मुख्यपृष्ठ › दैनंदिन बायबल पाठ › मार्च 2027 › 21 मार्च
कॅथलिक दिनदर्शिका
दैनंदिन बायबल पाठ (कॅथलिक) — 21 मार्च 2027
रविवार · पवित्र आठवडा
सण आणि संत
झावळ्यांचा रविवार — प्रभूचे दुःखसहन
रविवार · उपासनेचा रंग: लाल
दिवसाची वाचने
मिरवणुकीचे शुभवर्तमान
किंवा: योहा 12:12–16
1जेव्हा ते यरूशलेम शहराजवळ जैतुनांच्या डोंगराजवळ बेथफगे व बेथानी गावाजवळ आले तेव्हा येशूने आपल्या दोन शिष्यास असे सांगून पाठवले की, 2“समोरच्या गावात जा, गावात जाताच ज्याच्यावर कोणी बसले नाही असे शिंगरु बांधलेले आढळेल. ते सोडा व येथे आणा. 3आणि जर कोणी तुम्हास विचारले, ‘तुम्ही हे का घेऊन जात आहात?’ तर तुम्ही असे म्हणा, ‘प्रभूला याची गरज आहे.’ व तो ते लगेच परत तेथे पाठवील.” 4मग ते निघाले आणि त्यांना रस्त्यावर, दाराशी एक शिंगरु बांधलेले आढळले मग त्यांनी ते सोडले. 5तेथे उभे असलेल्या लोकांपैकी काहीजण त्यांना म्हणाले, “हे शिंगरु सोडून तुम्ही काय करीत आहात?” 6त्यांनी येशू त्यांना काय म्हणाला ते त्यांना सांगितले. तेव्हा त्या लोकांनी त्यास ते शिंगरु नेऊ दिले. 7त्यांनी ते शिंगरु येशूकडे आणले. त्यांनी आपली वस्त्रे त्याच्यावर पांघरली व येशू त्यावर बसला. 8पुष्कळ लोकांनी आपले झगे रस्त्यावर पसरले आणि इतरांनी शेतातून तोडलेल्या डहाळ्या पसरल्या. 9पुढे चालणारे व मागून येणारे घोषणा देऊ लागले, “होसान्ना, प्रभूच्या नावाने येणारा धन्यवादित असो. 10आमचा पूर्वज दावीद याचे येणारे राज्य धन्यवादित असो. स्वर्गात होसान्ना.”
पहिले वाचन
4थकलेल्यांना बोलून धीर कसा द्यावा म्हणून प्रभू परमेश्वराने, मला सुशिक्षितांची जीभ दिली आहे. तो मला सकाळी सकाळी जागे करतो; तो मला शिकविल्याप्रमाणे माझे कान उघडतो. 5प्रभू परमेश्वराने माझा कान उघडला आहे, आणि मीही बंडखोर झालो नाही किंवा मागे वळलो नाही. 6ज्यांनी मला मारले त्यांच्यापुढे मी पाठ केली आणि ज्यांनी माझ्या दाढीचे केस उपटले त्यांच्यापुढे मी आपले गाल केले. लज्जा व थुंकणे यांपासून मी आपले तोंड लपवले नाही. 7कारण प्रभू परमेश्वर मला मदत करील; म्हणून मी लज्जित झालो नाही; माझा प्रभू मला मदत करील. म्हणून मी माझे तोंड गारगोटीसारखे केले, कारण मला माहीत आहे माझी फजिती होणार नाही.
प्रतिसाद स्तोत्र
7सर्व माझ्याकडे बघणारे माझा उपहास करतात; ते माझा अपमान करतात, ते त्यांचे डोके हलवतात. 8ते म्हणतात “तो परमेश्वरावर विश्वास ठेवतो, तर परमेश्वर त्यास सोडवो. त्याने त्यास वाचवावे, कारण तो त्याच्याठायी हर्ष पावतो.” 16“कुत्री” मला वेढून आहेत, मला दुष्टांच्या घोळक्यांनी घेरले आहे. त्यांनी माझ्या हातापायाला छेदले आहे. 17मी माझी सर्व हाडे मोजू शकतो. ते माझ्याकडे टक लावून बघतात. 18त्यांनी माझे कपडे त्यांच्यात वाटून घेतली आहेत, आणि माझ्या कपड्यांसाठी ते चिठ्या टाकतात. 19परमेश्वरा, मला सोडून जाऊ नकोस तुच माझी शक्ती हो, लवकर ये आणि मला मदत कर. 22परमेश्वरा, मी माझ्या भावांना तुझे नाव सांगेन. सभेत मी तुझे गुणगान गाईन. 23जे लोक परमेश्वराचे भय धरतात, ते तुम्ही त्याची स्तुती करा! याकोबाच्या सर्व वंशजांनो, त्यास मान द्या! इस्राएलाच्या वंशजांनो, परमेश्वराची भीती बाळगा आणि त्याचा आदर करा.
