Bible Explorer अ‍ॅप मिळवा

मुख्यपृष्ठ › दैनंदिन बायबल पाठ › मार्च 2027 › 16 मार्च

कॅथलिक दिनदर्शिका

दैनंदिन बायबल पाठ (कॅथलिक) — 16 मार्च 2027

मंगळवार · उपवासकाळाचा पाचवा आठवडा

सण आणि संत

उपवासकाळाच्या पाचव्या आठवड्याचा मंगळवार

आठवड्याचा दिवस · उपासनेचा रंग: जांभळा

दिवसाची वाचने

पहिले वाचन

गण 21:4–9

4इस्राएल लोकांनी होर पर्वत सोडला व ते तांबड्या समुद्राकडे जाणाऱ्या रस्त्याला लागले. अदोम देशाला वळसा घालून जाण्यासाठी त्यांनी असे केले. परंतु लोक अधीर झाले. 5त्यांनी मोशेविरूद्ध व देवाविरूद्ध तक्रार करायला सुरुवात केली. लोक म्हणाले, तू आम्हास या रानात मरण्यासाठी मिसर देशातून बाहेर का आणलेस? इथे भाकरी नाही, पाणी नाही आणि या हलक्या अन्नाला आम्ही कंटाळलो आहोत. 6तेव्हा परमेश्वराने लोकांमध्ये विषारी साप सोडले. साप लोकांस चावले आणि बरेच इस्राएल लोक मरण पावले. 7लोक मोशेकडे आले आणि म्हणाले, आम्ही तुझ्याविरूद्ध आणि परमेश्वराविरूद्ध बोललो तेव्हा आम्ही पाप केले हे आम्हास माहीत आहे. तू परमेश्वराची प्रार्थना कर. हे साप आमच्या मधून काढून टाक. तेव्हा मोशेने लोकांसाठी परमेश्वराची प्रार्थना केली. 8परमेश्वर मोशेला म्हणाला, एक पितळेचा साप कर आणि तो खांबावर ठेव. साप चावल्यानंतर जर एखाद्याने खांबावरच्या पितळेच्या सापाकडे पाहिले तर तो मनुष्य मरणार नाही. 9मोशेने परमेश्वराची आज्ञा पाळली त्याने पितळेचा साप बनवला व तो खांबावर ठेवला. नंतर जेव्हा जेव्हा एखाद्या साप चावलेल्या मनुष्याने त्या खांबावरच्या पितळेच्या सापाकडे पाहिले तेव्हा तो जिवंत राहिला.

प्रतिसाद स्तोत्र

स्तोत्र 102:1–2, 15–20

1परमेश्वराजवळ प्रार्थना हे परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐक; माझ्या आरोळीकडे लक्ष दे. 2मी संकटात असताना माझ्यापासून तोंड लपवू नकोस. माझ्याकडे लक्ष दे. जेव्हा मी तुला हाक मारतो, मला त्वरेने उत्तर दे. 15हे परमेश्वरा, राष्ट्रे तुझ्या नावाचा आदर करतील, आणि पृथ्वीवरील सर्व राजे तुझ्या वैभवाचा सन्मान करतील. 16परमेश्वर सियोन पुन्हा बांधेल, आणि तो आपल्या गौरवाने प्रगट होईल. 17आणखी तो अनाथाच्या प्रार्थनेला प्रतिसाद देईल. तो त्यांची प्रार्थना नाकारणार नाही. 18पुढील पिढीसाठी हे लिहून ठेवले जाईल, आणि अजून ज्या लोकांचा जन्म झाला नाही ते परमेश्वराची स्तुती करतील. 19कारण परमेश्वराने आपल्या उच्च पवित्रस्थानातून खाली पाहीले आहे. परमेश्वराने स्वर्गातून खाली पृथ्वीकडे पाहीले, 20तो बंदिवानाचे कण्हणे ऐकेल, ज्यांना मृत्यूदंडाची शिक्षा ठरवली होती त्यास सोडविले.

शुभवर्तमान

योहा 8:21–30

21पुन्हा तो त्यांना म्हणाला, “मी निघून जातो आणि तुम्ही माझा शोध कराल व तुम्ही आपल्या पापात मराल, मी जेथे जातो तिकडे तुम्ही येऊ शकत नाही.” 22यावर यहूदी म्हणाले, “हा आत्महत्या करणार काय? कारण हा म्हणतो की, मी जाईन तिथे तुम्हास येता येणार नाही.” 23तो त्यांना म्हणाला, “तुम्ही खालचे आहात, मी वरचा आहे; तुम्ही या जगाचे आहा, मी या जगाचा नाही. 24म्हणून मी तुम्हास सांगितले की, तुम्ही तुमच्या पापात मराल; कारण, मी तो आहे असा तुम्ही विश्वास न धरल्यास तुम्ही आपल्या पापात मराल.” 25यावरुन ते त्यास म्हणाले, “तू कोण आहेस?” येशू त्यांना म्हणाला, “पहिल्यापासून तुम्हास जे सांगत आलो तेच नाही का? 26मला तुमच्याविषयी पुष्कळ बोलायचे आहे व न्यायनिवाडा करायचा आहे, पण ज्याने मला पाठवले तो खरा आहे आणि ज्या गोष्टी मी त्याच्याकडून ऐकल्या त्या मी जगाला सांगतो.” 27तो त्यांच्याशी पित्याविषयी बोलत होता हे त्यांना कळले नाही. 28तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “तुम्ही जेव्हा मनुष्याच्या पुत्राला उंच कराल तेव्हा तुम्हास हे कळेल की तो मी आहे आणि मी स्वतः काही करीत नाही तर पित्याने मला सांगितल्याप्रमाणे मी हे करतो. 29ज्याने मला पाठवले तो माझ्याबरोबर आहे; त्याने मला एकटे सोडले नाही; कारण मी नेहमी त्यास आवडणार्‍या गोष्टी करतो.” 30येशू हे बोलत असता पुष्कळ जणांनी त्याच्यावर विश्वास ठेवला.

सामान्य रोमन दिनदर्शिका; बिशपांची परिषद काही सण (प्रभूचे प्रकटीकरण, स्वर्गारोहण, ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त) रविवारी हलवू शकते किंवा स्वतःचे सण जोडू शकते. पाठसंग्रह: रविवारचे चक्र B, आठवड्याच्या दिवसांचे वर्ष I.

स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क