Bible Explorer अ‍ॅप मिळवा

शोधा › शुभवर्तमाने शेजारी शेजारी › यरूशलेमेत

शुभवर्तमाने शेजारी शेजारी · यरूशलेमेत

सदूकी आणि पुनरुत्थान

मत्त 22:23–33 · मार्क 12:18–27 · लूक 20:27–40

मत्तय

मत्त 22:23–33

23पुनरुत्थान होत नाही, असे म्हणणाऱ्या काही सदूक्यांनी त्याच दिवशी त्याच्याकडे येऊन त्यास विचारले,

24ते म्हणाले, “गुरूजी, मोशेने शिकविले की, जर एखादा मनुष्य मरण पावला आणि त्यास मूलबाळ नसेल, तर त्याच्या भावाने त्याच्या पत्नीशी लग्न करावे, म्हणजे मरण पावलेल्या भावाचा वंश चालेल.

25आता, आमच्यामध्ये सात भाऊ होते. पहिल्याने लग्न केले आणि नंतर तो मरण पावला आणि त्यास मूल नसल्याने त्याच्या भावाने त्याच्या पत्नीशी लग्न केले.

26असेच दुसऱ्या व तिसऱ्या भावाच्या बाबतीतही घडले व सातही भावांनी तिच्याशी लग्न केले आणि मरण पावले.

27शेवटी ती स्त्री मरण पावली.

28आता प्रश्न असा आहे की, पुनरुत्थानाच्या वेळेस ती कोणाची पत्नी असेल, कारण सर्व सातही भावांनी तिच्याशी लग्न केले होते.”

29येशूने त्यांना उत्तर देऊन म्हटले, “तुम्ही चुकीची समजूत करून घेत आहात, कारण तुम्हास शास्त्रलेख व देवाचे सामर्थ्य माहीत नाही.

30तुम्हास समजले पाहिजे की, पुनरुत्थानानंतरच्या जीवनात लोक लग्न करणार नाहीत किंवा करून देणार नाहीत, उलट ते स्वर्गात देवदूतासारखे असतील.

31तरी, मरण पावलेल्यांच्या पुनरुत्थानाविषयी देवाने तुम्हास जे सांगितले ते तुम्ही अजूनपर्यंत वाचले नाही काय?

32ते असे की, ‘मी अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव आणि याकोबाचा देव आहे,’ तो मरण पावलेल्यांचा देव नाही तर जिवंताचा देव आहे.”

33जेव्हा जमावाने हे ऐकले तेव्हा त्याच्या शिकवणीने आश्चर्यचकित झाले.

मार्क

मार्क 12:18–27

18नंतर, जे पुनरुत्थान नाही असे मानणारे काही सदूकी त्याच्याकडे आले त्यांनी त्यास विचारले,

19“गुरुजी. मोशेने आमच्यासाठी पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, जर कोणा मनुष्याचा भाऊ मरण पावला व त्याची पत्नी मागे राहिली, परंतु त्यांना मूलबाळ नसले तर आपल्या भावाच्या वंश पुढे चालावा म्हणून त्या मनुष्याने तिच्याबरोबर लग्न करावे आणि मरण पावलेल्या भावाचा वंश वाढवावा.

20तर असे कोणी सात भाऊ होते. पहिल्याने पत्नी केली व तो मूलबाळ न होता मरण पावला.

21दुसऱ्याने तिच्याबरोबर लग्न केले, तोसुध्दा मूलबाळ न होता मरण पावला.

22तिसऱ्याने तसेच केले. त्या सात भावांपैकी एकालाही त्या स्त्रीपासून, मूलबाळ झाले नाही. शेवटी ती स्त्रीही मरण पावली.

23सातही भावांनी तिच्याबरोबर लग्न केले तर पुनरुत्थानाच्या वेळी जेव्हा लोक मरण पावलेल्यातून उठतील तेव्हा ती कोणाची पत्नी असेल? कारण सातही जणांनी तिच्याबरोबर लग्न केले होते.”

24येशू त्यांना म्हणाला, “खात्रीने, शास्त्रलेख आणि देवाचे सामर्थ्य तुम्हास माहीत नाही म्हणून तुम्ही अशी चूक करीत आहात.

25कारण जेव्हा लोक मरण पावलेल्यातून उठतील तेव्हा ते लग्न करणार नाहीत व करून देणार नाहीत, त्याऐवजी ते स्वर्गातील देवदूताप्रमाणे असतील.

26परंतु मरण पावलेल्यांच्या पुन्हा उठण्याविषयी तुम्ही मोशेच्या पुस्तकातील जळत्या झुडपाविषयी वाचले नाही काय? तेथे देव मोशाला म्हणाला, मी अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव आणि याकोबाचा देव आहे.

27तो मरण पावलेल्यांचा देव नव्हे तर जिवंत लोकांचा देव आहे. तुम्ही फार चुकत आहात.”

लूक

लूक 20:27–40

27मग पुनरुत्थान नाही असे म्हणणारे काही सदूकी त्याच्याकडे आले. त्यांनी त्यास प्रश्न विचारला. ते म्हणाले,

28“गुरुजी मोशेने आमच्यासाठी लिहून ठेवले आहे की जर एखाद्याचा भाऊ मरण पावला व त्या भावाला पत्नी आहे पण मूल नाही, तर त्याच्या भावाने त्या विधवेशी लग्न करावे आणि भावासाठी त्यास मुले व्हावीत.

29सात भाऊ होते. पहिल्या भावाने लग्न केले व तो मूल न होता मरण पावला.

30नंतर दुसऱ्या भावाने तिच्याशी लग्न केले.

31नंतर तिसऱ्याने तिच्याशी लग्न केले. सातही भावांबरोबर तीच गोष्ट घडली. कोणालाही मुले न होता ते मरण पावले.

32नंतर ती स्त्रीही मरण पावली.

33तर मग पुनरुत्थानाच्या वेळी ती कोणाची पत्नी होईल? कारण त्या सातांनीही तिच्याबरोबर लग्न केले होते.”

34तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “या युगातले लोक लग्न करून घेतात व लग्न करून देतात.

35परंतु जे लोक त्या येणाऱ्या युगामध्ये व मृतांच्या पुनरुत्थानामध्ये भाग घेण्यासाठी पात्र ठरतील, ते लग्न करून घेणार नाहीत आणि लग्न करून देणार नाहीत

36आणि ते मरणार नाहीत, कारण ते देवदूतासारखे आहेत. ते पुनरुत्थानाचे पुत्र असल्यामुळे ते देवाचे पुत्रही आहेत.

37जळत्या झुडुपाविषयी मोशेने लिहिले, तेव्हा त्याने परमेश्वरास ‘अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव आणि याकोबाचा देव’ असे म्हणले व मरण पावलेलेसुद्धा उठवले जातात हे दाखवून दिले.

38देव मरण पावलेल्यांचा नाही तर जिवंतांचा देव आहे. सर्व लोक जे त्याचे आहेत ते जिवंत आहेत.”

39तेव्हा काही नियमशास्त्राचे शिक्षक म्हणाले, “गुरुजी, उत्तम बोललात.”

40मग त्यास आणखी प्रश्न विचारण्याचे धाडस कोणी केले नाही.

खूण केलेले: प्रत्येक वृत्तांतात असलेले शब्द, तुम्ही वाचता त्या भाषांतरात. सर्वात वारंवार येणारे शब्द (“आणि”, “तो”) खूण केलेले नाहीत; दुसऱ्या रूपातील शब्दाची खूण कदाचित होणार नाही.

स्रोत: OpenBible.info, CC BY 4.0 · इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क