Bible Explorer अ‍ॅप मिळवा

मुख्यपृष्ठ › दैनंदिन बायबल पाठ › एप्रिल 2027 › 23 एप्रिल

ऑर्थोडॉक्स दिनदर्शिका · 10 एप्रिल (जुनी पद्धत)

ऑर्थोडॉक्स दैनंदिन पाठ — 23 एप्रिल 2027

शुक्रवार · महान लेंतचा सहावा आठवडा · स्वर 5

सण आणि संत

Martyrs Terence, Pompius, and with them Africanus, Macarius, Xeno, Alexander and the other 33 beheaded at Carthage († c.249-251)

महान लेंत

कडक उपवास (कोरडे अन्न: भाकर, भाज्या, फळे)

हे मठाच्या नियमानुसार आहे. पॅरिशमध्ये उपवासाचे प्रमाण आपल्या पापकबुलीच्या धर्मगुरूसोबत, आरोग्य, वय आणि परिस्थितीनुसार ठरवले जाते.

दिवसाची वाचने

सहावा तास

यश 66:10–24

10यरूशलेमेवर प्रेम करणारे, तुम्ही सर्व तिच्याबरोबर हर्ष करा आणि तिच्यासाठी उल्लास करा. जे तुम्ही तिच्यासाठी शोक करता, ते तुम्ही सर्व तिच्याबरोबर आनंदाने हर्ष करा. 11कारण तुम्ही तिच्या सांत्वनांचे स्तन चोखून तृप्त व्हावे, आणि तिच्या महिम्याच्या विपूलतेचे दूध ओढून घेऊन संतुष्ट व्हावे. 12परमेश्वर असे म्हणतो “मी तुमच्यावर नदीप्रमाणे हे वैभव पसरवेल, आणि पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांच्या संपत्तीचा वाहणारा ओघ तुमच्या कडे येईल. तुम्ही ते चोखाल, तुम्ही कडेवर वाहिले जाल आणि मांड्यांवर खेळविले जाल. 13आई जशी मुलाला सांत्वन देते, तसा मी तुम्हास सांत्वन देईन, आणि यरूशलेमेत तुम्ही सांत्वन पावाल.” 14तुम्ही हे पाहाल आणि तुमचे हृदय हर्ष पावेल, आणि हिरवळीप्रमाणे तुमचे हाडे नवी होतील. आणि परमेश्वराचा हात त्याच्या सेवकाकडे आहे हे कळेल, पण त्याच्या शत्रूंचा त्यास राग येईल. 15कारण पाहा! परमेश्वर अग्नीसहीत येईल, आणि अग्नीद्वारे आपला क्रोध प्रकट करावा, आणि धमकीसोबत ज्वाला निघाव्यात म्हणून त्याचे रथ वावटळीसारखे होतील. 16कारण परमेश्वर अग्नीने आणि तलवारीने सर्व मनुष्यावर न्याय करेल. परमेश्वर मारले जातील ते खूप असतील. 17जे डुकराचे मांस खातात व अमंगळ गोष्टी व उंदीर खाऊन, बागांच्यामध्ये झाडा खाली आपणाला पवित्र करतात आपणांस स्वच्छ करतात, ते एकत्र नाश होतील असे परमेश्वर म्हणतो. 18कारण मला त्यांचे विचार आणि कल्पना ठाऊक आहेत. ती वेळ येणार आहे जेव्हा मी सर्व राष्ट्रांना व भाषांना एकत्र करीन. आणि ते येतील व माझे वैभव पाहतील. 19काही लोकांवर मी खूण करीन. मी या वाचविलेल्या काही लोकांस तार्शीश, पूल, लूद (धनुर्धाऱ्यांचा देश), तुबाल, यवान आणि दूरदूरच्या द्वीपात, ज्यांनी माझी कीर्ती ऐकली नाही व माझे वैभव पाहिले नाही त्याच्याकडे पाठवीन. ते राष्ट्रांमध्ये माझे वैभव प्रकट करतील. 20आणि ते सर्व राष्ट्रांतून तुमच्या भावांना आणतील. ते त्यांना माझ्या पवित्र डोंगरावर, यरूशलेमेला, घोड्यांवरून, खेचरांवर, उंटावरून, रथांतून आणि गाड्यांतून आणतील. ते म्हणजे जणू काही इस्राएलाच्या लोकांनी निर्मळ तबकातून, परमेश्वराच्या मंदिरात आणलेले नजराणे असतील. 21“ह्यातीलच काही लोकांस मी याजक व लेवी होण्यासाठी निवडीन.” परमेश्वर असे म्हणतो. 22कारण मी जे नवीन आकाशे व पृथ्वी निर्माण करीन, ती माझ्या समोर अक्षय राहतील. त्याचप्रमाणे तुमची नावे आणि मुले माझ्याबरोबर टिकून राहतील, परमेश्वर असे म्हणतो. 23आणि एका महिन्या पासून दुसऱ्या महिन्या पर्यंत, एका शब्बाथापासून दुसऱ्या शब्बाथापर्यंत, सर्व लोक माझ्या समोर नमन करायला येत जातील, परमेश्वर असे म्हणतो. 24“आणि ज्या मनुष्यांनी माझ्याविरूद्ध अपराध केला त्यांची प्रेते ते पाहातील, कारण त्यांचा किडा मरणार नाही आणि त्यांचा अग्नी कधी विझणार नाही. आणि ते मनुष्ये सर्व मनुष्यास घृणास्पद होतील.”

