Bible Explorer अ‍ॅप मिळवा

शोधा › राजे आणि इतिहास शेजारी शेजारी › शलमोन

राजे आणि इतिहास शेजारी शेजारी · शलमोन

समर्पणाच्या वेळी शलमोनाची प्रार्थना

1 राजे 8:22–53 · 2 इति 6:12–42

1 राजे

1 राजे 8:22–53

22शलमोन परमेश्वराच्या वेदीपुढे उभा राहिला व इस्राएलाच्या सर्व मंडळीसमोर दोन्ही हात आकाशाच्या दिशेने पसरले,

23तो म्हणाला, हे इस्राएलाच्या परमेश्वर देवा, तुजसमान दुसरा कोणी आकाशात किंवा पृथ्वीतलावर नाही. तू हा करार केलास, कारण तुझे आमच्यावर प्रेम आहे. तू आपला करार पाळतोस, जे सेवक तू दाखवलेल्या मार्गाने जातात त्यांच्याविषयी तू दयाळू आणि एकनिष्ठ असतोस.

24माझे वडिल दावीद या आपल्या सेवकाला तू वचन दिलेस, आणि ते खरे करून दाखवलेस. आपल्या मुखाने तू वचन दिलेस आणि तुझ्याच हाताने ते पूर्ण केले आहे; अशी आज वस्तुस्थिती आहे.

25माझ्या वडिलांना दिलेली इतर वचनेही हे इस्राएलाच्या देवा, परमेश्वरा, तू खरी करून दाखव तू म्हणाला होतास, दावीद, तुझ्याप्रमाणेच तुझ्या मुलांनीही माझा मार्ग अनुसरला, तर तुमच्या घराण्यातील पुरूषांची परंपरा कधीही खुंटावयाची नाही, एकजण नेहमी इस्राएलाच्या राजासनावर राहील.

26परमेश्वरा, इस्राएलाच्या देवा, हा माझे वडिल दाविदाला दिलेला शब्दही खरा ठरु दे अशी माझी प्रार्थना आहे.

27पण परमेश्वरा, तू खरोखरच पृथ्वीवर राहशील का? हे विस्तीर्ण आकाश आणि स्वर्ग यातही तू मावत नाहीस. तेव्हा हे मी बांधलेले मंदिरही तुझ्यासाठी कसे पुरेल!

28पण कृपाकरून माझी प्रार्थना व कळकळीची विनंती ऐक. मी तुझा सेवक आणि तू माझा परमेश्वर देव आहेस. आजची ही माझी प्रार्थना ऐक.

29माझ्या नावाचा निवास याठिकाणी होईल, असे ज्या ठिकाणाविषयी तू म्हटले त्या या ठिकाणाकडे रात्रंदिवस या मंदिराकडे तुझी दृष्टी असू दे, जी प्रार्थना तुझा सेवक या स्थळाकडे तोंड करून करीत आहे ती ऐक.

30परमेश्वरा, इस्राएलाचे सर्व लोक आणि मी इथे येऊन तुझी प्रार्थना करू तेव्हा त्या प्रार्थना ऐक. तुझे वास्तव्य स्वर्गात आहे हे आम्हास माहित आहे. तेथे त्या तुझ्या कानावर पडो आणि तू आम्हास क्षमा कर.

31जर एखादया व्यक्तीने आपल्या शेजाऱ्याविरूद्ध काही अपराध केल्यास त्यास शपथ घ्यावयास लावल्यास व या तुझ्या वेदीसमोर घेतली.

32तेव्हा ती तू स्वर्गातून ऐकून निवाडा कर. जर तो अपराधी असेल तर त्यास त्याप्रमाणे शिक्षा कर. आपल्या सेवकाचा न्याय करून दुष्टास दुष्ट ठरव व त्याची कृत्ये त्याच्या माथी येवो आणि धार्मिकास निर्दोष ठरवून त्याच्या निर्दोषतेप्रमाणे त्यास बक्षिस देऊन त्याचे समर्थन कर.

