Bible Explorer अ‍ॅप मिळवा

शोधा › शुभवर्तमाने शेजारी शेजारी › येशूचे दुःखसहन

शुभवर्तमाने शेजारी शेजारी · येशूचे दुःखसहन

पेत्राच्या नाकारण्याचे भाकीत

मत्त 26:31–35 · मार्क 14:27–31 · लूक 22:31–34 · योहा 13:36–38

मत्तय

मत्त 26:31–35

31येशूने सांगितले, “आज रात्री माझ्यामुळे, तुम्ही सर्व अडखळाल; कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, ‘मी मेंढपाळाचा वध करीन, कळपातील मेंढरांची दाणादाण होईल.’

32पण मी मरणातून उठल्यानंतर, तुमच्या अगोदर गालील प्रांतात जाईन.”

33पेत्र उत्तर देत म्हणाला, “इतर सर्व जरी आपणाविषयी अडखळले तरी मी कधीही अडखळणार नाही.”

34येशू त्यास म्हणाला, “मी तुला खरे सांगतो आज रात्री कोंबडा आरवण्यापूर्वी तू तीन वेळा मला नाकारशील.”

35पेत्र म्हणाला, “मला तुझ्याबरोबर मरावे लागले तरी मी तुला नाकारणार नाही.” आणि इतर शिष्यसुद्धा तसेच म्हणाले.

मार्क

मार्क 14:27–31

27येशू शिष्यांना म्हणाला, “तुम्ही सर्व अडखळून पडाल कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, ‘मी मेंढपाळास मारीन आणि मेंढरांची दाणादाण होईल.’

28परंतु माझे पुनरुत्थान झाल्यावर मी तुमच्यापुढे गालील प्रांतात जाईन.”

29पेत्र म्हणाला, जरी सर्व अडखळले तरी मी अडखळणार नाही.

30मग येशू त्यास म्हणाला, “मी तुला खरे सांगतो, आज रात्री दोनदा कोंबडा आरवण्यापूर्वी तू तीन वेळा मला नाकारशील.”

31तरीही पेत्र अधिक आवेशाने म्हणाला, “जरी मला आपणाबरोबर मरावे लागले तरीसुद्धा मी आपणाला नाकारणार नाही.” आणि इतर सर्वजण तसेच म्हणाले.

लूक

लूक 22:31–34

31शिमोना, शिमोना, ऐक! सैतानाने तुम्हास गव्हासारखे चाळावे म्हणून मागितले आहे.

32परंतु शिमोना, तुझा विश्वास ढळू नये, म्हणून मी तुझ्यासाठी प्रार्थना केली आहे आणि तू पुन्हा माझ्याकडे वळलास म्हणजे तुझ्या भावांस स्थिर कर.”

33परंतु शिमोन पेत्र त्यास म्हणाला, “प्रभू, मी तुझ्याबरोबर तुरुंगात जाण्यासाठी व मरण्यासाठी तयार आहे.”

34पण येशू म्हणाला, “पेत्रा, मी तुला सांगतो, तू मला ओळखतोस हे तीन वेळा नाकारशील तोपर्यंत आज कोंबडा आरवणार नाही.”

योहान

योहा 13:36–38

36शिमोन पेत्र त्यास म्हणाला, “प्रभूजी, आपण कोठे जाता?” येशूने त्यास उत्तर दिले, “मी जाईन तिकडे, आता, तुला माझ्यामागे येता येणार नाही; पण नंतर तू येशील.”

37पेत्र त्यास म्हणाला, “प्रभूजी, मला आपल्यामागे आताच का येता येणार नाही? मी आपल्यासाठी माझा जीव देईन.”

38येशूने त्यास उत्तर दिले, “माझ्यासाठी तू आपला जीव देशील काय? मी तुला खरे खरे सांगतों, तू मला तीनदा नाकारशील तोपर्यंत कोंबडा आरवणार नाही.”

खूण केलेले: प्रत्येक वृत्तांतात असलेले शब्द, तुम्ही वाचता त्या भाषांतरात. सर्वात वारंवार येणारे शब्द (“आणि”, “तो”) खूण केलेले नाहीत; दुसऱ्या रूपातील शब्दाची खूण कदाचित होणार नाही.

स्रोत: OpenBible.info, CC BY 4.0 · इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क