मुख्यपृष्ठ › दैनंदिन बायबल पाठ › मार्च 2027 › 25 मार्च
कॅथलिक दिनदर्शिका
दैनंदिन बायबल पाठ (कॅथलिक) — 25 मार्च 2027
गुरुवार · पास्काचे त्रिदिन
सण आणि संत
पवित्र गुरुवार
पास्काचे त्रिदिन · उपासनेचा रंग: पांढरा
दिवसाची वाचने
पहिले वाचन
1मग मोशे व अहरोन मिसर देशामध्ये असताना परमेश्वर त्यांच्याशी बोलला. तो म्हणाला, 2“हा महिना तुमच्यासाठी आरंभीचा महिना व्हावा. तुमचा हा वर्षाचा पहिला महिना व्हावा. 3इस्राएलाच्या सर्व मंडळीला सांग की या महिन्याच्या दहाव्या दिवशी प्रत्येक मनुष्याने आपल्या कुटुंबातील लोकांकरता एक कोकरू घ्यावे. 4आणि एक कोकरू, खाण्यासाठी घरातील माणसे थोडी असली तर त्याने आपल्या शेजाऱ्याच्या संख्येप्रमाणे कोकरू घ्यावे. प्रत्येकाच्या आहाराच्या मानाने एक कोकरू किती मनुष्यांना पुरेल याचा अंदाज घ्यावा. 5तो कोकरा एक वर्षाचा नर असावा व तो पूर्णपणे निर्दोष असावा, तो कोकरा मेंढरातला किंवा बोकडातला असावा. तुम्हास वाटेल तो घ्यावा. 6या पहिल्या महिन्याच्या चौदाव्या दिवसापर्यंत तो राखून ठेवावा. संध्याकाळी इस्राएली मंडळीतील लोकांनी त्यास वधावे. 7त्या कोकऱ्याचे रक्त घेऊन ते ज्या घरात त्याचे मांस खाणार आहेत त्याच्या दोन्ही दारबाह्यांना व चौकटीच्या कपाळपट्टीवर लावावे. 8त्याच रात्री त्याचे मांस विस्तवावर भाजून कडू भाजी व बेखमीर भाकरीबरोबर खावे. 11ते तुम्ही या प्रकारे खावे: तुमच्या कमरा कसून, पायांत जोडे घालून आणि हातात काठी घेऊन, ते घाईघाईने खावे; हा परमेश्वराचा वल्हांडण सण आहे. 12आज रात्री मी मिसर देशात फिरेन आणि त्यातील मनुष्य व पशू या सर्वांचे प्रथम जन्मलेले मी मारून टाकीन, आणि मिसर देशातील सर्व दैवतांना शिक्षा करीन. मी परमेश्वर आहे. 13परंतु तुमच्या घरांच्या दारावरील रक्त ही एक खूण असेल. मी जेव्हा रक्त पाहीन तेव्हा तुम्हास ओलांडून मी पुढे जाईन. मी मिसर देशाला मारीन तेव्हा कोणताही अनर्थ तुम्हावर येणार नाही व तुमचा नाश होणार नाही 14हा दिवस तुम्हास आठवणीदाखल होईल, हा दिवस परमेश्वरासाठी तुम्ही विशेष उत्सवाचा सण म्हणून पाळावा. तुमच्या वंशजांनी येथून पुढे हा सण पिढ्यानपिढ्या कायमचा विधी समजून पाळावा.
प्रतिसाद स्तोत्र
12परमेश्वराने माझ्यावर केलेल्या सर्व उपकाराची मी कशी परतफेड करू? 13मी तारणाचा प्याला उंचावून परमेश्वराच्या नावाने हाक मारीन. 15परमेश्वराच्या दृष्टीने त्याच्या भक्तांचा मृत्यू अमोल आहे. 16हे परमेश्वरा, मी खरोखर तुझा सेवक आहे; मी तुझा सेवक, तुझी दासी असलेल्या स्त्रीचा मुलगा आहे; माझी बंधने तू सोडली आहेस. 17मी तुला उपकाराचा यज्ञ अर्पण करीन आणि मी परमेश्वराचे नामस्मरण करीन. 18मी त्याच्या सर्व लोकांसमोर परमेश्वरास केलेले नवस पूर्ण करीन.
