Bible Explorer अ‍ॅप मिळवा

शोधा › राजे आणि इतिहास शेजारी शेजारी › शौल आणि दावीद

राजे आणि इतिहास शेजारी शेजारी · शौल आणि दावीद

रेफाईमच्या खोऱ्यात पलिष्ट्यांचा पराभव

2 शमु 5:17–25 · 1 इति 14:8–17

2 शमुवेल

2 शमु 5:17–25

17दावीदाला इस्राएल लोकांनी राज्याभिषेक केल्याचे पलिष्ट्यांनी ऐकले. तेव्हा त्यास शोधून त्याचा वध करण्यासाठी म्हणून ते निघाले. पण हे वृत्त समजल्यावर दावीद यरूशलेम येथील किल्ल्यात आला.

18पलिष्ट्यांनी रेफाईमच्या खोऱ्यात तळ दिला.

19दावीदाने परमेश्वरास विचारले, “मी पलिष्ट्यांवर चढाई करू का? तुझे साहाय्य मला लाभेल काय?” परमेश्वर उत्तरला, “होय पलिष्ट्यांच्या पराभवात मी तुला खात्रीने मदत करील.”

20तेव्हा दावीद बाल-परासीम येथे गेला आणि त्याने पलिष्ट्यांचा पराभव केला. दावीद तेव्हा म्हणाला, “खिंडार पडलेल्या धरणातून पाणी घूसावे तसा परमेश्वर माझ्यादेखत शत्रूवर तुटून पडला.” म्हणूनच दावीदाने त्या जागेचे नाव बाल परासीम म्हणजे, खिंडार पाडणारा प्रभू, असे ठेवले.

21पलिष्ट्यांनी आपल्या देवांच्या मूर्ती त्या ठिकाणीच टाकून दिल्या. दावीदाने आणि त्याच्या मनुष्यांनी त्या तेथून हलवल्या.

22पलिष्ट्यांनी पुन्हा एकदा रेफाईमच्या खोऱ्यात तळ दिला.

23दावीदाने प्रार्थना केली. यावेळी परमेश्वराने सांगितले, “तेथे जाऊ नको त्यांना वळसा घालून पाठीमागे जा. मग तुतीच्या झाडाजवळ त्यांच्यावर हल्ला कर.

24तुम्ही झाडावर चढून बसा. त्यांच्या सैन्याच्या चढाईचा आवाज तुम्हास झाडाच्या शेंड्यावरून ऐकू येईल. तेव्हा मात्र झटपट उठाव करा कारण परमेश्वरच पलिष्ट्यांच्या पाडावाला पुढे होईल.”

25दावीदाने मग परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे हालचाली केल्या. पलिष्ट्यांचा पराभव केला. गिबापासून गेजेरपर्यंत तो पलिष्ट्यांना मार देत गेला.

1 इतिहास

1 इति 14:8–17

8आता सर्व इस्राएलावर राजा होण्यासाठी दावीदाला अभिषेक केला आहे हे पलिष्ट्यांना जेव्हा कळाले तेव्हा ते दावीदाचा शोध करायला निघाले. पण दावीदाला ही बातमी कळाली तेव्हा तो त्यांच्याशी लढायला निघाला.

9आणि पलिष्ट्यांनी रेफाईमच्या खोऱ्यात राहणाऱ्या लोकांवर छापे मारून त्यांना लुटले.

10मग दावीदाने देवाला विचारले. तो म्हणाला, “पलिष्ट्यांवर मी हल्ला करु काय? मला तू त्यांच्यावर जय देशील काय?” परमेश्वराने त्यास सांगितले “हल्ला कर, मी त्यांना तुझ्या हाती नक्कीच देईन.”

11मग दावीद आणि त्याची माणसे बालपरासीम येथपर्यंत जाऊन पोचली आणि तेथे त्यांने त्यांचा पराभव केला. तो म्हणाला, “देव पुराच्या पाण्याच्या लोंढ्याप्रमाणे माझ्या हाताने माझ्या शत्रूवर तुटून पडला आहे.” त्याठिकाणाचे नाव बाल-परासीम असे पडले आहे.

12पलिष्ट्यांनी आपले देव तिथेच टाकले. आणि दावीदाने त्या मूर्ती जाळून टाकण्याची आज्ञा दिली.

13रेफाईमच्या खोऱ्यात राहणाऱ्या लोकांवर पलिष्ट्यांनी पुन्हा एकदा हल्ला केला.

14दावीदाने पुन्हा देवाला मदतीसाठी विचारले. देव त्यास म्हणाला “तू त्यांच्यावर हल्ला करायला जाशील तेव्हा समोरुन जाऊ नकोस तर वळसा घेऊन तुतीच्या झाडांसमोर त्याच्यावर चालून जा.

15तुतीच्या झाडांच्या शेंड्यांमधून तुला सैन्य चाल करून जाण्याचा आवाज ऐकशील तेव्हा लढाईला पुढे निघून जा. कारण देव पलिष्ट्यांवर हल्ला करायला पुढे निघाला आहे.”

16दावीदाने देवाच्या सांगण्याप्रमाणे केले. दावीदाने आपल्या लोकांसह पलिष्ट्यांचा पाडाव केला. गिबोनापासून गेजेरपर्यंत त्यांनी पलिष्ट्यांच्या सैन्याला झोडपून काढले.

17त्यामुळे दावीदाची कीर्ती सर्व देशात पसरली. परमेश्वराने सर्व राष्ट्रात त्याची दहशत निर्माण केली.

खूण केलेले: प्रत्येक वृत्तांतात असलेले शब्द, तुम्ही वाचता त्या भाषांतरात. सर्वात वारंवार येणारे शब्द (“आणि”, “तो”) खूण केलेले नाहीत; दुसऱ्या रूपातील शब्दाची खूण कदाचित होणार नाही.

स्रोत: OpenBible.info, CC BY 4.0 · इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क