाऱ्या मंडळ्या (ग्रीस, रोमानिया, बल्गेरिया, युक्रेन…) ठरावीक तारखेचे सण आणि संत त्याच नागरी तारखेला, 13 दिवस आधी, पाळतात, आणि त्यांचे काही पाठ वेगळे आहेत; ईस्टर आणि त्यावर अवलंबून असलेले दिवस सारखेच आहेत.

स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क