Bible Explorer अ‍ॅप मिळवा

मुख्यपृष्ठ › दैनंदिन बायबल पाठ › फेब्रुवारी 2027 › 7 फेब्रुवारी

कॅथलिक दिनदर्शिका

दैनंदिन बायबल पाठ (कॅथलिक) — 7 फेब्रुवारी 2027

रविवार · सामान्यकाळाचा पाचवा आठवडा

सण आणि संत

सामान्यकाळाचा पाचवा रविवार

रविवार · उपासनेचा रंग: हिरवा

दिवसाची वाचने

पहिले वाचन

ईयो 7:1–4, 6–7

1“प्रत्येक मनुष्यास पृथ्वीवर खूप कष्ट करावे लागतात की नाही? त्याचे आयुष्य मजुराच्या आयुष्यासारखे असते कि नाही? 2गुलामाप्रमाणे मनुष्यास काम केल्यानंतर संध्याकाळी सावलीची गरज भासते. मनुष्य काम केल्यानंतर पगाराच्या दिवसाची वाट बघणाऱ्या मजुराप्रमाणे आहे. 3म्हणून माझे अनेक महीने हालअपेष्टातून गेले आहेत, माझ्या वाट्याला कष्टाचीच रात्र आली आहे. 4जेव्हा मी झोपी जातो, मी स्वतःला म्हणतो? रात्र केव्हा निघून जाईन? आणि केव्हा मी ऊठेन? एकसारखा मी तळमळतो दिवस उजाडेपर्यंत. 6माझे दिवस विणकऱ्याच्या मागापेक्षा भरभर जातात आणि माझे आयुष्य आशेशिवाय संपते. 7देवा, माझे आयुष्य म्हणजे केवळ श्वास आहे हे आठव, माझे नेत्र काही चांगले पाहणार नाही.

प्रतिसाद स्तोत्र

स्तोत्र 147:1–6

1परमेश्वराची स्तुती करा, कारण आमच्या देवाची स्तुती गाणे चांगले आहे; ते आनंददायक आहे व स्तुती करणे उचित आहे. 2परमेश्वर यरूशलेम पुन्हा बांधतो; तो इस्राएलाच्या विखुरलेल्या लोकांस एकत्र करतो. 3तो भग्नहृदयी जनांना बरे करतो, आणि त्यांच्या जखमांस पट्टी बांधतो. 4तो ताऱ्यांची मोजणी करतो; तो त्यांच्यातील प्रत्येकाला त्यांच्या नावाने हाक मारतो. 5आमचा प्रभू महान आणि सामर्थ्यात भयचकीत कार्ये करणारा आहे; त्याची बुद्धी मोजू शकत नाही. 6परमेश्वर जाचलेल्यास उंचावतो; तो वाईटांना खाली धुळीस मिळवतो.

दुसरे वाचन

1 करिं 9:16–19, 22–23

16कारण जरी मी शुभवर्तमान सांगतो, तरी अभिमान मिरवण्यास मला कारण नाही कारण मला हे करणे भाग आहे; मी शुभवर्तमान सांगणार नाही, तर मला हाय. 17कारण, मी हे स्वेच्छेने केले, तर मला वेतन मिळेल, पण माझ्या इच्छेविरुद्ध असेल, तर माझ्यावर हा कारभार सोपविला गेला आहे. 18तर मग माझे वेतन काय? एवढेच की, मी शुभवर्तमान सांगताना, ते फुकट सांगावे आणि शुभवर्तमानाविषयीच्या माझ्या अधिकाराचा मी दुरुपयोग करू नये. 19कारण मी सर्वांपासून स्वतंत्र असलो तरी अधिक लोक मिळवावेत म्हणून मी सर्वाचा दास झालो. 22आणि मी दुर्बळ असलेले मिळविण्यास, दुर्बळांना दुर्बळासारखा झालो. मी सर्वांना सर्व झालो आहे, म्हणजे सर्वकाही करून मी कित्येकांचे तारण करावे. 23आणि मी हे सर्वकाही शुभवर्तमानाकरीता करतो, म्हणजे मीही तिच्यात सहभागी व्हावे.

शुभवर्तमान

मार्क 1:29–39

29येशू व त्याच्या शिष्यांनी सभास्थान सोडले आणि लगेच तो योहान व याकोब यांच्याबरोबर शिमोन व अंद्रिया यांच्या घरी गेला. 30शिमोनाची सासू तापाने बिछान्यावर पडली होती. तेव्हा त्यांनी ताबडतोब येशूला तिच्याविषयी सांगितले. 31तेव्हा त्याने जवळ जाऊन तिच्या हाताला धरून तिला उठवले आणि तिचा ताप निघून गेला व ती त्यांची सेवा करू लागली. 32संध्याकाळी म्हणजे सूर्यास्त झाल्यावर लोकांनी सर्व आजारी आणि भूतांनी पछाडलेल्यास त्याच्याकडे आणले. 33सर्व नगर दरवाजापुढे जमा झाले. 34त्याने निरनिराळ्या रोगांनी आजारी असलेल्यांना बरे केले व अनेक लोकांतून भूते काढली. पण त्याने भूतांना बोलू दिले नाही कारण ती त्यास ओळखत होती. 35मग त्याने अगदी पहाटेस अंधार असतानाच घर सोडले आणि एकांत स्थळी जाऊन तेथे त्याने प्रार्थना केली. 36शिमोन व त्याच्यासोबत असलेले येशूचा शोध करीत होते, 37व तो सापडल्यावर ते त्यास म्हणाले, गुरूजी “आम्ही सर्वजण तुमचा शोध करीत आहोत.” 38तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “आपण जवळपासच्या गावात जाऊ या, म्हणजे मला तेथे देखील उपदेश करता यावा म्हणून आपण दुसरीकडे जाऊ कारण त्यासाठीच मी निघून आलो आहे.” 39मग तो सर्व गालील प्रांतातून, त्यांच्या सभास्थानातून उपदेश करीत आणि भूते काढीत फिरला.

सामान्य रोमन दिनदर्शिका; बिशपांची परिषद काही सण (प्रभूचे प्रकटीकरण, स्वर्गारोहण, ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त) रविवारी हलवू शकते किंवा स्वतःचे सण जोडू शकते. पाठसंग्रह: रविवारचे चक्र B, आठवड्याच्या दिवसांचे वर्ष I.

स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क