Bible Explorer अ‍ॅप मिळवा

मुख्यपृष्ठ › दैनंदिन बायबल पाठ › मार्च 2027 › 27 मार्च

कॅथलिक दिनदर्शिका

दैनंदिन बायबल पाठ (कॅथलिक) — 27 मार्च 2027

शनिवार · पास्काचे त्रिदिन

सण आणि संत

पवित्र शनिवार — पास्का जागरण

पास्काचे त्रिदिन · उपासनेचा रंग: पांढरा

दिवसाची वाचने

पहिले वाचन

उत्प 1:1–2:2

1प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही निर्माण केली. 2पृथ्वी अंदाधुंद व रिकामी होती. जलाशयावर अंधकार होता, देवाचा आत्मा पाण्यावर पाखर घालत होता. 3देव बोलला, “प्रकाश होवो” आणि प्रकाश झाला. 4देवाने प्रकाश पाहिला की तो चांगला आहे. देवाने अंधकारापासून प्रकाश वेगळा केला. 5देवाने प्रकाशाला “दिवस” व अंधकाराला “रात्र” असे नाव दिले. संध्याकाळ झाली व सकाळ झाली, हा पहिला दिवस. 6देव बोलला, “जलांच्या मध्यभागी अंतराळ होवो व ते जलापासून जलांची विभागणी करो.” 7देवाने अंतराळ केले आणि अंतराळावरच्या व अंतराळाखालच्या जलांची विभागणी केली व तसे झाले. 8देवाने अंतराळास आकाश असे म्हटले. संध्याकाळ झाली व सकाळ झाली, हा दुसरा दिवस. 9नंतर देव बोलला, “आकाशाखालील पाणी एकाजागी एकत्र जमा होवो व कोरडी जमीन दिसून येवो,” आणि तसे झाले. 10देवाने कोरड्या जमिनीस भूमी आणि एकत्र झालेल्या पाण्याच्या संचयास समुद्र असे म्हटले. त्याने पाहिले की हे चांगले आहे. 11देव बोलला, “हिरवळ, बीज देणाऱ्या वनस्पती, आणि आपआपल्या जातीप्रमाणे, ज्यात त्याचे बीज आहे अशी फळे देणारी फळझाडे, ही पृथ्वीवर येवोत.” आणि तसेच झाले. 12पृथ्वीने हिरवळ, आपापल्या जातीचे बीज देणाऱ्या वनस्पती आणि आपापल्या जातीची फळे देणारी व त्या फळातच आपापल्या जातीचे बीज असणारी फळझाडे भूमीने उत्पन्न केली. देवाने पाहिले की हे चांगले आहे. 13संध्याकाळ झाली व सकाळ झाली, हा तिसरा दिवस. 14मग देव बोलला, “दिवस व रात्र ही वेगळी करण्यासाठी आकाशात ज्योति होवोत व त्या चिन्हे, ऋतू, दिवस, आणि वर्षे दाखविणाऱ्या होवोत. 15पृथ्वीला प्रकाश देण्यासाठी आकाशात त्या दीपाप्रमाणे होवोत,” आणि तसे झाले. 16दिवसावर सत्ता चालविण्यासाठी मोठी ज्योत आणि रात्रीवर सत्ता चालविण्यासाठी लहान ज्योत, अशा दोन मोठ्या ज्योती देवाने निर्माण केल्या. त्याने तारेही निर्माण केले. 17पृथ्वीवर प्रकाश देण्यासाठी, दिवसावर व रात्रीवर सत्ता चालविण्यासाठी, प्रकाश व अंधकार वेगळे करण्यासाठी देवाने त्यांना अंतराळात ठेवले. देवाने पाहिले की हे चांगले आहे. 19संध्याकाळ झाली व सकाळ झाली. हा चौथा दिवस. 20देव बोलला, “जले जीवजंतूनी भरून जावोत, आणि पृथ्वीच्या वर आकाशाच्या अंतराळात पक्षी उडोत.” 21समुद्रातील फार मोठे जलचर व अनेक प्रकारचे जलप्राणी त्यांच्या त्यांच्या जातींप्रमाणे देवाने उत्पन्न केले. तसेच पंख असलेल्या प्रत्येक पक्षाला त्याच्या जातीप्रमाणे देवाने उत्पन्न केले. देवाने पाहिले की हे चांगले आहे. 22देवाने त्यांना आशीर्वाद देऊन म्हटले, “फलद्रूप व्हा आणि बहुगुणित व्हा, समुद्रातील पाणी व्यापून टाका. पृथ्वीवर पक्षी बहुगुणित होवोत.” 23संध्याकाळ झाली व सकाळ झाली हा पाचवा दिवस. 24देव बोलला, “आपापल्या जातीचे सजीव प्राणी, गुरेढोरे, सरपटणारे प्राणी व वनपशू पृथ्वी उपजवो.” आणि तसे झाले. 25देवाने पृथ्वीवरील जनावरे, गुरेढोरे, वनपशू, आणि सरपटणारा प्रत्येक जीव त्याच्या त्याच्या जाती प्रमाणे निर्माण केला. देवाने पाहिले की हे चांगले आहे. 26देव बोलला, “आपण आपल्या प्रतिरूपाचा आपल्या सारखा मनुष्य निर्माण करू. समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी, सर्व वनपशू, मोठी जनावरे व जमिनीवर सरपटणारे सर्व लहान प्राणी यांच्यावर त्यांना सत्ता चालवू देऊ.” 27देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला. त्याच्या स्वतःच्या प्रतिरूपाचा असा देवाने तो निर्माण केला. नर व नारी असे त्यांना निर्माण केले. 28देवाने त्यांना आशीर्वाद दिला, आणि त्यांना म्हटले, “फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा आणि पृथ्वी व्यापून टाका. ती आपल्या सत्तेखाली आणा; समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी आणि पृथ्वीवर फिरणारा प्रत्येक सजीव प्राणी यांवर सत्ता चालवा.” 29देव म्हणाला, पाहा, सर्व पृथ्वीच्या पृष्ठभागावर असलेली बीज देणारी प्रत्येक वनस्पती आणि ज्यामध्ये बीज देणाऱ्या झाडाचे फळ आहे ते प्रत्येक झाड, ही मी तुम्हास दिली आहेत. ही तुम्हाकरिता अन्न असे होतील. 30तसेच पृथ्वीवरील प्रत्येक पशू, आकाशातील प्रत्येक पक्षी आणि पृथ्वीच्या पाठीवर ज्यामध्ये जीव आहे त्या प्रत्येक सरपटणाऱ्या प्राण्याकरता अन्न म्हणून मी प्रत्येक हिरवी वनस्पती दिली आहे. आणि सर्व तसे झाले. 31देवाने आपण जे केले होते ते सर्व पाहिले. पाहा, ते फार चांगले होते. संध्याकाळ झाली व नंतर सकाळ झाली, हा सहावा दिवस. 2:1त्यानंतर पृथ्वी, आकाश आणि त्यातील सर्वकाही पूर्ण करून झाले, आणि सर्वकाही जिवंत जिवांनी भरून गेले. 2देवाने सातव्या दिवशी आपण करीत असलेले काम समाप्त केले, आणि जे त्याने केले होते त्या त्याच्या कामापासून त्याने सातव्या दिवशी विसावा घेतला.