दुसरे वाचन
6तो देवाच्या स्वरूपाचा असूनही, त्याने आपण देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही, 7तर स्वतःला रिकामे केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले, 8आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रकट होऊन त्याने स्वतःला लीन केले आणि त्याने मरण आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोसले; येथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले. 9ह्यामुळे देवाने त्यास सर्वांहून उंच केले आहे आणि सर्व नावांहून श्रेष्ठ नाव ते त्यास दिले आहे. 10ह्यात हेतू हा की, स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वीखाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा, 11आणि हे देवपिताच्या गौरवासाठी प्रत्येक जीभेने येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असे कबूल करावे.
शुभवर्तमान
1वल्हांडण व बेखमीर भाकरीच्या सणाच्या दोन दिवस अगोदर मुख्य याजक लोक आणि नियमशास्त्राचे शिक्षक कपटाने त्यास धरून जिवे मारण्याचा मार्ग शोधीत होते. 2कारण ते म्हणत होते “आपण ते सणात करू नये नाही तर लोक दंगा करतील.” 3येशू बेथानी येथे शिमोन कुष्ठरोगी याच्या घरी मेजावर जेवायला बसला असता कोणीएक स्त्री वनस्पतीपासून बनवलेल्या शुद्ध सुगंधी तेलाची फार मौल्यवान अलाबास्त्र कुपी घेऊन आली. तिने अलाबास्त्र कुपी फोडली आणि सुगंधी तेल येशूच्या डोक्यावर ओतले. 4तेथे असलेले काही लोक रागावले, ते एकमेकांना म्हणाले, “सुगंधी तेलाचा असा नाश व्हावा हे बरे नाही. 5कारण हे सुगंधी तेल तीनशे सोन्याच्या नाण्यापेक्षा अधिक किंमतीला विकता आले असते आणि ते पैसे गरीबांना देता आले असते.” असे म्हणून त्यांनी तिच्याविरुद्ध कुरकुर केली. 6पण येशू म्हणाला, “तिला एकटे सोडा. तिला का त्रास देता? तिने माझ्यासाठी एक सुंदर कृत्य केले आहे. 7गरीब तर नेहमी तुमच्याजवळ असतील आणि पाहिजे तेव्हा त्यांना मदत करणे तुम्हास शक्य आहे. परंतु मी नेहमीच तुमच्याबरोबर असेन असे नाही. 8तिला शक्य झाले ते तिने केले. तिने दफनविधीच्या तयारीच्या काळाअगोदरच माझ्या शरीरावर सुगंधी तेल ओतले आहे. 9मी तुम्हास खरे सांगतो, सर्व जगात जेथे कोठे सुवार्तेची घोषणा केली जाईल तेथे तिची आठवण म्हणून तिने जे केले ते नेहमीच सांगितले जाईल.” 10नंतर बारा शिष्यांपैकी एक, यहूदा इस्कर्योत येशूला विश्वासघाताने धरून देण्यासाठी मुख्य याजकांकडे गेला. 11जेव्हा याजकांनी हे ऐकले तेव्हा त्यांना फार आनंद झाला आणि त्यांनी त्यास पैसे देण्याचे वचन दिले. मग यहूदा येशूला धरून त्यांच्या हातात देण्याची संधी पाहू लागला. 12बेखमीर भाकरीच्या सणाच्या पहिल्या दिवशी जेव्हा वल्हांडण सणाचा कोकरा बळी करत असत तेव्हा येशूचे शिष्य त्यास म्हणाले, “आम्ही जातो आणि वल्हांडण सणाच्या भोजनाची तयारी करतो. आम्ही कोठे जाऊन तयारी करावी अशी आपली इच्छा आहे?” 