Bible Explorer अ‍ॅप मिळवा

मुख्यपृष्ठ › दैनंदिन बायबल पाठ › जून 2027 › 6 जून

कॅथलिक दिनदर्शिका

दैनंदिन बायबल पाठ (कॅथलिक) — 6 जून 2027

रविवार · सामान्यकाळाचा 10वा आठवडा

सण आणि संत

सामान्यकाळाचा 10वा रविवार

रविवार · उपासनेचा रंग: हिरवा

दिवसाची वाचने

पहिले वाचन

उत्प 3:9–15

9तेव्हा परमेश्वर देवाने मनुष्यास हाक मारुन म्हटले, “तू कोठे आहेस?” 10मनुष्य म्हणाला, “बागेत मी तुझा आवाज ऐकला व मला भीती वाटली, कारण मी नग्न होतो. म्हणून मी लपलो.” 11परमेश्वर त्यास म्हणाला, “तू नग्न आहेस हे तुला कोणी सांगितले? ज्या झाडाचे फळ तू खाऊ नकोस अशी मी तुला आज्ञा दिली होती त्या झाडाचे फळ तू खाल्लेस काय?” 12मनुष्य म्हणाला, “तू ही स्त्री माझ्या सोबतीस म्हणून दिलीस, तिने त्या झाडाचे फळ मला दिले आणि म्हणून मी ते खाल्ले.” 13मग परमेश्वर देव त्या स्त्रीस म्हणाला, “तू हे काय केलेस?” ती स्त्री म्हणाली, “सर्पाने मला फसवले व म्हणून मी ते फळ खाल्ले.” 14परमेश्वर देव सर्पास म्हणाला, “तू हे केल्यामुळे सर्व गुरेढोरांमध्ये व सर्व वन्यपशूंमध्ये तू शापित आहेस. तू पोटाने सरपटत चालशील आणि आयुष्यभर तू माती खाशील. 15तुझ्यामध्ये व स्त्रीमध्ये आणि तुझ्या बीजामध्ये व स्त्रीच्या बीजामध्ये मी शत्रूत्व ठेवीन. तो तुझे डोके ठेचील आणि तू त्याची टाच फोडशील.”

प्रतिसाद स्तोत्र

स्तोत्र 130:1–8

1हे परमेश्वरा, मी तुला शोकसागरातून आरोळी मारीत आहे. 2हे प्रभू, माझी वाणी ऐक; माझ्या विनवणीच्या वाणीकडे तुझे कान लक्षपूर्वक लागलेले असोत. 3हे परमेश्वरा, तू जर अन्याय लक्षात ठेवशील तर, हे प्रभू, तुझ्यासमोर कोण उभा राहू शकेल? 4पण त्यांनी तुझे भय धरावे, म्हणून तुझ्याजवळ क्षमा आहे. 5मी परमेश्वराची वाट पाहतो, माझा आत्मा वाट पाहतो, आणि त्याच्या वचनावर मी आशा ठेवतो. 6पहाटेची वाट पाहणाऱ्या पहारेकऱ्यापेक्षा माझा जीव प्रभूची अधिक वाट पाहतो. 7हे इस्राएला, परमेश्वरावर आशा ठेव. कारण परमेश्वर दयाळू आहे, आणि त्याच्याजवळ विपुल उद्धार आहे. 8तोच इस्राएलास त्यांच्या सर्व पापांपासून मुक्त करीन.