स्तोत्र

स्तोत्र 104:1–2, 5–6, 10, 12–14, 24, 35

1हे माझ्या जिवा, परमेश्वराचा धन्यवाद कर. हे परमेश्वरा, माझ्या देवा, तू अत्यंत थोर आहेस; तू तेजस्विता आणि गौरव पांघरले आहेस. 2जसे वस्राने तसे तू आपणाला प्रकाशाने झाकतोस; तंबूच्या पडद्याप्रमाणे तू आकाश पसरतोस. 5त्याने पृथ्वीचा पाया घातला आहे, आणि ती कधीही हलणार नाही. 6तू पृथ्वीला वस्राप्रमाणे पाण्याने आच्छादिले आहेस; पाण्याने पर्वत झाकले आहेत. 10तो दऱ्यातून झरे वाहवितो; डोंगरामधून प्रवाह वाहत जातात. 12नदीकिनारी पक्षी आपले घरटे बांधतात; ते फांद्यामध्ये बसून गातात. 13तो आपल्या वरच्या खोल्यातून पर्वतावर पाण्याचा वर्षाव करतो. पृथ्वी त्याच्या श्रमाच्या फळाने भरली आहे. 14तो गुरांढोरासाठी गवत उगवतो, आणि मनुष्यांसाठी वनस्पतीची लागवड करतो; यासाठी की, मनुष्याने जमिनितून अन्न उत्पन्न करावे. 24हे परमेश्वरा, तुझी कृत्ये किती अधिक आणि किती विविध प्रकारची आहेत! ती सर्व तुझ्या ज्ञानाने केली आहेत; पृथ्वी तुझ्या समृद्धीने भरली आहे. 35पृथ्वीवरून पापी नष्ट होवोत, आणि दुष्ट आणखी न उरोत. हे माझ्या जिवा परमेश्वराचा धन्यवाद कर. परमेश्वराची स्तुती करा.