संध्याप्रार्थना: वाचन

उत्प 49:33–50:26

33आपल्या मुलांशी हे बोलणे संपवल्यानंतर याकोबाने आपले पाय पलंगावर जवळ ओढून घेतले व मरण पावला, आणि तो आपल्या पूर्वजांकडे गेला. 50:1त्यानंतर योसेफ आपल्या बापाला कवटाळून खूप रडला. त्याने त्याची चुंबने घेतली. 2योसेफाने आपल्या सेवकांतील वैद्यांना आपल्या वडिलाच्या प्रेताला मसाला लावण्याची व भरण्याची आज्ञा केली. तेव्हा त्यांनी खास मिसरच्या पद्धतीने इस्राएलाचे प्रेत मसाला लावून, भरून तयार केले. 3त्याकरता त्यांना चाळीस दिवस लागले, कारण तशा खास पद्धतीने प्रेत तयार करण्यासाठी तेवढा वेळ घेत. मिसरच्या लोकांनी त्याच्यासाठी सत्तर दिवस शोक केला. 4सत्तर दिवसानंतर शोक करण्याचा काळ संपला, तेव्हा योसेफ फारोच्या शाही अधिकाऱ्यांना म्हणाला, “जर मला तुमच्या दृष्टीने कृपा लाभली असेल तर, फारोला हे सांगा, 5‘माझा बाप मरावयास टेकला असताना त्याने मला शपथ घेण्यास सांगून म्हटले, “पाहा, मी मरणार आहे. माझी जी कबर मी आपणासाठी कनान देशात खणून ठेवली आहे तिच्यात तू मला नेऊन पूर.” तेव्हा कृपा करून माझ्या पित्यास पुरावयास जाऊ द्या; मग मी परत येईन. 6फारोने उत्तर दिले, “जा आणि आपल्या बापाला शपथ दिल्याप्रमाणे त्यास पुरून ये.” 7तेव्हा योसेफ आपल्या बापाला पुरण्यासाठी गेला. तेव्हा फारोचे सर्व अधिकारी व मिसरचे नेते आणि सर्व वडीलजन योसेफाबरोबर गेले. 8आपले कुटुंबीय, आपले भाऊ व त्यांचे कुटुंबीय तसेच आपल्या बापाचे कुटुंबीय योसेफाबरोबर होते. फक्त लहान मुले व पशू एवढेच गोशेन प्रांतात मागे राहिले होते. 9तो लोकांचा खूप मोठा समूह होता. सैनिकांची एक पलटणही घोड्यांवर व रथांत बसून मोठ्या संख्येने योसेफाबरोबर गेली. 10ते यार्देन नदीच्या पूर्वेस अटादाच्या खळ्यावर आले, तेव्हा त्यांनी फारच मोठा शोक केला. योसेफाने त्याच्या पित्याकरिता सात दिवस शोक केला. 11कनान देशात राहणाऱ्या लोकांनी अटादाच्या येथील हे प्रेतक्रियेचे विधी व संस्कार पाहिले तेव्हा ते म्हणाले, “मिसरच्या लोकांचा हा फारच दुःखाचा प्रसंग आहे.” त्यामुळे आता त्या जागेला आबेल-मिस्राईम असे नाव पडले आहे. 12अशा प्रकारे याकोबाच्या मुलांनी आपल्या वडिलाने दिलेल्या आज्ञेप्रमाणे केले; 13त्यांनी त्याचे प्रेत कनान देशात नेऊन एफ्रोन हित्ती याजकडून कबरस्तान म्हणून उपयोगी पडावे यासाठी अब्राहामाने विकत घेतलेल्या मम्रे येथील शेतातील मकपेला गुहेत पुरले. 14आपल्या वडिलाच्या प्रेतक्रियेनंतर योसेफ आणि त्याच्याबरोबर गेलेला सर्व समुदाय मिसरला माघारी गेला. 