दुसरे वाचन

2 करिं 4:13–5:1

13मी विश्वास ठेवला आणि म्हणून मी बोललो, हे पवित्र शास्त्रात लिहिल्याप्रमाणे आम्ही विश्वास ठेवला आहे आणि म्हणून बोलतो; कारण आमच्यात तोच विश्वासाचा आत्मा आहे. 14कारण आम्ही हे जाणतो की, प्रभू येशूला ज्याने उठवले तो आपल्यालाही येशूबरोबर उठवील आणि आम्हास तुमच्याबरोबरच सादर करील. 15सर्व गोष्टी तुमच्याकरता आहेत, म्हणजे ही विपुल कृपा पुष्कळ जणांच्या उपकारस्मरणाने, देवाच्या गौरवार्थ बहुगुणित व्हावी. 16म्हणून आम्ही खचत नाही. पण जरी आमचे हे बाहेरील देहपण नाश पावत आहे, तरी आमचे अंतर्याम हे दिवसानुदिवस नवीन होत आहे. 17कारण हे जे हलके दुःख केवळ तात्कालिक आहे ते आमच्यासाठी फार अधिक मोठ्या अशा सार्वकालिक गौरवाचा भार तयार करते. 18आता आम्ही दिसणार्‍या गोष्टींकडे पाहत नाही पण न दिसणार्‍या गोष्टींकडे पाहतो कारण दिसणार्‍या गोष्टी क्षणिक आहेत पण न दिसणार्‍या गोष्टी सार्वकालिक आहेत. 5:1कारण आम्ही हे जाणतो की, आमचे हे जगिक घर ज्यामध्ये आम्ही राहतो, नष्ट झाले तर आम्हास देवापासून मिळालेले सर्वकाळचे घर स्वर्गात आहे.

शुभवर्तमान

मार्क 3:20–35

20मग येशू घरी आला आणि पुन्हा इतके लोक जमले की त्यांना जेवता सुद्धा येईना. 21त्याच्या कुटुंबातील लोकांनी याविषयी ऐकले तेव्हा ते त्यास धरावयास निघाले कारण त्यास वेड लागले असे त्यांचे म्हणणे होते. 22तसेच यरूशलेम शहराहून आलेले नियमशास्त्राचे शिक्षक म्हणत होते की, याच्यामध्ये बालजबूल आहे आणि त्या भुतांच्या अधिपतीच्या साहाय्याने हा भूते काढतो. 23मग येशूने त्यांना आपणाजवळ बोलावून दाखल्याच्या साहाय्याने त्यांना सांगू लागला, “सैतान सैतानाला कसा काढील? 24आपापसात फूट पडलेले राज्य टिकू शकत नाही. 25आपापसात फूट पडलेले घरही टिकू शकत नाही. 26जर सैतान स्वतःलाच विरोध करू लागला आणि त्याच्यातच फूट पडली तर तो टिकू शकणार नाही, तर त्याचा शेवट होईल. 27खरोखर कोणालाही बलवान मनुष्याच्या घरात शिरून त्याची मालमत्ता लुटता येणार नाही. प्रथम त्या बलवान मनुष्यास बांधले पाहिजे, मगच त्याचे घर लुटता येईल.” 28मी तुम्हास खरे सांगतो की, “लोकांच्या पापांची व त्यांनी केलेल्या देवाच्या निंदेची त्यांना क्षमा होईल. 29पण जो कोणी पवित्र आत्म्याची निंदा करील, त्याची कधीच क्षमा होणार नाही आणि तो मनुष्य सार्वकालिक पापाचा दोषी आहे.” 30येशू असे म्हणाला कारण त्याच्यामध्ये अशुद्ध आत्मा आहे असे ते त्याच्याविषयी म्हणत होते. 31तेव्हा येशूची आई व भाऊ आले आणि बाहेर उभे राहून त्यांनी निरोप पाठवून त्यास बोलावले. 32लोकसमुदाय येशूभोवती बसला होता, ते त्यास म्हणाले, “तुझी आई व तुझे भाऊ बाहेर तुझी वाट पाहत आहेत.” 33त्याने त्यांना उत्तर दिले, “माझी आई व माझे भाऊ कोण आहेत?” 34मग तो आपल्या सभोवताली बसलेल्यांकडे सभोवती पाहून म्हणाला, “पाहा माझी आई आणि माझे भाऊ. 35जे कोणी देवाच्या इच्छेप्रमाणे वागतात तेच माझे भाऊ, माझी बहीण व माझी आई.”

आजचे संत

सामान्य रोमन दिनदर्शिका; बिशपांची परिषद काही सण (प्रभूचे प्रकटीकरण, स्वर्गारोहण, ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त) रविवारी हलवू शकते किंवा स्वतःचे सण जोडू शकते. पाठसंग्रह: रविवारचे चक्र B, आठवड्याच्या दिवसांचे वर्ष I.

स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क