Bible Explorer अ‍ॅप मिळवा

मुख्यपृष्ठ › दैनंदिन बायबल पाठ › जून 2027 › 19 जून

ऑर्थोडॉक्स दिनदर्शिका · 6 जून (जुनी पद्धत)

ऑर्थोडॉक्स दैनंदिन पाठ — 19 जून 2027

शनिवार · पास्काचा सातवा आठवडा · स्वर 6

सण आणि संत

स्मरणाचा शनिवार

उपवास

उपवास नाही

हे मठाच्या नियमानुसार आहे. पॅरिशमध्ये उपवासाचे प्रमाण आपल्या पापकबुलीच्या धर्मगुरूसोबत, आरोग्य, वय आणि परिस्थितीनुसार ठरवले जाते.

दिवसाची वाचने

प्रेषितांचे पत्र (दिवंगतांसाठी)

1 थेस्स 4:13–17

13पण बंधूंनो, मी इच्छीत नाही की, जे मरण पावलेत त्यांच्याविषयी तुम्ही अज्ञानी असावे, म्हणजे ज्यांना आशा नाही अशा इतरांप्रमाणे तुम्ही दुःख करू नये. 14कारण येशू मरण पावला व पुन्हा उठला असा जर आपण विश्वास ठेवतो, तर येशूमध्ये जे मरतात त्यांनाही देव त्याच्याबरोबर आणील. 15कारण प्रभूच्या वचनावरून आम्ही तुम्हास हे सांगतो की, आपण जे जिवंत आहोत व जे प्रभूच्या येण्यापर्यंत मागे राहू, ते आपण तोपर्यंत मरण पावलेल्यांच्या पुढे जाणार नाही. 16कारण आज्ञा करणाऱ्या गर्जणेने, आद्यदेवदूतांची वाणी आणि देवाच्या कर्ण्याचा आवाज येईल, तेव्हा प्रभू स्वतः स्वर्गातून उतरेल आणि ख्रिस्तात मरण पावलेले प्रथम उठतील. 17मग आपण जे जिवंत आहोत व मागे राहू, ते प्रभूला अंतराळात भेटण्यासाठी ढगात उचलले जाऊ आणि सर्वकाळ प्रभूबरोबर राहू.