13येशूने आपल्या दोघा शिष्यांना पाठवले आणि त्यांना सांगितले, “शहरात जा आणि पाण्याचे भांडे घेऊन जाणारा मनुष्य तुम्हास भेटेल, त्याच्यामागे जा. 14आणि जेथे तो आत जाईल त्या घराच्या मालकास सांगा, ‘गुरुजी म्हणतात, जेथे मला माझ्या शिष्यांबरोबर वल्हांडण सणाचे भोजन करणे शक्य होईल अशी खोली कोठे आहे?’ 15आणि तो तुम्हास माडीवरची एक मोठी नीटनेटकी केलेली खोली दाखवील, तेथे आपल्यासाठी तयारी करा.” 16शिष्य निघाले आणि ते शहरात गेले आणि येशूने सांगितल्याप्रमाणे त्यांना सर्व आढळले. मग त्यांनी वल्हांडण सणाच्या भोजनाची तयारी केली. 17संध्याकाळ झाली तेव्हा येशू बारा शिष्यांसह आला. 18मेजावर बसून ते जेवीत असता येशू म्हणाला, “मी तुम्हास खरे सांगतो, तुमच्यापैकी जो एकजण मला शत्रूच्या स्वाधीन करून देईल, तो माझ्याबरोबर येथे जेवण करीत आहे.” 19शिष्य अतिशय खिन्न झाले व प्रत्येकजण त्यास म्हणू लागला, “तो मी आहे का?” 20तो त्यांना म्हणाला, “बारा जणांपैकी एक जो माझ्याबरोबर ताटात भाकर बुडवत आहे तोच. 21त्याच्याविषयी पवित्र शास्त्रात जसे लिहिले आहे, तसा मनुष्याचा पुत्र जाईल, परंतु ज्याच्याकडून मनुष्याचा पुत्र धरून दिला जाईल, त्याची केवढी दुर्दशा होणार. तो जन्मला नसता तर ते त्याच्यासाठी बरे झाले असते.” 22ते भोजन करीत असता येशूने भाकर घेतली, उपकारस्तुती केली, ती मोडली आणि त्यांना दिली. तो म्हणाला, “घ्या, हे माझे शरीर आहे.” 23नंतर येशूने प्याला घेतला, उपकारस्तुती केली. तो प्याला त्यांना दिला आणि सर्व त्यातून प्याले. 24मग येशू म्हणाला, “हे माझे नव्या कराराचे रक्त आहे. पुष्कळांसाठी ते ओतले जात आहे. 25मी तुम्हास खरे सांगतो की, देवाच्या राज्यात मी नवा द्राक्षरस पिईन त्या दिवसापर्यंत मी यापुढे द्राक्षाचा उपज पिणार नाही.” 26नंतर त्यांनी उपकारस्तुतीचे गीत गाईले व ते जैतुनाच्या डोंगराकडे निघून गेले. 27येशू शिष्यांना म्हणाला, “तुम्ही सर्व अडखळून पडाल कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, ‘मी मेंढपाळास मारीन आणि मेंढरांची दाणादाण होईल.’ 28परंतु माझे पुनरुत्थान झाल्यावर मी तुमच्यापुढे गालील प्रांतात जाईन.” 29पेत्र म्हणाला, जरी सर्व अडखळले तरी मी अडखळणार नाही. 30मग येशू त्यास म्हणाला, “मी तुला खरे सांगतो, आज रात्री दोनदा कोंबडा आरवण्यापूर्वी तू तीन वेळा मला नाकारशील.” 31तरीही पेत्र अधिक आवेशाने म्हणाला, “जरी मला आपणाबरोबर मरावे लागले तरीसुद्धा मी आपणाला नाकारणार नाही.” आणि इतर सर्वजण तसेच म्हणाले. 32नंतर ते गेथशेमाने म्हटलेल्या जागी आले, तेव्हा येशू त्याच्या शिष्यांना म्हणाला, “मी प्रार्थना करीपर्यंत येथे बसा.” 33येशूने आपल्याबरोबर पेत्र, याकोब व योहान यांना घेतले. दुःख व वेदनांनी त्याचे मन भरून आले. 34तो त्यांना म्हणाला, “माझा जीव मरण्याइतका वेदना सोशीत आहे. येथे राहा व जागृत असा.” 