दुसरे वाचन
23कारण प्रभूपासून जे मला मिळाले तेच मी तुम्हास दिले. प्रभू येशूचा, ज्या रात्री विश्वासघात करण्यात आला. त्याने भाकर घेतली, 24आणि उपकार मानल्यावर ती मोडली आणि म्हणाला, “हे माझे शरीर आहे, जे मी तुमच्यासाठी देत आहे. माझी आठवण करण्यासाठी हे करा.” 25त्याचप्रमाणे त्यांनी भोजन केल्यावर त्याने प्याला घेतला आणि म्हणाला, “हा प्याला माझ्या रक्ताने झालेला नवीन करार आहे. जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझी आठवण करण्यासाठी हे करा.” 26कारण जितक्यांदा तुम्हीही भाकर खाता व हा प्याला पिता, तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करीता.
शुभवर्तमान
1आता, वल्हांडण सणाअगोदर असे झाले की, येशूने आता या जगांतून पित्याकडे निघून जाण्याची वेळ आली आहे, हे जाणून, या जगातील स्वकीयांवर त्याची जी प्रीती होती, ती त्याने शेवटपर्यंत केली. 2शिमोनाचा पुत्र यहूदा इस्कार्योत याच्या मनात येशूला विश्वासघाताने शत्रूच्या हाती द्यावे असे सैतानाने आधीच घातले होते. 3येशू जाणत होता की, पित्याने त्याच्या हातात सर्व दिले होते आणि तो देवाकडून आला होता व देवाकडे जात होता; 4येशू भोजनावरून उठला, त्याने आपली बाह्यवस्त्रे एकीकडे ठेवली आणि एक कापड घेऊन आपल्या कमरेला बांधला. 5त्यानंतर येशू एका गंगाळात पाणी ओतून आणि तो शिष्यांचे पाय धुऊ लागला व कमरेला बांधलेल्या कापडाने पुसू लागला. 6मग तो शिमोन पेत्राकडे आला, तेव्हा तो त्यास म्हणाला, “प्रभूजी, आपण माझे पाय धुता काय?” 7येशूने त्यास उत्तर दिले, “मी काय करतो ते तुला आता कळत नाही, पण ते तुला पुढे कळेल.” 8पेत्र त्यास म्हणाला, “तुम्हास माझे पाय कधीही धुवावयाचे नाहीत.” येशूने त्यास उत्तर दिले, “मी तुला धुतले नाही, तर तुला माझ्याबरोबर वाटा नाही.” 9शिमोन पेत्र त्यास म्हणाला, “प्रभूजी, माझे केवळ पायच धुऊ नका, तर हात आणि डोकेही धुवा.” 10येशूने त्यास म्हटले, “ज्याचे स्नान झाले आहे त्यास पायांशिवाय दुसरे काही धुवायची गरज नाही, तर तो सर्वांगी शुद्ध आहे; तुम्ही शुद्ध आहा, पण सगळे जण नाही.” 11कारण आपणाला विश्वासघाताने शत्रूच्या हाती कोण धरून देणार आहे हे त्यास ठाऊक होते, म्हणून तो म्हणाला, “तुम्ही सगळे जण शुद्ध नाही.” 12मग त्याने त्यांचे पाय धुतल्यावर आपली बाह्यवस्त्रे घालून व तो पुन्हा खाली बसल्यावर त्यांना म्हणाला, “मी तुम्हास काय केले ते तुम्हास समजले काय? 13तुम्ही मला ‘गुरू’ आणि ‘प्रभू’ म्हणता आणि ते ठीक म्हणता, कारण मी तसाच आहे. 14मग मी जर तुमचा प्रभू आणि गुरू असता तुमचे पाय धुतले तर तुम्हीपण एकमेकांचे पाय धुवावेत. 15कारण मी तुम्हास केले तसे तुम्हीही करावे म्हणून मी तुम्हास उदाहरण दिले आहे.
सामान्य रोमन दिनदर्शिका; बिशपांची परिषद काही सण (प्रभूचे प्रकटीकरण, स्वर्गारोहण, ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त) रविवारी हलवू शकते किंवा स्वतःचे सण जोडू शकते. पाठसंग्रह: रविवारचे चक्र B, आठवड्याच्या दिवसांचे वर्ष I.
स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क