15याकोब मरण पावल्यावर योसेफाचे भाऊ चिंतेत पडले, फार पूर्वी आपण योसेफाबरोबर दुष्टपणाने वागलो त्यावरून आता आपल्यावर त्याचा राग भडकेल अशी त्यांना भीती वाटली. ते स्वतःशीच म्हणाले, “कदाचित योसेफ अजूनही आपला तिरस्कार करत असेल आणि आपण त्याच्याशी वाईट वागलो त्याचा तो बदला घेईल.” 16तेव्हा त्या भावांनी योसेफाला येणेप्रमाणे निरोप पाठवला, “तुझ्या वडिलाने मरण्यापूर्वी आम्हांला अशी आज्ञा दिली, 17तो म्हणाला, ‘योसेफाला सांगा की, तुझ्या भावांनी तुझ्याशी जे वाईट वर्तन केले त्याबद्दल तू त्यांची क्षमा करावीस अशी मी विनंती करतो.’ तेव्हा हे योसेफा, आम्ही तुला अशी विनंती करतो की, आम्ही तुझ्याशी वाईट रीतीने वागलो त्याबद्दल कृपया तू आमची क्षमा कर. आम्ही देवाचे, तुझ्या वडिलाच्या देवाचे दास आहोत.” योसेफाचे भाऊ वरीलप्रमाणे बोलले त्यामुळे योसेफाला फार दुःख झाले व तो रडला. 18योसेफाचे भाऊ त्याच्याकडे गेले व ते त्याच्या पाया पडले. मग ते म्हणाले, “आम्ही आपले दास आहोत.” 19मग योसेफ त्यांना म्हणाला, “भिऊ नका. मी काय देवाच्या स्थानी आहे काय? 20तुम्ही माझे वाईट करण्याचा कट केला, पण देव माझ्यासाठी चांगली योजना करीत होता. असंख्य लोकांचे प्राण वाचविण्यासाठी माझा उपयोग करावा अशी देवाची योजना होती. आज तुम्ही ते पाहत आहात. 21तेव्हा आता तुम्ही भिऊ नका. मी तुमची व तुमच्या मुलाबाळांची काळजी घेईन, तुमचे पोषण करीन.” अशा रीतीने त्याने त्यांचे समाधान केले आणि त्यांच्याशी ममतेने बोलला. 22योसेफ आपल्या वडिलाच्या कुटुंबियांसह मिसरमध्ये राहिला. तो एकशे दहा वर्षांचा असताना मरण पावला. 23योसेफाच्या हयातीत एफ्राईमाला मुले व नातवंडे झाली. त्याचा मुलगा मनश्शे याला माखीर नावाचा मुलगा झाला. योसेफाने माखीराची मुले ही पाहिली. 24योसेफाचे मरण जवळ आले तेव्हा तो आपल्या भावांना म्हणाला, “माझी मरण्याची वेळ जवळ आली आहे; परंतु देव तुमची काळजी घेईल हे मला माहीत आहे. तो देव तुम्हास या देशातून काढून अब्राहाम, इसहाक, व याकोब यांना जो देश देण्याचे वचन त्याने दिले होते त्या देशात घेऊन जाईल.” 25मग योसेफाने इस्राएल लोकांस शपथ घ्यायला लावली. तो म्हणाला, “देव जेव्हा तुम्हास येथून काढून पुढे घालून त्या नवीन देशात घेऊन जाईल तेव्हा माझे शरीर तुम्ही तुमच्या बरोबर घेऊन जाल असे मला वचन द्या.” 26योसेफ एकशे दहा वर्षांचा झाल्यावर मिसरमध्ये मरण पावला. वैद्यांनी त्याच्या शरीराला मसाला लावून ते पुरण्यासाठी तयार केले व ते मिसर देशामध्ये शवपेटीत ठेवले.