प्रेषितांचे पत्र

प्रेषि 28:1–31

1जेव्हा आमचे पाय सुखरुपपणे तेथील जमीनीला लागले, तेव्हा आम्हास कळले की, त्या बेटाचे नाव मिलिता असे आहे. 2तेथील रहिवाश्यांनी आम्हास अतिशय ममतेने वागविले, त्यांनी एक शेकोटी पेटविली आणि आमचे स्वागत केले, कारण पाऊस पडू लागाला होता व थंडीही होती. 3पौलाने काटक्या गोळा केल्या आणि ते त्या शेकोटीत टाकू लागला, उष्णतेमुळे तेथून एक साप निघाला आणि त्याने पौलाच्या हाताला विळखा घातला. 4ते पाहून तेथील रहिवाशी एकमेकांना म्हणू लागले, “हा मनुष्य खुनी असला पाहिजे, समुद्रातून जरी हा वाचला असला तरी न्यायदेवताही याला जगू देत नाही.” 5परंतु पौलाने तो प्राणी शेकोटीत झटकून टाकला आणि पौलाला काही अपाय झाला नाही. 6त्या बेटावरील लोकांस पौलाचे अंग सुजून येईल किंवा पौल एकाएकी मरून पडेल असे वाटत होते, बराच वेळ वाट पाहूनही पौलाला काहीही विकार झाल्याचे दिसेना, तेव्हा त्या लोकांचे विचार पालटले आणि पौल देवच आहे असे ते म्हणू लागले. 7तेथून जवळच पुब्ल्य नावाच्या मनुष्याची शेती होती, पुब्ल्य हा त्या बेटाचा मुख्य अधिकारी होता, त्याने आम्हा सर्वांचे त्याच्या घरी स्वागत केले आणि तीन दिवस आमचा चांगला पाहुणचार केला. 8पुब्ल्याचे वडील तापाने व पोट खराब असल्यामुळे आजारी होते, त्यामुळे अंथरुणाला खिळून होते, पौल त्या आजारी व्यक्तीला भेटायला गेला प्रार्थना करून पौलाने आपला हात त्याच्यावर ठेवला आणि त्या मनुष्यास बरे केले. 9हे घडलेले पाहिल्यावर त्या बेटावरील इतर आजारी लोक पौलाकडे आले आणि बरे झाले. 10त्यांनी आम्हास सन्मानपूर्वक पुष्कळ वस्तू भेटीदाखल दिल्या आणि जेव्हा आम्ही परत प्रवासास निघालो तेव्हा आम्हास लागणाऱ्या अनेक गोष्टी पुरविल्या. 11आम्ही तेथे हिवाळ्यात राहिल्यावर आलेक्सांद्रा शहरातील एका जहाजातून पुढील प्रवासास निघालो, ते जहाज त्या बेटावर हिवाळाभर मुक्कामाला होते, त्या जहाजाच्या समोरील बाजूस जुळ्या भावाचे चिन्ह होते. 12मग आम्ही सुराकूस येथे जाऊन पोहचलो आणि तेथे तीन दिवस राहिलो. 13तेथून शिडे उभारून आम्ही निघालो आणि रेगियोन नगराला गेलो, तेथे एक दिवस मुक्काम केला, नंतर दक्षिणेकडील वारा सुटल्यावर दुसऱ्या दिवशी पुत्युलास गेलो. 14त्या शहरात आम्हास काही बंधुजन भेटले, त्यांच्या सांगण्यावरून आम्ही तेथे सात दिवस राहिलो, मग आम्ही रोम येथे जाऊन पोहचलो. 15तेथील बंधूनी आमच्याबद्दलची वार्ता ऐकली होती, ते आमच्या भेटीसाठी अप्पियाच्या बाजारपेठेपर्यंत आणि तीन धर्मशाळेपर्यंत आले, पौलाची त्यांची भेट झाल्यावर त्याने देवाचे उपकार मानले व त्यास धीर आला. 16आम्ही रोम येथे पोहोंचल्यावर पौलाला एकटे राहायला परवानगी मिळाली, परंतु त्याच्यावर देखरेख करण्यासाठी एक शिपाई ठेवण्यात आला. 17तीन दिवसानंतर पौलाने सर्व यहूदी पुढाऱ्यांना एकत्र बोलावले, जेव्हा सर्वजण जमा झाले तेव्हा पौल त्यांना म्हणाला, “बंधूंनो, आपल्या बांधवांविरुद्ध मी काहीही केलेले नाही, तरी मला यरूशलेम येथे पकडून रोमी लोकांच्या हाती कैदी म्हणून देण्यात आले. 18आणि जेव्हा त्यांनी माझी चौकशी केली, तेव्हा त्यांची मला सोडून देण्याची इच्छा होती, कारण मरणदंडाला योग्य असा कोणताही गुन्हा मी केला नव्हता. 19परंतु यहूदी लोकांनी जेव्हा माझ्या सुटकेला हरकत घेतली, तेव्हा कैसराकडे न्याय मागणे मला भाग पडले, याचा अर्थ असा नाही की, यहूदी लोकांविरुद्ध मला दोषारोप करण्याची इच्छा आहे. 20या कारणासाठी तुम्हास भेटण्याची आणि तुमच्याशी बोलण्याची मी इच्छा दाखविली, कारण इस्राएलाच्या आशेच्या निष्ठेमुळेच मी या साखळ्यांनी जखडलो गेलो आहे.” 21यहूदी पुढारी पौलाला म्हणाले, “आम्हास तुमच्याबाबत यहूदीयाहून कसलेही पत्र आलेले नाही, अगर तिकडून येणाऱ्या बंधुजनांपैकी एकाही भावाने तुमच्याविषयी वाईट कळविले अथवा बोललेले नाही.” 22परंतु तुमची मते काय आहेत हे समजून घेण्याची आमची इच्छा आहे, कारण या गटाविरुद्ध सगळीकडे लोक बोलतात हे आम्हास माहीत आहे. 23तेव्हा यहूदी लोकांनी एक बैठकीचा दिवस ठरवला, जेथे पौल राहत होता, तेथे ते मोठ्या संख्येने जमा झाले, तेव्हा पौलाने त्यांना समजावून सांगितले आणि देवाच्या राज्याविषयी आपली साक्ष दिली, मोशेच्या नियमशास्त्रापासून आणि संदेष्ट्यांच्यापासून फोड करून येशूविषयी त्यांची खात्री पटविण्याचा प्रयत्न केला, हे तो सकाळपासून संध्याकाळपर्यंत करीत होता. 24त्याने फोड करून सांगितलेल्या गोष्टीविषयी काही जणांची खात्री पटली, तर काहींनी तो बोलत असलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवला नाही. 25पौल पुढील एक गोष्ट बोलला, त्यावरून मतभेद होऊन त्यांच्यापैकी काहीजण उठले आणि तेथून जाऊ लागले, पौल म्हणाला, “यशया संदेष्टयांच्या द्वारे पवित्र आत्मा आपल्या वाडवडिलांशी जे बोलला, ते खरोखरच किती खरे आहे! यशया म्हणाला होता.” 26या लोकांकडे तुम्ही जा आणि त्यांना सांगाः तुम्ही ऐकाल तर खरेपण तुम्हास समजणार नाही, तुम्ही पहाल तुम्हास दिसेल पण तुम्ही काय पाहत ते तुम्हास कळणार नाही. 27कारण या लोकांचे अंतःकरण जड झाले आहेत त्याच्या कानांनी त्यांना ऐकू येत नाही आणि त्यांनी आपले डोळे बंद केले आहेत नाही तर त्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिले असते आणि आपल्या कानांनी ऐकले असते आणि माझ्याकडे वळले असते आणि मी त्यांना बरे केले असते. 28म्हणून देवाचे हे तारण परराष्ट्रीयांकडे लोकांकडे पाठविण्यात आले आहे, हे तुम्हा यहूदी लोकांस कळावे, ते ऐकतील. 29तो असे बोलल्यावर यहूदी आपल्यामध्ये फार विवाद करीत निघाले. 30पूर्ण दोन वर्षे तो त्याच्या भाड्याच्या घरात राहिला, जे त्यास भेटायला येत, त्यांचे तो स्वागत करी. 31त्याने देवाच्या राज्याविषयी प्रचार केला, त्याने प्रभू येशूविषयी शिक्षण दिले, तो हे काम फार धैर्याने करीत असे आणि कोणीही त्यास बोलण्यात अडवू शकले नाही.

