Bible Explorer अ‍ॅप मिळवा

शोधा › राजे आणि इतिहास शेजारी शेजारी › यरूशलेमेचा पाडाव

राजे आणि इतिहास शेजारी शेजारी · यरूशलेमेचा पाडाव

सिद्कीया आणि यरूशलेमेचा पाडाव

2 राजे 24:18–20; 25:1–21 · 2 इति 36:11–21 · यिर्म 52:1–27

2 राजे

2 राजे 24:18–20; 25:1–21

24:18सिद्कीया राज्य करु लागला तेव्हा एकवीस वर्षांचा होता. त्याने यरूशलेमेवर अकरा वर्षे राज्य केले. याच्या आईचे नाव हमूटल. ती लिब्ना शहरातील यिर्मया याची मुलगी.

24:19सिद्कीया यहोयाकीमाप्रमाणेच वर्तनाने वाईट होता. परमेश्वराच्या आज्ञेविरुध्द तो वागला.

24:20तेव्हा परमेश्वराने संतापाने यरूशलेम आणि यहूदा यांची हकालपट्टी केली. नंतर सिद्कीयाने बाबेलाच्या राज्याविरूद्ध बंडखोरी केली.

25:1सिद्कीयाने बाबेलाच्या राजाविरुध्द बंड केले आणि त्याच्या आज्ञा पाळण्याचे त्याने नाकारले. त्यामुळे बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर आपल्या सैन्यासह यरूशलेमेवर चाल करून गेला. सिद्कीयाच्या कारकिर्दीचे ते नववे वर्ष, दहावा महिना, दहावा दिवस होता. नबुखद्नेस्सरच्या सैन्याने यरूशलेमेला वेढा देऊन लोकांचे येणे जाणे रोखले. मग त्याने नगराभोवती कचऱ्याचे अडसर निर्माण केले.

25:2सिद्कीया राजाच्या कारकिर्दीचे अकरावे वर्ष उजाडेपर्यंत या नगराला वेढा चालू राहिला.

25:3दुष्काळाने परिस्थिती बिकट झाली होती. चौथ्या महिन्याच्या नवव्या दिवसापर्यंत नगरातील सामान्य मनुष्याची अन्नान्नदशा झाली.

25:4मग नगराच्या तटाला एक खिंड पाडण्यात आली; दोन्ही तटांच्यामध्ये जी वेस राजाच्या बागेजवळ होती त्या वाटेने सर्व योद्धे रातोरात पळून गेले; नगरास खास्द्यांचा वेढा पडलाच होता; इकडे राजाने अराबाचा रस्ता धरला.

25:5खास्दी सैन्याने राजाचा पाठलाग केला आणि त्यांना यरीहोजवळ गाठले. तेव्हा सिद्कीयाचे सैन्य त्यास एकटा सोडून पळून गेले.

25:6बाबेल देशाच्या लोकांनी राजा सिद्कीयाला धरुन रिब्ला येथे आपल्या राजाकडे नेले. या लोकांनी सिद्कीयाला जबर शासन करण्याचे ठरवले.

25:7त्यांनी सिद्कीयाच्या मुलांना त्याच्या नजरेसमोर जिवे मारले. नंतर सिद्कीयाचे डोळे काढले आणि त्यास जेरबंद करून बाबेलला नेले.

25:8बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर याच्या कारकिर्दीच्या एकोणिसाव्या वर्षी, पाचव्या महिन्यात सातव्या दिवशी नबूजरदान यरूशलेमेवर चाल करून आला. नबुजरदान हा राजाच्या उत्तम, निवडक सैन्याचा नायक होता.

25:9या नबुजरदानने परमेश्वराचे मंदिर, राजवाडा आणि यरूशलेममधील सर्व घरे जाळून टाकली. मोठमोठे वाडेही त्याने उद्ध्वस्त केले.

25:10मग खास्दी सैन्याने यरूशलेमची तटबंदी पाडली.

25:11नगरात अजून असलेले लोक बाबेलाच्या राज्याकडे फितून गेलेले लोक व उरलेले लोक यांना गारद्यांचा नायक नबूजरदानाने ताब्यात घेतले आणि त्यांच्यापैकी जे शरण यायला तयार होते त्यांच्यासह सर्वांना कैदी म्हणून नेले.

25:12अगदीच दरिद्री लोकांस तेवढे त्याने तेथेच राहू दिले. द्राक्षमळे आणि शेतीची देखभाल करण्यासाठी त्याने त्यांना तिथे ठेवले.

25:13परमेश्वराच्या मंदिरातील सर्व पितळी पात्रांची खास्दी सैन्याने मोडतोड केली. पितळी खांब, ढकलगाड्या, मोठमोठी पितळी घंगाळी यांची मोडतोड करून ते पितळ त्यांनी बाबेलला नेले.