33जेव्हा इस्राएल लोकांचा तुझ्याविरूद्धच्या पापामुळे शत्रूंच्या हातून पराभव होईल व ते त्यांच्या पापापासून मागे फिरतील, तुझ्या नावाने पश्चाताप करतील, प्रार्थना विनंती करून या मंदिरात क्षमा मागतील;

34तेव्हा स्वर्गातून तू त्यांचे ऐक, तुझे लोक इस्राएल यांच्या पापाची क्षमा कर आणि जो देश तू त्यांच्या पूर्वजांना देऊ केला त्यामध्ये त्यांना तू परत आण.

35त्यांनी तुझ्याविरूद्ध पाप केल्यामुळे आकाशकपाटे बंद झाली व पाऊस पडला नाही. तेव्हा ते जर या ठिकाणाकडे तोंड करून तुझी प्रार्थना करतील व तुझे नाव कबूल करतील व तू दीन केल्यामुळे तुझ्याकडे वळतील,

36तेव्हा स्वर्गातून इस्राएली लोक व तुझे सेवक त्यांची विनवणी ऐकून त्यांच्या पापांची क्षमा कर. त्यांना योग्य मार्गाने चालायला शिकव, आणि परमेश्वरा, तू त्यांना वतन म्हणून दिलेल्या भूमीवर पाऊस पडू दे.

37कधी जमीन ओसाड होऊन त्यावर कोणतेही पीक येणार नाही, किंवा एखादा साथीचा रोग पसरेल. कधी टोळधाड, भेरड, घुली येऊन सगळे पीक फस्त करतील. कधी शत्रूच्या हल्ल्याला काही ठिकाणचे लोक बळी पडतील, किंवा एखाद्या दुखण्याने लोक हैराण होतील.

38असे कधी झाल्यास, एकाने जरी आपल्या पापाची कबुली दिली किंवा सर्व इस्राएली लोकांनी आपल्या जीवाला होणारा त्रास ओळखून मंदिराकडे हात पसरुन क्षमा याचना करतील.

39तर त्यांची प्रार्थना स्वर्गातून ऐकून त्यांना क्षमा कर आणि कृती कर. लोकांच्या मनात काय आहे हे फक्त तूच जाणतोस. तेव्हा प्रत्येकाचा योग्य न्यायनिवाडा कर.

40आमच्या पूर्वजांना तू जी भूमी दिलीस तिथे लोकांनी त्यांचे वास्तव्य तिथे असेपर्यंत तुझा आदर ठेवून व भय धरुन रहावे म्हणून एवढे कर.

41इस्राएली लोकांशिवाय तुझ्या नावासाठी परदेशाहून कोणी आला,

42कारण तुझे महान नाव बलशाली हात व पुढे केलेला बाहू ही सर्व त्यांच्या ऐकण्यात येणारच, व त्यांनी या मंदिराकडे येऊन प्रार्थना केली,

43तर तू स्वर्गातून त्यांचीही प्रार्थना ऐक. त्यांच्या मनासारखे कर. म्हणजे इस्राएली लोकांप्रमाणेच या लोकांसही तुझ्याबद्दल भय आणि आदर वाटेल. तुझ्या सन्मानार्थ हे मंदिर मी बांधले आहे हे मग सर्व लोकांस कळेल.

44परमेश्वरा, कधी तू आपल्या लोकांस शत्रूवर चढाई करायचा आदेश देशील. तेव्हा तुझे लोक तू निवडलेल्या या नगराकडे आणि तुझ्या सन्मानार्थ मी बांधलेल्या मंदिराकडे वळतील. आणि ते तुझ्याकडे प्रार्थना करतील.

45तेव्हा तू आपल्या स्वर्गातून त्यांची प्रार्थना विंनती ऐक आणि त्यांना मदत कर.

46जर लोकांच्या हातून तुझ्याविरूद्ध काही पाप घडले, (कारण पाप करत नाही असा कोणीच नाही) अशावेळी त्यांच्यावर संतापून तू त्यांचा शत्रूकडून पराभव करवशील. शत्रू मग त्यांना कैदी करून दूरदेशी नेतील.

47तर बंदी करून नेलेल्या देशात गेल्यावर मग हे लोक झाल्या गोष्टी विचारात घेतील. त्यांना आपल्या पापांचा पश्चाताप करतील तुझ्याकडून दयेची अपेक्षा करतील आणि ते प्रार्थना करतील, आम्ही चुकलो, आमच्या हातून दुष्टाई घडली अशी ते कबुली देतील.

