Bible Explorer अ‍ॅप मिळवा

मुख्यपृष्ठ › दैनंदिन बायबल पाठ › मे 2027 › 1 मे

ऑर्थोडॉक्स दिनदर्शिका · 18 एप्रिल (जुनी पद्धत)

ऑर्थोडॉक्स दैनंदिन पाठ — 1 मे 2027

शनिवार · पवित्र आठवडा

सण आणि संत

महान आणि पवित्र शनिवार

महान लेंत

कडक उपवास (कोरडे अन्न: भाकर, भाज्या, फळे)

हे मठाच्या नियमानुसार आहे. पॅरिशमध्ये उपवासाचे प्रमाण आपल्या पापकबुलीच्या धर्मगुरूसोबत, आरोग्य, वय आणि परिस्थितीनुसार ठरवले जाते.

दिवसाची वाचने

प्रातःप्रार्थना (भविष्यवाणी)

यहे 37:1–14

1परमेश्वराचा हात माझ्यावर आला, परमेश्वराच्या आत्म्याकडून मला बाहेर उचलून नेले आणि खाली दरीच्या मध्यभागी आणून ठेवले. ती हाडांनी भरलेली होती. 2मग त्याने मला त्यामधून गोल व गोल चालवले. पाहा! दरीत जमिनीवर पुष्कळ हाडे पडलेली होती. आणि पाहा! ती हाडे अगदी सुकलेली होती. 3तो मला म्हणाला, “मानवाच्या मुला, ही हाडे पुन्हा जिवंत होऊ शकतील का?” मग मी म्हणालो, “प्रभू परमेश्वरा, फक्त तुलाच माहीत आहे.” 4मग तो मला म्हणाला, “त्या हाडांविषयी भविष्य सांग आणि त्यांना म्हण, सुकलेल्या हाडांनो परमेश्वराचे वचन ऐका. 5प्रभू परमेश्वर या हाडांस असे म्हणतो, पाहा, मी तुमच्यात श्वास घालीन व तुम्ही जिवंत व्हाल. 6मी तुमच्यावर स्नायू लावीन आणि मांस चढवीन आणि मी तुम्हास त्वचेने आवरण घालीन आणि तुमच्यात श्वास घालीन, म्हणजे तुम्ही जिवंत व्हाल. मग तुम्हास समजेल की मीच प्रभू परमेश्वर आहे.” 7म्हणून मला आज्ञा झाली त्याप्रमाणे मी भविष्य सांगितले; जसे मी भविष्य सांगत असता, आवाज आला. पाहा भूकंप होऊन हाडांना हाड लागून एकमेकांशी जवळ येऊन जोडली गेली. 8मी पाहिले आणि पाहा, तेव्हा त्यांच्यावर स्नायू होते. आणि मांस चढले व त्यावर त्वचेने आवरण घातले. पण त्यांच्यात अजून श्वास नव्हता. 9मग परमेश्वर मला म्हणाला, “मानवाच्या मुला वाऱ्याला भविष्य सांग, भविष्य सांग आणि म्हण, प्रभू परमेश्वर असे म्हणतो, हे वाऱ्या तू चोहो दिशेने ये व वधलेल्यावर फुंकर घाल म्हणजे ते पुन्हा जिवंत होतील.” 10मग मला आज्ञा केल्याप्रमाणे मी भविष्य सांगितले, तेव्हा त्यामध्ये श्वास येऊन ते जिवंत झाले व ते अतिशय मोठे सैन्य आपल्या पायावर उभे राहिले. 11आणि देव मला म्हणाला, “मानवाच्या मुला, ही हाडे म्हणजे सर्व इस्राएल घराणेच आहे. पाहा ते म्हणतात, आमची हाडे सुकून गेली आहेत. आम्हास आशा राहिलेली नाही. आम्हास नाशासाठी कापून टाकले आहे. 12म्हणून भविष्य सांग आणि त्यांना म्हण, प्रभू परमेश्वर असे म्हणतो, पाहा, माझ्या लोकांनो, मी तुमच्या कबरी उघडून तुम्हास कबरीतून बाहेर काढीन. आणि मी तुम्हास इस्राएलाच्या भूमीत परत आणीन. 13माझ्या लोकांनो, जेव्हा मी तुमच्या कबरी उघडीन व त्यातून तुम्हास बाहेर काढीन तेव्हा तुम्हास समजेल की मी परमेश्वर आहे. 14मी तुमच्यात माझा आत्मा ओतीन म्हणजे मग तुम्ही जिवंत व्हाल. आणि मी तुम्हास तुमच्या स्वतःच्या देशात विसावा देईन. तेव्हा मी परमेश्वर हे बोललो व मी तसे केले हे तुम्हास समजेल, असे परमेश्वर म्हणतो.”

प्रातःप्रार्थना: प्रेषितांचे पत्र

1 करिं 5:6–8 · गल 3:13–14

6तुमचा अभिमान चांगला नाही. थोडेसे खमीर सगळा गोळा फुगवते, हे तुम्हास माहित आहे ना? 7म्हणून तुम्ही जुने खमीर काढून टाका, यासाठी की जसे तुम्ही बेखमीर झाला आहात तसे तुम्ही एक नवीन गोळा व्हावे कारण आपला वल्हांडणाचा कोकरा जो ख्रिस्त त्याचे अर्पण झाले आहे. 8तर आपण जुन्या खमिराने किंवा वाईटपणा व कुकर्माच्या खमिराने नाही, पण सरळपणा व खरेपणाच्या बेखमीर भाकरीने सण पाळू या. 3:13आपल्याबद्दल ख्रिस्त शाप झाला आणि त्याने आपणाला नियमशास्त्राच्या शापापासून खंडणी भरून सोडविले; असा शास्त्रलेख आहे ‘जो कोणी झाडावर टांगलेला आहे तो शापित आहे’, असा शास्त्रलेख आहे. 14ह्यात उद्देश हा की, अब्राहामाला दिलेला आशीर्वाद ख्रिस्त येशूच्या द्वारे परराष्ट्रीयांना मिळावा, म्हणजे आपल्या विश्वासाद्वारे आत्म्याविषयीचे अभिवचन मिळावे.

प्रातःप्रार्थना: शुभवर्तमान

मत्त 27:62–66

62त्या दिवसास तयारीचा दिवस म्हणत असत, दुसऱ्या दिवशी मुख्य याजक लोक व परूशी पिलाताकडे गेले. 63ते म्हणाले, “साहेब, आम्हास आठवण आहे की, तो लबाड जिवंत असताना असे म्हणाला होता की, ‘मी तीन दिवसानी परत जीवनात येईल.’ 64म्हणून तीन दिवसापर्यंत कबरेवर कडक पहारा ठेवण्याची आज्ञा करा. कारण त्याचे शिष्य येऊन त्याचे शरीर चोरुन नेण्याचा प्रयत्न करतील. मग तो मरणानंतर पुन्हा उठला असे लोकांस सांगतील. ही शेवटची फसवणूक पहिल्यापेक्षा अधिक वाईट होईल.” 65पिलात म्हणाला, “तुमच्याबरोबर पहारा घ्या, जा आणि कबरेवर कडक पहारा ठेवा.” 66म्हणून ते गेले आणि कबरेवर कडक पहारा ठेवला. कबरेवर जी धोंड होती तिच्यावर सरकारी शिक्का मारला आणि तेथे पहारा करण्यासाठी शिपाई नेमले.

संध्याप्रार्थना: वाचन (पहिले वाचन)

उत्प 1:1–13

1प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही निर्माण केली. 2पृथ्वी अंदाधुंद व रिकामी होती. जलाशयावर अंधकार होता, देवाचा आत्मा पाण्यावर पाखर घालत होता. 3देव बोलला, “प्रकाश होवो” आणि प्रकाश झाला. 4देवाने प्रकाश पाहिला की तो चांगला आहे. देवाने अंधकारापासून प्रकाश वेगळा केला. 5देवाने प्रकाशाला “दिवस” व अंधकाराला “रात्र” असे नाव दिले. संध्याकाळ झाली व सकाळ झाली, हा पहिला दिवस. 6देव बोलला, “जलांच्या मध्यभागी अंतराळ होवो व ते जलापासून जलांची विभागणी करो.” 7देवाने अंतराळ केले आणि अंतराळावरच्या व अंतराळाखालच्या जलांची विभागणी केली व तसे झाले. 8देवाने अंतराळास आकाश असे म्हटले. संध्याकाळ झाली व सकाळ झाली, हा दुसरा दिवस. 9नंतर देव बोलला, “आकाशाखालील पाणी एकाजागी एकत्र जमा होवो व कोरडी जमीन दिसून येवो,” आणि तसे झाले. 10देवाने कोरड्या जमिनीस भूमी आणि एकत्र झालेल्या पाण्याच्या संचयास समुद्र असे म्हटले. त्याने पाहिले की हे चांगले आहे. 11देव बोलला, “हिरवळ, बीज देणाऱ्या वनस्पती, आणि आपआपल्या जातीप्रमाणे, ज्यात त्याचे बीज आहे अशी फळे देणारी फळझाडे, ही पृथ्वीवर येवोत.” आणि तसेच झाले. 12पृथ्वीने हिरवळ, आपापल्या जातीचे बीज देणाऱ्या वनस्पती आणि आपापल्या जातीची फळे देणारी व त्या फळातच आपापल्या जातीचे बीज असणारी फळझाडे भूमीने उत्पन्न केली. देवाने पाहिले की हे चांगले आहे. 13संध्याकाळ झाली व सकाळ झाली, हा तिसरा दिवस.