दुसरे वाचन

उत्प 22:1–18

1या गोष्टी झाल्यानंतर देवाने अब्राहामाची परीक्षा घेतली. तो अब्राहामाला म्हणाला, “अब्राहामा!” अब्राहाम म्हणाला, “हा मी येथे आहे.” 2नंतर देव म्हणाला, “तुझा एकुलता एक प्रिय पुत्र, ज्याच्यावर तू प्रीती करतोस त्या इसहाकाला घेऊन तू मोरिया देशात जा आणि तेथे मी तुला सांगेन त्या डोंगरावर माझ्यासाठी त्याचे होमार्पण कर.” 3तेव्हा अब्राहाम पहाटेस लवकर उठला, त्याने खोगीर घालून आपले गाढव तयार केले, आपला मुलगा इसहाक व त्याच्यासोबत दोन तरुण सेवकांना आपल्याबरोबर घेतले. त्याने होमार्पणाकरिता लाकडे फोडून घेतली आणि मग ते सर्व देवाने सांगितलेल्या ठिकाणी प्रवासास निघाले. 4तिसऱ्या दिवशी अब्राहामाने वर पाहिले आणि दूर अंतरावर ती जागा पाहिली. 5मग अब्राहाम आपल्या तरुण सेवकांना म्हणाला, “तुम्ही येथे गाढवाजवळ थांबा, आणि मी व मुलगा तिकडे जातो. आम्ही देवाची आराधना करू आणि तुम्हाकडे परत येऊ.” 6अब्राहामाने होमार्पणासाठी लाकडे घेऊन इसहाकाच्या खांद्यावर ठेवली; त्याने स्वतःच्या हातात अग्नी व एक सुरा घेतला. आणि ते दोघे बरोबर निघाले. 7इसहाक आपल्या पित्याला म्हणाला, “माझ्या बाबा.” अब्राहामाने उत्तर दिले, “मी येथे आहे, माझ्या मुला.” इसहाक म्हणाला, “मला लाकडे व अग्नी दिसतात, परंतु होमार्पणासाठी कोकरू कोठे आहे?” 8अब्राहाम म्हणाला, “माझ्या मुला, होमार्पणासाठी कोकरू देव स्वतः आपल्याला पुरवेल.” तेव्हा अब्राहाम व त्याचा मुलगा बरोबर निघाले. 9देवाने सांगितलेल्या ठिकाणी जेव्हा ते जाऊन पोहचले, तेथे अब्राहामाने एक वेदी बांधली, त्याने वेदीवर लाकडे रचली. नंतर त्याने आपला पुत्र इसहाक याला बांधले, आणि वेदीवरील लाकडावर ठेवले. 10मग अब्राहामाने आपला हात पुढे करून आपल्या मुलाला मारण्यासाठी सुरा हातात घेतला. 11परंतु तेवढ्यात, परमेश्वराच्या दूताने स्वर्गातून हाक मारून त्यास म्हटले, “अब्राहामा, अब्राहामा!” अब्राहामाने उत्तर दिले, “मी येथे आहे.” 12तो म्हणाला, “तू आपल्या मुलावर हात टाकू नकोस, किंवा त्यास कोणत्याही प्रकारची इजा करू नकोस, कारण आता मला खात्रीने समजले की, तू देवाचे भय बाळगतोस, कारण तू माझ्यासाठी आपल्या एकुलत्या एका पुत्राला ही राखून ठेवले नाही.” 13आणि मग अब्राहामाने वर पाहिले आणि पाहा, त्याच्यामागे एका झुडपात शिंगे अडकलेला असा एक एडका होता. मग त्याने जाऊन तो घेतला व आपल्या मुलाच्या ऐवजी त्या एडक्याचे होमार्पण म्हणून अर्पण केले. 14तेव्हा अब्राहामाने त्या जागेला, “परमेश्वर पुरवठा करेल,” असे नाव दिले, आणि आजवर देखील, “परमेश्वराच्या डोंगरावर तो पुरवठा केला जाईल,” असे बोलले जाते. 15नंतर स्वर्गातून परमेश्वराच्या दूताने अब्राहामास दुसऱ्यांदा हाक मारली 16आणि म्हटले, हे परमेश्वराचे शब्द आहेत, “मी परमेश्वर आपलीच शपथ वाहून म्हणतो की, तू ही जी गोष्ट केली आहे, म्हणजे तू आपल्या एकुलत्या एका मुलाला राखून ठेवले नाही, 17मी खरोखर तुला आशीर्वाद देईन व तुझे वंशज आकाशातल्या ताऱ्यांसारखे व समुद्र किनाऱ्यावरील वाळू इतके बहुतपट वाढवीनच वाढवीन; आणि तुझे वंशज आपल्या शत्रूच्या वेशीचा ताबा मिळवतील. 18पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे तुझ्या संततीद्वारे आशीर्वादित होतील, कारण तू माझा शब्द पाळला आहेस.”

स्तोत्र

स्तोत्र 16:5, 8–11

5परमेश्वरा, तू माझा निवडलेला भाग आणि माझा प्याला आहे. माझा वाटा तुच धरून ठेवतोस. 8मी परमेश्वरास नेहमी माझ्यासमोर ठेवतो म्हणून मी त्याच्या उजव्या हातातून कधीही ढळणार नाही. 9त्यामुळे माझे हृदय आनंदी आहे; माझे मन त्यास उंच करते. खचित माझा देह सुद्धा सुरक्षित राहतो. 10कारण तू माझ्या जीवाला मृतलोकांत राहू देणार नाही, ज्याच्याजवळ तुझी प्रेमदया आहे, त्यास तू अधोलोक पाहू देणार नाहीस. 11तू मला जीवनाचा मार्ग शिकवला, तुझ्या उपस्थितीत विपुल हर्ष आहे, तुझ्या उजव्या हातात सुख सर्वकाळ आहेत.

