Bible Explorer अ‍ॅप मिळवा

शोधा › राजे आणि इतिहास शेजारी शेजारी › शौल आणि दावीद

राजे आणि इतिहास शेजारी शेजारी · शौल आणि दावीद

दावीदाची प्रार्थना

2 शमु 7:18–29 · 1 इति 17:16–27

2 शमुवेल

2 शमु 7:18–29

18यानंतर दावीद आत जाऊन परमेश्वरासमोर बसला आणि म्हणाला, “हे प्रभू, परमेश्वरा, मला एवढी किंमत तू का देतोस? माझे घराणे तुला महत्वाचे का वाटते? तू मला एवढे मोठे का केलेस?

19हे प्रभू परमेश्वरा, तुझ्या दृष्टीने ही केवळ लहान गोष्ट आहे; तू आपल्या सेवकाच्या घराण्यासंबंधाने पुढील बर्‍याच काळाचे सांगून ठेवले आहेस; प्रभू परमेश्वरा, हे सर्व तू मानवी व्यवहारासारखे केले आहेस.

20मी आणखी काय बोलणार? प्रभू परमेश्वरा, तू तुझ्या सेवकाला जाणतोसच.

21तू करणार म्हणालास, आणि तुला तसे करायची इच्छा आहे; तेव्हा या अदभुत गोष्टी खरोखरच घडतील. मला, तुझ्या सेवकाला, तू त्याची पूर्णकल्पनाही द्यायचे ठरवलेस.

22ह्यास्तव हे माझ्या प्रभू, परमेश्वरा, तू खरोखरच महान आहेस. जे काही आम्ही आमच्या कानांनी आजवर ऐकले आहे, त्यावरून पाहता तुझ्यासमान कोणी नाही. तुझ्याखेरीज अन्य कोणी देव नाही.

23पृथ्वीच्या पाठीवर इस्राएलसारखे राष्ट्र नाही. इस्राएलाची प्रजा ही खास प्रजा आहे. ती गुलाम होती, तिला तू मिसरमधून सोडवलेस आणि मुक्त केलेस. तिला आपली प्रजा बनवलेस. इस्राएलांसाठी तू महान आणि अद्भूत चमत्कार केलेस.

24तू निरंतर इस्राएलाला स्वतःच्या कवेत घेतलेस. हे परमेश्वरा तू त्यांचा देव झालास.

25आता तर परमेश्वर देवा, तू या तुझ्या सेवकासाठी काही गोष्टी सिध्दीस नेणार आहेस. तुझ्या वचनाप्रमाणे कृपा करून तसेच होऊ दे. माझा वंश सतत राज्य करू दे.

26मग तुझ्या नावाचा महिमा वाढेल. लोक म्हणतील, सर्वशक्तिमान परमेश्वर देवाची इस्राएलवर सत्ता आहे. तुझी सेवा करायला तुझा सेवक दावीद याच्या घराण्याला बळ मिळू दे.

27सर्वशक्तिमान परमेश्वरा, इस्राएलाच्या देवा, तूच हे मला दाखवले आहेस तू म्हणालास, मी तुझ्यासाठी घर बांधीन, म्हणून मी तुझा सेवक तुझ्यापुढे ही प्रार्थना करण्याचे साहस करत आहे.

28प्रभू परमेश्वरा, तूच आमचा देव आहेस. तुझ्या सांगण्यावर माझा पूर्ण भरंवसा आहे. या सर्व चांगल्या गोष्टी माझ्याबाबतीत, तुझ्या या सेवकाच्या बाबतीत घडणार आहेत असे तू म्हणालास.

29आता माझ्या घराण्याला आशीर्वाद दे. माझा वंश सातत्याने चालू दे. हे प्रभू परमेश्वरा, तूच तसे म्हणाला आहेस आमच्यावर तुझ्या आशीर्वादाचे छत्र कायमचे राहील असा तुझा आशीर्वाद आहे.”

1 इतिहास

1 इति 17:16–27

16नंतर दावीद राजा आत गेला व परमेश्वरासमोर जाऊन बसला; तो म्हणाला, “हे परमेश्वर देवा, मी कोण आहे, आणि माझे घराणे काय की तू मला येथपर्यंत आणले आहे?”

17आणि हे देवा, तुझ्यादृष्टीने ही केवळ लहान गोष्ट होती, पण तू तुझ्या सेवकाच्या घराविषयी भविष्यात येणाऱ्या बऱ्याच दिवसांबद्दल बोलला आहेस. व हे परमेश्वर देवा, मला तू भविष्यातील पिढ्या दाखवल्या आहेत.

18तुझ्या सेवकाचा तू सन्मान केला आहेस. आणखी मी, दावीद, तुला काय बोलू? तुझ्या सेवकाला तू विशेष ओळख दिली आहेस.

19हे परमेश्वरा, तुझ्या सेवकासाठी व तुझा स्वतःचा हेतू पूर्ण व्हावा, म्हणून तू या सर्व महान गोष्टी प्रगट करण्यासाठी अदभुत कृत्ये केलीस.

20हे परमेश्वरा, जे सर्व आम्ही आजवर आमच्या कानांनी ऐकले त्याप्रमाणे तुजसमान कोणी नाही आणि तुझ्याशिवाय कोणीच देव नाही.

21आणि तुझ्या इस्राएल लोकांसारखे दुसरे कोठले राष्ट्र पृथ्वीवर आहे ज्यांना तू, आपलेच लोक व्हावेत, म्हणून देव स्वतः त्यांना मिसरातून सोडवण्यास गेला; या तुझ्या लोकांस तू मिसरातून सोडवले तिच्या देखत महान व भयानक कृत्ये करून तू आपले नाव केले. ज्यांना तू मिसरातून सोडवले होते, त्या तुझ्या लोकांपुढून इतर राष्ट्रांस घालवून दिले.

22तू इस्राएलांना आपले स्वतःचे लोक सर्वकाळासाठी करून ठेवले आणि परमेश्वरा तू त्यांचा देव झालास.

23म्हणून आता, हे परमेश्वरा, तुझ्या सेवकाला आणि त्याच्या घराण्याला तू हे वचन दिले आहेस, ते सर्वकाळ स्थापित कर. तू बोलला आहेस तसे कर.

24तुझे नाव सर्वकाळ स्थापित व्हावे व थोर केले जावे, असे म्हणून, सेनाधीश परमेश्वर इस्राएलाचा देव आहे. दावीद, तुझा सेवक याचे घराणे तुझ्यासमोर स्थापित व्हावे.

25कारण, माझ्या देवा, तू आपल्या सेवकास हे प्रगट केले की, तू त्याच्यासाठी घर बांधशील. याकरिता तुझ्या सेवकाला, तुझ्याकडे प्रार्थना करण्याचे धैर्य मिळाले आहे.

26आता हे परमेश्वरा, तूच देव आहेस आणि तुझ्या सेवकाला हे चांगले अभिवचन दिले आहे.

27तर आता, संतुष्ट होऊन तुझ्या सेवकाच्या घराण्याला तुझ्यापुढे सर्वकाळ राहण्याचा आशीर्वाद दिला आहे. हे परमेश्वरा, तू, आशीर्वाद दिलास आणि ते सर्वकाळ आशीर्वादित आहे.

खूण केलेले: प्रत्येक वृत्तांतात असलेले शब्द, तुम्ही वाचता त्या भाषांतरात. सर्वात वारंवार येणारे शब्द (“आणि”, “तो”) खूण केलेले नाहीत; दुसऱ्या रूपातील शब्दाची खूण कदाचित होणार नाही.

स्रोत: OpenBible.info, CC BY 4.0 · इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क