संध्याप्रार्थना: वाचन (दुसरे वाचन)

यश 60:1–16

1“उठ, प्रकाशमान हो, कारण तुझा प्रकाश आला आहे, आणि परमेश्वराचे तेज तुझ्यावर उगवले आहे.” 2जरी अंधार पृथ्वीला आणि निबीड काळोख लोकांस झाकेल, तरी परमेश्वर तुझ्यावर उदय पावेल आणि, त्याचे तेज तुझ्यावर येईल. 3राष्ट्रे तुझ्या प्रकाशाकडे येतील, आणि राजे तुझ्या उगवत्या तेजस्वी प्रकाशाकडे येतील. 4तुझ्या सभोवती पाहा! ते सर्व एकत्र जमतात आणि तुझ्याकडे येतात. तुझी मुले दूरुन येतील आणि तुझ्या मुलींना कडेवर बसून आणतील. 5तेव्हा तू हे पाहशील आणि आनंदाने उल्हासीत होशील, आणि तुझे हृदय हर्षाने भरून वाहेल. कारण समुद्रातील भरपूर संपत्ती तुझ्यापुढे ओतली जाईल, राष्ट्रांचे सर्व धन तुझ्याकडे येईल. 6मिद्यान आणि एफा येथील उंटाचे कळप तुला झाकतील, शेबातले सर्व येतील, ते सोने आणि धूप आणतील आणि परमेश्वराची स्तुतिस्तोत्रे गातील. 7केदारमधील सर्व मेंढ्या गोळा करून तुझ्याकडे एकत्र केल्या जातील. नबायोथचे मेंढे तुझी सेवा करतील. ते माझ्या वेदीवर स्विकार्य असे अर्पण होतील, आणि मी माझ्या तेजस्वी घराला आणखी गौरवीत करीन. 8हे कोण आहेत जे मेघाप्रमाणे उडतात, आणि कबुतराप्रमाणे आपल्या आश्रयस्थानाकडे उडत येतात? 9द्वीपे माझी वाट पाहतात, आणि परमेश्वर तुझा देव याच्या नावासाठी, आणि इस्राएलाच्या पवित्रासाठी तुझ्या मुलांना आपले सोने व रुपे यांसहीत दुरुन आणावे, म्हणून पहिल्याने तार्शीशाची जहाजे वाट पाहतील, कारण त्याने तुला शोभविले आहे. 10विदेश्यांची मुले तुझ्या भींती पुन्हा बांधतील, आणि त्यांचे राजे तुझी सेवा करतील. “जरी रागात मी तुला शिक्षा केली, परंतु आता माझ्या प्रसन्नतेने मी तुझ्यावर दया केली आहे.” 11तुझे दरवाजे सदोदित उघडे राहतील, दिवस असो किंवा रात्र ते कधीही बंद होणार नाहीत. ह्यासाठी की राष्ट्रे व त्यांची संपत्ती आणि कैद केलेले राजे तुझ्याकडे आणावे. 12खचित, जे राष्ट्र व राज्य तुझी सेवा करतील नाही त्याचा नाश होईल, ती राष्ट्रे पुर्णपणे विनाश पावतील. 13माझ्या पवित्र जागेला सुंदर करायला लबानोनाचे वैभव म्हणजे सरू, देवदारू आणि भद्रदारू हे तुझ्याकडे येतील, आणि मी माझे पायाचे स्थान गौरवशाली करील. 14ज्यांनी तुला दुखावले, तेच आता तुझ्यापुढे नमतील, ते तुझ्या पायावर झुकतील. ते तुला परमेश्वराचे नगर म्हणतील, इस्राएलाच्या पवित्राचे सियोन म्हणून संबोधतील. 15“तू टाकलेली आणि तिरस्कारयुक्त होतीस, तुझ्यातून कोणीही जात नसे, मी तुला चिरकालासाठी गौरवाची एक गोष्ट करीन, एका पिढी पासून दुसऱ्या पिढीपर्यंतचा आनंद असे करीन.” 16तू राष्ट्रांचे दुध पिणार आणि राजांचे स्तन चोखणार, मग तुला समजेल की परमेश्वर तुझा देव, तुला सोडवणारा आणि तारणारा, याकोबाचे सामर्थ्य आहे.

संध्याप्रार्थना: वाचन (तिसरे वाचन)

निर्ग 12:1–11

1मग मोशे व अहरोन मिसर देशामध्ये असताना परमेश्वर त्यांच्याशी बोलला. तो म्हणाला, 2“हा महिना तुमच्यासाठी आरंभीचा महिना व्हावा. तुमचा हा वर्षाचा पहिला महिना व्हावा. 3इस्राएलाच्या सर्व मंडळीला सांग की या महिन्याच्या दहाव्या दिवशी प्रत्येक मनुष्याने आपल्या कुटुंबातील लोकांकरता एक कोकरू घ्यावे. 4आणि एक कोकरू, खाण्यासाठी घरातील माणसे थोडी असली तर त्याने आपल्या शेजाऱ्याच्या संख्येप्रमाणे कोकरू घ्यावे. प्रत्येकाच्या आहाराच्या मानाने एक कोकरू किती मनुष्यांना पुरेल याचा अंदाज घ्यावा. 5तो कोकरा एक वर्षाचा नर असावा व तो पूर्णपणे निर्दोष असावा, तो कोकरा मेंढरातला किंवा बोकडातला असावा. तुम्हास वाटेल तो घ्यावा. 6या पहिल्या महिन्याच्या चौदाव्या दिवसापर्यंत तो राखून ठेवावा. संध्याकाळी इस्राएली मंडळीतील लोकांनी त्यास वधावे. 7त्या कोकऱ्याचे रक्त घेऊन ते ज्या घरात त्याचे मांस खाणार आहेत त्याच्या दोन्ही दारबाह्यांना व चौकटीच्या कपाळपट्टीवर लावावे. 8त्याच रात्री त्याचे मांस विस्तवावर भाजून कडू भाजी व बेखमीर भाकरीबरोबर खावे. 9तुम्ही त्याचे मांस कच्चेच किंवा पाण्यात शिजवून खाऊ नये तर विस्तवावर भाजून खावे; त्याची मुंडी, पाय व आतडी हीसुद्धा खावीत. 10त्यातले काहीही सकाळपर्यंत ठेवू नये आणि सकाळपर्यंत काही उरलेच तर ते आगीत जाळून टाकावे. 11ते तुम्ही या प्रकारे खावे: तुमच्या कमरा कसून, पायांत जोडे घालून आणि हातात काठी घेऊन, ते घाईघाईने खावे; हा परमेश्वराचा वल्हांडण सण आहे.

संध्याप्रार्थना: वाचन (चौथे वाचन)