प्रेषितांचे पत्र (दिवंगतांसाठी (दुसरे वाचन))

1 करिं 15:47–57

47पाहिला मनुष्य भूमीतून म्हणजे तो मातीपासून बनविला गेला, तर दुसरा मनुष्य स्वर्गातून आला. 48ज्याप्रमाणे तो मनुष्य मातीपासून बनविला गेला, त्याप्रमाणे लोकसुद्धा मातीपासूनच बनविले गेले आणि त्या स्वर्गीय मनुष्याप्रमाणे स्वर्गीय लोकही तसेच आहेत. 49आणि जो मातीचा होता त्याचे प्रतिरूप आपण धारण केले, त्याचप्रमाणे जो स्वर्गीय आहे त्याचे प्रतिरूप आपण धारण करू. 50आता बंधूंनो मी हे सांगतो की, मांस व रक्त ह्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळू शकत नाही आणि विनाशीपणाला अविनाशीपणाचे वतन मिळत नाही. 51पाहा! मी तुम्हास एक रहस्यमय सत्य सांगत आहे. आपण सर्व मरणार नाही. आपण सर्व बदलून जाऊ. 52क्षणात, डोळ्यांचे पाते लवते न लवते तोच, शेवटचा कर्णा वाजेल तेव्हा, कारण कर्णा वाजेल आणि मरण पावलेले अविनाशीपणात उठवले जातील आणि आपण बदलून जाऊ. 53कारण हे जे विनाशी आहे त्याने अविनाशीपण परिधान करावे आणि हे जे मरणाधीन आहे त्याने अमरपण परिधान करावे हे आवश्यक आहे. 54हे जे विनाशी त्याने अविनाशीपण धारण करावे व हे जे मरणाधीन आहे त्याने अमरत्व धारण करावे, असे जेव्हा होईल तेव्हा, पवित्र शास्त्रात लिहिल्याप्रमाणे; “विजयात मरण गिळले गेले आहे.” 55“अरे मरणा तुझा विजय कोठे आहे? मरणा, तुझी नांगी कोठे आहे?” 56मरणाची नांगी पाप आहे आणि पापाचे सामर्थ्य नियमशास्त्रापासून येते. 57पण देवाला धन्यवाद असो, जो प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्हास विजय देतो!

