Bible Explorer अ‍ॅप मिळवा

शोधा › राजे आणि इतिहास शेजारी शेजारी › शलमोन

राजे आणि इतिहास शेजारी शेजारी · शलमोन

शलमोन लोकांना आशीर्वाद देतो

1 राजे 8:12–21 · 2 इति 6:1–11

1 राजे

1 राजे 8:12–21

12तेव्हा शलमोन म्हणाला, “परमेश्वर म्हणाला आहे की, मी निबीड अंधारात वस्ती करीन.

13परंतु तुला युगानुयूग राहण्यासाठी, हे मंदिर मी तुझ्यासाठी बांधले आहे.”

14इस्राएल लोकांकडे वळून राजाने त्यांना आशीर्वाद दिला, तेव्हा ती सर्व मंडळी उठून उभी राहीली.

15तो म्हणाला, “इस्राएलाचा परमेश्वर देव धन्य असो! माझे वडिल दावीद यांना म्हटल्याप्रमाणे त्याने स्वत:च्या हाताने ते पूर्ण केले परमेश्वर माझ्या वडिलांना म्हणाला,

16माझ्या इस्राएली प्रजेला मी मिसरमधून बाहेर आणले. पण या वंशातील कुठलेही नगर मी अजून माझे नाव राखण्यासाठी माझे मंदिर उभारण्यासाठी निवडले नाही. तसेच इस्राएल लोकांचा नेता म्हणून अजून कोणाची निवड केली नाही. पण आता माझा जेथे सन्मान होईल असे यरूशलेम हे नगर मी निवडले आहे, आणि इस्राएल लोकांचा अधिपती म्हणून मी दाविदाची निवड केली आहे.”

17इस्राएलाच्या परमेश्वर देवाच्या सन्मानार्थ मंदिर बांधावे असे, माझे वडिल दावीद यांच्या फार मनात होते.

18पण परमेश्वर माझे वडिल दावीद यांना म्हणाला, “माझ्या नामासाठी मंदिर उभारण्याची तुझ्या मनातील इच्छा मी जाणून आहे, अशी इच्छा तू बाळगलीस ते चांगले आहे.

19पण तुझ्या हस्ते हे मंदिराचे काम होणार नाही, तर तुझ्या पोटी जो पुत्र होईल तो माझ्या नामासाठी हे मंदिर बांधील.

20परमेश्वर जे वचन बोलला ते त्याने खरे करून दाखवले आहे. आता माझे वडिल दावीद याच्या गादीवर मी आलो आहे. इस्राएलाच्या परमेश्वर देवासाठी हे मंदिरही मी बांधले आहे.

21त्यामध्ये पवित्र कराराच्या कोशासाठी एक जागा करवून घेतली आहे. त्या कोशामध्ये परमेश्वराने आपल्या पूर्वजांना मिसरमधून बाहेर आणले, तेव्हा केलेला तो करार यामध्ये आहे.”

2 इतिहास

2 इति 6:1–11

1मग शलमोन म्हणाला, “मी निबीड अंधकारात वास करीन असे परमेश्वर म्हणाला आहे.

2परमेश्वरा, तुझ्या निवासासाठी मी हे विशाल घर बांधले आहे, तेथे तू चिरकाल राहावेस.”

3मग शलमोनाने मागे वळून सर्व इस्राएल समुदायांना आशीर्वाद दिला. आणि ते सर्व उभे राहीले.

4शलमोन पुढे म्हणाला, “इस्राएलाच्या परमेश्वर देवाचे स्तवन करा. माझे पिता दावीद यांच्याशी तो जे बोलला ते त्याने खरे करून दाखवले आहे. परमेश्वर देवाने असे वचन दिले होते.”

5मी माझ्या लोकांस मिसरातून बाहेर आणल्यानंतर इस्राएल वंशातील कोणतेही नगर मी माझ्या नावाचे घर तिथे बांधले जावे म्हणून निवडले नाही. तसेच, माझ्या इस्राएल लोकांचे आधिपत्य करण्यासाठी कोणाएकाची निवडही केली नाही.

6पण आता यरूशलेम हे स्थान माझे नाव तेथे रहावे यासाठी मी निवडले आहे आणि दावीदाला इस्राएल लोकांवर नेमले आहे.

7“इस्राएलाचा देव परमेश्वर याच्या प्रीत्यर्थ माझे पिता दावीद यांना मंदिर बांधायचे होते.

8पण परमेश्वर त्यांना म्हणाला, ‘दावीद माझ्या नावाने मदिर बांधायचा विचार तुझ्या मनात आला हे चांगले झाले.

9पण ते तू बांधू शकत नाहीस पण तुझा पुत्र जो तुझ्यापासून जन्मला तो हे काम करील.’

10आता परमेश्वराने कबूल केले तसेच झाले आहे व माझे पिता दावीद यांच्या जागी मी इस्राएल लोकांचा राजा झालो आहे. ‘मी इस्राएलचा राजा आहे असे होईल’ हे वचन परमेश्वराने दिले होते, आणि मी इस्राएलाचा देव परमेश्वर याच्या नावाने मंदिर बांधले आहे.

11मी कराराचा कोश मंदिरात ठेवला आहे. इस्राएलच्या लोकांशी परमेश्वराने केलेला करार या कोशात आहे.”

खूण केलेले: प्रत्येक वृत्तांतात असलेले शब्द, तुम्ही वाचता त्या भाषांतरात. सर्वात वारंवार येणारे शब्द (“आणि”, “तो”) खूण केलेले नाहीत; दुसऱ्या रूपातील शब्दाची खूण कदाचित होणार नाही.

स्रोत: OpenBible.info, CC BY 4.0 · इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क