35त्यांच्यापासून थोडे दूर अंतरावर जाऊन तो जमिनीवर पडला आणि त्याने प्रार्थना केली की, “शक्य असेल तर ही घटका मजपासून टळून जावो.” 36तो म्हणाला, “अब्बा-पिता, तुला सर्वकाही शक्य आहे. हा प्याला मजपासून दूर कर तरी माझ्या इच्छेप्रमाणे नाही तर तुझ्या इच्छेप्रमाणे कर.” 37नंतर येशू आला आणि त्यांना झोपलेले पाहिले. तो पेत्राला म्हणाला, “शिमोना, तू झोपी गेलास काय? तासभर तुझ्याच्याने जागे राहवत नाही काय? 38जागृत राहा आणि प्रार्थना करा म्हणजे तुम्ही परीक्षेत पडणार नाही. आत्मा उत्सुक आहे पण देह अशक्त आहे.” 39पुन्हा येशू दूर गेला आणि त्याच गोष्टी उच्चारून त्याने प्रार्थना केली. 40नंतर तो परत आला व त्यास ते झोपलेले आढळले कारण त्यांचे डोळे जड झाले होते आणि त्यास काय उत्तर द्यावे हे त्यांना कळेना. 41तो पुन्हा तिसऱ्या वेळेस आला आणि त्यांना म्हणाला, “तुम्ही अजूनही झोपलेले आणि विश्रांती घेत आहात काय? पुरे झाले! आता वेळ आली आहे. मनुष्याचा पुत्र पाप्यांच्या हाती धरून दिला जात आहे. 42उठा, आपण जाऊ या. पाहा, मला धरून देणारा मनुष्य इकडे येत आहे.” 43आणि येशू बोलत आहे तोपर्यंत बारा जणांपैकी एक यहूदा तेथे आला. त्याच्याबरोबर मुख्य याजक लोक व नियमशास्त्राचे शिक्षक आणि वडील यांनी पाठवलेले अनेक लोक तलवारी व सोटे घेऊन आले. 44घात करून देणाऱ्याने त्यांना अशी खूण दिली होती की, “मी ज्या कोणाचे चुंबन घेईन तोच तो आहे, त्यास धरा आणि सांभाळून न्या.” 45मग यहूदा आल्याबरोबर तो येशूकडे गेला आणि म्हणाला, “रब्बी!” आणि असे म्हणून यहूदाने येशूचे चुंबन घेतले. 46नंतर त्यांनी त्याच्यावर हात टाकले आणि त्यास अटक केली. 47तेथे जवळ उभे असलेल्यांपैकी एकाने आपली तलवार काढली आणि महायाजकाच्या नोकरावर वार करून त्याचा कान कापून टाकला. 48नंतर येशू त्यांना म्हणाला, “मी लुटारू असल्याप्रमाणे तुम्ही तलवारी आणि सोटे घेऊन मला पकडायला बाहेर पडलात काय? 49मी दररोज परमेश्वराच्या भवनात शिकवीत असता तुम्हाबरोबर होतो आणि तुम्ही मला अटक केली नाही. परंतु शास्त्रलेख पूर्ण झालाच पाहिजे.” 50सर्व शिष्य त्यास सोडून पळून गेले. 51एक तरूण मनुष्य अंगावर तागाचे वस्त्र पांघरून त्याच्यामागे चालत होता. त्यांनी त्यास धरले, 52परंतु तो तागाचे वस्त्र टाकून उघडाच पळून गेला. 53नंतर त्यांनी येशूला तेथून महायाजकाकडे नेले आणि सर्व मुख्य याजक लोक, वडील व नियमशास्त्राचे शिक्षक जमा झाले. 54थोडे अंतर ठेवून पेत्र येशूच्या मागे सरळ महायाजकाच्या वाड्यात गेला. तेथे पेत्र कामदारांबरोबर विस्तवाजवळ शेकत बसला. 55मुख्य याजक लोक आणि सर्व यहूदी सभा येशूला जिवे मारण्यासाठी पुरावा गोळा करण्याचा प्रयत्न करीत होते. परंतु त्यांना काही मिळेना. 56पुष्कळांनी त्याच्याविरुध्द खोटी साक्ष दिली. परंतु त्यांची साक्ष सारखी नव्हती. 