शुभवर्तमान (दिवंगतांसाठी)

योहा 5:24–30

24मी तुम्हास खरे खरे सांगतो, जो माझे वचन ऐकतो आणि ज्याने मला पाठवले त्याच्यावर विश्वास ठेवतो त्यास सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे आणि त्याच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही; तो मरणातून जीवनात पार गेला आहे. 25मी तुम्हास खरे खरे सांगतो की, मरण पावलेले लोक देवाच्या पुत्राचा आवाज ऐकतील व जे ऐकतील ते जिवंत होतील, अशी वेळ येत आहे, किंबहुना आता आलीच आहे. 26कारण पित्याच्या ठायी जसे स्वतःचे जीवन आहे तसे पुत्राच्या ठायीही स्वतःचे जीवन असावे असे त्याने त्यास दिले. 27आणि तो मनुष्याचा पुत्र आहे, या कारणास्तव न्यायनिवाडा करण्याचा अधिकारही त्यास दिला. 28त्याचे आश्चर्य करू नका; कारण जेव्हा कबरात असलेले सर्व त्याचा आवाज ऐकतील अशी घटका येत आहे, 29आणि ज्याने सत्कर्मे केली ते जीवनाच्या पुनरुत्थानासाठी व ज्यांनी दुष्कर्मे केली ते न्यायाच्या पुनरुत्थानासाठी बाहेर येतील. 30मला स्वतः होऊन काही करता येत नाही. जसे मी ऐकतो तसा न्यायनिवाडा करतो आणि माझा निवाडा योग्य आहे कारण मी स्वतःच्या इच्छेप्रमाणे नाही तर ज्याने मला पाठवले त्याच्या इच्छेप्रमाणे करायला पाहतो.