25:14इतर पात्रे, फावडी, वाती कापण्याच्या कात्र्या, पळ्या, पितळी थाळ्या ही परमेश्वराच्या मंदिरातली सर्व उपकरणेही त्यांनी घेतली.

25:15अग्नीपात्रे, वाडगे, सोने-चांदीच्या लोभापायी सोन्यारुप्याची भांडीही नबुजरदानने हस्तगत केली.

25:16अशाप्रकारे, नबुजरदानने बळकावलेल्या वस्तू दोन पितळी स्तंभ. एक मोठे पितळी घंगाळ परमेश्वराच्या मंदिरासाठी शलमोनने करवून घेतलेल्या ढकलगाड्या, यांत इतके पितळ होते की त्याचे वजन करणे शक्य नव्हते.

25:17प्रत्येक स्तंभाची उंची सत्तावीस फूट त्यावरील कळस साडेचार फूट उंचीचे तेही पितळी असून त्यावर जाळीकाम आणि डाळिंबाची नक्षी होती, दोन्ही स्तंभ अगदी सारखेच होते.

25:18नबुजरदानने लोकांस मंदिरातून खाली नेले व मुख्य याजक सराया दुय्यम याजक सफन्या आणि तीन द्वारपाल

25:19आणि शहरातून एक सैन्याधिकारी अजूनही नगरात असलेले राजाचे पांच सल्लागार सैन्याधिकाऱ्याचा सचिव. हा जनगणना प्रमुख असून सैनिकांची निवड करत असे. शहरात सापडलेली साठ माणसेही त्याने घेतली.

25:20बाबेलातील रिब्ला येथे नबूजरदानाने या सर्वांना राजासमोर हजर केले.

25:21बाबेलाच्या राजाने त्या सर्वांची हमाथ देशातील रिब्ला येथे हत्या केली. अशाप्रकारे यहूदी यांना आपल्या भूमीतून बंदीवान म्हणून जावे लागले.

2 इतिहास

2 इति 36:11–21

11सिद्कीया यहूदाचा राजा झाला तेव्हा एकवीस वर्षांचा होता. त्याने यरूशलेमेमध्ये अकरा वर्षे राज्य केले.

12परमेश्वराच्या दृष्टीने निंद्य असे त्याने केले. परमेश्वराचे आदेश संदेष्टा यिर्मया याच्याकडून येत असत. त्याच्यापुढेही सिदकीया विनम्र झाला नाही आणि यिर्मयाचे त्याने ऐकले नाही.

13सिद्कीयाने नबुखद्नेस्सर विरुध्द उठाव केला. नबुखद्नेस्सरने पूर्वी सिद्कीया कडून स्वत:शी एकनिष्ठतेची शपथ वाहवली होती. सिद्कीयाने तेव्हा देवाची शपथ घेऊन तसे वचन दिले होते. पण तरीही सिद्कीयाने आडमुठेपणा केला आणि आपला आयुष्यक्रम बदलून इस्राएलच्या परमेश्वर देवाचे आज्ञापालन करायचे नाकारले.

14त्याचप्रमाणे याजकांचे प्रमुख, आणि यहूदातील वडिलधारी मंडळी यांचे दुराचरण वाढत चालले आणि त्यांनी अधिकाधिक पातके केली. ते परमेश्वराच्या बाबतीत अप्रमाणिक झाले. इतर देशांची अमंगळ कृत्यांची उदाहरणे त्यांनी समोर ठेवली. या प्रमुखांनी यरूशलेमामधल्या परमेश्वराने पवित्र केलेल्या मंदिराची धूळधान केली.

15त्यांच्या पूर्वजांच्या परमेश्वर देवाने लोकांस सावध करण्यासाठी मोठ्या निकडीने संदेष्टे पाठवले. आपल्या प्रजेविषयी आणि मंदिराविषयी त्याच्या मनात करुणा होती म्हणून परमेश्वर असे वागला. त्यांचा अथवा मंदिराचा नाश होऊ नये असे परमेश्वरास वाटत होते.

16पण या परमेश्वराच्या प्रजेने मात्र संदेष्ट्यांची टर उडवली. त्यांनी देवाच्या संदेष्ट्यांच्या सांगण्याकडे दुर्लक्ष केले. देवाच्या संदेशांची हेटाळणी केली. अखेर देवाचा क्रोध अनावर झाला. आता त्याचा संताप थोपवता येणे अशक्य झाले.