57नंतर काहीजण उभे राहीले आणि त्याच्याविरुध्द साक्ष देऊन म्हणाले, आम्ही त्यास असे म्हणताना ऐकले की, 58“हाताने बांधलेले परमेश्वराचे भवन मी पाडून टाकीन आणि हातांनी न बांधलेले असे दुसरे भवन तीन दिवसात उभारीन.” 59परंतु तरीही याबाबतीत त्यांच्या साक्षीत मेळ नव्हता. 60नंतर महायाजक त्यांच्यापुढे उभा राहिले आणि त्याने येशूला विचारले, “तू उत्तर देणार नाहीस काय? हे लोक तुझ्याविरुद्ध आरोप करताहेत हे कसे?” 61परंतु येशू गप्प राहिला. त्याने उत्तर दिले नाही. नंतर महायाजकाने पुन्हा विचारले, “धन्यवादिताचा पुत्र ख्रिस्त तो तू आहेस काय?” 62येशू म्हणाला, “मी आहे, आणि तुम्ही मनुष्याच्या पुत्राला सर्वसमर्थ देवाच्या उजवीकडे बसलेले व आकाशातील मेघांसह येताना पाहाल.” 63महायाजकाने आपले कपडे फाडले आणि म्हणाला, “आपणाला अधिक साक्षीदारांची काय गरज आहे? 64तुम्ही निंदा ऐकली आहे. तुम्हास काय वाटते?” सर्वांनी त्यास मरणदंड योग्य आहे अशी शिक्षा फर्मावली. 65काहीजण त्याच्यावर थुंकू लागले. त्याचे तोंड झाकून बुक्क्या मारू लागले व त्यास म्हणू लागले, “ओळख बरे, तुला कोणी मारले?” कामदारांनी त्यास ताब्यात घेतले आणि मारले. 66पेत्र अंगणात असतानाच महायाजकाच्या दासीपैकी एक तेथे आली. 67आणि तिने पेत्राला शेकताना पाहिले. तेव्हा तिने त्याच्याकडे निरखून पाहिले व म्हणाली, “तू सुद्धा नासरेथकर येशूबरोबर होतास ना?” 68परंतु पेत्राने ते नाकारले आणि म्हणाला, “तू काय म्हणतेस हे मला कळत नाही व समजतही नाही.” पेत्र अंगणाच्या दरवाजाच्या देवडीवर गेला आणि कोंबडा आरवला. 69जेव्हा दासीने त्यास पाहिले तेव्हा जे लोक तेथे होते त्यांना ती म्हणू लागली की, “हा मनुष्य त्यांच्यापैकीच एक आहे.” 70पेत्राने पुन्हा ते नाकारले. नंतर थोड्या वेळाने तेथे उभे असलेले लोक पेत्राला म्हणाले, “खात्रीने तू त्यांच्यापैकी एक आहेस, कारण तू सुद्धा गालीली आहेस.” 71पेत्र निर्भत्सना करीत व शपथ वाहून म्हणाला, “तुम्ही ज्या मनुष्याविषयी बोलत आहात त्यास मी ओळखत नाही!” 72आणि लगेच दुसऱ्यांदा कोंबडा आरवला, “दोन वेळा कोंबडा आरवण्यापूर्वी तू मला तीन वेळा नाकारशील,” असे येशू म्हणाला होता याची पेत्राला आठवण झाली व तो अतिशय दुःखी झाला व मोठ्याने रडला. 15:1पहाट होताच मुख्य याजक लोक, वडीलजन, नियमशास्त्राचे शिक्षक व सर्व यहूदी सभा यांनी मसलत करून येशूला बांधून पिलाताच्या ताब्यात दिले. 2पिलाताने त्यास विचारले, तू यहूद्यांचा राजा आहेस काय? येशूने उत्तर दिले, “तू म्हणतोस तसेच.” 3मुख्य याजकांनी पुष्कळ बाबतीत येशूवर आरोप ठेवले. 4मग पिलाताने त्यास पुन्हा प्रश्न विचारला, तू उत्तर देणार नाहीस काय? पाहा, ते कितीतरी गोष्टींविषयी तुझ्यावर आरोप करत आहेत! 5पण तरीही येशूने उत्तर दिले नाही म्हणून पिलाताला आश्चर्य वाटले. 6वल्हांडण सणाच्या वेळी ते कोणत्याही एका कैद्याच्या सुटकेची मागणी करीत असत. त्यास पिलात रिवाजाप्रमाणे लोकांसाठी सोडत असे. 