योना 1:1–4:11

1अमित्तयाचा पुत्र योना याच्याकडे परमेश्वराचे वचन आले की, 2“ऊठ, व त्या मोठ्या निनवे शहरात जा आणि तिकडे जाऊन त्याच्याविरुध्द आरोळी कर; कारण त्यांची दुष्टता मजसमोर वर आली आहे.” 3परंतु योना परमेश्वराच्या सान्निध्यापासून तार्शीश शहरास दूर पळून जायला निघाला, आणि याफो येथे गेला, तेव्हा तार्शीसास जाणारे एक जहाज त्यास सापडले; मग त्याने प्रवासाचे भाडे दिले व परमेश्वराच्या सान्निध्यापासून त्यांच्याबरोबर दूर तार्शिशास जाण्यासाठी जहाजात जाऊन बसला. 4परंतु परमेश्वराने समुद्रात मोठा वारा सुटू दिला आणि असे मोठे वादळ समुद्रात आले की जहाज फुटण्याच्या मार्गावर आले. 5तेव्हा खलाशी घाबरले आणि प्रत्येकजण आपल्या देवाला हाक मारू लागले व जहाज हलके करण्यासाठी त्यातील माल समुद्रात फेकून देऊ लागले; परंतु योना तर जहाजाच्या अगदी सर्वात आतल्या भागात उतरून जाऊन तेथे तो गाढ झोपला होता. 6मग जहाजाचा मुख्यनायक त्याच्याजवळ येऊन म्हणाला, “अरे, झोप घेत काय पडलास? ऊठ आपल्या ईश्वराला हाक मार, कदाचित तुझा ईश्वर आपल्याकडे लक्ष देईल, म्हणजे आपला नाश होणार नाही.” 7ते सर्व एकमेकाला म्हणाले, “चला आपण चिठ्ठ्या टाकू म्हणजे कोणामुळे हे संकट आपणावर आले आहे; हे आपणास कळेल.” त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या तेव्हा योनाच्या नावाची चिठ्ठी निघाली. 8तेव्हा त्यांनी योनाला म्हटले, “आम्ही तुला विनंती करतो, कोणामुळे हे संकट आम्हावर आले आहे, हे तू आम्हास सांग; तुझा धंदा काय आहे आणि तू कोठून आला आहेस? तुझा देश कोणता आणि तू कोणत्या लोकांपैकी आहेस?” 9योनाने त्यांना म्हटले; “मी इब्री आहे; ज्या स्वर्गातल्या देवाने समुद्र व कोरडी भूमी उत्पन्न केली त्या परमेश्वराचे मी भय धरतो.” 10मग त्या लोकांस अत्यंत भीती वाटली; आणि ते योनाला म्हणाले, “तू हे काय केले?” कारण त्या लोकांनी जाणले की तो परमेश्वरासमोरून पळून जात आहे, कारण त्याने त्यास तसे सांगितले होते. 11मग ते योनाला म्हणाले, “समुद्र आमच्यासाठी शांत व्हावा, म्हणून आम्ही तुझे काय करावे?” कारण समुद्र तर अधिकाधिक खवळत होता. 12तो त्यास म्हणाला, “तुम्ही मला उचलून समुद्रात फेकून द्या म्हणजे समुद्र तुमच्यासाठी शांत होईल; कारण माझ्यामुळे हे मोठे वादळ तुम्हावर उठले आहे हे मला माहीत आहे.” 13तरीसुध्दा त्या मनुष्यांनी जहाज किनाऱ्यास आणण्यासाठी खूप प्रयत्नाने वल्हविले; परंतु ते काही करू शकत नव्हते, कारण समुद्र त्यांजवर अधिकाधिक खवळत चालला होता. 14तेव्हा ते परमेश्वराचा धावा करत म्हणाले, “हे परमेश्वरा, आम्ही तुला विनंती करतो या मनुष्याच्या जिवामुळे आमचा नाश होऊ नये, आणि त्याच्या मृत्यूचा दोष आम्हावर येऊ नये; कारण हे परमेश्वरा, जसे तुला योग्य वाटेल तसे तू केले आहेस.” 15नंतर त्यांनी योनाला उचलून समुद्रात फेकून दिले. तेव्हा समुद्र खवळायचा थांबून शांत झाला. 16मग त्या मनुष्यांस परमेश्वराची खूप भीती वाटली, आणि त्यांनी परमेश्वरास यज्ञ केला आणि नवसही केले. 17मग योनाला गिळण्यास परमेश्वराने एक मोठा मासा तयार केला होता. योना तीन दिवस आणि तीन रात्री त्या माशाच्या पोटात होता. 2:1नंतर माशाच्या पोटातून योनाने आपला देव परमेश्वर याची प्रार्थना केली 2तो म्हणाला, “मी आपल्या आपत्तीमध्ये परमेश्वरास हाक मारली, आणि त्याने मला उत्तर दिले; मी मृत्यूलोकाच्या पोटातून मदतीकरता हाक मारली! तू माझा आवाज ऐकलास. 3तू मला समुद्रांच्या मध्यभागी खोल टाकले, आणि प्रवाहाने मला वेढले, तुझ्या सर्व उसळत्या लाटांचा कल्लोळ माझ्यावरून गेला. 4आणि मी म्हणालो, ‘मी तुझ्या दृष्टीसमोरून टाकलेला आहे; तरी तुझ्या पवित्र मंदिराकडे मी पुन्हा डोळे लावीन?’ 5जलांनी प्राण जाईपर्यंत मला झाकले; आणि डोहाने सर्वबाजूनी मला घेरले, समुद्रातील शेवाळाने माझ्या डोक्याला लपेटले. 6मी पर्वतांच्या तळापर्यंत गेलो; पृथ्वीच्या अडसरांनी मला कायमचे कोंडून टाकले; तथापि माझ्या देवा परमेश्वरा, तू माझा जीव खड्डयातून वरती काढला आहे. 7जेव्हा माझा जीव माझ्या ठायी व्याकुळ झाला; तेव्हा मी परमेश्वराचे स्मरण केले, आणि माझी प्रार्थना तुझ्या पवित्र मंदिरात पोहंचली. 8जे निरर्थक मूर्तींकडे आपले चित्त लावतात, ते स्वतः आपल्या दयानिधीला नाकारतात. 9परंतु मी आभार मानण्याच्या वाणीने तुझ्याकडे यज्ञ अर्पण करीन; जो नवस मी केला आहे तो मी पूर्ण करीन, तारण परमेश्वराकडूनच आहे.” 10मग परमेश्वराने त्या मोठ्या माश्याला आज्ञा केली; तेव्हा त्याने योनाला कोरडया भूमीवर ओकून टाकले. 3:1परमेश्वराचे वचन दुसऱ्यांदा योनाकडे आले, 2“ऊठ, त्या मोठ्या निनवे शहरास जा, आणि जो संदेश मी तुला सांगेन त्याची घोषणा कर.” 3मग परमेश्वराच्या वचनाप्रमाणे योना उठून निनवेस गेला. निनवे हे फार मोठे शहर होते. ते सर्व चालत फिरण्यास तीन दिवस लागत होते. 4योना शहरातून एक दिवसाची वाट चालत असता त्याने घोषणा करून म्हटले, “अजून चाळीस दिवस आहेत, मग निनवेचा नाश होईल.” 5तेव्हा निनवेतल्या लोकांनी देवावर विश्वास ठेवला, उपास जाहीर केला, आणि मोठ्यापासून लहानापर्यंत सर्वांनी गोणताट नेसले. 6निनवेच्या राजाला ही बातमी समजली, तेव्हा तो आपल्या आसनावरून उठला व आपला झगा आपल्या अंगातून काढून तो गोणताट नेसून राखेत बसला. 7राजाने आणि त्याच्या सरदारांच्या ठरावाने निनवेत घोषणा करून ठराव प्रसिध्द केला. त्याने सांगितले, “कोणत्याही मनुष्यांने अथवा पशूंने, गुराढोरांनी अथवा शेरडामेंढरांनी काही चाखू नये; खाऊ नये व पाणी पिऊ नये. 8परंतु मनुष्य आणि पशू यांनी गोणताट नेसावेत; देवाचा मनापासून धावा करावा आणि प्रत्येकाने आपल्या कुमार्गापासून व आपल्या हाताच्या दुष्कर्मापासून मागे फिरावे. 9न जाणो, कदाचित देव वळेल, अनुताप पावेल व आपल्या संतप्त क्रोधापासून फिरेल, म्हणजे आपला नाश होणार नाही.” 10तर ते आपल्या कुमार्गापासून फिरले आहेत, अशी त्यांची कृत्ये देवाने पाहिली आणि ज्या संकटाविषयी देव बोलला होता की, “मी त्यांच्यावर ते आणीन,” त्याविषयी त्याने आपले मन बदलले व त्याने तसे केले नाही. 4:1परंतु यामुळे योनाला फार वाईट वाटले व त्यास राग आला. 2तो परमेश्वराजवळ विनवणी करू लागला, “हे परमेश्वरा, मी माझ्या देशात होतो तेव्हा माझे सांगणे हेच होते की नाही? म्हणूनच मी तार्शीशास पळून जाण्याची घाई केली, कारण मला माहित होते की तू कृपाळू, कनवाळू, मंदक्रोध, दया संपन्न आहेस. संकट आणल्याबद्दल अनुताप करणारा असा देव आहेस. 3माझी विनंती ऐक; हे परमेश्वरा, माझा जीव घे, कारण जिवंत राहण्यापेक्षा मला मरण चांगले वाटते.” 4मग परमेश्वर म्हणाला, “तुला राग येणे चांगले आहे काय?” 5मग योना बाहेर निघून निनवे शहराच्या पूर्व दिशेला बसला; तेथे तो एक मंडप करून सावलीत, शहराचे काय होईल हे पाहत बसला. 6मग परमेश्वर देवाने योनाच्या डोक्यावर सावलीसाठी एक वेली उगविली, म्हणजे त्याने दुःखातून मुक्त व्हावे असे केले. त्या वेलीमुळे योनाला खूप आनंद झाला. 7मग दुसऱ्या दिवशी देवाने एक किडा तयार केला, तो त्या वेलीला लागल्यामुळे ती वेल सुकून गेली. 8मग देवाने, सूर्य उगवल्यावर पूर्वेकडून झळईचा वारा सोडला; आणि ऊन योनाच्या डोक्याला लागले त्याने तो मूर्छित झाला व त्यास मरण येवो अशी तो विनवणी करत म्हणाला, “मला जिवंत राहण्यापेक्षा मरण चांगले वाटते.” 9मग देव योनाला म्हणाला, “त्या वेलीमुळे तुला राग येणे हे चांगले आहे काय?” तो म्हणाला, “रागामुळे माझा जीव गेला तरी चालेल.” 10परमेश्वर त्यास म्हणाला, “या वेलीसाठी तू काहीच कष्ट केले नाहीस व तू हिला मोठे केले नाही, ती एका रात्रीत मोठी झाली आणि एका रात्रीत नष्ट झाली, त्या वेलीची तुला एवढी काळजी आहे; 11ज्यांना उजव्या व डाव्या हाताचा फरक समजत नाही असे एक लाख वीस हजारांपेक्षा जास्त लोक या मोठ्या निनवे शहरात आहेत आणि पुष्कळ गुरेढोरे आहेत. त्यांची मी काळजी करू नये काय?”

संध्याप्रार्थना: वाचन (पाचवे वाचन)

यहो 5:10–15

10इस्राएल लोकांनी गिलगालात तळ दिल्यावर यरीहोजवळच्या मैदानात त्या महिन्याच्या चतुर्दशीस संध्याकाळी वल्हांडण सण पाळला. 11वल्हांडणाच्या दुसऱ्या दिवशी त्या देशात पिकलेल्या धान्याच्या बेखमीर भाकरी आणि हुरडा हा त्यांनी खाल्ला. 12त्यांनी देशांतले उत्पन्न खाल्ले त्याच्या दुसऱ्या दिवसापासून मान्ना बंद झाला; तो पुन्हा इस्राएल लोकांस मिळाला नाही, त्या वर्षी त्यांनी कनान देशातले उत्पन्न खाल्ले. 13यहोशवाने यरीहोजवळ असताना समोर पहिले तो कोणी पुरुष आपल्या हाती उपसलेली तलवार घेऊन पुढे उभा आहे असे त्याच्या नजरेस पडले. यहोशवाने जवळ जाऊन विचारले, तू आमच्या पक्षाचा की आमच्या वैऱ्यांच्या पक्षाचा? 14तो म्हणाला, “दोहोंपैकी कोणतेही नाही; कारण मी परमेश्वराच्या सेनेचा सेनापती आहे.” तेव्हा यहोशवाने त्यास नमन करण्यासाठी आपले मुख भूमीकडे करून म्हटले, “माझ्या स्वामीची आपल्या सेवकाला काय आज्ञा आहे?” 15परमेश्वराचा सेनापती यहोशवाला म्हणाला, “आपल्या पायातले जोडे काढ; कारण ज्या जागी तू उभा आहेस ती पवित्र आहे.” तेव्हा यहोशवाने तसे केले.