48बंदी करून नेलेल्या शत्रुंच्या देशात असताना ते जर अंत:करणपूर्वक तुझ्याकडे वळले आणि तू त्यांच्या पूर्वजांना दिलेल्या भूमीच्या दिशेने, तू निवडलेल्या या नगराच्या दिशेने आणि तुझ्या सन्मानार्थ मी बांधलेल्या या मंदिराच्या दिशेने त्यांनी प्रार्थना केली तर

49तू ती आपल्या स्वर्गातील ठिकाणाहून त्यांची प्रार्थना व विनंती ऐक व त्यांस न्याय दे.

50त्यांच्या सर्व पापांची क्षमा कर. तुझ्याविरुध्द पाप केल्याबद्दल त्यांना क्षमा कर. त्यांच्या शत्रूसमोर त्यांच्या वर दया दाखव, म्हणजे ते त्यांच्यावर दया करतील,

51ते तुझे लोक आहेत हे आठव तू त्यांना मिसरमधून बाहेर आणलेस जसे काही लोखंड वितळविण्याचा तापलेल्या भट्टीतून बाहेर काढले हेच तुझे वतन होत.

52“तर तुझे डोळे तुझ्या सेवकाच्या विनंतीकडे व तुझ्या या इस्राएल लोकांची प्रार्थना कृपाकरून ऐक, ते तुझा धावा करतील त्यांच्या हाकेला प्रतिसाद दे.

53प्रभू परमेश्वरा, पृथ्वीतलावरील सर्व मनुष्यांमधून निवड करून तू यांना वेगळे केले आहेस. तू तुझे अभिवचन दिले आहेस. त्यानुसार हे लोक तुझे वतन व्हावे म्हणून मिसरमधून तू आमच्या पूर्वजांना बाहेर नेलेस तेव्हा आपला सेवक मोशे याच्याकडून हे कार्य करवून घेतलेस.”

2 इतिहास

2 इति 6:12–42

12शलमोन, परमेश्वराच्या वेदीसमोर उभा राहिला. तेथे जमलेल्या सर्व इस्राएल लोकांपुढे तो उभा होता. त्याने आपले बाहू पसरले.

13बाहेरच्या दालनात प्रत्येकी पाच हात लांब, पाच हात रुंद आणि तीन हात उंच असलेला एक पितळी चौरंग शलमोनाने तयार केला व मंडपाच्या मध्यभागी ठेवला. त्यावर चढून तो समस्त इस्राएल लोकांसमोर गुडघे टेकून बसला आणि त्याने आकाशाकडे हात पसरले.

14शलमोन म्हणाला, “हे इस्राएलाच्या परमेश्वर देवा, स्वर्गात किंवा पृथ्वीवर तुझ्यासारखा दुसरा कोणीही देव नाही. तुझे जिवाभावाने अनुसरण करणाऱ्या आणि योग्य आचरण करणाऱ्या तुझ्या सेवकांना तुझे प्रेम आणि तुझी कृपा यांचे दिलेले वचन पाळणारा तू परमेश्वर आहेस.”

15दावीद याला दिलेले वचन तू पाळलेस. दावीद माझे पिता होते तू आपल्या मुखानेच त्यांना वचन दिलेस आणि आज आपल्या हाताने ते प्रत्यक्षात आणले आहेस.

16तसेच आता, हे इस्राएलच्या परमेश्वर देवा, दावीद या सेवकाला दिलेले हे वचनही खरे कर. तू असे म्हणाला होतास: माझ्यासमक्ष इस्राएलच्या राजासनावर न चुकता तुझ्या वंशातीलच कोणीतरी येत जाईल. मात्र तुझ्या मुलांनी माझ्या नियमशास्त्राप्रमाणे काटेकोर वर्तन केले पाहिजे. तुझ्याप्रमाणेच त्यांनीही माझा करार पाळला पाहिजे.

17तेव्हा आता, हे इस्राएलाच्या परमेश्वर देवा, तुझे हे शब्द खरे होऊ देत. आपला सेवक दावीद याला तू तसा शब्द दिला आहेस.