17तेव्हा खास्दी राजाला देवाने यहूदा व यरूशलेमेवर स्वारी करायला लावले. त्याने मंदिरात असलेल्या तरुणांनाही ठार केले. यहूदा व यरूशलेममधील लोकांवर त्याने दयामाया दाखवली नाही. लोकांस जिवे मारताना तरुण, कुमारी, वृध्द स्त्री-पुरुष, यावर त्याने तलवार चालवावी. देवानेच नबुखद्नेस्सराला यहूदा व यरूशलेमेच्या लोकांस शासन करायची मुभा दिली होती.

18देवाच्या मंदिरातील लहानमोठी सर्व पात्रे व निधी, आणि राजा व त्याचे सरदार ह्यांचे निधी ही सर्व तो बाबेलास घेऊन गेला.

19त्यांनी देवाच्या घराला आग लावली, यरूशलेमची तटबंदी उद्ध्वस्त केली, राजा आणि सरदार यांच्या मालकीची घरे जाळली. यरूशलेम येथील प्रत्येक मौल्यवान वस्तू लुटून नेली किंवा नष्ट केली.

20अजूनही हयात असलेल्या व तलवारीपासून वाचलेल्या लोकांस नबुखद्नेस्सरने बाबेलला नेऊन गुलाम केले. पुढे पारसाचे राज्य येऊन त्यांनी बाबेलचा पराभव करेपर्यंत हे गुलाम तेथेच राहिले.

21अशाप्रकारे, यिर्मयाकडून इस्राएलाबद्दल परमेश्वराने जे वदवले ते प्रत्यक्षात घडले. परमेश्वर यिर्मयाद्वारे म्हणाला होता: हे ठिकाण सत्तर वर्षे निर्मनुष्य आणि उजाड राहील. लोकांनी न पाळलेल्या शब्बाथाच्या भरपाईसाठी असे होईल.

यिर्मया

यिर्म 52:1–27

1सिद्कीया राज्य करू लागला तेव्हा तो एकवीस वर्षाचा होता; अकरा वर्षे त्याने यरूशलेमेवर राज्य केले. त्याच्या आईचे नाव हमूटल. ती लिब्नाकर यिर्मयाची मुलगी होती.

2यहोयाकीम याने जी प्रत्येकगोष्ट केली होती त्याप्रमाणे यानेही, परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट होते ते केले.

3आपल्या दृष्टीसमोरून त्यांना काढून टाकेपर्यंत, परमेश्वराच्या कोपाद्वारे यरूशलेम व यहूदामध्ये सर्व या घटना घडल्या. मग सिद्कीयाने बाबेलाच्या राजाच्या विरोधात बंड केले.

4मग असे झाले की, त्याच्या कारकिर्दीच्या नवव्या वर्षाच्या दहाव्या महिन्यात दहाव्या दिवशी बाबेलाचा राजा नबुखद्नेस्सर याने आपल्या सर्व सैन्याबरोबर यरूशलेमेविरूद्ध चाल करून आला. त्याने त्याच्यापुढे तळ ठोकला आणि त्यांच्याभोवती वेढ्याची भिंत बांधली

5म्हणून सिद्कीया राजाच्या अकराव्या वर्षापर्यंत त्या नगराला वेढा पडला होता.

6चौथ्या महिन्याच्या नवव्या दिवशी, नगरात भयंकर दुष्काळ पडला, तो इतका की, देशातल्या लोकांसाठी अन्नाचा कण नव्हता.

7मग नगराच्या तटाला खिंडार पाडण्यात आले आणि सर्व लढणारे माणसे पळाले राजाच्या बागेजवळ दोहो तटामध्ये जी वेस होती तिच्या वाटेने ते रात्री नगरातून निघून गेले आणि खास्दी लोक नगराच्यासभोवती होते, म्हणून ते अराब्याच्या वाटेने निघून गेले.

8पण खास्द्यांच्या सैन्याने राजाच्या पाठीस लागून यरीहोच्या मैदानात सिद्कीयाला गाठले. त्याचे सर्व सैन्य त्याच्यापासून पांगून दूर गेले.

9त्यांनी राजाला पकडले व त्यास हमाथ देशातील रिब्ला येथे बाबेलाच्या राजाकडे वर नेले. तेथे त्याने त्यास शिक्षा ठरवली.

10बाबेलाच्या राजाने सिद्कीयाच्या मुलांना त्याच्या डोळ्यापुढे मारले आणि यहूदाच्या सर्व अधिकाऱ्यांचीही त्याने रिब्ला येथे हत्या केली.

11मग बाबेलाच्या राजाने सिद्कीयाचे डोळे काढले, त्यास पितळी बेड्या घालून बाबेलास नेले. त्याने त्यास त्याच्या मरणाच्या दिवसापर्यंत तुरुंगातच ठेवले.