संध्याप्रार्थना: वाचन (सहावे वाचन)

निर्ग 13:20–15:19

20मग ते सुक्कोथ नगराहून रवाना झाले व रानाजवळील एथामात त्यांनी तळ दिला. 21त्यांनी रात्रंदिवस चालावे म्हणून परमेश्वर दिवसा त्यांना मार्ग दाखविण्यासाठी मेघस्तंभाच्या ठायी आणि रात्री त्यांना प्रकाश देण्यासाठी अग्नीस्तंभाच्या ठायी त्यांच्यापुढे चालत असे. 22दिवसा मेघस्तंभ व रात्री अग्नीस्तंभ लोकांपुढून कधी दूर होत नसत. 14:1परमेश्वर मोशेला म्हणाला, 2“इस्राएल लोकांस असे सांग की, तुम्ही मागे फिरून मिग्दोल व समुद्र यांच्यामध्ये व बआल-सफोन जवळ असलेल्या पीहहीरोथ येथे तळ देऊन रात्री मुक्काम करावा. 3इस्राएली लोकांविषयी फारो म्हणेल, ते रानात भटकत आहेत. रानात त्यांचा कोंडमारा झाला आहे. 4मी फारोचे मन कठीण करीन व तो त्यांचा पाठलाग करीन. मी फारो व त्याची सेना यांचा पराभव करून गौरवशाली होईन, मग मिसराच्या लोकांस समजेल की मी परमेश्वर आहे.” त्याप्रमाणे इस्राएल लोकांनी केले. 5इस्राएल लोक निसटून गेल्याचे मिसराच्या राजाला समजले तेव्हा तो व त्याचे अधिकारी यांचे विचार बदलले व आपण हे काय केले असे त्यांना वाटले. फारो म्हणाला, “आपण इस्राएली लोकांस आपल्या दास्यातून पळून का जाऊ दिले?” 6तेव्हा फारोने आपला रथ तयार करण्यास सांगितले आणि आपल्या लोकांस घेऊन तो निघाला. 7त्याने सहाशे उत्तम योद्धे व मिसरातील सर्व रथ त्यांवरील सरदारांसोबत आपल्याबरोबर घेतले. 8इस्राएल लोक तर मिसरहून मोठ्या अवसानाने चालले होते, परंतु परमेश्वराने फारो राजाचे मन कठीण केले. 9फारोच्या लष्करात पुष्कळ घोडेस्वार व रथ होते. मिसरी सैन्याने त्यांचा पाठलाग केला व इस्त्राएल लोकांनी लाल समुद्र व बआल-सफोनाच्या दरम्यान पीहहीरोथ येथे तळ दिला होता तेथे त्यांना गाठले. 10फारो व मिसरी सैन्य आपणाकडे येताना इस्राएल लोकांनी पाहिले, तेव्हा ते अतिशय घाबरले; आणि मदतीसाठी ते परमेश्वराचा धावा करू लागले. 11ते मोशेला म्हणाले, “आम्हांला मिसरात काय कबरा नव्हत्या म्हणून येथे रानात मरावयास आणले? आम्हांला तू मिसरातून बाहेर का काढले? 12मिसरमध्ये आम्ही तुला नव्हतो का म्हणत की आम्ही आहो ते ठीक आहो, आम्ही मिसरामध्ये गुलाम म्हणून राहिलो असतो तर बरे झाले असते. येथे रानात मरून जावे त्यापेक्षा मिसऱ्यांचे दास्य पत्करले.” 13परंतु मोशेने उत्तर दिले, “भिऊ नका! स्थिर उभे राहा आणि परमेश्वर आज तुमचे तारण करील ते पाहा. आजच्या दिवसानंतर हे मिसराचे लोक तुम्हास पुन्हा कधीही दिसणार नाहीत. 14परमेश्वर तुमच्याकरता त्यांच्याशी लढेल, तुम्ही शांत उभे राहा.” 15मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “माझा धावा करीत काय बसलास? इस्राएल लोकांस सांग की पुढे चला. 16तू आपली काठी उचल आणि आपला हात समुद्रावर उगारून तो दुभाग म्हणजे इस्राएल लोक भर समुद्रात कोरड्या भूमीवरून चालतील. 17आणि पाहा, मी स्वतः मिसऱ्यांची मने कठीण करीन आणि ते तुमचा पाठलाग करतील. आणि फारो व त्याचे सर्व सैन्य, स्वार व रथ यांचा पराभव केल्याने माझा महिमा प्रगट होईल. 18फारो व त्याचे रथ व त्यांचे स्वार यांचा पराभव केल्याने माझा महिमा प्रगट झाला म्हणजे मी परमेश्वर आहे हे मिसरी लोकांस कळेल.” 19इस्राएली सेनेच्या पुढे चालणारा देवाचा दूत सेनेच्या मागे गेला, आणि मेघस्तंभ त्यांच्या आघाडीवरून निघून त्यांच्या पिछाडीस उभा राहिला. 20अशा रीतीने तो मिसराचे लोक व इस्राएल लोक यांच्यामध्ये उभा राहिला; मेघ व अंधकार होता तरी तो रात्रीचा प्रकाश देत होता. रात्रभर एका पक्षाला दुसऱ्या पक्षाकडे जाता आले नाही. 21मग मोशेने तांबड्या समुद्रावर आपला हात उगारला, तेव्हा परमेश्वराने रात्रभर पूर्वेकडून जोराचा वारा वाहवून समुद्र मागे हटविला, असा की पाणी दुभागून मध्ये कोरडी जमीन झाली. 22आणि इस्राएल लोक कोरड्या वाटेवरून भर समुद्रातून पार गेले. समुद्राचे पाणी त्यांच्या उजव्या व डाव्या बाजूला भिंतीसारखे उभे राहिले. 23त्यानंतर तेव्हा मिसऱ्यांनी त्यांचा पाठलाग केला. फारोचे सर्व घोडे, रथ व स्वार त्यांच्या पाठोपाठ समुद्रामध्ये गेले. 24तेव्हा त्या दिवशी भल्या पहाटे परमेश्वराने मेघस्तंभातून व अग्निस्तंभातून खाली मिसराच्या सैन्याकडे पाहिले आणि त्यांचा गोंधळ उडवून त्यांचा पराभव केला. 25रथाची चाके रुतल्यामुळे रथावर ताबा ठेवणे मिसराच्या लोकांस कठीण झाले; तेव्हा ते मोठ्याने ओरडून म्हणाले, “आपण येथून लवकर निघून जाऊ या! कारण परमेश्वर इस्राएलाच्या बाजूने आम्हाविरूद्ध लढत आहे.” 26नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला, “तुझा हात समुद्रावर उगार म्हणजे भिंतीसारखे उभे राहिलेले पाणी पूर्ववत जमून मिसऱ्यावर, त्यांच्या रथावर व स्वारांवर येईल.” 27मोशेने आपला हात समुद्रावर उगारला तेव्हा दिवस उजाडल्यावर पाणी पहिल्यासारखे समान पातळीवर आले; तेव्हा मिसराच्या लोकांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु परमेश्वराने त्यांना समुद्रामध्ये उलथून पाडिले. 28पाणी पूर्ववत झाले व त्याने घोडे, रथ व स्वारांना गडप केले आणि इस्राएल लोकांचा पाठलाग करणाऱ्या फारोच्या सर्व सैन्याचा नाश झाला, त्यांच्यातले कोणीही वाचले नाही. 29परंतु इस्राएली लोक कोरड्या भूमीवरून भरसमुद्र ओलांडून पार गेले. ते पाणी त्यांच्या उजव्या व डाव्या हाताला भिंतीप्रमाणे उभे राहिले. 30तेव्हा अशा रीतीने त्या दिवशी परमेश्वराने मिसऱ्यांच्या हातातून इस्त्राएल लोकांस सोडविले आणि मिसरी समुद्रतीरी मरून पडलेले इस्राएल लोकांनी आपल्या डोळ्यांनी पाहिले. 31परमेश्वराने मिसऱ्यांना आपला प्रबळ हात दाखविला तो इस्राएल लोकांनी पाहिला, तेव्हा त्यांनी परमेश्वराचे भय धरले आणि परमेश्वरावर व त्याचा सेवक मोशे याच्यावरही विश्वास ठेवला. 15:1नंतर मोशे व इस्राएल लोक यांनी परमेश्वरास हे गीत गाईले. ते म्हणाले, “मी परमेश्वरास गीत गाईन कारण तो विजयाने प्रतापी झाला आहे; घोडा व स्वार यांना त्याने समुद्रात उलथून टाकले आहे. 2परमेश्वर माझे सामर्थ्य व माझे गीत आहे. तो माझे तारण झाला आहे. मी त्याची स्तुतीस्तोत्रे गाईन; परमेश्वर माझा देव आहे; तो माझ्या पूर्वजांचा देव आहे; मी त्याचे गौरव करीन. 3परमेश्वर महान योद्धा आहे; त्याचे नाव परमेश्वर आहे. 4त्याने फारोचे रथ व स्वार यांना समुद्रात फेकून दिले; त्याचे निवडक अधिकारी तांबड्या समुद्रात बुडाले आहेत. 5खोल पाण्याने त्यांना बुडविले; ते खोल पाण्यात दगडाप्रमाणे तळापर्यंत बुडाले. 6हे परमेश्वरा, तुझा उजवा हात आश्चर्यकारकरीत्या बलशाली आहे; त्या हाताने तू शत्रूंचा चुराडा करून टाकलास. 7तुझ्या वैभवशाली सामर्थ्याने तू तुझ्याविरूद्ध बंड करून उठणाऱ्यांचा नाश करतोस; अग्नीने वाळलेल्या गवताच्या काड्या जाळाव्या तसे तू त्यांना तुझ्या रागाने जाळून भस्म करतोस. 8तुझ्या नाकपुड्यांच्या फुंकराने जलाच्या राशी बनल्या. जलप्रवाह राशी सारखे उंच उभे राहिले, जलाशय सागराच्या उदरी थिजून गेले. 9शत्रू म्हणाला, मी त्यांचा पाठलाग करीन, त्यांना गाठीन, मी त्यांची सर्व संपत्ती लुटून घेईन; त्यामुळे माझा जीव तृप्त होईल. मी तलवार उपसून आपल्या हाताने त्यांचा नाश करीन. 10परंतु तू त्यांच्यावर आपला फुंकर वायू सोडलास आणि समुद्राच्या पाण्याने त्यांना गडप केले; ते शिशाप्रमाणे समुद्रात खोल पाण्यात तळापर्यंत बुडाले. 11हे परमेश्वरा, देवांमध्ये तुजसमान कोण आहे? पवित्रतेने ऐश्वर्यवान, स्तवनात भयानक, अद्भुते करणारा असा तुजसमान कोण आहे? 12तू तुझा उजवा हात उगारला, पृथ्वीने त्यांना गिळून टाकले. 13तू उध्दारलेल्या लोकांस तू तुझ्या दयाळूपणाने चालवले आहेस; तुझ्या सामर्थ्याने तू त्यांना तुझ्या पवित्र आणि आनंददायी प्रदेशात नेले आहे. 14इतर राष्ट्रे ही गोष्ट ऐकून भयभीत होतील; पलिष्टामध्ये राहणारे लोक भीतीने थरथर कापतील. 15मग अदोमाचे अधिकारी हैराण झाले. मवाबाचे नायक भीतीने थरथर कापत आहेत आणि कनानी लोक गलित झाले आहेत. 16तुझे सामर्थ्य पाहून ते लोक घाबरतील, आणि परमेश्वराचे लोक म्हणजे तू तारलेले लोक निघून पार जाईपर्यंत ते तुझ्या लोकांस काहीही न करता, दगडासारखे एकाच जागी उभे राहतील; 17तू तुझ्या लोकांस तुझ्या वतनाच्या पर्वतावर घेऊन जाशील; हे परमेश्वरा, तू आपल्यासाठी केलेले निवासस्थान हेच आहे. हे प्रभू, तुझ्या हातांनी स्थापिलेले तुझे पवित्र स्थान हेच. 18परमेश्वर सदासर्वदा राज्य करील.” 19फारोचे घोडे, स्वार व रथ समुद्रात गेले, या प्रकारे परमेश्वराने त्यांना समुद्राच्या पाण्यात गडप केले; परंतु इस्राएल लोक भरसमुद्रातून कोरड्या जमिनीवरून चालत पार गेले.

