मुख्यपृष्ठ › दैनंदिन बायबल पाठ › मार्च 2027 › 15 मार्च
ऑर्थोडॉक्स दिनदर्शिका · 2 मार्च (जुनी पद्धत)
ऑर्थोडॉक्स दैनंदिन पाठ — 15 मार्च 2027
सोमवार · महान लेंतचा पहिला आठवडा · स्वर 8
सण आणि संत
महान लेंतचा प्रारंभ
महान लेंत
अन्नाचा पूर्ण त्याग
हे मठाच्या नियमानुसार आहे. पॅरिशमध्ये उपवासाचे प्रमाण आपल्या पापकबुलीच्या धर्मगुरूसोबत, आरोग्य, वय आणि परिस्थितीनुसार ठरवले जाते.
दिवसाची वाचने
सहावा तास
1आमोज याचा मुलगा यशया ह्याने यहूदा व यरूशलेम ह्याविषयी उज्जीया, योथाम, आहाज व हिज्कीया या यहूदी राजांच्या कालकिर्दीच्या काळात पुढे घडून येणाऱ्या गोष्टींविषयीचा दृष्टांत पाहिला. 2हे आकाशा, ऐक आणि हे पृथ्वी लक्षपूर्वक कान दे; कारण परमेश्वर हे बोलला आहेः “मी लेकरांचे पालनपोषण करून त्यांना वाढविले, परंतु त्यांनी मजविरूद्ध बंडखोरी केली. 3बैल आपल्या धन्याला ओळखतो, आणि गाढव आपल्या मालकाचे खाण्याचे कुंड ओळखतो, परंतु इस्राएल ओळखत नाही, इस्राएलास समजत नाही.” 4अहाहा! हे राष्ट्र, पापी, दुष्कृत्यांच्या भाराने खाली दबलेले लोक, दुष्ट जनांची संतती, भ्रष्टाचाराने वागणारी मुले! त्यांनी परमेश्वरास सोडून दिले आहे, इस्राएलाच्या पवित्र परमेश्वरास त्यांनी तुच्छ लेखले आहे. त्यांनी स्वतःस त्याच्यापासून दूर केले आहे. 5तुम्ही अजूनही का मार खाता? तुम्ही अधिकाधिक बंड का करता? तुमचे संपूर्ण मस्तक आजारी व संपूर्ण अंतःकरण कमकुवत आहे. 6पायाच्या तळव्यापायापासून डोक्यापर्यंत ज्याला दुखापत झाली नाही असा भाग राहीला नाही; फक्त जखमा व घाव आणि ताज्या उघड्या जखमा आहेत; त्या स्वच्छ केल्या नाहीत, पट्टी बांधून त्या झाकल्याही नाहीत किंवा तेलाने उपचार केला नाही. 7तुमचा ओसाड झाला आहे; तुमची नगरे जळून गेली आहेत. तुमच्या देखत परकीयांनी तुमची शेते उध्द्वस्त केली आहेत. परकीयांनी ती नासधूस करून, उलथून सोडून दिली आहेत. 8सियोनाची कन्या ही द्राक्षाच्या मळ्यातील खोपटीसारखी, काकडीच्या बागेतील पडवीसारखी, वेढा दिलेल्या नगरासारखी झाली आहे. 9जर सेनाधीश परमेश्वराने आम्हासाठी थोडेही शिल्लक ठेवले नसते तर आमची अवस्था सदोम व गमोरा या नगरांसारखी झाली असती. 10सदोमाच्या अधिकाऱ्यांनो, परमेश्वराचा वचन ऐका; गमोराच्या लोकांनो आमच्या देवाच्या नियमशास्त्राकडे लक्ष्य द्या. 11परमेश्वर म्हणतो, “तुमचे असंख्य यज्ञबली माझ्या काय कामाचे? जळालेल्या मेंढरांची अर्पणे, प्राण्यांची चरबी ही मला आता पुरेशी झाली आहेत; आणि तसेच बैल, कोंकरे, किंवा शेळ्या यांच्या रक्ताने मला संतोष होत नाही;” 12जेव्हा तुम्ही मजसमोर सादर होण्यास येता, माझी अंगणे आपल्या पायाखाली तुडविता? असे करण्यास तुम्हास कोणी सांगितले? 