12आता बाबेलाच्या राजा नबुखद्नेस्सर याच्या कारकिर्दीच्या एकोणिसाव्या वर्षी, पाचव्या महिन्याच्या दहाव्या दिवशी, नबूजरदान यरूशलेमेस आला. तो बाबेलामधील राजाचा सेवक व राजाच्या अंगरक्षकांचा नायक होता.

13त्याने परमेश्वराचे घर जाळले, राजवाडा व यरूशलेमेमधील सर्व घरेही जाळली. नगरातील प्रत्येक महत्वाची इमारतसुद्धा त्याने जाळून टाकली.

14राजाच्या अंगरक्षकाच्या नायकाबरोबर असलेल्या सर्व खास्दी सैन्याने यरूशलेमेभोवती असलेली तटबंदी मोडून तोडून टाकली.

15सेनापती नबूजरदानाने यरूशलेम नगरामध्ये अजूनही राहत असलेल्या सर्व लोकांस कैदी म्हणून नेले. बाबेलाच्या राजाला आधीच शरण आलेल्यांनाही तो घेऊन गेला. यरूशलेममध्ये मागे राहिलेले कुशल कारागीरही त्याने बरोबर नेले.

16पण राजाचा अंगरक्षकांचा नायक नबूजरदान याने देशातील काही अगदी गरीब त्यांना द्राक्षमळ्यांत व शेतांत काम करण्यासाठी मागेच ठेवले.

17परमेश्वराच्या घरातील असलेले पितळी खांब, परमेश्वराच्या घरातील पितळी गंगाळसागर व त्याच्या बैठकी खास्द्यांनी तोडून तुकडे तुकडे केले आणि सर्व पितळ परत बाबेलाला घेऊन गेले.

18पात्रे, फावडी, दिव्याची कात्री, वाट्या, आणि मंदिरातील सेवा ज्या पितळी उपकरणाने याजक करीत ती सर्व खास्द्यांनी नेली.

19पेले व धूपपात्रे, वाट्या, बहुगुणी, दीपस्तंभ, चमचे, कटोरे जी सोन्याची आणि रुप्याचे बनवली होती ती राजाचा अंगरक्षकांचा नायक तीदेखील घेऊन गेला.

20दोन खांब, गंगाळसागर, व त्याच्या बैठकीखालचे बारा पितळी बैल शलमोन राजाने परमेश्वराच्या घरासाठी बनविले होते, या वस्तूतील अधिक पितळ वजनात मावणे शक्य नव्हते.

21प्रत्येक खांब अठरा हात उंच होता. त्याच्या घेराला बारा हात दोरी लागे. प्रत्येकाची जाडी चार बोटे होती व पोकळ होती.

22त्यावर पितळेचा कळस होता. कळसाची उंची पाच हात होती, त्यासभोवती सर्व जाळीकाम व चारी बांजूनी डाळिंबे होती. ती सर्व पितळे बनवली होती. दुसरे खांब व त्याची डाळिंबे पहिल्या खांबाप्रमाणे सारखीच होती.

23असे तेथे कळसाच्या चाऱ्ही बाजूंना शहाण्णव डाळिंबे होती आणि जाळीकामावर सभोवती सर्व डाळिंबे शंभर होती.

24अंगरक्षकांच्या नायकाने बंदिवान प्रमुख याजक सराया व दुसरा याजक सफन्या यांच्याबरोबर आणि तीन द्वारपालांनाही एकत्रित नेले.

25सैनिकांवर जो अधिकारी नेमला होता त्यास आणि जे सात माणसे राजाला सल्ला देत, ते अजूनपर्यंत नगरातच होते. त्याप्रमाणेच मनुष्यांची सैन्यात भरती करणारा जबाबदार सेनापतीचा चिटणीस, त्यांच्याबरोबर देशातील नगरात असलेले साठ महत्वाची माणसे यांना नगरातून पकडून नेले.

26नंतर अंगरक्षकाचा नायक नबूजरदान याने त्यांना घेऊन रिब्ला येथे बाबेलाच्या राजाकडे आणले.

27रिब्लामध्ये बाबेलाच्या राजाने त्यांना हमाथ देशात रिब्ला येथे मार देऊन ठार केले. अशा तऱ्हेने यहूदा आपल्या देशातून हद्दपार झाला.

खूण केलेले: प्रत्येक वृत्तांतात असलेले शब्द, तुम्ही वाचता त्या भाषांतरात. सर्वात वारंवार येणारे शब्द (“आणि”, “तो”) खूण केलेले नाहीत; दुसऱ्या रूपातील शब्दाची खूण कदाचित होणार नाही.

स्रोत: OpenBible.info, CC BY 4.0 · इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क