संध्याप्रार्थना: वाचन (सातवे वाचन)

सफ 3:8–15

8ह्यास्तव परमेश्वर म्हणतो, “मी लूट करायला ऊठेन तोपर्यंत माझी वाट पाहा, कारण राष्ट्रे एकत्र यावी, राज्ये गोळा करावी, आणि त्यांच्यावर मी आपला कोप व संतप्त क्रोध ओतावा, असा मी निश्चय केला आहे, कारण माझ्या क्रोधाच्या अग्नीने सर्व पृथ्वी भस्म होईल. 9त्यानंतर लोकांस मी शुद्ध ओठ देईन, अशासाठी की परमेश्वराच्या नावाला हाक मारताना त्या सर्वांनी खांद्याला खांदा लावून एक होऊन माझी सेवा करावी. 10कूश देशातील नदीपलीकडचे माझे आराधक व माझी विखुरलेली माणसे, मला अर्पणे घेऊन येतील. 11त्या दिवसात तू माझ्याविरूद्ध केलेल्या सर्व कृत्यांची तुला लाज वाटणार नाही, कारण त्या समयापर्यंत जे तुझ्या वैभवाविषयी अभिमान धरत होते त्यांना मी बाहेर घालवीन, आणि मग तू माझ्या पवित्र पर्वतावर पुन्हा गर्विष्ठ असणार नाहीस. 12तुझ्यामध्ये मी फक्त नम्र व दीन लोकांसच राहू देईन, आणि तू परमेश्वराच्या नावात आश्रय घेशील.” 13“इस्राएलमधील उरलेले वाईट कृत्ये करणार नाहीत व खोटे बोलणार नाहीत. त्यांच्या मुखात कपटी जीभ आढळणार नाही. ते चरुन आडवे पडून राहतील व त्यांना कोणीही त्रास देणार नाही.” 14सियोन कन्ये, गा आणि हे इस्राएल, आनंदाने जल्लोष कर! यरूशलेमेच्या कन्ये, आनंद व उल्लास कर! 15कारण परमेश्वराने तुझा दंड दूर केला आहे; त्यांने तुझ्या शत्रूला घालवून दिले आहे! इस्राएलचा राजा, परमेश्वर तुझ्यामध्ये आहे. आता तुला कोणत्याही अरिष्टाची भीती बाळगण्याचे कारण नाही!

संध्याप्रार्थना: वाचन (आठवे वाचन)

1 राजे 17:8–24

8तेव्हा परमेश्वर एलीयाला म्हणाला, 9“सीदोनामधील सारफथ येथे जाऊन राहा, तेथे एक विधवा राहते. तिला मी तुला अन्न द्यायला सांगितले आहे.” 10तेव्हा एलीया सारफथ येथे गेला. तो नगराच्या वेशीजवळ जातो तर त्यास एक स्त्री भेटली. ती विधवा होती. ती सरपण गोळा करत होती. एलीया तिला म्हणाला, “मला थोडे पाणी प्यायला मिळेल का?” 11ती पाणी आणायला निघाली तेव्हा, एलीया तिला म्हणाला, “मला एखादा भाकरीचा तुकडाही दिलास तर बरे!” 12तेव्हा ती स्त्री म्हणाली, “परमेश्वर देवाची शपथ सांगते, माझ्याकडे भाकर अजिबात नाही. थोडेसे पीठ शिल्लक आहे. आणि बरणीच्या तळाला थोडेसे तेल आहे. इथे मी सरपण गोळा करायला आले. ते घेऊन मी घरी जाईन, स्वयंपाक करीन तो शेवटचाच. माझा पुत्र आणि मी जेवू आणि मग भूकेने मरु.” 13तेव्हा एलीया तिला म्हणाला, “भिऊ नकोस. घरी जा आणि आत्ता म्हणालीस त्याप्रमाणे स्वयंपाक कर. पण आधी जे पीठ शिल्लक आहे, त्याची लहानशी भाकर करून मला आणून दे, मग तुमच्या दोघांचा स्वयंपाक कर. 14इस्राएलाचा परमेश्वर देव म्हणाला आहे, तुझ्या डब्यातील पीठ कधी सरणार नाही. तुझ्या बरणीत नेहमीच तेल असेल. पुन्हा परमेश्वर पृथ्वीवर पाऊस पाडेपर्यंत असे चालेल.” 15तेव्हा ती घरी गेली. एलीयाच्या सांगण्याप्रमाणे तिने केले. एलीया, ती आणि तिचा पुत्र यांना बरेच दिवसपर्यंत पुरेसे खायला मिळत गेले. 16पीठ आणि तेल कधीच संपले नाही. एलीयाला परमेश्वराने जे सांगितले त्याप्रमाणेच हे घडत गेले. 17काही दिवसानंतर त्या स्त्रीचा पुत्र आजारी पडला. जिच्या मालकीचे ते घर होते, त्याचे दुखणे वाढत गेले शेवटी त्याचा श्वास थांबला. 18तेव्हा ती स्त्री म्हणाली, “एलीया, तू तर देवाचा मनुष्य आहेस, मला तुझी काही मदत होईल का? की माझ्या पापांची आठवण द्यायलाच तू आला आहेस? की माझ्या मुलाला मारायला आला आहेस?” 19एलीया तिला म्हणाला, “तुझ्या मुलाला माझ्याकडे आण.” मग त्याने त्या मुलाला घेतले आणि वरच्या मजल्यावर तो गेला. आपल्या खोलीत, आपल्या बिछान्यावर त्याने त्यास ठेवले. 20एलीयाने मग प्रार्थना केली, “परमेश्वर देवा, या विधवेने मला तिच्या घरी आश्रय दिला आहे. तिच्यावर ही वेळ का आणतोस? तिच्या मुलाला तू मारणार का?” 21मग एलीयाने तीनदा त्याच्यावर पाखर घालून करून प्रार्थना केली, “परमेश्वर देवा याला वाचव.” 22एलीयाच्या हाकेला परमेश्वराने उत्तर दिले. मुलाचा प्राण पुन्हा येऊन तो जिवंत झाला. 23एलीयाने मुलाला खाली आणले. त्याच्या आईकडे त्यास सोपवून एलीया म्हणाला, “बघ, तुझा पुत्र जिवंत आहे.” 24ती स्त्री एलीयाला म्हणाली, “तू खरोखरच देवाचा मनुष्य आहेस हे मला पटले. खरोखरच परमेश्वर तुझ्या शब्दाद्वारे बोलतो हे आता मला कळले.”