13पुन्हा निरर्थक अशी अर्पणे आणू नका; धुपाचा मला तिटकारा आहे. तुमचे नवचंद्रदर्शन व शब्बाथ मेळे, असे पापी मेळे मी खपवून घेत नाही. 14तुमची चंद्रदर्शने व तुम्ही नेमलेले सण यांचा माझा जीव द्वेष करतो; त्यांचे मला ओझे झाले आहे; तो सहन करून मी थकलो आहे. 15म्हणून जेव्हा तुम्ही प्रार्थनेत हात पसरता, तेव्हा मी आपले डोळे तुम्हापासून झाकीन; जरी तुम्ही पुष्कळ प्रार्थना केल्या, तरीही मी त्या ऐकणार नाही; तुमचे हात निष्पापांच्या घाताच्या रक्ताने पूर्णपणे भरले आहेत. 16स्वतःला धुवा, स्वच्छ करा; तुमची दुष्ट कृत्ये माझ्या नजरेपासून नाहीशी करा; वाईट करणे सोडा; 17चांगले करण्यास शिका; न्याय मिळवा, पीडितांची मदत करा, पितृहीनांना न्याय द्या, विधवांचे रक्षण करा. 18परमेश्वर म्हणतो, “आता या, व एकमेकांशी संवाद करून हे जाणून घ्या; जरी तुमची पातके लाखेसारखी लाल असली, तरीही ती बर्फाप्रमाणे शुभ्र होतील; जरी ती किरमिजी रंगासारखी लाल असली, तरी ती शुभ्र लोकरीसारखी होतील. 19जर तुमची इच्छा असेल व तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल, तर तुम्हास या भूमीपासून चांगले खावयास मिळेल. 20परंतु जर तुम्ही नाकाराल व बंड कराल, तर तलवार तुमचा नाश करील,” कारण परमेश्वर आपल्या मुखाने हे बोलला आहे.
संध्याप्रार्थना: वाचन
1प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही निर्माण केली. 2पृथ्वी अंदाधुंद व रिकामी होती. जलाशयावर अंधकार होता, देवाचा आत्मा पाण्यावर पाखर घालत होता. 3देव बोलला, “प्रकाश होवो” आणि प्रकाश झाला. 4देवाने प्रकाश पाहिला की तो चांगला आहे. देवाने अंधकारापासून प्रकाश वेगळा केला. 5देवाने प्रकाशाला “दिवस” व अंधकाराला “रात्र” असे नाव दिले. संध्याकाळ झाली व सकाळ झाली, हा पहिला दिवस. 6देव बोलला, “जलांच्या मध्यभागी अंतराळ होवो व ते जलापासून जलांची विभागणी करो.” 7देवाने अंतराळ केले आणि अंतराळावरच्या व अंतराळाखालच्या जलांची विभागणी केली व तसे झाले. 8देवाने अंतराळास आकाश असे म्हटले. संध्याकाळ झाली व सकाळ झाली, हा दुसरा दिवस. 9नंतर देव बोलला, “आकाशाखालील पाणी एकाजागी एकत्र जमा होवो व कोरडी जमीन दिसून येवो,” आणि तसे झाले. 10देवाने कोरड्या जमिनीस भूमी आणि एकत्र झालेल्या पाण्याच्या संचयास समुद्र असे म्हटले. त्याने पाहिले की हे चांगले आहे. 11देव बोलला, “हिरवळ, बीज देणाऱ्या वनस्पती, आणि आपआपल्या जातीप्रमाणे, ज्यात त्याचे बीज आहे अशी फळे देणारी फळझाडे, ही पृथ्वीवर येवोत.” आणि तसेच झाले. 12पृथ्वीने हिरवळ, आपापल्या जातीचे बीज देणाऱ्या वनस्पती आणि आपापल्या जातीची फळे देणारी व त्या फळातच आपापल्या जातीचे बीज असणारी फळझाडे भूमीने उत्पन्न केली. देवाने पाहिले की हे चांगले आहे. 13संध्याकाळ झाली व सकाळ झाली, हा तिसरा दिवस.
