Bible Explorer अ‍ॅप मिळवा

मुख्यपृष्ठ › दैनंदिन बायबल पाठ › मार्च 2027 › 16 मार्च

ऑर्थोडॉक्स दिनदर्शिका · 3 मार्च (जुनी पद्धत)

ऑर्थोडॉक्स दैनंदिन पाठ — 16 मार्च 2027

मंगळवार · महान लेंतचा पहिला आठवडा · स्वर 8

सण आणि संत

Martyrs Eutropius, Cleonicus and Basiliscus of Amasea († c. 308)

महान लेंत

कडक उपवास (कोरडे अन्न: भाकर, भाज्या, फळे)

हे मठाच्या नियमानुसार आहे. पॅरिशमध्ये उपवासाचे प्रमाण आपल्या पापकबुलीच्या धर्मगुरूसोबत, आरोग्य, वय आणि परिस्थितीनुसार ठरवले जाते.

दिवसाची वाचने

सहावा तास

यश 1:19–2:3

19जर तुमची इच्छा असेल व तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल, तर तुम्हास या भूमीपासून चांगले खावयास मिळेल. 20परंतु जर तुम्ही नाकाराल व बंड कराल, तर तलवार तुमचा नाश करील,” कारण परमेश्वर आपल्या मुखाने हे बोलला आहे. 21विश्वासू नगरी वेश्या कशी झाली! ती जी की पूर्णपणे न्यायी होती, धार्मिकतेने परिपूर्ण होती, पण ती आज खुन्यांनी भरून गेली आहे. 22तुमची चांदी अशुद्ध झाली आहे, तुमच्या द्राक्षरसात पाणी मिसळले आहे. 23तुमचे सरदार बंडखोर व चोरांचे साथीदार आहेत; प्रत्येकाला लाच घेणे प्रिय आणि नजराण्यांच्या मागे धावणे आवडते. ते अनाथांचे रक्षण करीत नाहीत किंवा विधवांची कायदेशीर दयेची बाजूही घेत नाहीत. 24यांकरीताच प्रभू, सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा सामर्थ्यशाली देव हे म्हणतो कीः “त्यांचा नाश होवो! मी माझ्या विरोधकांचा सूड घेईन, आणि माझ्या शत्रू विरूद्ध मी स्वतः बदला घेईन; 25मी तुजविरूद्ध आपला हात वळवून, तुझे शुद्धीकरण करून तुझ्यातील निरुपयोगी गोष्टी काढून सर्व प्रकारची अशुद्धता दूर करीन. 26मी तुझे सर्व न्यायधीश पूर्वी जसे होते तसे करीन, तुझे सर्व सल्लागार सुरवातीस जसे होते तसे करीन, त्यानंतर तुला नीतिमानांची विश्वासू नगरी म्हणतील.” 27सियोनेचा न्यायाने उद्धार होईल व तिच्यातील पश्चातापी लोकांचा धार्मिकतेने उद्धार होईल. 28बंडखोर व पापी यांचा एकत्र चुराडा होईल व ज्यांनी परमेश्वराचा त्याग केला त्यांचाही तसाच चुराडा होईल. 29“तुम्हास पवित्र वाटणाऱ्या एलाच्या झाडाची तुम्हास लाज वाटेल, आणि तुम्ही निवडलेल्या बागा तुम्हास लज्जास्पद होतील. 30कारण तुम्ही पाने कोमजलेल्या एलाच्या झाडाप्रमाणे, व पाणी नसलेल्या बागेसारखे व्हाल. 31बलाढ्य मनुष्य वाळलेल्या झाडाच्या ढिलपीप्रमाणे दुर्बल होईल व त्याची कामे जाळाच्या लहानशा ठिणगीसारखी राहतील; ती दोन्ही एकत्र जाळण्यात येतील, तो त्यास कोणीही विझवणार नाही.” 2:1यरूशलेम व यहूदा याविषयीच्या गोष्टी दृष्टांताद्वारे आमोज याचा मुलगा यशया यास प्राप्त झाल्या. 2शेवटल्या दिवसात, परमेश्वराचे डोंगरावरील मंदिर, पर्वताच्या सर्वात उंच जागी स्थापण्यात येईल, आणि ते डोंगरावर उंच होईल; व सर्व राष्ट्रे त्याकडे लोटतील. 3“चला, आपण वर परमेश्वराच्या डोंगरावर जाऊ, याकोबाच्या देवाच्या मंदिरात जाऊ, म्हणजे तो आम्हास त्याचे मार्ग शिकवील व आपण त्याच्या मार्गात चालू” असे पुष्कळ लोक म्हणतील. कारण सियोनेतून धर्मशास्त्र व यरूशलेमेतून देवाचे वचन बाहेर येईल.

