Bible Explorer अ‍ॅप मिळवा

मुख्यपृष्ठ › दैनंदिन बायबल पाठ › फेब्रुवारी 2027 › 7 फेब्रुवारी

ऑर्थोडॉक्स दिनदर्शिका · 25 जानेवारी (जुनी पद्धत)

ऑर्थोडॉक्स दैनंदिन पाठ — 7 फेब्रुवारी 2027

रविवार · स्वर 3

सण आणि संत

पेन्टेकॉस्टनंतरचा 36वा रविवार

रशियाचे नवे हुतात्मे आणि विश्वासाचे साक्षीदार

उपवास

उपवास नाही

हे मठाच्या नियमानुसार आहे. पॅरिशमध्ये उपवासाचे प्रमाण आपल्या पापकबुलीच्या धर्मगुरूसोबत, आरोग्य, वय आणि परिस्थितीनुसार ठरवले जाते.

दिवसाची वाचने

संध्याप्रार्थना: वाचन

नीति 10; नीति 3; नीति 8 (निवडलेली वचने)

संध्याप्रार्थना: वाचन

नीति 10 (निवडलेली वचने)

संध्याप्रार्थना: वाचन

या भाषांतरात नाही

प्रातःप्रार्थनेचे तिसरे शुभवर्तमान

मार्क 16:9–20

9आठवड्याच्या पहिल्या दिवशी येशू उठल्यावर त्याने प्रथम मग्दालीया नगराची मरीयाला, जिच्यातून त्याने सात भूते काढली होती, तिला दर्शन दिले. 10ती गेली आणि रडून शोक करणाऱ्या त्याच्या अनुयायांना तिने हे वृत्त सांगितले. 11त्यांनी ऐकले की तो जिवंत आहे व तिने त्यास पाहिले आहे. तेव्हा त्यांनी तिच्या म्हणण्यावर विश्वास ठेवला नाही. 12यानंतर त्यांच्यापैकी दोघे उघड्या माळरानावर चालले होते. गावाकडे जात असता येशू त्यांना दुसऱ्या रुपाने प्रकट झाला. 13ते परत आले व इतरांना त्याविषयी सांगितले परंतु त्यांनी त्यांच्यावरही विश्वास ठेवला नाही. 14नंतर अकरा शिष्य जेवत बसले असता येशू त्यांना प्रकट झाला. त्याने शिष्यांच्या अविश्वासाबद्दल आणि त्यांच्या अंतःकरणाच्या कठोरतेबद्दल त्यांना समज दिली कारण ज्यांनी त्यास उठल्यावर पाहिले होते त्यांच्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही. 15तो त्यांना म्हणाला, “सर्व जगात जा आणि सर्व सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. 16जो कोणी विश्वास ठेवतो आणि बाप्तिस्मा घेतो त्याचे तारण होईल, परंतु जो विश्वास ठेवत नाही तो शिक्षेस पात्र होईल. 17परंतु जे विश्वास ठेवतील त्यांच्याबरोबर ही चिन्हे असतील, ते माझ्या नावाने भूते काढतील, ते नव्या नव्या भाषा बोलतील. 18ते आपल्या हातांनी साप उचलतील आणि ते कोणतेही प्राणघातक पदार्थ प्याले तरी ते त्यांना कदापि बाधणार नाही. ते आजाऱ्यांवर हात ठेवतील आणि ते बरे होतील.” 19मग प्रभू येशू त्यांच्याबरोबर बोलल्यानंतर तो स्वर्गात घेतला गेला आणि देवाच्या उजव्या बाजूस जाऊन बसला. 20शिष्य बाहेर गेले आणि त्यांनी प्रत्येक ठिकाणी सुवार्तेची घोषणा केली. प्रभूने त्यांच्याबरोबर कार्य केले व त्याने वचनाबरोबर असणाऱ्या चिन्हांनी त्याची खात्री केली.

प्रेषितांचे पत्र

1 तीम 1:15–17

15ही गोष्ट विश्वसनीय व पूर्ण अंगीकार करण्यास योग्य आहे की, ख्रिस्त येशू पापी लोकांस तारावयला जगात आला आणि त्या पापी लोकांपैकी मी मुख्य पापी आहे. 16परंतु केवळ याच हेतूने माझ्यावर दया दाखविण्यात आली की माझ्यासारख्या अत्यंत वाईट पाप्यावर ख्रिस्त येशूने सहनशीलता दाखवली त्या उदाहरणावरून, पुढील काळात जे त्याजवर विश्वास ठेवतील त्यांना सर्वकाळचे जीवन मिळावे. 17आता सर्वकाळचा राजा जो अविनाशी व अदृश्य आहे अशा एकाच देवाला सन्मान आणि गौरव सदासर्वकाळासाठी असो. आमेन.