संध्याप्रार्थना: वाचन (9वे वाचन)

यश 61:10–62:5

10मी परमेश्वराच्या ठायी अत्यंत हर्ष पावतो, माझ्या देवाच्या ठायी माझा जीव अतीशय आनंदीत होतो. कारण जसा पती फेटा घालून आपणाला सुशोभित करतो, आणि नवरी जशी अलंकाराणे स्वतःला भूषित करते, तशी त्याने मला तारणाचे वस्रे नेसवली आहेत, मला नीतिमत्तेच्या झग्याने आच्छादले आहे. 11कारण पृथ्वी जशी आपले अंकूरलेले रोप उगवते, आणि जशी बाग त्याच्यामधील लागवड उगवते. त्याचप्रमाणे परमेश्वर सर्व राष्ट्रांसमोर चांगुलपणा व प्रशंसा अंकुरीत करीन. 62:1“मी सियोनेकरीता शांत राहणार नाही, आणि यरूशलेमेकरीता तिचा चांगुलपणा तेजस्वी प्रकाशाप्रमाणे चमकेपर्यंत आणि तारण जळत्या मशालीप्रमाणे निघेपर्यंत मी गप्प बसणार नाही.” 2मग राष्ट्रे तुझा चांगुलपणा पाहतील सर्व राजे तुझी प्रतिष्ठा पाहतील. परमेश्वर तुला जे नवे नाव देईल, त्या नावाने तुला हाक मारतील. 3तू परमेश्वराच्या हातातील सुंदर मुकुटाप्रमाणे होशील, आणि तुझ्या देवाच्या हातात राजकीय पगडी होशील. 4यापुढे तुला “त्यागलेली” असे म्हणणार नाहीत, किंवा तुझ्या भूमीला “भयाण” असेही म्हणणार नाही. खरच तुला “माझा आनंद तिच्या ठायी आहे” असे म्हणतील, आणि तुझ्या भूमीला “विवाहित” म्हणतील. कारण परमेश्वराचा आनंद तुझ्यामध्ये आहे, आणि तुझी भूमी विवाहित होईल. 5जसा तरूण मुलगा तरूणीशी विवाह करतो, त्याचप्रकारे तुझी मुले तुझ्याशी विवाह करतील. जसा वर आपल्या वधूवरुन हर्ष करतो, तसा तुझा देव तुझ्यावरून हर्ष करील.

संध्याप्रार्थना: वाचन (10वे वाचन)

उत्प 22:1–18

1या गोष्टी झाल्यानंतर देवाने अब्राहामाची परीक्षा घेतली. तो अब्राहामाला म्हणाला, “अब्राहामा!” अब्राहाम म्हणाला, “हा मी येथे आहे.” 2नंतर देव म्हणाला, “तुझा एकुलता एक प्रिय पुत्र, ज्याच्यावर तू प्रीती करतोस त्या इसहाकाला घेऊन तू मोरिया देशात जा आणि तेथे मी तुला सांगेन त्या डोंगरावर माझ्यासाठी त्याचे होमार्पण कर.” 3तेव्हा अब्राहाम पहाटेस लवकर उठला, त्याने खोगीर घालून आपले गाढव तयार केले, आपला मुलगा इसहाक व त्याच्यासोबत दोन तरुण सेवकांना आपल्याबरोबर घेतले. त्याने होमार्पणाकरिता लाकडे फोडून घेतली आणि मग ते सर्व देवाने सांगितलेल्या ठिकाणी प्रवासास निघाले. 4तिसऱ्या दिवशी अब्राहामाने वर पाहिले आणि दूर अंतरावर ती जागा पाहिली. 5मग अब्राहाम आपल्या तरुण सेवकांना म्हणाला, “तुम्ही येथे गाढवाजवळ थांबा, आणि मी व मुलगा तिकडे जातो. आम्ही देवाची आराधना करू आणि तुम्हाकडे परत येऊ.” 6अब्राहामाने होमार्पणासाठी लाकडे घेऊन इसहाकाच्या खांद्यावर ठेवली; त्याने स्वतःच्या हातात अग्नी व एक सुरा घेतला. आणि ते दोघे बरोबर निघाले. 7इसहाक आपल्या पित्याला म्हणाला, “माझ्या बाबा.” अब्राहामाने उत्तर दिले, “मी येथे आहे, माझ्या मुला.” इसहाक म्हणाला, “मला लाकडे व अग्नी दिसतात, परंतु होमार्पणासाठी कोकरू कोठे आहे?” 8अब्राहाम म्हणाला, “माझ्या मुला, होमार्पणासाठी कोकरू देव स्वतः आपल्याला पुरवेल.” तेव्हा अब्राहाम व त्याचा मुलगा बरोबर निघाले. 9देवाने सांगितलेल्या ठिकाणी जेव्हा ते जाऊन पोहचले, तेथे अब्राहामाने एक वेदी बांधली, त्याने वेदीवर लाकडे रचली. नंतर त्याने आपला पुत्र इसहाक याला बांधले, आणि वेदीवरील लाकडावर ठेवले. 10मग अब्राहामाने आपला हात पुढे करून आपल्या मुलाला मारण्यासाठी सुरा हातात घेतला. 11परंतु तेवढ्यात, परमेश्वराच्या दूताने स्वर्गातून हाक मारून त्यास म्हटले, “अब्राहामा, अब्राहामा!” अब्राहामाने उत्तर दिले, “मी येथे आहे.” 12तो म्हणाला, “तू आपल्या मुलावर हात टाकू नकोस, किंवा त्यास कोणत्याही प्रकारची इजा करू नकोस, कारण आता मला खात्रीने समजले की, तू देवाचे भय बाळगतोस, कारण तू माझ्यासाठी आपल्या एकुलत्या एका पुत्राला ही राखून ठेवले नाही.” 13आणि मग अब्राहामाने वर पाहिले आणि पाहा, त्याच्यामागे एका झुडपात शिंगे अडकलेला असा एक एडका होता. मग त्याने जाऊन तो घेतला व आपल्या मुलाच्या ऐवजी त्या एडक्याचे होमार्पण म्हणून अर्पण केले. 14तेव्हा अब्राहामाने त्या जागेला, “परमेश्वर पुरवठा करेल,” असे नाव दिले, आणि आजवर देखील, “परमेश्वराच्या डोंगरावर तो पुरवठा केला जाईल,” असे बोलले जाते. 15नंतर स्वर्गातून परमेश्वराच्या दूताने अब्राहामास दुसऱ्यांदा हाक मारली 16आणि म्हटले, हे परमेश्वराचे शब्द आहेत, “मी परमेश्वर आपलीच शपथ वाहून म्हणतो की, तू ही जी गोष्ट केली आहे, म्हणजे तू आपल्या एकुलत्या एका मुलाला राखून ठेवले नाही, 17मी खरोखर तुला आशीर्वाद देईन व तुझे वंशज आकाशातल्या ताऱ्यांसारखे व समुद्र किनाऱ्यावरील वाळू इतके बहुतपट वाढवीनच वाढवीन; आणि तुझे वंशज आपल्या शत्रूच्या वेशीचा ताबा मिळवतील. 18पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे तुझ्या संततीद्वारे आशीर्वादित होतील, कारण तू माझा शब्द पाळला आहेस.”

संध्याप्रार्थना: वाचन (11वे वाचन)

यश 61:1–9

1प्रभू परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आहे, कारण त्याने मला अभिषेक केला आहे. ह्यासाठी की दिनांस सुवार्ता सांगावी आणि भग्नहृदयाच्या लोकांस बरे करावे. पाडाव केलेल्यास मुक्तता आणि बंदिवानांस मोकळीक गाजवून सांगावी. 2परमेश्वराच्या कृपासमयाचे वर्ष व त्याच्या प्रतिकाराचा दिवस घोषणा करून सांगायला, आणि शोक करणाऱ्या सर्वांना सांत्वन करायला त्याने मला पाठवले आहे. 3सियोनेच्या शोक करणाऱ्यांस राखेच्या ऐवजी शोभा, शोकाच्या ठिकाणी आनंदाचे तेल, खिन्न आत्म्याच्या ठिकाणी प्रशंसेचे वस्र नेमून द्यायला त्याने मला पाठवले आहे. आणि त्याचा महिमा व्हावा म्हणून त्यांना न्यायीपणाची वृक्षे, परमेश्वराने लावलेले असे म्हणतील. 4“ते प्राचीन ओसाड स्थले पुन्हा बांधतील, ते पूर्वी नाश झालेले पुनर्संचयित करतील, ते फार पूर्वीची मोडलेली नगरे, फार वर्षांपूर्वी नाश पावलेली शहरे नव्यासारखी करतील.” 5परदेशी उभे राहून तुमचे कळप चारतील आणि परदेशीयांची मुले तुमच्या शेतांत आणि द्राक्षमळ्यांत काम करतील. 6तुला “परमेश्वराचा याजक” आमच्या देवाचा सेवक असे म्हणतील. जगातील सर्व राष्ट्रांची संपत्ती तुम्ही भोगाल आणि ती मिळाल्याबद्दल तुम्हास अभिमान वाटेल. 7“तुझ्या अपमाना ऐवजी तुला दुप्पट मिळेल, आणि तुझ्या अप्रतिष्ठेच्या ऐवजी ते आपल्या विभागाविषयी आनंद करतील, म्हणून ते आपल्या भूमीत दुप्पट भाग पावतील, सर्वकाळचा आनंद त्याना प्राप्त होईल.” 8कारण मी परमेश्वर न्यायावर प्रीती करतो, आणि मी दरोडेखोर आणि हिंसक अन्यायाचा तिरस्कार वाटतो. मी विश्वासाने त्यांचे प्रतिफळ त्यांना देईन, आणि मी माझ्या लोकांबरोबर सर्वकाळचा करार करीन. 9त्यांचे वंशज सर्व राष्ट्रांत आणि लोकांमध्ये त्यांचे संतान ओळखले जातील. त्यांना पाहणारे सर्व ते कबूल करतील की, “परमेश्वराने ज्या लोकांस आशीर्वादीत केले आहे, ते हेच आहेत.”

