Bible Explorer अ‍ॅप मिळवा

मुख्यपृष्ठ › दैनंदिन बायबल पाठ › मार्च 2027 › 17 मार्च

ऑर्थोडॉक्स दिनदर्शिका · 4 मार्च (जुनी पद्धत)

ऑर्थोडॉक्स दैनंदिन पाठ — 17 मार्च 2027

बुधवार · महान लेंतचा पहिला आठवडा · स्वर 8

सण आणि संत

Venerable Gerasimus of the Jordan († 451)

महान लेंत

कडक उपवास (कोरडे अन्न: भाकर, भाज्या, फळे)

हे मठाच्या नियमानुसार आहे. पॅरिशमध्ये उपवासाचे प्रमाण आपल्या पापकबुलीच्या धर्मगुरूसोबत, आरोग्य, वय आणि परिस्थितीनुसार ठरवले जाते.

दिवसाची वाचने

सहावा तास

यश 2:3–11

3“चला, आपण वर परमेश्वराच्या डोंगरावर जाऊ, याकोबाच्या देवाच्या मंदिरात जाऊ, म्हणजे तो आम्हास त्याचे मार्ग शिकवील व आपण त्याच्या मार्गात चालू” असे पुष्कळ लोक म्हणतील. कारण सियोनेतून धर्मशास्त्र व यरूशलेमेतून देवाचे वचन बाहेर येईल. 4तो राष्ट्रांमध्ये न्याय करील व अनेक लोकांबद्दल निर्णय देईल, ते आपल्या तलवारी मोडून त्याचे फाळ बनवतील व आपल्या भाल्यांचे कोयते करतील, यानंतर राष्ट्र राष्ट्रांवर तलवार उगारणार नाही किंवा युद्धकला सुद्धा अवगत करणार नाही. 5याकोबाच्या घराण्या, ये, आणि आपण परमेश्वराच्या प्रकाशात चालू. 6कारण तू तुझ्या लोकांचा म्हणजे याकोबाच्या घराण्याचा त्याग केला आहेस, कारण ते पूर्वेकडील लोकांच्या चालीरितीने भरले आहेत आणि ते पलिष्ट्याप्रमाणे शकुन पाहणारे आहेत, व ते परदेशी लोकांच्या पुत्रांबरोबर हातमिळवणी करतात. 7त्यांची भूमी चांदी व सोन्याने भरगच्च झाली आहे; त्यांच्या श्रीमंतीला सीमा राहिलेली नाही, त्यांची भूमी घोडे व रथ यांनी भरलेली असून त्यासही सीमा उरलेली नाही. 8तसेच त्यांची संपूर्ण भूमी मूर्तींनी भरलेली आहे; ते स्वहस्ते बनविलेल्या कलाकृतीची, स्वतःच्या बोटांनी बनविलेल्या गोष्टीची पूजा करतात. 9ते लोक पाया पडतील, आणि वैयक्तिक खाली पडतील; म्हणून त्यांचा स्विकार करू नका. 10खडकाळ जागी जा व परमेश्वराच्या भयापासून व त्याच्या वैभवी गौरवापासून जमिनीत लप. 11न्यायाच्या त्या दिवशी गर्विष्ठ मनुष्याची दृष्टी नीच केली जाईल, व त्याचा गर्व खाली करण्यात येईल, आणि फक्त परमेश्वराचेच नाव उंचावले जाईल.

संध्याप्रार्थना: वाचन

उत्प 1:24–2:3

24देव बोलला, “आपापल्या जातीचे सजीव प्राणी, गुरेढोरे, सरपटणारे प्राणी व वनपशू पृथ्वी उपजवो.” आणि तसे झाले. 25देवाने पृथ्वीवरील जनावरे, गुरेढोरे, वनपशू, आणि सरपटणारा प्रत्येक जीव त्याच्या त्याच्या जाती प्रमाणे निर्माण केला. देवाने पाहिले की हे चांगले आहे. 26देव बोलला, “आपण आपल्या प्रतिरूपाचा आपल्या सारखा मनुष्य निर्माण करू. समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी, सर्व वनपशू, मोठी जनावरे व जमिनीवर सरपटणारे सर्व लहान प्राणी यांच्यावर त्यांना सत्ता चालवू देऊ.” 27देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला. त्याच्या स्वतःच्या प्रतिरूपाचा असा देवाने तो निर्माण केला. नर व नारी असे त्यांना निर्माण केले. 28देवाने त्यांना आशीर्वाद दिला, आणि त्यांना म्हटले, “फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा आणि पृथ्वी व्यापून टाका. ती आपल्या सत्तेखाली आणा; समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी आणि पृथ्वीवर फिरणारा प्रत्येक सजीव प्राणी यांवर सत्ता चालवा.” 29देव म्हणाला, पाहा, सर्व पृथ्वीच्या पृष्ठभागावर असलेली बीज देणारी प्रत्येक वनस्पती आणि ज्यामध्ये बीज देणाऱ्या झाडाचे फळ आहे ते प्रत्येक झाड, ही मी तुम्हास दिली आहेत. ही तुम्हाकरिता अन्न असे होतील. 30तसेच पृथ्वीवरील प्रत्येक पशू, आकाशातील प्रत्येक पक्षी आणि पृथ्वीच्या पाठीवर ज्यामध्ये जीव आहे त्या प्रत्येक सरपटणाऱ्या प्राण्याकरता अन्न म्हणून मी प्रत्येक हिरवी वनस्पती दिली आहे. आणि सर्व तसे झाले. 31देवाने आपण जे केले होते ते सर्व पाहिले. पाहा, ते फार चांगले होते. संध्याकाळ झाली व नंतर सकाळ झाली, हा सहावा दिवस. 2:1त्यानंतर पृथ्वी, आकाश आणि त्यातील सर्वकाही पूर्ण करून झाले, आणि सर्वकाही जिवंत जिवांनी भरून गेले. 2देवाने सातव्या दिवशी आपण करीत असलेले काम समाप्त केले, आणि जे त्याने केले होते त्या त्याच्या कामापासून त्याने सातव्या दिवशी विसावा घेतला. 3देवाने सातव्या दिवसास आशीर्वाद दिला आणि तो पवित्र केला, कारण देवाने त्याचे निर्मितीचे जे सर्व काम केले होते त्या आपल्या कामापासून त्या दिवशी त्याने विसावा घेतला.

