Bible Explorer अ‍ॅप मिळवा

मुख्यपृष्ठ › दैनंदिन बायबल पाठ › ऑगस्ट 2027 › 19 ऑगस्ट

ऑर्थोडॉक्स दिनदर्शिका · 6 ऑगस्ट (जुनी पद्धत)

ऑर्थोडॉक्स दैनंदिन पाठ — 19 ऑगस्ट 2027

गुरुवार · पेन्टेकॉस्टनंतरचा 9वा आठवडा · स्वर 7

सण आणि संत

The Holy Transfiguration of Our Lord God and Saviour Jesus Christ

मरीयेच्या निद्रेचा उपवास

मासे चालतात

हे मठाच्या नियमानुसार आहे. पॅरिशमध्ये उपवासाचे प्रमाण आपल्या पापकबुलीच्या धर्मगुरूसोबत, आरोग्य, वय आणि परिस्थितीनुसार ठरवले जाते.

दिवसाची वाचने

संध्याप्रार्थना: वाचन

निर्ग 24:12–18

12परमेश्वर मोशेला म्हणाला, “पर्वतावर मला भेटावयास ये; मी दोन दगडी पाट्यांवर इस्राएल लोकांच्या शिक्षणासाठी नियम व आज्ञा लिहिलेल्या आहेत; त्या मी तुला देतो.” 13तेव्हा मोशे व त्याचा मदतनीस यहोशवा हे उठले आणि मोशे देवाच्या पर्वतावर चढून गेला. 14मोशे इस्राएलांच्या वडिलांना म्हणाला, “आम्ही तुमच्याकडे परत येईपर्यंत तुम्ही येथेच थांबा, मी परत येईपर्यंत अहरोन व हूर हे तुमच्याबरोबर आहेत; कोणाचे काही प्रकरण असेल तर त्याने त्यांच्याकडे जावे.” 15मग मोशे पर्वतावर चढून गेला आणि ढगाने पर्वत झाकून टाकला; 16परमेश्वराचे तेज सीनाय पर्वतावर उतरले; ढगाने सहा दिवस पर्वताला झाकून टाकले; सातव्या दिवशी परमेश्वराने मोशेला हाक मारली. 17इस्राएल लोकांस पर्वताच्या शिखरावर परमेश्वराचे तेज भस्म करणाऱ्या धगधगत्या अग्नीसारखे दिसत होते. 18मोशे पर्वतावर चढून आणखी वर ढगात गेला; मोशे चाळीस दिवस व चाळीस रात्र तेथे होता.