संध्याप्रार्थना: वाचन (12वे वाचन)

2 राजे 4:8–37

8एकदा अलीशा शूनेम येथे गेला. तेथे एक प्रतिष्ठित स्त्री राहत होती. तिने अलीशाला आपल्या घरी येऊन जेवायचा आग्रह केला. त्यामुळे अलीशा जेव्हा तिकडून जाई तेव्हा त्या स्त्रीकडे जेवणासाठी थांबत असे. 9तेव्हा ती स्त्री आपल्या नवऱ्याला म्हणाली, “पाहा, मला आता कळाले आहे की, आपल्या येथे नेहमी येतो तो अलीशा, परमेश्वराचा पवित्र मनुष्य आहे. 10तेव्हा त्याच्यासाठी वर एक लहानशी खोली बांधू या, त्यामध्ये एक पलंग, मेज व बैठक आणि दिव्याची सोय पण करु. म्हणजे तो जेव्हा येईल तेव्हा त्यास थांबायला ही खोली होईल.” 11मग एके दिवशी अलीशा त्या घरी आला तेव्हा त्याने त्या खोलीत आराम केला. 12तेव्हा अलीशाने आपला सेवक गेहजी याला, “त्या शूनेमच्या स्त्रीला बोलावून आणायला सांगितले.” त्याप्रमाणे गेहजीने त्या स्त्रीला बोलावले, ती येऊन अलीशा पुढे उभी राहिली. 13अलीशा त्यास म्हणाला, तिला सांग की, “तू आमची चांगली काळजी घेतली आहेस. तेव्हा मी तुझ्यासाठी काय करु? तुझ्यासाठी राजाशी किंवा सेनापतीशी बोलू का?” ती म्हणाली, “मी माझ्या लोकांमध्ये राहते.” 14तेव्हा अलीशा गेहजीला म्हणाला, “मग आपण तिच्यासाठी काय करु शकतो?” गेहजी म्हणाला, “तिला खरोखर मूलबाळ नाही आणि तिचा पती वृध्द आहे.” 15मग अलीशा म्हणाला, “तिला बोलाव” गेहजीने पुन्हा तिला बोलावले, तेव्हा ती येऊन दाराशी उभी राहिली. 16अलीशा तिला म्हणाला, “पुढील वसंत ऋतुत याच सुमारास तू आपल्या मुलाला उराशी धरशील.” ती म्हणाली, “नाही, माझ्या स्वामी, तुम्ही परमेश्वराचे मनुष्य आहात, माझ्याशी खोटे बोलू नका.” 17पण ती स्त्री गरोदर राहिली आणि अलीशा म्हणाला त्याप्रमाणेच वसंत ऋतूच्या वेळी तिने मुलाला जन्म दिला. 18मुलगा मोठा झाल्यावर, एके दिवशी तो आपल्या बापाजवळ जो कापणी करणाऱ्यां लोकांस सोबत होता तेथे गेला. 19तो वडिलांना म्हणाला, “माझे डोके, माझे डोके.” यावर त्याचे वडिल आपल्या नोकराला म्हणाले, “याला त्याच्या आईकडे घेऊन जा.” 20नोकराने मुलाला त्याच्या आईकडे पोचवले. दुपारपर्यंत हा मुलगा आईच्या मांडीवर बसला होता नंतर तो मेला. 21तेव्हा त्या स्त्रीने आपल्या मुलाला परमेश्वराच्या मनुष्याच्या पलंगावर ठेवले व खोलीचे दार लावून ती बाहेर गेली. 22तिने नवऱ्याला हाक मारुन म्हटले, “कृपाकरून एक नोकर आणि एक गाढव माझ्याकडे पाठव, म्हणजे मी ताबडतोब जाऊन परमेश्वराच्या मनुष्यास भेटून येते.” 23त्या स्त्रीचा पती तिला म्हणाला, “आजच त्याच्याकडे का जातेस? आज चंद्रदर्शन नाही, की शब्बाथही नाही.” ती म्हणाली, “सगळे ठीक होईल.” 24मग गाढवावर खोगीर चढवून ती नोकराला म्हणाली, “आता पटकन चल आणि मी सांगितल्या शिवाय माझ्यासाठी वेग कमी करु नको!” 25मग ती निघून कर्मेल डोंगरास परमेश्वराच्या मनुष्याकडे आली. अलीशाने तिला दुरुनच येताना पाहिले, तेव्हा त्याने गेहजी या आपल्या नोकराला म्हटले, “बघ, ती शूनेमची स्त्री येत आहे. 26कृपाकरून तिला भेटायला धावत जा आणि तिला विचार, तू व तुझा पती, तुझा मुलगा, हे सर्व ठीक आहेत ना?” ती म्हणाली, सर्वकाही ठीक आहे. 27आणि तिने डोंगरावर देवाच्या मनुष्याजवळ जाऊन त्याचे पाय धरले. तेव्हा तिला ढकलण्यास गेहजी जवळ आला, पण परमेश्वराच्या मनुष्याने म्हटले, “तिला एकटे सोड, ती काळजीत आहे. परमेश्वराने हिची समस्या माझ्यापासून लपवली आहे, मला काहिच कळवले नाही.” 28तेव्हा ती म्हणाली, “माझ्या स्वामी, मी तुझ्याजवळ मुलगा मागितला होता काय? ‘मला फसवू नको’ असे मी म्हटले नव्हते काय?” 29तेव्हा अलीशा गेहजीला म्हणाला, “निघायची तयारी कर व तुझ्या हातात माझी काठी घे, आणि तिच्या घरी जा. जर तुला कोणी भेटला तर त्यास सलाम करू नको, आणि कोणी तुला सलाम केला तर त्यास उत्तर देऊ नको. आणि माझी काठी त्या मुलाच्या तोंडावर ठेव.” 30पण मुलाच्या आईने म्हटले, “परमेश्वराची आणि तुमची शपथ मी तुम्हास सोडणार नाही!” तेव्हा अलीशा उठला आणि तिच्या मागून निघाला. 31गेहजी त्यांच्या आधी घरी जाऊन पोहचला व त्याने त्या मुलाच्या तोंडावर काठी ठेवली पण ते मूल काही बोलले नाही किंवा कोणतीच हालचाल केली नाही. तेव्हा गेहजी परत अलीशाकडे गेला व त्यास म्हणाला, “मूल काही जागे झाले नाही.” 32जेव्हा अलीशा घरात आला ते मूल मरण पावलेले व त्याच्या अंथरुणावर निपचीत पडले होते. 33अलीशाने खोलीत शिरुन दार लावून घेतले. आता खोलीत ते मूल आणि अलीशा अशी दोघेच होती. अलीशाने मग परमेश्वराची प्रार्थना केली. 34अलीशा त्या मुलाच्या अंगावर पालथा पडला. त्याने आपले तोंड मुलाच्या तोंडावर आणि डोळे मुलाच्या डोळ्यावर, आपले हात त्याच्या हातावर ठेवले. अशा प्रकारे अलीशाने त्या मुलावर पाखर घातल्यावर त्या मुलाच्या अंगात ऊब निर्माण झाली. 35मग अलीशा उठला आणि घरात इकडेतिकडे फिरला. मग पुन्हा वर येऊन मुलावर पाखर घातली. मुलाला एका पाठोपाठ सात शिंका आल्या आणि त्याने डोळे उघडले. 36अलीशाने गेहजीला हाक मारुन त्या शूनेमकरिणीला बोलवण्यास सांगितले. त्याने तिला बोलविल्यावर ती खोलीत आल्यावर, अलीशा तिला म्हणाला, “तुझ्या मुलाला उचलून घे.” 37मग तिने जमिनीपर्यंत पालथे पडून त्यास नमन केले व मुलाला उचलून घेऊन बाहेर आली.

संध्याप्रार्थना: वाचन (13वे वाचन)

यश 63:11–64:5

11त्याच्या लोकांनी मोशेच्या प्राचीन काळाविषयी विचार केला. ते म्हणाले, तो देव कोठे आहे? ज्याने आपल्या कळपाच्या मेंढपाळांसोबत त्यांना समुद्रातून वर आणले, देव कोठे आहे? ज्याने आपला पवित्र आत्मा त्यांच्यामध्ये घातला 12ज्याने आपले वैभवशाली सामर्थ्य मोशेच्या उजव्या हाताने पुढे नेले, आणि ज्याने आपणास सार्वकालिक नाव करायला त्यांच्यापुढे समुद्र दुभागला, तो देव कोठे आहे? 13तो देव कोठे आहे? ज्याने त्यांना खोल समुद्रामधून चालवत नेले, जसा घोडा सपाट जमिनीवर धावत सुटतो, तसे ते अडखळले नाहीत. 14परमेश्वराने त्यांना खोऱ्यात उतरत जाणाऱ्या गुरांप्रमाणे विसावा दिला. ह्याप्रमाणे तू लोकांस मार्गदर्शन केलेस आणि ह्यासाठी की तुझे प्रतापी होवो. 15स्वर्गातून खाली पाहा आणि तुझ्या पवित्र व तेजोमय वस्तीतून नोंद घे. तुझा आवेश आणि तुझी महतकृत्ये कोठे आहेत? तुझी करुणा आणि दयाळू कृती आमच्याकडून ठेवल्या आहेत 16तू तर आमचा पिता आहेस, तरी अब्राहाम आम्हास ओळखत नाही आणि इस्राएलाला आम्ही माहीत नाही. परमेश्वरा, तू आमचा पिता, सर्वकाळपासून आम्हांला खंडून घेणारा, हे तुझे नाव आहे. 17परमेश्वरा, तू आम्हास तुझ्यापासून मार्गातून का बहकू देतोस आणि तुझ्या आज्ञा न पाळाव्यात म्हणून तू आमचे हृदये कठीण का करतोस? तुझ्या सेवकाकरिता परत ये, जे तुझ्या वतनाचे वंश आहेत. 18तुझी माणसे थोडाच वेळ तुझे पवित्र स्थान ताब्यात घेतील, पण आमच्या शत्रूंनी तुझे पवित्र मंदिर पायाखाली तुडवले. 19त्या लोकांसारखे आम्ही झालो, ज्यांच्यावर तू कधीच राज्य केले नाही आणि ज्याना तुझे नाव दिले गेले नाही. 64:1अहा! जर तू स्वर्ग दुभंगला आणि खाली उतरून आलास! तर पर्वत तुझ्या उपस्थितीत थरथरतील, 2जसा अग्नी काड्या पेटवतो, जसा अग्नी पाणी उकळवतो तसा तू आपल्या शत्रूंस आपले नाव कळवायला राष्ट्रे तुझ्यापुढे थरथर कापावीत म्हणून तू खाली उतरून आला असता तर किती बरे झाले असते! 3जेव्हा तू या महान गोष्टी केल्या ज्या आम्हास अपेक्षीत नव्हत्या, तेव्हा तू खाली उतरून आलास, पर्वत तुझ्या समोर भीतीने थरथर कापले. 4तर जो त्याची आशा धरतो त्याच्यासाठी जे त्याने तयार केले आहे, ते प्राचीन काळापासून कोणीही ऐकलेले किंवा समजले नाही, हे देवा तुझ्याशिवाय कोण्याच्या डोळ्याने ते पाहिले नाही. 5जे लोक सत्कृत्यात आनंद मानतात, जे तुझ्या मार्गात तुझी आठवण करतात आणि ते पाळतात, त्यांना मदत करायला तू आला आहे, पण तू रागावलास आणि आम्ही पाप केले. त्या मध्ये आमचे तारण होईल का?