तिसरे वाचन

निर्ग 14:15–15:1

15मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “माझा धावा करीत काय बसलास? इस्राएल लोकांस सांग की पुढे चला. 16तू आपली काठी उचल आणि आपला हात समुद्रावर उगारून तो दुभाग म्हणजे इस्राएल लोक भर समुद्रात कोरड्या भूमीवरून चालतील. 17आणि पाहा, मी स्वतः मिसऱ्यांची मने कठीण करीन आणि ते तुमचा पाठलाग करतील. आणि फारो व त्याचे सर्व सैन्य, स्वार व रथ यांचा पराभव केल्याने माझा महिमा प्रगट होईल. 18फारो व त्याचे रथ व त्यांचे स्वार यांचा पराभव केल्याने माझा महिमा प्रगट झाला म्हणजे मी परमेश्वर आहे हे मिसरी लोकांस कळेल.” 19इस्राएली सेनेच्या पुढे चालणारा देवाचा दूत सेनेच्या मागे गेला, आणि मेघस्तंभ त्यांच्या आघाडीवरून निघून त्यांच्या पिछाडीस उभा राहिला. 20अशा रीतीने तो मिसराचे लोक व इस्राएल लोक यांच्यामध्ये उभा राहिला; मेघ व अंधकार होता तरी तो रात्रीचा प्रकाश देत होता. रात्रभर एका पक्षाला दुसऱ्या पक्षाकडे जाता आले नाही. 21मग मोशेने तांबड्या समुद्रावर आपला हात उगारला, तेव्हा परमेश्वराने रात्रभर पूर्वेकडून जोराचा वारा वाहवून समुद्र मागे हटविला, असा की पाणी दुभागून मध्ये कोरडी जमीन झाली. 22आणि इस्राएल लोक कोरड्या वाटेवरून भर समुद्रातून पार गेले. समुद्राचे पाणी त्यांच्या उजव्या व डाव्या बाजूला भिंतीसारखे उभे राहिले. 23त्यानंतर तेव्हा मिसऱ्यांनी त्यांचा पाठलाग केला. फारोचे सर्व घोडे, रथ व स्वार त्यांच्या पाठोपाठ समुद्रामध्ये गेले. 24तेव्हा त्या दिवशी भल्या पहाटे परमेश्वराने मेघस्तंभातून व अग्निस्तंभातून खाली मिसराच्या सैन्याकडे पाहिले आणि त्यांचा गोंधळ उडवून त्यांचा पराभव केला. 25रथाची चाके रुतल्यामुळे रथावर ताबा ठेवणे मिसराच्या लोकांस कठीण झाले; तेव्हा ते मोठ्याने ओरडून म्हणाले, “आपण येथून लवकर निघून जाऊ या! कारण परमेश्वर इस्राएलाच्या बाजूने आम्हाविरूद्ध लढत आहे.” 26नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला, “तुझा हात समुद्रावर उगार म्हणजे भिंतीसारखे उभे राहिलेले पाणी पूर्ववत जमून मिसऱ्यावर, त्यांच्या रथावर व स्वारांवर येईल.” 27मोशेने आपला हात समुद्रावर उगारला तेव्हा दिवस उजाडल्यावर पाणी पहिल्यासारखे समान पातळीवर आले; तेव्हा मिसराच्या लोकांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु परमेश्वराने त्यांना समुद्रामध्ये उलथून पाडिले. 28पाणी पूर्ववत झाले व त्याने घोडे, रथ व स्वारांना गडप केले आणि इस्राएल लोकांचा पाठलाग करणाऱ्या फारोच्या सर्व सैन्याचा नाश झाला, त्यांच्यातले कोणीही वाचले नाही. 29परंतु इस्राएली लोक कोरड्या भूमीवरून भरसमुद्र ओलांडून पार गेले. ते पाणी त्यांच्या उजव्या व डाव्या हाताला भिंतीप्रमाणे उभे राहिले. 30तेव्हा अशा रीतीने त्या दिवशी परमेश्वराने मिसऱ्यांच्या हातातून इस्त्राएल लोकांस सोडविले आणि मिसरी समुद्रतीरी मरून पडलेले इस्राएल लोकांनी आपल्या डोळ्यांनी पाहिले. 31परमेश्वराने मिसऱ्यांना आपला प्रबळ हात दाखविला तो इस्राएल लोकांनी पाहिला, तेव्हा त्यांनी परमेश्वराचे भय धरले आणि परमेश्वरावर व त्याचा सेवक मोशे याच्यावरही विश्वास ठेवला. 15:1नंतर मोशे व इस्राएल लोक यांनी परमेश्वरास हे गीत गाईले. ते म्हणाले, “मी परमेश्वरास गीत गाईन कारण तो विजयाने प्रतापी झाला आहे; घोडा व स्वार यांना त्याने समुद्रात उलथून टाकले आहे.