18परमेश्वर पृथ्वीवर लोकांमध्ये वस्ती करु शकत नाही ही गोष्ट, हे देवा, आम्हास माहीत आहे. आकाश आणि त्या पुढचे अवकाशही तुला सामावून घ्यायला असमर्थ आहेत. या मी बांधलेल्या मंदिरातही तू मावू शकत नाहीस हे आम्ही जाणतो

19पण माझी एवढी प्रार्थना ऐक. मी करुणा भाकतो तिजकडे लक्ष दे. परमेश्वर देवा, माझी हाक ऐक. मी तुझा एक दास आहे.

20या मंदिराकडे अहोरात्र तुझी दृष्टी असो असे मी तुला कळकळीने विनवतो. तुझे नाव इथे राहील असे तू म्हणाला होतास, मी या मंदिराकडे तोंड करून प्रार्थना करीन तेव्हा ती तू ऐक.

21तुझ्या इस्राएल लोकांनी तसेच मी केलेल्या प्रार्थना तू ऐक. या प्रार्थनास्थळाकडे तोंड करून आम्ही प्रार्थना करु तेव्हा तिच्याकडे तू लक्ष दे. तुझ्या आकाशातील स्थानावरुन इथे तुझे लक्ष असू दे. आमच्या प्रार्थना ऐक आणि आम्हास क्षमा कर.

22एखाद्याने आपल्या शेजाऱ्याचा काही अपराध केल्याचा आरोप त्याच्यावर आला आणि तो तुझे नाव घेऊन आपण निर्दोष आहोत असे सांगू लागला तर तो वेदीसमोर तसे शपथ घेऊन सांगत असतांना,

23तू स्वर्गातून ऐक तुझ्या सेवकाचा योग्य न्यायनिवाडा कर ज्याच्या हातून अपराध घडला असेल त्यास शासन कर त्याच्यामुळे इतरांना जसा त्रास झाला तसाच याला होऊ दे आणि ज्याचे वागणे उचित होते तो निर्दोष असल्याचे सिध्द कर. त्याचे प्रतिफळ त्यास दे.

24इस्राएल लोकांनी तुझ्याविरुध्द पाप केल्यामुळे जर शत्रूंनी तुझ्या इस्राएल लोकांचा पराभव केला आणि अशावेळी इस्राएल लोक तुझ्याकडे येऊन तुझ्या नावाने प्रार्थना करु लागले, या मंदिरात येऊन विनवणी करु लागले तर.

25तू स्वर्गातून ते ऐकून इस्राएल लोकांच्या पापांची क्षमा कर. तू त्यांना आणि त्यांच्या पूर्वजांना दिलेल्या भूमीवर त्यांना पुन्हा परत आण.

26जर इस्राएल लोकांनी पाप केल्यामुळे आकाश बंद होऊन पर्जन्यवृष्टी झालीच नाही त्यावेळी पश्चातापाने इस्राएल लोकांनी मंदिराच्या दिशेने पाहत प्रार्थना केली, आणि तू केलेल्या शिक्षेमुळे अपराध करणे थांबवले,

27तर स्वर्गातून त्यांचे ऐक आणि त्यांच्या पापांची क्षमा कर. इस्राएल लोक तुझे दास आहेत. त्यांना जगण्याचा सन्मार्ग दाखव. तुझ्या भूमीवर पाऊस पाड. कारण हा देश तू आपल्या लोकांस वतन करून दिला आहे.

28कदाचित् एखादयावेळी दुष्काळ, भयानक साथीचा रोग, किंवा पिकांवर रोग अथवा टोळ, नाकतोडे यांची धाड अशी काही आपत्ती किंवा लोकांच्या राहत्या नगरांवर शत्रूंचा हल्ला झाल्यास, रोगराई आल्यास,

29तुझे इस्राएल लोक तुझी करुणा भाकतील आणि प्रार्थना करतील. जो कोणी आपले क्लेश किंवा दु:ख ओळखून, या मंदिराच्या दिशेने बाहू उभारुन प्रार्थना करु लागेल.

30तेव्हा तू ते स्वर्गातून ऐक. जेथे तू राहतोस. तू ऐकून त्यांना क्षमा कर. प्रत्येका मनुष्याचा मनोदय तुला माहीत असल्यामुळे ज्याला जे योग्य असेल त्यास ते दे. मानवाचे मन फक्त तूच ओळखतोस.