संध्याप्रार्थना: वाचन

उत्प 1:14–23

14मग देव बोलला, “दिवस व रात्र ही वेगळी करण्यासाठी आकाशात ज्योति होवोत व त्या चिन्हे, ऋतू, दिवस, आणि वर्षे दाखविणाऱ्या होवोत. 15पृथ्वीला प्रकाश देण्यासाठी आकाशात त्या दीपाप्रमाणे होवोत,” आणि तसे झाले. 16दिवसावर सत्ता चालविण्यासाठी मोठी ज्योत आणि रात्रीवर सत्ता चालविण्यासाठी लहान ज्योत, अशा दोन मोठ्या ज्योती देवाने निर्माण केल्या. त्याने तारेही निर्माण केले. 17पृथ्वीवर प्रकाश देण्यासाठी, दिवसावर व रात्रीवर सत्ता चालविण्यासाठी, प्रकाश व अंधकार वेगळे करण्यासाठी देवाने त्यांना अंतराळात ठेवले. देवाने पाहिले की हे चांगले आहे. 19संध्याकाळ झाली व सकाळ झाली. हा चौथा दिवस. 20देव बोलला, “जले जीवजंतूनी भरून जावोत, आणि पृथ्वीच्या वर आकाशाच्या अंतराळात पक्षी उडोत.” 21समुद्रातील फार मोठे जलचर व अनेक प्रकारचे जलप्राणी त्यांच्या त्यांच्या जातींप्रमाणे देवाने उत्पन्न केले. तसेच पंख असलेल्या प्रत्येक पक्षाला त्याच्या जातीप्रमाणे देवाने उत्पन्न केले. देवाने पाहिले की हे चांगले आहे. 22देवाने त्यांना आशीर्वाद देऊन म्हटले, “फलद्रूप व्हा आणि बहुगुणित व्हा, समुद्रातील पाणी व्यापून टाका. पृथ्वीवर पक्षी बहुगुणित होवोत.” 23संध्याकाळ झाली व सकाळ झाली हा पाचवा दिवस.

संध्याप्रार्थना: वाचन

नीति 1:20–33

20ज्ञान रस्त्यावर पुकारा करते, ते उघड्या जागेवर आपली वाणी उच्चारते; 21ती गजबजलेल्या रस्त्याच्या नाक्यावरून घोषणा करते, शहराच्या प्रवेशद्वारापाशी घोषणा करते, 22“अहो भोळ्यांनो, जे काही तुम्हास समजत नाही त्याची किती वेळ आवड धरणार? तुम्ही चेष्टा करणारे, किती वेळ चेष्टा करण्यात आनंद पावणार, आणि मूर्ख किती वेळ ज्ञानाचा तिरस्कार करणार? 23तुम्ही माझ्या निषेधाकडे लक्ष द्या; मी आपले विचार तुम्हावर ओतीन; मी आपली वचने तुम्हास कळवीन. 24मी बोलावले पण तुम्ही ऐकायला नकार दिला; मी आपला हात पुढे केला, पण कोणीही लक्ष दिले नाही. 25परंतु तुम्ही माझ्या सर्व शिक्षणाचा अव्हेर केला आणि माझ्या दोषारोपाकडे दुर्लक्ष केले. 26म्हणून मीही तुमच्या संकटाना हसेन, तुमच्यावर संकटे आलेली पाहून मी थट्टा करीन. 27जेव्हा वादळांप्रमाणे तुमच्यावर भितीदायक दहशत येईल, आणि तुफानाप्रमाणे तुमच्यावर समस्या आघात करतील; जेव्हा संकटे आणि दु:ख तुम्हावर येतील. 28ते मला हाका मारतील आणि मी त्यांना उत्तर देणार नाही; ते माझा झटून शोध करतील, पण मी त्यांना सापडणार नाही. 29कारण त्यांनी ज्ञानाचा द्वेष केला; आणि परमेश्वराचे भय निवडून घेतले नाही, 30त्यांनी माझ्या शिक्षणास नकार दिला, आणि त्यांनी माझी तोंडची शिक्षा अवमानली. 31म्हणून ते आपल्या वर्तणुकीचे फळ खातील आणि आपल्याच योजनांच्या फळाने भरले जातील. 32कारण जो कोणी भोळा जेव्हा दूर निघून जाईल त्याचा नाश होईल; आणि मूर्खाचे स्वस्थपण त्याचा नाश करील. 33परंतु जो कोणी माझे ऐकतो तो सुरक्षित राहतो. आणि अरिष्टाची भिती नसल्यामुळे स्वस्थ राहतो.”

तारखा रशियन मंडळीच्या ज्युलियन दिनदर्शिकेनुसार आहेत (सर्बियन आणि जॉर्जियन मंडळ्या आणि आथोस पर्वत यांच्याप्रमाणे): मंडळीच्या दिनदर्शिकेतील 3 मार्च म्हणजे नागरी दिनदर्शिकेतील 16 मार्च. नवी दिनदर्शिका पाळणाऱ्या मंडळ्या (ग्रीस, रोमानिया, बल्गेरिया, युक्रेन…) ठरावीक तारखेचे सण आणि संत त्याच नागरी तारखेला, 13 दिवस आधी, पाळतात, आणि त्यांचे काही पाठ वेगळे आहेत; ईस्टर आणि त्यावर अवलंबून असलेले दिवस सारखेच आहेत.

स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क