स्तोत्र

निर्ग 15:1–6, 17–18

1नंतर मोशे व इस्राएल लोक यांनी परमेश्वरास हे गीत गाईले. ते म्हणाले, “मी परमेश्वरास गीत गाईन कारण तो विजयाने प्रतापी झाला आहे; घोडा व स्वार यांना त्याने समुद्रात उलथून टाकले आहे. 2परमेश्वर माझे सामर्थ्य व माझे गीत आहे. तो माझे तारण झाला आहे. मी त्याची स्तुतीस्तोत्रे गाईन; परमेश्वर माझा देव आहे; तो माझ्या पूर्वजांचा देव आहे; मी त्याचे गौरव करीन. 3परमेश्वर महान योद्धा आहे; त्याचे नाव परमेश्वर आहे. 4त्याने फारोचे रथ व स्वार यांना समुद्रात फेकून दिले; त्याचे निवडक अधिकारी तांबड्या समुद्रात बुडाले आहेत. 5खोल पाण्याने त्यांना बुडविले; ते खोल पाण्यात दगडाप्रमाणे तळापर्यंत बुडाले. 6हे परमेश्वरा, तुझा उजवा हात आश्चर्यकारकरीत्या बलशाली आहे; त्या हाताने तू शत्रूंचा चुराडा करून टाकलास. 17तू तुझ्या लोकांस तुझ्या वतनाच्या पर्वतावर घेऊन जाशील; हे परमेश्वरा, तू आपल्यासाठी केलेले निवासस्थान हेच आहे. हे प्रभू, तुझ्या हातांनी स्थापिलेले तुझे पवित्र स्थान हेच. 18परमेश्वर सदासर्वदा राज्य करील.”

चौथे वाचन

यश 54:5–14

5कारण तुझा निर्माता तुझा पती आहे; त्याचे नाव सेनाधीश परमेश्वर आहे. इस्राएलाचा पवित्र प्रभू तुझा उद्धारक आहे; त्यास सर्व पृथ्वीचा देव असे म्हटले जाईल. 6कारण तुला त्यागलेली आणि आत्म्यात दुःखीत पत्नीप्रमाणे परमेश्वर तुला परत बोलावित आहे, तरुण विवाहीत स्त्रीप्रमाणे आणि नाकारलेली, असे तुझा देव म्हणत आहे. 7मी तुला थोड्या वेळासाठी सोडले, परंतु मोठ्या करुणेने मी तुला एकत्र करीन. 8मी रागाच्या भरात क्षणभर आपले तोंड तुजपासून लपवले; पण मी सर्वकाळच्या कराराच्या विश्वासाने मी तुझ्यावर दया करीन. असे परमेश्वर, तुझा तारणहार म्हणतो. 9“कारण नोहाच्या जलाप्रमाणे हे मला आहेः जशी मी शपथ घेऊन म्हणालो नोहाचा जलप्रलय पुन्हा कधीही भूमीवर चालणार नाही, तशी मी शपथ घेतली मी तुझ्यावर कधी रागावणार नाही आणि तुला धिक्कारणार नाही. 10जरी पर्वत कोसळतील आणि टेकड्या ढळतील, तरी माझा कराराचा विश्वासूपणा तुझ्यापासून दूर होणार नाहीत किंवा माझ्या शांतीचा करार ढळणार नाही, असे तुझ्यावर दया करणारा परमेश्वर म्हणतो. 11अगे जाचलेले, वादळाने मस्त झालेले आणि सांत्वन न पावलेले, पाहा, तुझे पाषाण सुरम्य रंगात बसवीन, आणि तुझा पाया नीलमण्यांनी घालीन. 12तुझा कळस माणकांचा आणि तुझ्या वेशी मी चकाकणारी रत्ने करीन, आणि बाहेरील भींत सुंदर खड्यांची करीन. 13आणि तुझ्या सर्व मुलांना परमेश्वर शिकवील; आणि तुमच्या मुलांची शांती महान असेल. 14नीतिमत्तेत तू स्थापीत होशील. तुला येथून पुढे छळाचा अनुभव येणार नाही, कारण तू भिणार नाही, आणि तुला घाबरवण्यास कोणीही तुझ्याजवळ येणार नाही.

स्तोत्र

स्तोत्र 30:1, 3–5, 10–12

1स्तोत्र; मंदिराच्या प्रतिस्थापनेच्या वेळचे गाणे. दाविदाचे स्तोत्र. हे परमेश्वरा, मी तुला उंच करीन, कारण तू मला उठून उभे केले आहेस आणि माझ्या शत्रूंना माझ्यावर हर्ष करू दिला नाहीस. 3हे परमेश्वरा तू माझ्या जीवाला मृतलोकांतून वर काढून आणलेस. मी खाचेत उतरू नये, म्हणून तू मला जिवंत राखले आहे. 4जे तुम्ही विश्वासयोग्य आहा, ते तुम्ही परमेश्वरास स्तुती गा. त्याची पवित्रता स्मरून त्याच्या नावाला धन्यवाद द्या. 5कारण त्याचा राग काही क्षणाचा आहे, परंतु त्याचा अनुग्रह आयुष्यभर आहे. रडने कदाचीत रात्रभर असेल, परंतु सकाळी हर्ष होईलच. 10हे परमेश्वरा, ऐक आणि माझ्यावर दया कर. हे परमेश्वरा, मला मदत करणारा हो. 11तू माझे शोक करणे, नाचण्यात पालटवला आहे. तू माझे गोणताट काढून मला हर्षाचे वस्र नेसवले आहेत. 12म्हणून माझे हृदय तुझी स्तुती गाईल आणि शांत राहणार नाही. हे परमेश्वरा, माझ्या देवा मी तुझी सर्वकाळ स्तुती करीन.