संध्याप्रार्थना: वाचन
1इस्राएलाचा राजा, दावीदाचा पुत्र शलमोन, याची ही नितीसूत्रे. 2ज्ञान व शिक्षण शिकावे, बुद्धीच्या वचनाचे ज्ञान मिळवावे, 3सुज्ञतेचे शिक्षण घेऊन जे योग्य, न्यायी, आणि चांगले ते करण्यास शिकावे, 4भोळ्यांना शहाणपण आणि तरुणांना ज्ञान व दूरदर्शीपणा द्यावे, 5ज्ञानी व्यक्तीने ऐकावे आणि त्याने ज्ञानात वाढावे, बुद्धीमान व्यक्तीला मार्गदर्शन मिळावे, 6ज्ञानी लोकांची वचने आणि त्याची गूढरहस्ये समजावी, म्हणून म्हणी व सुवचने ह्यासाठी ही आहेत. 7परमेश्वराचे भय ज्ञानाची सुरुवात आहे, मूर्ख ज्ञान आणि शिक्षण तुच्छ मानतात. 8माझ्या मुला, तू तुझ्या वडिलांची शिकवण ऐक, आणि तू तुझ्या आईचा नियम बाजूला टाकू नकोस; 9ते तुझ्या शिराला सुशोभित वेष्टन आणि तुझ्या गळ्यात लटकते पदक आहे. 10माझ्या मुला, जर पापी तुला फूस लावून त्यांच्या पापात पाडण्याचा प्रयत्न करतो, तर त्याच्यामागे जाण्यास नकार दे; 11जर ते म्हणतील “आमच्याबरोबर ये. आपण वध करण्यास वाट बघू; आपण लपू व निष्कारण निष्पाप व्यक्तीवर हल्ला करू. 12जसे अधोलोक निरोग्यांना गिळून गर्तेत पडणाऱ्यांसारखे करतो तसे आपण त्यांना जिवंतपणीच गिळून टाकू. 13आपणांस सर्व प्रकारच्या मौलवान वस्तू मिळतील; आपण इतरांकडून जे चोरून त्याने आपण आपली घरे भरू. 14तू आपला वाटा आम्हाबरोबर टाक, आपण सर्व मिळून एकच पिशवी घेऊ.” 15माझ्या मुला, त्यांच्याबरोबर त्या मार्गाने खाली जाऊ नकोस; ते जेथून चालतात त्याचा स्पर्शही तुझ्या पावलांना होऊ देऊ नकोस; 16त्यांचे पाय दुष्कृत्ये करायला धावतात, आणि ते रक्त पाडायला घाई करतात. 17एखादा पक्षी पाहत असतांना, त्यास फसवण्यासाठी जाळे पसरणे व्यर्थ आहे. 18ही माणसे तर आपल्या स्वतःचा घात करण्यासाठी टपतात. ते आपल्या स्वतःसाठी सापळा रचतात. 19जो अन्यायाने संपत्ती मिळवतो त्या प्रत्येकाचे मार्ग असेच आहेत; अन्यायी धन ज्यांनी धरून ठेवले आहे ते त्यांचाही जीव घेते. 20ज्ञान रस्त्यावर पुकारा करते, ते उघड्या जागेवर आपली वाणी उच्चारते;
तारखा रशियन मंडळीच्या ज्युलियन दिनदर्शिकेनुसार आहेत (सर्बियन आणि जॉर्जियन मंडळ्या आणि आथोस पर्वत यांच्याप्रमाणे): मंडळीच्या दिनदर्शिकेतील 2 मार्च म्हणजे नागरी दिनदर्शिकेतील 15 मार्च. नवी दिनदर्शिका पाळणाऱ्या मंडळ्या (ग्रीस, रोमानिया, बल्गेरिया, युक्रेन…) ठरावीक तारखेचे सण आणि संत त्याच नागरी तारखेला, 13 दिवस आधी, पाळतात, आणि त्यांचे काही पाठ वेगळे आहेत; ईस्टर आणि त्यावर अवलंबून असलेले दिवस सारखेच आहेत.
स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क