7बरब्बा नावाचा एक मनुष्य, बंडखोरांबरोबर तुरुंगात होता. त्याने दंगलीमध्ये खून केल्याबद्दल त्यास पकडण्यात आले होते. 8लोक आले आणि पिलाताला तो नेहमी त्यांच्यासाठी करीत असे तसे करायला लावले. 9पिलाताने विचारले, तुमच्यासाठी यहूद्यांच्या राजाला सोडावे अशी तुमची इच्छा आहे काय? 10पिलात असे म्हणाला कारण त्यास माहीत होते की, द्वेषामुळे मुख्य याजकांनी येशूला धरुन दिले होते. 11परंतु पिलाताने त्याच्याऐवजी बरब्बाला सोडावे असे मुख्य याजकांनी लोकांस चिथवले. 12परंतु पिलात त्यांना पुन्हा म्हणाला, तर मग तुम्ही ज्याला यहूद्यांचा राजा म्हणता त्याचे मी काय करावे अशी तुमची इच्छा आहे? 13ते पुन्हा मोठ्याने ओरडले, त्यास वधस्तंभावर खिळा! 14पिलाताने पुन्हा विचारले, का? त्याने कोणता गुन्हा केला आहे? ते सर्व अधिकच मोठ्याने ओरडले, त्यास वधस्तंभावर खिळा! 15पिलाताला लोकांस खूश करायचे होते म्हणून त्याने त्यांच्यासाठी बरब्बाला सोडले आणि येशूला फटके मारून वधस्तंभावर खिळण्यासाठी शिपायांच्या स्वाधीन केले. 16शिपायांनी येशूला राज्यपालाच्या वाड्यात, प्रयतोर्यमात म्हणजे कचेरीत नेले आणि त्यांनी सैनिकांची एक तुकडीच एकत्र बोलावली. 17त्यांनी त्याच्या अंगावर जांभळा झगा घातला व काटयाचा मुकुट करून त्यास घातला. 18ते त्यास मुजरा करू लागले आणि म्हणू लागले, यहूद्यांच्या राजाचा जयजयकार असो. 19त्यांनी वेताच्या काठीने वारंवार त्याच्या डोक्यावर मारले. त्याच्यावर थुंकले आणि गुडघे टेकून त्यास वंदन केले. 20त्यांनी त्याची थट्टा केल्यावर त्याच्या अंगावरून जांभळा झगा काढून घेतला व त्याचे स्वतःचे कपडे त्यास घातले. नंतर वधस्तंभावर खिळणे शक्य व्हावे म्हणून ते त्यास बाहेर घेऊन गेले. 21वाटेत त्यांना कुरेनेकर शिमोन नावाचा एक मनुष्य दिसला. तो आलेक्सांद्र व रूफ यांचा पिता होता व आपल्या रानातून घरी परत चालला होता. मग सैनिकांनी त्यास जबरदस्तीने येशूचा वधस्तंभ वहावयास लावले. 22आणि त्यांनी येशूला गुलगुथा म्हणजे कवटीची जागा म्हटलेल्या ठिकाणी आणले. 23त्यांनी त्यास बोळ मिसळलेला द्राक्षरस दिला परंतु त्याने तो घेतला नाही. 24त्यांनी त्यास वधस्तंभावर खिळले, कोणी कोणते कपडे घ्यावे यासाठी त्यांनी चिठठ्या टाकल्या व त्याचे कपडे वाटून घेतले. 25त्यांनी त्यास वधस्तंभावर खिळले तेव्हा दिवसाचा तिसरा तास झाला होता. 26आणि त्याच्यावर त्याच्या दोषारोपाचा लेख, “यहूद्यांचा राजा” असा लिहिला होता. 27त्यांनी त्याच्याबरोबर दोन लुटारूंना एकाला त्याच्या उजवीकडे व दुसऱ्याला त्याच्या डावीकडे वधस्तंभावर खिळले होते. 29जवळून जाणारे लोक त्याची निंदा करीत होते. ते आपली डोकी हलवून म्हणाले, अरे! परमेश्वराचे भवन पाडून ते तीन दिवासात बांधणारा तो तूच ना! 30वधस्तंभावरुन खाली ये आणि स्वतःला वाचव. 31तसेच मुख्य याजकांनी, नियमशास्त्राच्या शिक्षकांनी येशूची थट्टा केली आणि एकमेकास म्हणाले, त्याने दुसऱ्यांचे तारण केले पण त्यास स्वतःचा बचाव करता येत नाही! 