पाचवे वाचन

यश 55:1–11

1अहो सर्व तान्हेल्यांनो, पाण्याजवळ या! आणि ज्याच्याजवळ पैसा नाही, सर्व या, विकत घ्या आणि खा! या, पैश्याशिवाय व मोलाशिवाय मद्य आणि दूध घ्या. 2जी भाकर नव्हे तिच्यासाठी तुम्ही चांदी का तोलून देता? आणि ज्याने समाधान होत नाही त्यासाठी श्रम का करता? माझे लक्षपूर्वक ऐका आणि जे चांगले आहे ते खा व मिष्टान्नात तुमचे जीवन आनंदीत होवो. 3तुम्ही कान द्या आणि माझ्याकडे या! ऐका, म्हणजे तुमचे जीवन जिवंत राहील! मी खरोखर तुमच्याबरोबर सर्वकाळचा करार करीन, विश्वासाची कृती करून दावीदाशी करार केला. 4पाहा, मी त्यास राष्ट्रात साक्षी, लोकांचा अधिपती व सेनापती याप्रमाणे ठेवले आहे. 5पाहा, तू राष्ट्र ओळखत नाहीस अशा राष्ट्राला तू बोलावशील आणि ज्या राष्ट्राला तुझी ओळख नाही ते तुजकडे धाव घेतील. कारण परमेश्वर तुझा देव, इस्राएलाचा पवित्र प्रभू, ज्याला तू गौरविले आहे याच्याकरता तुजकडे धाव घेतील. 6परमेश्वर सापडेल त्याकाळी त्यास शोधा; तो जवळ असतानाच त्यास बोलवा. 7दुष्ट आपला मार्ग व पापी मनुष्य आपले विचार सोडून देवो. तो परमेश्वराकडे माघारी येवो आणि तो त्यांच्यावर दया करील व तो आमच्या देवाकडे येवो, तो त्यांना विपुलपणे क्षमा करील. 8कारण माझे विचार तुमचे विचार नाहीत, किंवा तुमचे मार्ग माझे मार्ग नाहीत. हे परमेश्वराचे म्हणणे आहे. 9कारण जसे आकाश पृथ्वीपेक्षा उंच आहे तसे माझे मार्ग तुमच्या मार्गाहून आणि माझे विचार तुमच्या विचांरापेक्षा उंच आहेत. 10कारण जसे पाऊस आणि बर्फ आकाशातून खाली पडतात आणि पुन्हा भूमी भिजवल्याशिवाय आणि उत्पन्न करण्यास व अंकुर व पेरणाऱ्यास बीज आणि खाणाऱ्यास भाकर दिल्याशिवाय आकाशात परत जात नाही. 11तसेच माझ्या तोंडातून निघालेले शब्द निरर्थक होऊन परत माझ्याकडे येणार नाही, परंतु जे मी इच्छिले ते पूर्ण करील आणि ज्यासाठी पाठवले ते यशस्वी होईल.

स्तोत्र

यश 12:2–6

2पाहा, देव माझे तारण आहे; मी त्याजवर भाव ठेवीतो व भिणार नाही, कारण परमेश्वर, होय परमेश्वर माझे बल व गीत आहे. तो माझे तारण झाला आहे.” 3तुम्ही आनंदाने तारण कुपातून पाणी काढाल. 4त्या दिवशी तुम्ही म्हणाल, “परमेश्वरास धन्यवाद द्या व त्याच्या नावाचा धावा करा; लोकांमध्ये त्याची कृत्ये जाहीर करा; त्याचे नाम थोर आहे अशी घोषणा करा. 5परमेश्वरास गा, कारण त्याने गौरवी कृत्ये केली आहेत; हे सर्व पृथ्वीवर माहीत होवो. 6अगे सीयोन निवासिनी गजर कर आणि आनंदाने आरोळी मार, कारण इस्राएलाचा पवित्र तो तुझ्याठायी थोर आहे.”