संध्याप्रार्थना: वाचन

नीति 31:8–31

8जो कोणी स्वतःसाठी बोलू शकत नाही त्यांच्यासाठी बोल, गरीबांच्या हक्कांसाठी आपले तोंड उघड. 9तू आपले मुख उघड आणि जे योग्य आहे त्याचा योग्य रीतीने न्याय कर, आणि ते गरीब व गरजू आहेत त्यांची बाजू मांडून त्यांना न्याय कर. 10हुशार व कार्यक्षम पत्नी कोणाला सापडेल? पण तिचे मोल मौल्यवान खड्यांपेक्षा अधिक आहे. 11तिच्या पतीचे मन तिच्यावर भरवसा ठेवते, तो कधीही गरीब होणार नाही. 12ती आपल्या आयुष्याच्या सर्व दिवशी त्याच्यासाठी चांगल्या गोष्टी करते आणि अनिष्ट करत नाही. 13ती लोकर आणि ताग निवडते, आणि आपल्या हातांनी आनंदाने काम करते. 14ती व्यापाऱ्याच्या जहाजासारखी आहे, ती आपले अन्न दुरून आणते. 15रात्र गेली नाही तोच ती उठून, आपल्या कुटुंबासाठी अन्न शिजवते, आणि नोकर मुलींना काय करायचे ते काम वाटून देते. 16ती शेताविषयी विचार करून ते विकत घेते, ती आपल्या हातांच्या श्रमाने द्राक्षाचे मळे लावते. 17ती स्वतःला बलरुप पोशाख घालते, आणि आपले बाहू बळकट करते. 18आपला उद्योग फायदेशीर आहे हे तिला कळते; सर्व रात्री तिचा दिवा विझत नाही. 19ती आपला हात चातीला लावते, आणि ती गुंडाळलेला दोरा धरते. 20ती आपला हात नेहमी गरीबांसाठी उघडते; ती गरजवंतास देण्यास आपला हात पुढे करते. 21आपल्या कुटुंबासाठी तिला बर्फाचे भय वाटत नाही, कारण तिचे सर्व कुटुंब किरमिजी वस्त्र पांघरलेले असते. 22ती आपल्या अंथरुणावर टाकायला चादरी आणि पांघरायला तलम तागाचे जांभळे वस्त्र तयार करते. 23तिचा पती वेशीत, देशातल्या वडिलांमध्ये बसलेला असता त्यास लोक ओळखतात. 24ती तागाची वस्त्रे करते आणि ते विकते, ती व्यापाऱ्यांना कमरबंध पुरवते. 25बल व आदर तिचे वस्त्र आहेत, आणि ती येणाऱ्या काळामध्ये आनंदी राहू शकते. 26तिच्या मुखातून सुज्ञतेचे बोल निघतात. आणि दयेचा नियम तिच्या जिभेवर आहे. 27ती कधीही आळशी नसते; ती आपल्या कुटुंबाच्या मार्गाकडे लक्ष देते, आणि आळसाची भाकर खात नाही. 28तिची मुले उठतात आणि ती त्यांना जे काही आनंद देईल ते देते; तिचा पती तिची प्रशंसा करून, म्हणतो, 29“पुष्कळ स्त्रियांनी चांगले केले आहे, पण तू त्या सर्वांहून उत्कृष्ट आहेस.” 30लावण्य फसवे आहे आणि सौंदर्य हे व्यर्थ आहे, पण तू जी स्त्री परमेश्वराचे भय धरते तिची प्रशंसा होते. 31तिच्या हाताचे फळ तिला द्या, आणि तिच्या कृत्यांनी भर वेशीत तिची प्रशंसा होवो.

तारखा रशियन मंडळीच्या ज्युलियन दिनदर्शिकेनुसार आहेत (सर्बियन आणि जॉर्जियन मंडळ्या आणि आथोस पर्वत यांच्याप्रमाणे): मंडळीच्या दिनदर्शिकेतील 10 एप्रिल म्हणजे नागरी दिनदर्शिकेतील 23 एप्रिल. नवी दिनदर्शिका पाळणाऱ्या मंडळ्या (ग्रीस, रोमानिया, बल्गेरिया, युक्रेन…) ठरावीक तारखेचे सण आणि संत त्याच नागरी तारखेला, 13 दिवस आधी, पाळतात, आणि त्यांचे काही पाठ वेगळे आहेत; ईस्टर आणि त्यावर अवलंबून असलेले दिवस सारखेच आहेत.

स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क