संध्याप्रार्थना: वाचन

निर्ग 33:11–23; 34:4–6, 8

11मित्रांशी बोलावे त्याप्रमाणे परमेश्वर मोशेबरोबर समोरासमोर बोलत असे. मोशे छावणीकडे माघारी जात असे. तरी मोशेचा मदतनीस नूनाचा मुलगा यहोशवा, हा तरुण मंडप सोडून बाहेर येत नसे. 12मोशे परमेश्वरास म्हणाला, “पाहा या लोकांस घेऊन जाण्यास तू मला सांगितलेस, परंतु तू माझ्याबरोबर कोणाला पाठविणार ते तू सांगितले नाहीस; तू मला म्हणालास, मी तुला तुझ्या नावाने ओळखतो आणि तुझ्यावर माझी कृपादृष्टी आहे. 13आता माझ्यावर तुझी कृपादृष्टी असल्यास तुझे मार्ग मला दाखव म्हणजे मला तुझी ओळख पटेल आणि त्यामुळे तुझी कृपादृष्टी माझ्यावर होईल. पाहा, हे राष्ट्र तुझी प्रजा आहे.” 14परमेश्वराने उत्तर दिले, “मी स्वत: तुझ्याबरोबर येईन व तुला विसावा देईन.” 15मग मोशे परमेश्वरास म्हणाला, “जर तू स्वतः येणार नाहीस तर मग आम्हांला या येथून पुढे नेऊ नकोस. 16तसेच तुझी कृपादृष्टी माझ्यावर व तुझ्या लोकांवर झाली आहे हे कशावरून समजावे? जर तू आमच्याबरोबर आल्याने मी व हे तुझे लोक पृथ्वीवरील इतर सर्व लोकांहून वेगळे झालो आहो यावरूनच ते समजायचे ना?” 17मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू मागतोस त्याप्रमाणे मी करीन, कारण माझी कृपादृष्टी तुझ्यावर झाली आहे आणि मी व्यक्तीशः तुला तुझ्या नावाने ओळखतो.” 18नंतर मोशे म्हणाला, “आता कृपा करून मला तुझे तेज दाखव.” 19मग परमेश्वराने मोशेला उत्तर दिले, “मी माझे सर्व चांगुलपण तुझ्यापुढे चालवीन; मी परमेश्वर आहे आणि हे माझे नाव मी जाहीर करीन. ज्याच्यावर कृपा करावीशी वाटेल त्याच्यावर मी कृपा करीन आणि ज्याच्यावर दया करावीशी वाटते त्याच्यावर दया करीन. 20परंतु” तू माझा “चेहरा पाहू शकणार नाहीस, कारण माझा चेहरा पाहिलेला कोणीही मनुष्य जिवंत राहणार नाही.” 21परमेश्वर म्हणाला, “माझ्याजवळ या ठिकाणी एक खडक आहे; तू त्यावर उभा राहा. 22माझे तेज त्या जागेजवळून पुढे जाईल, तेव्हा मी तुला त्या खडकातील मोठ्या भेगेत ठेवीन; आणि मी निघून जाईपर्यंत माझ्या हाताने तुला झाकीन; 23नंतर मी माझा हात काढून घेईन आणि तू माझी पाठ पाहशील; परंतु तू माझा चेहरा पाहणार नाहीस.” 34:4तेव्हा मोशेने पहिल्या पाट्यांसारख्याच आणखी दोन दगडी पाट्या घडून तयार केल्या; सकाळीच उठून त्या हाती घेऊन परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे सीनाय पर्वतावर चढून गेला; 5तेव्हा मोशे पर्वतावर आल्यावर परमेश्वर एका ढगातून त्याच्याकडे खाली उतरला व तेथे त्याच्यापाशी उभा राहिला; आणि त्याने परमेश्वर या नावाची घोषणा केली. 6परमेश्वर त्याच्यापुढून अशी घोषणा करीत गेला: “परमेश्वर, परमेश्वर, दयाळू, कृपाळू देव, मंदक्रोध, दयेचा व सत्याचा सागर, 8मग मोशेने ताबडतोब भूमीपर्यंत वाकून परमेश्वरास नमन केले.

संध्याप्रार्थना: वाचन

1 राजे 19:3–9, 11–13, 15–16

3एलीया हे ऐकून घाबरला. आपला जीव वाचवायला त्याने पळ काढला. बरोबर त्याने आपल्या नोकराला घेतले होते. यहूदामधील बैर-शेबा येथे ते गेले. आपल्या नोकराला तिथेच सोडून 4तो पुढे दिवसभर वाळवंट तुडवत गेला. एका झाडाखाली तो बसला. आता मरण यावे असे त्यास वाटले. एलीया म्हणाला, “आता हे पुरे झाले, परमेश्वरा! मला आता मरु दे माझ्या पूर्वजांपेक्षा माझ्यात काय बरे आहे?” 5एका झाडाखाली तो आडवा झाला आणि त्यास झोप लागली. तेव्हा एक देवदूत तिथे आला एलीयाला स्पर्श करून म्हणाला, “उठ हे खा.” 6एलीया उठून पाहतो तर निखाऱ्यावर भाजलेली एक भाकर आणि पाण्याचे मडके शेजारी ठेवलेले होते. एलीयाने ते खाल्ले, पाणी प्याला आणि तो पुन्हा झोपी गेला. 7आणखी काही वेळाने तो परमेश्वराचे देवदूत दुसऱ्यांदा पुन्हा त्याच्याजवळ आला त्याने त्यास स्पर्श केला आणि त्यास म्हणाला, “ऊठ आणि थोडे खाऊन घे, नाहीतर पुढचा मोठा प्रवास करायला तुला शक्ती राहणार नाही.” 8तेव्हा एलीया उठला त्याने खाल्ले आणि पाणी प्याला. त्या अन्नाच्या बळावर पुढे तो चाळीस दिवस आणि रात्री चालत राहिला. देवाचा डोंगर होरेब येथपर्यंत तो चालला. 9तिथे एका गुहेत शिरुन त्याने रात्र काढली. तेव्हा परमेश्वर एलीयाशी बोलला. तो म्हणाला, “एलीया, तू येथे का आला आहेस?” 11यावर परमेश्वर एलीयाला म्हणाला, “जा, या डोंगरावर माझ्यासमोर उभा राहा. मी तुझ्या जवळून जातो” मग जोराचा वारा सुटला. त्या सोसाट्याच्या वाऱ्याने डोंगरालाही तडे जाऊन मोठेमोठे खडक परमेश्वरासमोर पडले. पण त्या वाऱ्यात परमेश्वर नव्हता. त्यानंतर धरणीकंप झाला, पण तेथेही परमेश्वर नव्हता. 12धरणीकंपानंतर अग्नी प्रकटला. पण तेथेही परमेश्वर नव्हता. अग्नी शमल्यावर मात्र शांत, मंजुळ स्वर ऐकू आला. 13एलीयाने हा ध्वनी ऐकला तेव्हा अंगरख्याने चेहरा झाकून घेऊन तो गुहेच्या दाराशी जाऊन उभा राहिला. “एलीया, तू इथे का आला आहेस?” अशी वाणी त्यास ऐकू आली. 15तेव्हा परमेश्वर त्यास म्हणाला, “आता मागे जा आणि वाळवंटातून जाणाऱ्या रस्त्याने दिमिष्काला पोहोंचेपर्यंत चालत जा. दिमिष्कामध्ये जा आणि अरामाचा राजा म्हणून हजाएलला अभिषेक कर. 16निमशीचा पुत्र येहू याला इस्राएलचा राजा म्हणून अभिषेक कर. आणि आबेल-महोला इथला शाफाटाचा पुत्र अलीशा याला पुढे तुझी जागा घेणारा संदेष्टा म्हणून अभिषेक कर.