31असे झाले म्हणजे तू आमच्या पूर्वजांना दिलेल्या या भूभागावर त्यांची वस्ती असेपर्यंत लोक तुझे भय बाळगतील आणि तुझे ऐकतील.

32जर तुझ्या इस्राएल प्रजेपेक्षा वेगळा असा कोणी उपराही कदाचित् दूर देशाहून इथे आलेला असेल. तुझ्या नावाची महती, आणि तुझे सामर्थ्यशाली बाहू यांच्यामुळे तो आलेला असेल. त्याने येऊन या मंदिराकडे पाहत प्रार्थना केली तर,

33तू ती स्वर्गातून ऐक. त्याची मागणी पुरव. म्हणजे इस्राएल लोकांप्रमाणेच पृथ्वीवरील इतर लोकांसही तुझ्या नावाचा महिमा कळेल आणि त्यांना तुझ्याविषयी आदर वाटेल. व मी बांधलेले हे मंदिर तुझ्या नावाचे आहे ते पृथ्वीवरील सर्व लोकांस कळेल.

34शत्रूंशी लढावयास जर तू आपल्या लोकांस दुसऱ्या ठिकाणी पाठवशील आणि तिथून ते तू निवडलेल्या या नगराच्या आणि मी बांधलेल्या मंदिराच्या दिशेने पाहत प्रार्थना करु लागतील.

35तर तू स्वर्गातून त्यांची प्रार्थना ऐक आणि त्यांच्या विनंती प्रमाणे त्यांना मदत कर.

36पाप कोणाच्या हातून होत नाही? तेव्हा लोक तुझ्याविरुध्द पाप करतील जेव्हा तुझा त्यांच्यावर कोप होईल. तू शत्रूंकरवी त्यांचा पाडाव करशील, बंदी म्हणून त्यांना बळजबरीने इथून दूरच्या किंवा एखाद्या जवळच्या ठिकाणी नेले जाईल.

37पण तिथे त्यांचे हृदयपरिवर्तन होऊन, परभूमीत कैदी होऊन पडलेले ते विनवणी करून म्हणतील, आम्ही चुकलो, आमच्या हातून पाप घडले आहे. आम्ही दुराचरण केले आहे.

38असतील तिथून ते अंतःकरणातून तुला शरण येतील. या देशाच्या तू त्याच्या पूर्वजांना दिलेल्या देशाच्या दिशेने आणि तू निवडलेल्या नगराच्या दिशेने पाहत ते प्रार्थना करतील. तुझ्या नावाकरिता मी बांधलेल्या या मंदिराच्या दिशेने पाहत ते प्रार्थना करतील.

39तेव्हा तू तुझ्या स्वर्गातील निवासस्थानातून ऐक; त्यांच्या प्रार्थना व विनंतीकडे कान दे, त्यांना मदत कर. ज्यांनी तुझ्याविरुध्द पाप केले आहे अशा तुझ्या लोकांस क्षमा कर.

40आता, हे परमेश्वरा, माझी तुला विनवणी आहे की तू तुझे कान आणि डोळे उघड. आम्ही इथे बसून जी प्रार्थना करणार आहोत ती लक्षपूर्वक ऐक.

41आता, हे परमेश्वर देवा, तुझे सामर्थ्य मिरवणाऱ्या या कराराच्या कोशाजवळ, आपल्या विश्रामस्थानी तू ये. तुझे याजक उध्दाराने भूषित होवोत. तुझ्या चांगूलपणात तूझे भक्त हर्ष पावोत.

42“हे परमेश्वर देवा, तुझ्या अभिषिक्त राजाचा स्विकार कर. तुझा एकनिष्ठ सेवक दावीद याचे स्मरण असू दे.”

खूण केलेले: प्रत्येक वृत्तांतात असलेले शब्द, तुम्ही वाचता त्या भाषांतरात. सर्वात वारंवार येणारे शब्द (“आणि”, “तो”) खूण केलेले नाहीत; दुसऱ्या रूपातील शब्दाची खूण कदाचित होणार नाही.

स्रोत: OpenBible.info, CC BY 4.0 · इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क