प्रेषितांचे पत्र (संत ग्रेगरी यांच्यासाठी)

1 करिं 12:7–11

7पण आत्म्याचे प्रकटीकरण हे सर्वांस उपयोगी होण्यास एकेकाला दिले आहे. 8कारण एकाला आत्म्याच्याद्वारे ज्ञानाचे वचन मिळते, आणखी एकाला त्याच आत्म्याच्या इच्छेप्रमाणे विद्येचे वचन दिले जाते. 9दुसर्‍याला त्याच आत्म्याच्या योगे विश्वास, आणखी एकाला त्याच आत्म्याच्या योगे निरोगी करण्याची कृपादाने, 10आणखी एकाला चमत्कार करण्याची शक्ती व दुसऱ्याला भविष्य सांगण्याची शक्ती, तर दुसऱ्याला आत्म्या आत्म्यातील फरक ओळखण्याची, आणखी एकाला विविध प्रकारच्या भाषा बोलण्याची, आणखी एकाला भाषांतर करून अर्थ सांगण्याची शक्ती दिली आहे. 11पण या सर्वात तोच एक आत्मा कार्य करतो. तो आपल्या इच्छेप्रमाणे प्रत्येक जणाला कृपादान वाटून देतो.

शुभवर्तमान

लूक 18:35–43

35येशू यरीहोजवळ येत असतांना एक आंधळा रस्त्यावर बसून भीक मागत होता. 36जेव्हा त्या आंधळ्या मनुष्याने जवळून जाणाऱ्या लोकांचा आवाज ऐकला तेव्हा त्याने विचारले, ही कशाची गडबड चालली आहे. 37लोकांनी त्यास सांगितले, “नासरेथकर येशू जवळून जात आहे.” 38तो ओरडून म्हणाला, “अहो येशू, दाविदाचे पुत्र माझ्यावर दया करा.” 39जे पुढे चालले होते त्यांनी त्यास शांत राहण्यास सांगितले. पण तो अजून मोठ्याने ओरडून म्हणाला, “दाविदाचे पुत्र माझ्यावर दया करा!” 40येशू थांबला आणि त्याने आंधळ्याला स्वतःकडे आणण्याची आज्ञा केली, तो आंधळा जवळ आल्यावर येशूने त्यास विचारले, 41“मी तुझ्यासाठी काय करावे म्हणून तुझी इच्छा आहे?” तो म्हणाला, “प्रभू मला पुन्हा दृष्टी यावी.” 42येशू त्यास म्हणाला, “तुला दृष्टी येवो, तुझ्या विश्वासाने तुला चांगले केले आहे.” 43ताबडतोब त्यास दिसू लागले आणि तो देवाचे गौरव करीत येशूच्या मागे गेला. सर्व लोकांनी हे पाहिले आणि देवाची स्तुती केली.

शुभवर्तमान (संत ग्रेगरी यांच्यासाठी)

योहा 10:9–16

9मी द्वार आहे; माझ्याद्वारे कोणी आत जाईल तर त्याचे तारण होईल; तो आत येईल आणि बाहेर जाईल आणि त्यास खावयास मिळेल. 10चोर तर, तो केवळ चोरी, घात व नाश करायला येतो. मी तर त्यांना जीवन प्राप्ती व्हावी व विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे. 11मी उत्तम मेंढपाळ आहे; उत्तम मेंढपाळ मेंढरांकरिता आपला जीव देतो. 12जो मेंढपाळ नाही तर मोलकरीच आहे आणि ज्याची स्वतःची मेंढरे नाहीत, तो लांडग्याला येत असलेले पाहून मेंढरे सोडून पळून जातो; आणि लांडगा त्यांच्यावर झडप घालून धरतो त्यांची दाणादाण करतो. 13मोलकरी पळून जातो कारण तो मोलकरीच आहे आणि त्यास मेंढरांची काळजी नाही. 14मी उत्तम मेंढपाळ आहे; आणि, जसा पिता मला ओळखतो आणि मी पित्याला ओळखतो तसे जे माझे आहेत त्यांना मी ओळखतो आणि जे माझे आहेत ते मला ओळखतात; आणि मी मेंढरांसाठी आपला जीव देतो. 16या मेंढवाड्यातली नाहीत अशी माझी दुसरी मेंढरे आहेत; तीही मला आणली पाहिजेत आणि ती माझी वाणी ऐकतील. मग एक कळप आणि एक मेंढपाळ असे होईल.

तारखा रशियन मंडळीच्या ज्युलियन दिनदर्शिकेनुसार आहेत (सर्बियन आणि जॉर्जियन मंडळ्या आणि आथोस पर्वत यांच्याप्रमाणे): मंडळीच्या दिनदर्शिकेतील 25 जानेवारी म्हणजे नागरी दिनदर्शिकेतील 7 फेब्रुवारी. नवी दिनदर्शिका पाळणाऱ्या मंडळ्या (ग्रीस, रोमानिया, बल्गेरिया, युक्रेन…) ठरावीक तारखेचे सण आणि संत त्याच नागरी तारखेला, 13 दिवस आधी, पाळतात, आणि त्यांचे काही पाठ वेगळे आहेत; ईस्टर आणि त्यावर अवलंबून असलेले दिवस सारखेच आहेत.

स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क