प्रातःप्रार्थना: शुभवर्तमान

लूक 9:28–36

28आणि या गोष्टी सांगितल्यानंतर सुमारे आठ दिवसानी असे झाले की, पेत्र व योहान व याकोब यांना बरोबर घेऊन तो प्रार्थना करायला डोंगरावर गेला. 29तेव्हा तो प्रार्थना करीत असता त्याच्या मुखाचे रूप पालटले व त्याचे वस्त्र पांढरे शुभ्र लखलखीत झाले. 30आणि पाहा, दोन पुरूष त्याच्याशी संभाषण करीत होते; हे मोशे व एलीया होते, 31ते तेजस्वी दिसत होते आणि जे त्याचे प्रयाण तो यरूशलेम शहरात पूर्ण करणार होता, त्याविषयी ते बोलत होते. 32तेव्हा पेत्र व त्याच्याबरोबर जे होते ते झोपेने भारावले होते, परंतु ते पूर्णपणे जागे झाले तेव्हा त्यांचे तेज आणि जे दोन पुरूष त्याच्याजवळ उभे राहिले होते त्यांनाही पहिले. 33मग असे झाले की ते त्याच्यापासून दूर होत असता पेत्राने येशूला म्हटले, “हे गुरु, येथे असणे आम्हास बरे आहे; तर आम्ही तीन मंडप करू, तुझ्यासाठी एक व मोशेसाठी एक व एलीयासाठी एक.” आपण काय बोलत आहोत याचे त्यास भान नव्हते. 34तो या गोष्टी बोलत असता एक ढग येऊन त्यांच्यावर सावली करू लागला आणि ते ढगांत शिरले तेव्हा ते भ्याले. 35आणि ढगांतून वाणी आली, ती म्हणाली, “हा माझा निवडलेला पुत्र आहे, याचे तुम्ही ऐका.” 36ही वाणी झाल्यावर येशू एकटाच दिसला आणि ते उगेच राहिले व ज्या गोष्टी त्यांनी पहिल्या होत्या त्यांतले काहीच त्यांनी त्या दिवसांमध्ये कोणाला सांगितले नाही.

प्रेषितांचे पत्र (प्रभूच्या रूपांतरासाठी)