32या इस्राएलाचा राजा ख्रिस्त याला वधस्तंभावरुन खाली येऊ द्या मग आम्ही ते पाहू आणि त्याच्यावर विश्वास ठेवू आणि जे त्याच्याबरोबर वधस्तंभावर खिळले होते त्यांनी देखील त्याचा अपमान केला. 33दुपारची वेळ झाली. सगळ्या देशभर अंधार पडला, तो अंधार दुपारी तीन वाजेपर्यंत राहिला. 34मग तीन वाजता येशू मोठ्याने आरोळी मारून म्हणाला, “एलोई, एलोई, लमा सबकथनी, म्हणजे, माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा त्याग का केलास?” 35जवळ उभे असलेल्या काहीजणांनी हे ऐकले तेव्हा ते म्हणाले, ऐका, तो एलीयाला बोलवत आहे. 36एकजण धावत गेला. त्याने स्पंज आंबेत बुडवून भरला. वेताच्या काठीवर ठेवला व तो येशूला पिण्यास दिला आणि म्हणाला, थांबा! एलीया येऊन त्यास खाली उतरवायला येतो की काय हे आपण पाहू. 37मग मोठ्याने आरोळी मारून येशूने प्राण सोडला. 38तेव्हा परमेश्वराच्या भवनातील पडदा वरपासून खालपर्यंत फाटला व त्याचे दोन भाग झाले. 39येशूच्या पुढे उभे आलेल्या अधिकाऱ्याने जेव्हा त्याची आरोळी ऐकली आणि तो कसा मरण पावला हे पाहिले तेव्हा तो म्हणाला, खरोखर हा मनुष्य देवाचा पुत्र होता. 40तेथे असलेल्या काही स्त्रिया दुरून पाहत होत्या. त्यांच्यामध्ये मग्दालीया नगराची मरीया, याकोब व योसेफ यांची आई मरीया व सलोमी या होत्या. 41येशू जेव्हा गालील प्रांतात होता तेव्हा या स्त्रिया त्याच्यामागे जात व त्याची सेवा करीत असत. याशिवाय त्याच्याबरोबर यरूशलेम शहरापर्यंत आलेल्या इतर अनेक स्त्रियाही होत्या. 42त्या सुमारास संध्याकाळ झाली होती आणि तो तयारीचा म्हणजे शब्बाथाच्या आधीचा दिवस होता. 43योसेफ अरिमथाईकर न्यायसभेचा माननीय सभासद होता व तो सुद्धा देवाचे राज्य येण्याची वाट पाहत होता. तो योसेफ धैर्याने पिलाताकडे गेला आणि त्याने येशूचे शरीर मागितले. 44येशू इतक्या लवकर कसा मरण पावला याचे पिलाताला आश्चर्य वाटले. मग त्याने सेनाधिकारी बोलावले आणि त्यांना विचारले. येशूला मरून बराच वेळ झाला की काय? 45सेनाधिकाऱ्याकडून ते कळाल्यावर, तेव्हा त्याने ते शरीर योसेफाला दिले. 46मग योसेफाने तागाचे वस्त्र विकत आणले आणि येशूला वधस्तंभावरुन खाली काढले व त्यास तागाच्या वस्त्रात गुंडाळून ते त्याने खडकात खोदलेल्या कबरेत ठेवले. नंतर त्याने कबरेच्या तोंडावर दगड बसविला. 47येशूला कोठे ठेवले हे मग्दालीया नगराची मरीया आणि याकोब व योसेफ यांची आई मरीया पाहत होत्या.
सामान्य रोमन दिनदर्शिका; बिशपांची परिषद काही सण (प्रभूचे प्रकटीकरण, स्वर्गारोहण, ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त) रविवारी हलवू शकते किंवा स्वतःचे सण जोडू शकते. पाठसंग्रह: रविवारचे चक्र B, आठवड्याच्या दिवसांचे वर्ष I.
स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क