संध्याप्रार्थना: वाचन

नीति 2:1–22

1माझ्या मुला, जर तू माझी वचने स्वीकारशील आणि माझ्या आज्ञा तुझ्याजवळ संग्रह करून ठेवशील, 2ज्ञानाचे ऐकशील. आणि ज्ञानाकडे तुझे मन लावशील. 3जर तू विवेकासाठी आरोळी करशील, आणि तुझा आवाज त्यासाठी मोठ्याने उच्चारशील; 4जर तू रुप्याप्रमाणे त्याचा शोध घेशील, आणि जसे तू गुप्तधन मिळविण्याचा प्रयत्न करतो तसेच ज्ञानाचा शोध घेशील; 5तर तुला परमेश्वराच्या भयाची जाणीव होईल, आणि देवाविषयीचे ज्ञान तुला सापडेल. 6कारण परमेश्वर ज्ञान देतो, त्याच्या मुखातून सुज्ञता आणि ज्ञान येतात. 7जे त्यास संतोषवितात त्यांना तो पूर्ण ज्ञान देतो, जे प्रामाणिकपणे चालतात त्यांना तो ढाल आहे, 8तो न्यायाच्या मार्गाचे रक्षण करतो, आणि जे त्याच्याबरोबर विश्वसनीय आहेत त्याच्या मार्गात टिकून राहतील. 9मग धर्म, निती व सात्विकता तुला समजेल, आणि प्रत्येक चांगला मार्ग कळेल. 10ज्ञान तुझ्या हृदयात प्रवेश करील, आणि तुझ्या आत्म्याला ज्ञान आनंदित करील. 11दूरदर्शीपणा तुझ्यावर पहारा करील, आणि समंजसपणा तुला सांभाळेल. 12ते तुला वाईट मार्गापासून सोडविल, कपटी गोष्टी बोलणाऱ्यापासून, सोडवायला तो तुला संभाळील, 13ते चांगले मार्ग सोडून, अंधकाराच्या मार्गांनी चालत आहेत. 14जेव्हा ते दुष्कर्म करतात ते आनंदित होतात, आणि दुष्कर्माच्या विकृतीवरून ते उल्लासतात. 15ते वाकडे मार्ग अनुसरतात, आणि ते फसवणूक करून त्यांच्या वाटा लपवतात. 16ज्ञान आणि दूरदर्शीपणा तुला अनितीमान स्त्रीपासून वाचवील, जी स्त्री धाडस करायला बघते आणि खुशामतीच्या शब्दांनी स्तुती करते. 17तिने आपला तरुणपणाचा सोबती सोडला आहे, आणि आपल्या देवाचा करार विसरली आहे. 18कारण तिचे घर मरणाकडे खाली वाकले आहे. आणि तिच्या वाटा तुला त्या कबरेत असलेल्याकडे घेऊन जातात. 19जे सर्व कोणी तिच्याकडे जातात ते पुन्हा माघारी येत नाहीत. आणि त्यांना जीवनाचा मार्ग सापडत नाही. 20म्हणून तू चांगल्या लोकांच्या मार्गाने चालावे, व जे योग्य मार्गाने जातात त्याच्यामागे जावे. 21कारण योग्य करतात तेच देशात घर करतील, आणि जे प्रामाणिक आहेत तेच त्यामध्ये राहतील. 22परंतु दुष्टांना त्यांच्या वतनातून छेदून टाकले जाईल, आणि जे विश्वासहीन त्यांना त्यांच्या वतनापासून दूर नेले जाईल.

तारखा रशियन मंडळीच्या ज्युलियन दिनदर्शिकेनुसार आहेत (सर्बियन आणि जॉर्जियन मंडळ्या आणि आथोस पर्वत यांच्याप्रमाणे): मंडळीच्या दिनदर्शिकेतील 4 मार्च म्हणजे नागरी दिनदर्शिकेतील 17 मार्च. नवी दिनदर्शिका पाळणाऱ्या मंडळ्या (ग्रीस, रोमानिया, बल्गेरिया, युक्रेन…) ठरावीक तारखेचे सण आणि संत त्याच नागरी तारखेला, 13 दिवस आधी, पाळतात, आणि त्यांचे काही पाठ वेगळे आहेत; ईस्टर आणि त्यावर अवलंबून असलेले दिवस सारखेच आहेत.

स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क