2 पेत्र 1:10–19

10म्हणून बंधूंनो, तुमचे पाचारण व तुमची निवड अढळ करण्यासाठी विशेष प्रयत्न करा. या गोष्टी तुम्ही केल्या तर तुम्ही कधी अडखळणार नाही. 11आणि तशा प्रकारे आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या सार्वकालिक राज्यात जयोत्सावाने तुमचा प्रवेश होईल. 12या कारणास्तव, जरी तुम्हास या गोष्टी माहित आहेत आणि प्राप्त झालेल्या सत्यात तुम्ही स्थिर झाला आहा, तरी तुम्हास त्यांची नेहमीच आठवण देण्याची काळजी घेईन. 13मी या मंडपात आहे तोपर्यंत तुम्हास आठवण देऊन जागृत ठेवणे हे मला योग्य वाटते. 14कारण मला माहीत आहे की, आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याने मला कळवल्याप्रमाणे मला माझा मंडप लवकर काढावा लागेल. 15आणि माझे निघून जाणे झाल्यानंतरही या गोष्टी, सतत तुमच्या स्मरणात रहाव्या म्हणून शक्य तितके करीन. 16कारण चातुर्याने कल्पिलेल्या कथास अनुसरून आम्ही आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे सामर्थ्य व येण्याविषयी जे तुम्हास कळवले असे नाही तर आम्ही त्याचे ऐश्वर्य, प्रत्यक्ष पाहणारे होतो. 17कारण त्यास देवपित्याकडून सन्मान व गौरव मिळाले; तेव्हा ऐश्वर्ययुक्त गौरवाच्याद्वारे अशी वाणी झाली की, “हा माझा प्रिय पुत्र, मला परमप्रिय आहे, ह्याच्याविषयी मी संतुष्ट आहे.” 18त्याच्याबरोबर पवित्र डोंगरावर असताना आकाशातून आलेली ही वाणी आम्ही स्वतः ऐकली. 19शिवाय अधिक निश्चित असे संदेष्ट्याचे वचन आम्हाजवळ आहे; ते काळोख्या जागी प्रकाशणार्‍या दिव्याप्रमाणे आहे म्हणून, तुमच्या अंतःकरणात दिवस उजाडेपर्यंत व प्रभाततारा उगवेपर्यंत तुम्ही त्याकडे लक्ष द्याल तर चांगले कराल.

शुभवर्तमान (प्रभूच्या रूपांतरासाठी)

मत्त 17:1–9

1मग सहा दिवसानंतर येशूने पेत्र, याकोब व त्याचा भाऊ योहान यांना आपल्याबरोबर घेतले व त्यांना एका उंच डोंगरावर एकांती नेले. 2तेव्हा त्यांच्यादेखत त्याचे रूप पालटले. त्याचे तोंड सूर्यासारखे प्रकाशले आणि त्याची वस्त्रे प्रकाशासारखी पांढरी शुभ्र झाली. 3तेव्हा पाहा, मोशे व एलीया हे त्याच्याशी बोलत असताना त्यांना दिसले. 4पेत्र येशूला म्हणाला, “प्रभू, येथे असणे हे आपणासाठी बरे आहे. आपली इच्छा असेल तर मी येथे तीन मंडप करतो, एक आपल्यासाठी एक मोशेसाठी व एक एलीयासाठी.” 5तो बोलत आहे तो, पाहा, इतक्यात, एका तेजस्वी मेघाने त्यांच्यावर सावली केली आणि त्या मेघातून अशी वाणी झाली की, “हा माझा प्रिय पुत्र आहे, याजविषयी मी संतुष्ट आहे, याचे तुम्ही ऐका.” 6येशूबरोबर असलेल्या शिष्यांनीही वाणी ऐकली. तेव्हा ते जमिनीवर पालथे पडले कारण ते फार घाबरले होते. 7तेव्हा येशूजवळ येऊन त्यांना स्पर्श करून म्हणाला, “उठा! घाबरू नका.” 8मग त्यांनी आपले डोळे उघडले आणि वर पाहिले तेव्हा त्यांना येशूशिवाय दुसरे कोणीही दिसले नाही. 9नंतर ते डोंगरावरून खाली उतरत असताना, येशूने त्यांना आज्ञा केली की, “मनुष्याचा पुत्र मरणातून पुन्हा उठेपर्यंत डोंगरावर जे पाहिले ते कोणालाही सांगू नये.”

तारखा रशियन मंडळीच्या ज्युलियन दिनदर्शिकेनुसार आहेत (सर्बियन आणि जॉर्जियन मंडळ्या आणि आथोस पर्वत यांच्याप्रमाणे): मंडळीच्या दिनदर्शिकेतील 6 ऑगस्ट म्हणजे नागरी दिनदर्शिकेतील 19 ऑगस्ट. नवी दिनदर्शिका पाळणाऱ्या मंडळ्या (ग्रीस, रोमानिया, बल्गेरिया, युक्रेन…) ठरावीक तारखेचे सण आणि संत त्याच नागरी तारखेला, 13 दिवस आधी, पाळतात, आणि त्यांचे काही पाठ वेगळे आहेत; ईस्टर आणि त्यावर अवलंबून असलेले दिवस सारखेच आहेत.

स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क