Bible Explorer अ‍ॅप मिळवा

मुख्यपृष्ठ › दैनंदिन बायबल पाठ › जून 2027 › 20 जून

ऑर्थोडॉक्स दिनदर्शिका · 7 जून (जुनी पद्धत)

ऑर्थोडॉक्स दैनंदिन पाठ — 20 जून 2027

रविवार · स्वर 7

सण आणि संत

पवित्र पेन्टेकॉस्ट. पवित्र त्रैक्याचा सण

उपवास

उपवास नाही

हे मठाच्या नियमानुसार आहे. पॅरिशमध्ये उपवासाचे प्रमाण आपल्या पापकबुलीच्या धर्मगुरूसोबत, आरोग्य, वय आणि परिस्थितीनुसार ठरवले जाते.

दिवसाची वाचने

संध्याप्रार्थना: वाचन

गण 11:16–17, 24–29

16परमेश्वर मोशेला म्हणाला, इस्राएलाच्या वडिलांचे सत्तर मनुष्ये मजकडे आण. मंडळीचे नेते असलेल्या या लोकांस दर्शनमंडपाच्या दारापाशी आण; व तुझ्याबरोबर त्यांना उभे कर. 17मग मी खाली येऊन तेथे तुझ्याशी बोलेन. मग तुझ्यावर असलेल्या आत्म्यातून काही भाग मी त्यांनाही देईन. मग लोकांची काळजी घेण्यास ते तुला मदत करतील. ह्याप्रकारे इस्राएल लोकांची जबाबदारी केवळ तुझ्या एकट्यावर राहणार नाही. 24मोशे बाहेर गेला आणि परमेश्वर जे बोलला ते लोकांस सांगितले. मग मोशेने मंडळीच्या सत्तर वडिलांना एकत्र जमविले आणि त्याने त्यांना तंबू सभोवती उभे केले. 25मग परमेश्वर ढगात उतरून आला आणि मोशेशी बोलला. मोशेवर परमेश्वराचा आत्मा होता. त्यातून काही घेऊन परमेश्वराने ते त्या सत्तर वडिलावर ठेवला. तो आत्मा आल्यावर ते संदेश सांगू लागले. परंतु त्यानंतर मात्र त्यांनी पुन्हा संदेश सांगितला नाही. 26त्यातील दोन वडील एलदाद व मेदाद छावणीच्या बाहेर गेले नाहीत. त्यांची नांवे वडीलांच्या यादीत होती. परंतु ते छावणीतच राहिले; त्यामुळे आत्मा त्यांच्यावरही आला आणि ते छावणीतच संदेश सांगू लागले. 27तेव्हा एका तरुणाने पळत जाऊन मोशेला हे सांगितले. तो म्हणाला, एलदाद व मेदाद हे छावणीत संदेश सांगत आहेत. 28तेव्हा नूनाचा मुलगा यहोशवा मोशेला म्हणाला, मोशे, माझे स्वामी तुम्ही त्यांना बंदी घाला. यहोशवा तरुण असल्यापासून मोशेचा मदतनीस होता. 29मोशेने त्यास उत्तर दिले, माझ्या प्रतिष्ठेसाठी तू त्यांचा हेवा करतोस काय? परमेश्वराचे सर्वच लोक संदेष्टे असते आणि परमेश्वराने त्या सर्वांवर आपला आत्मा ठेविला असता तर किती बरे होते.