संध्याप्रार्थना: वाचन (14वे वाचन)

यिर्म 31:31–34

31परमेश्वर असे म्हणतो, पाहा, असे दिवस येत आहेत की, “मी इस्राएलाच्या व यहूदाच्या घराण्याशी नवा करार करीन. 32मी त्यांच्या वडीलांबरोबर मिसर देशातून बाहेर काढून आणण्यासाठी त्यांचा हात धरला तेव्हा जो करार केला होता त्याप्रमाणे हा असणार नाही. त्या दिवसात जरी मी त्यांच्यासाठी पती होतो तरी त्यांनी माझ्या कराराचा भंग केला.” असे परमेश्वर म्हणतो. 33“पण परमेश्वर म्हणतो, त्यादिवसानंतर जो करार मी इस्राएलाच्या घराण्याबरोबर करीन तो हाच आहे.” “मी आपले नियमशास्त्र त्यांच्या अंतर्यांमात ठेवीन व त्यांच्या हृदयावर मी ते लिहीन, कारण मी त्यांचा देव होईन व ते माझे लोक होतील. 34नंतर परमेश्वरास ओळखा असे म्हणून पुढे प्रत्येक मनुष्य आपल्या शेजाऱ्याला किंवा प्रत्येक आपल्या भावाला शिकवणार नाही. कारण लहानापासून थोरापर्यंत मला ओळखतील.” असे परमेश्वर म्हणतो. “कारण मी त्यांच्या अन्यायांची त्यांना क्षमा करीन आणि मी त्यांच्या पापांचे स्मरण ठेवणार नाही.”

संध्याप्रार्थना: वाचन (15वे वाचन)

दानि 3

प्रेषितांचे पत्र

रोम 6:3–11

3किंवा आपण जितक्यांनी ख्रिस्त येशूमध्ये बाप्तिस्मा घेतला, त्या आपण त्याच्या मरणात बाप्तिस्मा घेतला हे तुम्ही जाणत नाही काय? 4म्हणून आपण त्याच्या मरणातील बाप्तिस्म्याने त्याच्याबरोबर पुरले गेलो, ते ह्यासाठी की जसा ख्रिस्त पित्याच्या गौरवामुळे मरण पावलेल्यांमधून उठवला गेला तसेच आपणही जीवनाच्या नवेपणात चालले पाहिजे. 5कारण जर त्याच्या मरणाच्या रूपात आपण त्याच्याशी जोडलेले आहोत तर त्याच्या पुन्हा उठण्याच्या रूपात आपण त्याच्याशी जोडलेले होऊ. 6आपण जाणतो की आपल्यामधील जुना मनुष्य त्याच्याबरोबर वधस्तंभावर खिळला गेला आहे, म्हणजे पापाचे शरीर नष्ट होऊन आपण पुढे पापाचे दास्य करू नये. 7कारण जो मरण पावला आहे तो पापापासून मुक्त होऊन न्यायी ठरवलेला आहे. 8पण आपण जर ख्रिस्ताबरोबर मरण पावलो असलो, तर आपण त्याच्याबरोबर जिवंतही राहू असा आपण विश्वास ठेवतो. 9कारण आपण हे जाणतो की, मरण पावलेल्यांमधून उठलेला ख्रिस्त पुन्हा मरणार नाही. त्याच्यावर मरणाची सत्ता अजिबात राहिली नाही. 10कारण तो मरण पावला तो पापासाठी एकदाच मरण पावला, पण जिवंत आहे तो देवासाठी जिवंत आहे. 11तसेच आपण ख्रिस्त येशूमध्ये खरोखर पापाला मरण पावलेले पण देवाला जिवंत आहोत असे तुम्ही स्वतःला माना.

शुभवर्तमान

मत्त 28:1–20

1मग शब्बाथानंतर आठवड्याचा पहिला दिवस उजडतांच पहाटेस मग्दालीया नगराची मरीया, याकोब व योसेफ यांची आई मरीया कबर पाहावयास तेथे गेल्या 2त्यावेळी पाहा, तेथे मोठा भूकंप झाला. परमेश्वराचा दूत स्वर्गातून उतरून तेथे आला. त्याने कबरेच्या तोंडावरची धोंड बाजूला लोटली व तो तीवर बसला. 3त्याचे रूप चमकणाऱ्या विजेसारखे व त्याचे कपडे बर्फासारखे शुभ्र होते. 4पहारा करणारे शिपाई खूप घाबरले, ते थरथर कापू लागले आणि ते मरण पावलेल्या मनुष्यांसारखे झाले. 5देवदूत त्या स्त्रियांना म्हणाला, “भिऊ नका, कारण मी जाणतो की, ज्याला वधस्तंभावर खिळले होते त्या येशूला तुम्ही शोधत आहात. 6पण तो इथे नाही कारण तो म्हणाला होता, त्याप्रमाणे त्यास मरणातून उठविण्यात आले आहे. या आणि जेथे त्यास ठेवले होते ती जागा पाहा. 7आता लवकर जा आणि त्याच्या शिष्यांना सांगा, तो मरणातून उठला आहे आणि बघा, तो तुमच्यापुढे गालील प्रांतात जात आहे आणि तुम्ही त्यास तेथे पाहाल. पाहा, मी तुम्हास सांगितले आहे.” 8तेव्हा त्या स्त्रिया भयाने व मोठ्या आनंदाने कबरेजवळून घाईने निघाल्या व त्याच्या शिष्यांना हे वर्तमान सांगण्यासाठी त्या धावत गेल्या. 9मग पाहा; येशू त्यांना भेटला आणि तो त्यांना म्हणाला, “शांती असो!” त्या त्याच्याजवळ आल्या. त्यांनी त्याचे पाय धरले आणि त्यास नमन केले. 10तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “भिऊ नका, जा, माझ्या भावांना सांगा की त्यांनी गालील प्रांतात जावे. ते तिथे मला पाहतील.” 11त्या स्त्रिया शिष्यांना सांगण्यासाठी गेल्या. तेव्हा कबरेवरील पहारेकरी शिपायांतील काहीजण नगरात गेले आणि त्यांनी घडलेले सर्व मुख्य याजकांना सांगितले. 12नंतर याजक जाऊन वडीलजनांना भेटले आणि त्यांनी एक कट रचला. त्यांनी शिपायांना पुष्कळ पैसे देऊन असे म्हणण्यास सांगितले. 13ते म्हणाले, “लोकांस असे सांगा की, आम्ही रात्री झोपेत असताना येशूचे शिष्य आले आणि त्यांनी त्याचे शरीर चोरुन नेले. 14हे जर राज्यापालाच्या कानावर गेले तर आम्ही त्याच मन वळवू देऊ आणि तुम्हास काही होऊ देणार नाही.” 15मग शिपायांनी पैसे घेतले व याजकांनी सांगितले तसे केले आणि ही गोष्ट यहूदी लोकात आजवर बोलण्यात येते. 16पण अकरा शिष्य गालील प्रांतात येशूने त्यांना सांगितलेल्या डोंगरावर निघून गेले. 17आणि त्यांनी त्यास बघितले तेव्हा त्यांनी त्याची उपासना केली. पण काहींना संशय आला. 18तेव्हा येशू त्यांच्याकडे आला आणि म्हणाला, “स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला देण्यात आला आहे. 19म्हणून तुम्ही जा आणि राष्ट्रांतील लोकांस माझे शिष्य करा. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावाने बाप्तिस्मा द्या. 20आणि जे काही मी तुम्हास शिकविले आहे ते त्या लोकांस पाळायला शिकवा आणि पाहा, युगाच्या शेवटापर्यंत मी सदोदित तुमच्याबरोबर आहे.”

तारखा रशियन मंडळीच्या ज्युलियन दिनदर्शिकेनुसार आहेत (सर्बियन आणि जॉर्जियन मंडळ्या आणि आथोस पर्वत यांच्याप्रमाणे): मंडळीच्या दिनदर्शिकेतील 18 एप्रिल म्हणजे नागरी दिनदर्शिकेतील 1 मे. नवी दिनदर्शिका पाळणाऱ्या मंडळ्या (ग्रीस, रोमानिया, बल्गेरिया, युक्रेन…) ठरावीक तारखेचे सण आणि संत त्याच नागरी तारखेला, 13 दिवस आधी, पाळतात, आणि त्यांचे काही पाठ वेगळे आहेत; ईस्टर आणि त्यावर अवलंबून असलेले दिवस सारखेच आहेत.

स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क