Bible Explorer अ‍ॅप मिळवा

शोधा › शुभवर्तमाने शेजारी शेजारी › येशूचे दुःखसहन

शुभवर्तमाने शेजारी शेजारी · येशूचे दुःखसहन

पेत्र येशूला नाकारतो

मत्त 26:69–75 · मार्क 14:66–72 · लूक 22:54–62 · योहा 18:25–27

मत्तय

मत्त 26:69–75

69यावेळी पेत्र वाड्याच्या अंगणात बसला होता. महायाजकाच्या दासीपैकी एक दासी पेत्राकडे आली. ती म्हणाली, “तू सुद्धा गालील प्रांताच्या येशूबरोबर होतास.”

70पण पेत्राने सर्वांसमोर ते नाकारले. तो म्हणाला, “तू काय म्हणतेस ते मला माहीत नाही.”

71मग तो अंगणातून निघून फाटकापाशी गेला. फाटकाजवळ दुसऱ्या एका दासीने त्यास पाहिले. ती तेथे असलेल्या लोकांस म्हणाली, “नासरेथकर येशूबरोबर हा होता.”

72पुन्हा एकदा पेत्र शपथ घेऊन येशूला नाकारून, म्हणाला, “मी त्यास ओळखत नाही!”

73काही क्षणानंतर तेथे असलेले लोक पेत्राकडे वळाले आणि त्यास म्हणाले, “तू खरोखर येशूच्या शिष्यांपैकी एक आहेस, हे आम्हास माहीत आहे, तुझ्या बोलण्यावरून हे आम्हास स्पष्ट दिसून येते.”

74मग तो स्वतःला शाप देऊ लागला. तो जोराने म्हणाला, “मी देवाशपथ सांगतो, येशू हा मनुष्य कोण आहे हे मला माहीत नाही!” पेत्र असे म्हणाला तोच कोंबडा आरवला.

75नंतर येशू काय म्हणाला होता हे पेत्राला आठवले, “कोंबडा आरवण्यापूर्वी तू मला तीन वेळा नाकारशील.” यानंतर पेत्र तेथून बाहेर निघून गेला आणि मोठ्या दुःखाने रडला.

मार्क

मार्क 14:66–72

66पेत्र अंगणात असतानाच महायाजकाच्या दासीपैकी एक तेथे आली.

67आणि तिने पेत्राला शेकताना पाहिले. तेव्हा तिने त्याच्याकडे निरखून पाहिले व म्हणाली, “तू सुद्धा नासरेथकर येशूबरोबर होतास ना?”

68परंतु पेत्राने ते नाकारले आणि म्हणाला, “तू काय म्हणतेस हे मला कळत नाही व समजतही नाही.” पेत्र अंगणाच्या दरवाजाच्या देवडीवर गेला आणि कोंबडा आरवला.

69जेव्हा दासीने त्यास पाहिले तेव्हा जे लोक तेथे होते त्यांना ती म्हणू लागली की, “हा मनुष्य त्यांच्यापैकीच एक आहे.”

70पेत्राने पुन्हा ते नाकारले. नंतर थोड्या वेळाने तेथे उभे असलेले लोक पेत्राला म्हणाले, “खात्रीने तू त्यांच्यापैकी एक आहेस, कारण तू सुद्धा गालीली आहेस.”

71पेत्र निर्भत्सना करीत व शपथ वाहून म्हणाला, “तुम्ही ज्या मनुष्याविषयी बोलत आहात त्यास मी ओळखत नाही!”

72आणि लगेच दुसऱ्यांदा कोंबडा आरवला, “दोन वेळा कोंबडा आरवण्यापूर्वी तू मला तीन वेळा नाकारशील,” असे येशू म्हणाला होता याची पेत्राला आठवण झाली व तो अतिशय दुःखी झाला व मोठ्याने रडला.

लूक

लूक 22:54–62

54त्यांनी त्यास अटक केली व ते त्यास महायाजकाच्या घरी घेऊन गेले. पेत्र दुरून त्यांच्यामागे चालला.

55त्यांनी अंगणाच्या मध्यभागी विस्तव पेटविला आणि त्याच्याभोवती बसले व पेत्रही त्यांच्यात बसला.

56तेव्हा कोणाएका दासीने तेथे त्यास विस्तवाच्या उजेडात बसलेले पाहिले. तिने त्याच्याकडे निरखून पाहिले आणि ती म्हणाली, “हा मनुष्यही त्याच्याबरोबर होता.”

57पेत्र ते नाकारुन म्हणाला, “बाई, मी त्यास ओळखत नाही.”

58थोड्या वेळानंतर दुसऱ्या मनुष्याने त्यास पाहिले आणि म्हणाला, “तू सुद्धा त्यांच्यापैकी एक आहेस!” पण पेत्र म्हणाला, “गृहस्था, मी नाही!”

59नंतर सुमारे एक तास झाल्यावर आणखी एकजण ठामपणे म्हणाला, “खात्रीने हा मनुष्यसुद्धा त्याच्याबरोबर होता, कारण हा गालील प्रांताचा आहे.”

60परंतु पेत्र म्हणाला, “गृहस्था तू काय बोलतोस ते मला कळत नाही!” तो बोलत असतांना त्याच क्षणी कोंबडा आरवला.

61आणि प्रभूने वळून पेत्राकडे पाहिले तेव्हा पेत्राला प्रभूने उच्चारिलेले वाक्य आठवले, “आज कोंबडा आरवण्यापूर्वी तू तीन वेळा मला नाकारशील,” असे सांगितलेले त्यास आठवले.

62मग तो बाहेर जाऊन मोठ्या दुःखाने रडला.

योहान

योहा 18:25–27

25शिमोन पेत्र शेकत उभा राहिला होता; त्यास इतर म्हणाले, “तूही त्याच्या शिष्यांतला आहेस काय?” त्याने नाकारले व म्हटले, “मी नाही.”

26पेत्राने ज्याचा कान कापला होता त्याचा नातलग असलेला, महायाजकाच्या दासांपैकी एक होता, तो त्यास म्हणाला, “मी तुला त्याच्याबरोबर बागेत नाही का पाहिले?”

27पेत्राने पुन्हा नाकारले आणि, लागलाच, कोंबडा आरवला.

खूण केलेले: प्रत्येक वृत्तांतात असलेले शब्द, तुम्ही वाचता त्या भाषांतरात. सर्वात वारंवार येणारे शब्द (“आणि”, “तो”) खूण केलेले नाहीत; दुसऱ्या रूपातील शब्दाची खूण कदाचित होणार नाही.

स्रोत: OpenBible.info, CC BY 4.0 · इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क