संध्याप्रार्थना: वाचन

योए 2:23–32

23म्हणून सियोनवासीयांनो, आनंदीत व्हा. आणि परमेश्वर तुमच्या देवामध्ये उल्हासित व्हा. कारण तुम्हास हितकर होईल इतका आगोटीचा पाऊस तो देतो, तो पहिली पर्जन्यवृष्टी योग्य प्रमाणाने देतो, आगोटीचा व वळवाचा पाऊस पाडतो. 24खळी गव्हाने भरून जातील, आणि पिंपे द्राक्षरसाने व जैतूनाच्या तेलाने भरून वाहतील. 25मी, माझे सैन्य तुमच्याविरुध्द पाठवले. तुमचे जे काही होते ते, नाकतोडे, टोळ, कुसरूड व घुले यांनी खाल्ले. मी, तुमच्या संकटाच्या वर्षाची भरपाई करीन. 26मग तुम्हास भरपूर खायला मिळेल. तुम्ही तृप्त व्हाल. आणि तुम्ही, तुमच्या परमेश्वर देवाची, स्तुती कराल. त्याने तुमच्यासाठी आश्चर्यकारक गोष्टी केल्या आहेत. माझ्या लोकांस पुन्हा कधीही लज्जित व्हावे लागणार नाही. 27मी इस्राएलाच्या बाजूने आहे हे तुम्हास समजेल. आणि मी परमेश्वर म्हणजे तुमचा देव आहे, आणि दुसरा कोणीच नाही. माझ्या लोकांस पुन्हा कधीही लज्जित व्हावे लागणार नाही. 28ह्यानंतर मी माझा आत्मा सर्व देहावर ओतीन, आणि तुमची मुले आणि तुमच्या मुली भविष्य सांगतील. तुमच्यातील वृद्धांना स्वप्न पडतील. तुमच्यातील तरूणांना दृष्टांत होतील. 29आणि त्या दिवसात मी माझा आत्मा दासांवर व स्त्री दासीवरसुद्धा ओतीन. 30मी आकाशात आणि पृथ्वीवर आश्चर्यकारक चिन्हे आणि तेथे रक्त, अग्नी व दाट धुराचे खांब दाखवीन. 31परमेश्वराचा महान आणि भयंकर दिवस उगवण्यापूर्वी सूर्य बदलून अंधकारमय आणि चंद्र रक्तमय असा होईल. 32जसे परमेश्वराने म्हटले, जो कोणी परमेश्वराच्या नावाने हाक मारील तो प्रत्येकजण वाचेल. जे कोणी बचावतील ते सियोन पर्वतावर व यरूशलेमेत राहतील, आणि ज्यांना परमेश्वर बोलावतो, ते बाकी वाचलेल्यात राहतील.

संध्याप्रार्थना: वाचन

यहे 36:24–28

24मी तुम्हास त्या राष्ट्रांतून काढून घेईन आणि तुम्हास प्रत्येक देशातून गोळा करीन व तुम्हास तुमच्या देशात आणीन. 25मग तुमच्यावर शुद्ध पाणी शिंपडेल तेव्हा तुम्ही तुमच्या सर्व अशुद्धतेपासून तुम्ही शुद्ध व्हाल. आणि मी तुम्हास तुमच्या सर्व मूर्तीपासून शुद्ध करीन. 26मी तुम्हास नवीन हृदय देईन, तुमच्या ठायी नवीन आत्मा घालीन; तुमच्या देहातून पाषाणमय हृदय काढून टाकीन व तुम्हास मांसमय हृदय देईन. 27मी तुमच्या ठायी माझा आत्मा घालीन. आणि तुम्ही माझ्या नियमांनी चालाल. माझे निर्णय पाळून त्याप्रमाणे आचरण कराल, असे मी करीन. 28मग तुम्ही, मी तुमच्या पूर्वजांना दिलेल्या, देशात रहाल. तुम्ही माझे लोक व्हाल व मी तुमचा देव होईन.

प्रातःप्रार्थना: शुभवर्तमान

योहा 20:19–23

19त्या दिवशी, म्हणजे आठवड्याच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी, शिष्य जेथे जमले होते तेथील दरवाजे यहूद्यांच्या भीतीमुळे बंद असता, येशू आत आला व मध्यभागी उभा राहून म्हणाला, “तुम्हास शांती असो.” 20आणि हे बोलल्यावर त्याने त्यांना आपले हात आणि कूस दाखवली; आणि शिष्यांनी प्रभूला बघितले तेव्हा ते आनंदित झाले 21तेव्हा येशू त्यांना पुन्हा म्हणाला, “तुम्हास शांती असो. जसे पित्याने मला पाठवले आहे तसे मीहि तुम्हास पाठवतो.” 22एवढे बोलल्यावर त्याने त्यांच्यावर फुंकर टाकली आणि तो त्यांना म्हणाला, “पवित्र आत्म्याचा स्वीकार करा. 23ज्या कोणाच्या पापांची तुम्ही क्षमा करता त्यांची क्षमा झाली आहे आणि ज्या कोणाची तुम्ही ठेवता ती तशीच ठेवलेली आहेत.”