सहावे वाचन

या भाषांतरात नाही

स्तोत्र

स्तोत्र 19:7–10

7परमेश्वराचे नियमशास्त्र परिपूर्ण आहे, ते जीवाला पुर्नजीवित करणारे आहे. परमेश्वराचे नियम विश्वसनीय आहेत, ज्यांना अनुभव नाही त्यांना शहाणपण देणारे आहे. 8परमेश्वराच्या सूचना खऱ्या आहेत. जे हृदयाला हर्षीत करतात. परमेश्वराच्या कराराचे नियम शुद्ध आहेत, ते डोळे प्रकाशवनारे आहेत. 9परमेश्वराची भीती शुद्ध आहे, ती सर्वकाळ टिकणारे आहे, परमेश्वराचे नियम खरे आहेत, आणि सर्व न्यायी आहेत. 10ते सोन्यापेक्षा ही मौल्यवान आहेत. अती उत्तम सोन्यापेक्षाही ते शुद्ध आहेत. ते मधाच्या पोळ्यातून गळणाऱ्या, मधापेक्षाही गोड आहेत.

सातवे वाचन

यहे 36:16–28

16मग परमेश्वराचे वचन मजकडे आले व म्हणाले, 17“मानवाच्या मुला, इस्राएलाचे घराणे त्यांच्या देशात वस्ती करून राहिले तेव्हा त्यांनी आपल्या मार्गाने व कृत्यांनी तो देश भ्रष्ट केला. त्यांचे मार्ग माझ्यापुढे रजस्रावी स्त्रीच्या विटाळाप्रमाणे आहेत. 18म्हणून त्यांनी जे रक्त भूमीवर पाडले होते त्यामुळे, आणि त्यांनी आपल्या मूर्तींनी तिला अशुद्ध केले होते त्यामुळे मी आपला क्रोध त्यांच्यावर ओतला. 19मी त्यांना राष्ट्रांमध्ये पसरविले आणि सर्व देशात विखरुन टाकले. मी त्यांच्या मार्गाप्रमाणे व त्यांच्या कृत्याप्रमाणे न्याय केला. 20मग ते त्या दुसऱ्या राष्ट्रांत गेले आणि ते जेथे कोठे गेले, तेथेही त्यांनी माझे पवित्र नाव भ्रष्ट केले, तेव्हा लोक त्यांना म्हणाले, हे खरेच परमेश्वराचे लोक आहेत का? कारण त्यांना त्याच्या देशातून बाहेर फेकून दिले आहे. 21पण इस्राएल घराणे ज्या ज्या राष्ट्रात गेले त्यांनी माझे पवित्र नाव भ्रष्ट केले. तेव्हा मी आपल्या नावास जपलो. 22म्हणून इस्राएलाच्या घराण्यास सांग की, प्रभू परमेश्वर असे म्हणतो, इस्राएल घराण्यांनो, मी हे तुमच्यासाठी करत नाही, तुम्ही जेथे जेथे गेलात, तेथे तेथे तुम्ही माझे पवित्र नाव भ्रष्ट केलेत त्याकरता मी हे करत आहे. 23कारण तुम्ही माझ्या महान नावास राष्ट्रांमध्ये भ्रष्ट केल्यामुळे त्या राष्ट्रांनी अपवित्र मानले, ती ते पवित्र मानतील असे मी करीन आणि त्या राष्ट्राच्या देखत तुमच्या ठायी मला पवित्र मानतील तेव्हा राष्ट्रास समजेल की, मी प्रभू परमेश्वर आहे. 24मी तुम्हास त्या राष्ट्रांतून काढून घेईन आणि तुम्हास प्रत्येक देशातून गोळा करीन व तुम्हास तुमच्या देशात आणीन. 25मग तुमच्यावर शुद्ध पाणी शिंपडेल तेव्हा तुम्ही तुमच्या सर्व अशुद्धतेपासून तुम्ही शुद्ध व्हाल. आणि मी तुम्हास तुमच्या सर्व मूर्तीपासून शुद्ध करीन. 26मी तुम्हास नवीन हृदय देईन, तुमच्या ठायी नवीन आत्मा घालीन; तुमच्या देहातून पाषाणमय हृदय काढून टाकीन व तुम्हास मांसमय हृदय देईन. 27मी तुमच्या ठायी माझा आत्मा घालीन. आणि तुम्ही माझ्या नियमांनी चालाल. माझे निर्णय पाळून त्याप्रमाणे आचरण कराल, असे मी करीन. 28मग तुम्ही, मी तुमच्या पूर्वजांना दिलेल्या, देशात रहाल. तुम्ही माझे लोक व्हाल व मी तुमचा देव होईन.

स्तोत्र

स्तोत्र 42:2, 4; 43:3–4

2माझा जीव देवासाठी, जिवंत देवासाठी तहानेला आहे. मी केव्हा देवासमोर येऊन हजर होईन? 4हर्षानादाने आणि स्तुती करत, सण साजरा करणाऱ्या पुष्कळांबरोबर, कसा मी त्या गर्दीला नेतृत्व करत देवाच्या घरात घेऊन जात असे, हे आठवून माझा जीव माझ्याठायी ओतला जात आहे. 43:3तू आपला प्रकाश आणि सत्य पाठवून दे, ते मला चालवोत. तुझ्या पवित्र डोंगराकडे आणि मंडपाकडे ते मला मार्गदर्शन करोत. 4तेव्हा मी देवाच्या वेदीजवळ, देव जो माझा मोठा आनंद आहे, त्याकडे जाईल, आणि हे देवा, माझ्या देवा, वीणा वाजवून मी तुझी स्तुती करीन.