शुभवर्तमान

योहा 21:15–25

15मग त्यांची न्याहरी झाल्यावर येशूने शिमोन पेत्राला म्हटले, “योहानाच्या पुत्रा शिमोना, यांच्यापेक्षा तू माझ्यावर अधिक प्रीती करतोस काय?” तो त्यास म्हणाला, “होय, प्रभू, तू जाणतोस की, मी तुझ्यावर प्रीती करतो.” तो त्यास म्हणतो, “माझी कोकरे चार.” 16तो पुन्हा दुसऱ्यांदा त्यास म्हणाला, “योहानाच्या पुत्रा, शिमोना, तू माझ्यावर प्रीती करतोस काय?” तो त्यास म्हणाला, “होय, प्रभू, तू जाणतोस की, मी तुझ्यावर प्रीती करतो.” तो त्यास म्हणाला, “माझी मेंढरे राख.” 17तो तिसर्‍यांदा त्यास म्हणाला, “योहानाच्या पुत्रा, शिमोना, तू माझ्यावर प्रीती करतोस काय?” पेत्र दुःखी होऊन त्यास म्हणाला, “प्रभू, तुला सर्व माहीत आहे, तू जाणतोस की, मी तुझ्यावर प्रीती करतो.” येशू त्यास म्हणतो, “माझी मेंढरे चार.” 18“मी तुला खरे खरे सांगतो, तू जेव्हा तरुण होतास तेव्हा आपली कंबर बांधून तुझी इच्छा असेल तिकडे जात होतास; पण तू म्हातारा होशील तेव्हा हात पुढे करशील, दुसरा तुझी कंबर बांधील आणि तुझी इच्छा नसेल तिकडे तुला नेईल.” 19तो कोणत्या मरणाने देवाचे गौरव करणार होता हे प्रकट करायला तो हे बोलला आणि हे बोलल्यावर तो त्यास म्हणतो, “माझ्यामागे ये.” 20तेव्हा पेत्र मागे वळला आणि पाहतो की, ज्या शिष्यावर येशूची प्रीती होती जो भोजनाच्या वेळी त्याच्या छातीशी टेकला असता मागे लवून ‘प्रभू, तुला धरून देणारा तो कोण आहे?’ असे म्हणाला होता, त्यास त्याने मागे चालतांना पाहिले. 21म्हणून, त्यास बघून, पेत्र येशूला म्हणाला, “प्रभू, ह्याचे काय?” 22येशूने त्यास म्हटले, “मी येईपर्यंत त्याने रहावे अशी जर माझी इच्छा असेल तर त्याचे तुला काय? तू माझ्यामागे ये.” 23तेव्हा बांधवांत हे बोलणे पसरले की, तो शिष्य मरणार नाही. पण येशू त्यास म्हणाला नव्हता की, तो मरणार नाही, पण “मी येईपर्यंत त्याने रहावे अशी जर माझी इच्छा असेल तर तुला काय?” 24जो या गोष्टींची साक्ष देतो व ज्याने या गोष्टी लिहिल्या आहेत तोच हा शिष्य आहे; आणि त्याची साक्ष खरी आहे हे आम्हास माहीत आहे. 25आणि ह्याशिवाय येशूने केलेली पुष्कळ कृत्ये आहेत; ती एकएक लिहिली तर लिहिलेली पुस्तके या जगात देखील मावणार नाहीत असे मला वाटते.

शुभवर्तमान (दिवंगतांसाठी (दुसरे वाचन))

योहा 6:35–39

35तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “मीच जीवनाची भाकर आहे. माझ्याकडे जो येतो त्यास कधीही भूक लागणार नाही आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्यास कधीही तहान लागणार नाही. 36परंतु तुम्ही मला पाहीले असताही विश्वास ठेवत नाही असे मी तुम्हास सांगितले. 37पिता जे मला देतो ते सर्व माझ्याकडे येईल आणि माझ्याकडे जो येतो त्यास मी कधीच घालवणार नाही. 38कारण मी स्वर्गातून आलो तो स्वतःच्या इच्छेप्रमाणे करायला नाही, पण ज्याने मला पाठवले त्याच्या इच्छेप्रमाणे करायला आलो आहे. 39आणि ज्याने मला पाठवले त्याची इच्छा हीच आहे की, त्याने मला जे सर्व दिले आहे त्यातून मी काहीही हरवू नये, पण शेवटच्या दिवशी मी ते उठवावे.

तारखा रशियन मंडळीच्या ज्युलियन दिनदर्शिकेनुसार आहेत (सर्बियन आणि जॉर्जियन मंडळ्या आणि आथोस पर्वत यांच्याप्रमाणे): मंडळीच्या दिनदर्शिकेतील 6 जून म्हणजे नागरी दिनदर्शिकेतील 19 जून. नवी दिनदर्शिका पाळणाऱ्या मंडळ्या (ग्रीस, रोमानिया, बल्गेरिया, युक्रेन…) ठरावीक तारखेचे सण आणि संत त्याच नागरी तारखेला, 13 दिवस आधी, पाळतात, आणि त्यांचे काही पाठ वेगळे आहेत; ईस्टर आणि त्यावर अवलंबून असलेले दिवस सारखेच आहेत.

स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क