प्रेषितांचे पत्र

प्रेषि 2:1–11

1नंतर पेन्टेकॉस्ट म्हणजे पन्नासावा दिवस आला तेव्हा ते सर्व एकत्र जमले असताना. 2अकस्मात मोठ्या वाऱ्याच्या सुसाट्यासारखा आकाशातून नाद झाला, व ज्या घरात ते वसले होते ते सर्व त्याने भरले. 3आणि वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नीच्या जीभांसारख्या जीभा त्यांना दिसल्या, व प्रत्येकावर त्या एकएक अशा बसल्या. 4तेव्हा ते सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जसजशी त्यांना वाचा दिली, तसतसे ते निरनिराळ्या भाषांतून बोलू लागले. 5त्यावेळेस आकाशाखालच्या प्रत्येक राष्ट्रातील भक्तिमान यहूदी यरूशलेम शहरात राहत होते. 6तो नाद झाल्यावर लोकसमुदाय एकत्र होऊन गोंधळून गेला, कारण प्रत्येकाने त्यांना आपआपल्या भाषेत बोलताना ऐकले. 7ते सर्व आश्चर्याने थक्क होऊन; म्हणाले, “पाहा, हे बोलणारे सर्व गालील प्रांतातील ना? 8तर आपण प्रत्येकजण आपआपली जन्मभाषा ऐकतो हे कसे? 9पार्थी, मेदी, एलामी, मेसोपटेम्या, यहूदीया, कप्पदुकिया, पंत, आशिया, 10फ्रुगिया, पंफुलिया, मिसर व कुरणेच्या जवळचा लिबुवा देश ह्यात राहणारे, यहूदी व यहूदीयमतानूसारी असे रोमन प्रवासी, 11क्रेतीय, अरब, असे आपण त्यांना आपआपल्या भाषांत देवाची महत्कृत्ये सांगताना ऐकतो.”

शुभवर्तमान

योहा 7:37–52; 8:12

37मग सणाच्या शेवटल्या दिवशी म्हणजे मोठ्या दिवशी, येशू उभा राहून मोठ्याने म्हणाला, “कोणी तहानलेला असेल तर त्याने माझ्याकडे यावे आणि प्यावे. 38जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याच्या अंतःकरणातून शास्त्रलेखात सांगितल्याप्रमाणे जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील.” 39ज्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्यांना जो आत्मा मिळणार होता, त्याच्याविषयी त्याने हे म्हटले. तोपर्यंत पवित्र आत्मा दिलेला नव्हता, कारण अजून येशूचे गौरव झाले नव्हते. 40लोकसमुदायातील कित्येकजण हे शब्द ऐकून म्हणत होते, “खरोखर, हा तो संदेष्टा आहे.” 41कित्येक म्हणाले, “हा ख्रिस्त आहे.” दुसरे कित्येक म्हणाले, “ख्रिस्त गालील प्रांतातून येणार आहे काय? 42दाविदाच्या वंशाचा आणि ज्या गावात दावीद होता त्या बेथलेहेमातून ख्रिस्त येईल अस शास्त्रलेख म्हणत नाही काय?” 43यावरुन त्याच्यामुळे लोकात फूट झाली. 44त्यांच्यातील कित्येकजण त्यास धरायला पाहत होते, तरी कोणी त्याच्यावर हात टाकले नाहीत. 45मग कामदार मुख्य याजकांकडे व परूश्यांकडे आले, तेव्हा ते त्यांना म्हणाले, “तुम्ही त्यास का आणले नाही?” 46कामदारांनी उत्तर दिले, “कोणीही मनुष्य त्याच्यासारखा कधी बोलला नाही.” 47तेव्हा परूश्यांनी त्यांना उत्तर दिले, “तुम्हीपण फसलात काय? 48अधिकार्‍यांपैकी किंवा परूश्यांपैकी कोणी त्याच्यावर विश्वास ठेवला आहे काय? 49पण हा जो लोकसमुदाय नियमशास्त्र जाणत नाही तो शापित आहे.” 50पूर्वी त्याच्याकडे आलेला आणि त्यांच्यातला एक असलेला निकदेम त्यांना म्हणाला. 51“एखाद्या मनुष्याचे ऐकण्याअगोदर आणि तो काय करतो याची माहीती करून घेतल्यावाचून आपले नियमशास्त्र त्याचा न्याय करते काय?” 52त्यांनी त्यास उत्तर देऊन म्हटले, “तुम्हीपण गालील प्रांतातले आहात काय? शोधा आणि बघा, कारण गालील प्रांतातून संदेष्टा उद्भवत नाही.” 8:12पुढे येशू पुन्हा त्यांना म्हणाला, “मीच जगाचा प्रकाश आहे; जो मला अनुसरतो तो अंधारात चालणारच नाही, तर त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील.”

तारखा रशियन मंडळीच्या ज्युलियन दिनदर्शिकेनुसार आहेत (सर्बियन आणि जॉर्जियन मंडळ्या आणि आथोस पर्वत यांच्याप्रमाणे): मंडळीच्या दिनदर्शिकेतील 7 जून म्हणजे नागरी दिनदर्शिकेतील 20 जून. नवी दिनदर्शिका पाळणाऱ्या मंडळ्या (ग्रीस, रोमानिया, बल्गेरिया, युक्रेन…) ठरावीक तारखेचे सण आणि संत त्याच नागरी तारखेला, 13 दिवस आधी, पाळतात, आणि त्यांचे काही पाठ वेगळे आहेत; ईस्टर आणि त्यावर अवलंबून असलेले दिवस सारखेच आहेत.

स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क