प्रेषितांचे पत्र

रोम 6:3–11

3किंवा आपण जितक्यांनी ख्रिस्त येशूमध्ये बाप्तिस्मा घेतला, त्या आपण त्याच्या मरणात बाप्तिस्मा घेतला हे तुम्ही जाणत नाही काय? 4म्हणून आपण त्याच्या मरणातील बाप्तिस्म्याने त्याच्याबरोबर पुरले गेलो, ते ह्यासाठी की जसा ख्रिस्त पित्याच्या गौरवामुळे मरण पावलेल्यांमधून उठवला गेला तसेच आपणही जीवनाच्या नवेपणात चालले पाहिजे. 5कारण जर त्याच्या मरणाच्या रूपात आपण त्याच्याशी जोडलेले आहोत तर त्याच्या पुन्हा उठण्याच्या रूपात आपण त्याच्याशी जोडलेले होऊ. 6आपण जाणतो की आपल्यामधील जुना मनुष्य त्याच्याबरोबर वधस्तंभावर खिळला गेला आहे, म्हणजे पापाचे शरीर नष्ट होऊन आपण पुढे पापाचे दास्य करू नये. 7कारण जो मरण पावला आहे तो पापापासून मुक्त होऊन न्यायी ठरवलेला आहे. 8पण आपण जर ख्रिस्ताबरोबर मरण पावलो असलो, तर आपण त्याच्याबरोबर जिवंतही राहू असा आपण विश्वास ठेवतो. 9कारण आपण हे जाणतो की, मरण पावलेल्यांमधून उठलेला ख्रिस्त पुन्हा मरणार नाही. त्याच्यावर मरणाची सत्ता अजिबात राहिली नाही. 10कारण तो मरण पावला तो पापासाठी एकदाच मरण पावला, पण जिवंत आहे तो देवासाठी जिवंत आहे. 11तसेच आपण ख्रिस्त येशूमध्ये खरोखर पापाला मरण पावलेले पण देवाला जिवंत आहोत असे तुम्ही स्वतःला माना.

स्तोत्र

स्तोत्र 118:1–2, 16–17, 22–23

1परमेश्वरास धन्यवाद द्या, कारण तो चांगला आहे, कारण त्याची दया सर्वकाळ टिकणारी आहे. 2इस्राएलाने आता म्हणावे, “त्याची दया सर्वकाळ टिकणारी आहे.” 16परमेश्वराचा उजवा हात उंचावला आहे; परमेश्वराचा उजवा हात विजय मिळवतो. 17मी मरणार नाही, पण जगेन आणि परमेश्वराची कृत्ये जाहीर करीन. 22इमारत बांधणाऱ्यांनी जो दगड नाकारला होता, तोच कोनाशिला झाला आहे. 23परमेश्वराने हे केले आहे; आमच्या दृष्टीने ते अतिशय अद्भुत आहे.

शुभवर्तमान

मार्क 16:1–7

1शब्बाथाचा दिवस संपला तेव्हा मग्दालीया नगराची मरीया, याकोबाची आई मरीया आणि सलोमी यांनी त्यास लावण्याकरिता सुगंधी तेल विकत आणले. 2आणि आठवड्याच्या पहिल्या दिवशी, अगदी पहाटे सूर्योदयाच्या वेळी त्या कबरेकडे गेल्या. 3त्या एकमेकीस म्हणत होत्या की, कबरेच्या तोंडावरून आपणासाठी धोंड कोण बाजूला लोटील? 4नंतर त्यांनी वर पाहिले आणि त्यांना धोंड दूर लोटलेली आढळली. ती फारच मोठी होती. 5त्या कबरेत आत गेल्या तेव्हा त्या चकित झाल्या. त्यांना एक तरुण पुरूष उजव्या बाजूस बसलेला आढळला. त्याने पांढरा शुभ्र झगा घातला होता. 6तो त्यांना म्हणाला, भयभीत होऊ नका, तुम्ही नासरेथकर येशू जो वधस्तंभावर खिळला होता त्याचा शोध करीत आहात. पण तो उठला आहे. येथे नाही. त्यांनी त्यास ठेवले होते ती जागा पाहा. 7जा आणि त्याच्या शिष्यांना व पेत्रालाही सांगा की, तो तुमच्या अगोदर गालील प्रांतात जात आहे, त्याने तुम्हास सांगितल्याप्रमाणे तेथे तो तुम्हास दृष्टीस पडेल.

सामान्य रोमन दिनदर्शिका; बिशपांची परिषद काही सण (प्रभूचे प्रकटीकरण, स्वर्गारोहण, ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त) रविवारी हलवू शकते किंवा स्वतःचे सण जोडू शकते. पाठसंग्रह: रविवारचे चक्र B, आठवड्याच्या दिवसांचे वर्ष I.

स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क