Bible Explorer अ‍ॅप मिळवा

मुख्यपृष्ठ › दैनंदिन बायबल पाठ › फेब्रुवारी 2027 › 28 फेब्रुवारी

ऑर्थोडॉक्स दिनदर्शिका · 15 फेब्रुवारी (जुनी पद्धत)

ऑर्थोडॉक्स दैनंदिन पाठ — 28 फेब्रुवारी 2027

रविवार · स्वर 6

सण आणि संत

उधळ्या पुत्राचा रविवार

उपवास

उपवास नाही

हे मठाच्या नियमानुसार आहे. पॅरिशमध्ये उपवासाचे प्रमाण आपल्या पापकबुलीच्या धर्मगुरूसोबत, आरोग्य, वय आणि परिस्थितीनुसार ठरवले जाते.

दिवसाची वाचने

प्रातःप्रार्थनेचे सहावे शुभवर्तमान

लूक 24:36–53

36ते या गोष्टी त्यांना सांगत असतानाच येशू त्यांच्यामध्ये उभा राहिला आणि त्यास म्हणाला, “तुम्हास शांती असो.” 37ते दचकले आणि भयभीत झाले. त्यांना असे वाटले की, ते भूत पाहत आहेत. 38तो त्यांना म्हणाला, “तुम्ही असे अस्वस्थ का झालात? तुमच्या मनात शंका का निर्माण झाल्या? 39माझे हात व पाय पाहा तुम्हास मी दिसतो तोच मी आहे. मला स्पर्श करा आणि पाहा की, मला आहे तसे हाडमांस भूताला नसते.” 40असे बोलून त्याने त्यास आपले हातपाय दाखवले. तरीही त्यांच्या आनंदामुळे त्यांना ते खरे वाटेना. 41तरी आनंदामुळे विश्वास न धरता आश्चर्यचकित झाले तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “येथे तुमच्याजवळ खाण्यासाठी काय आहे?” 42मग त्यांनी त्यास भाजलेला माशाचा तुकडा दिला. 43त्याने तो घेतला व त्यांच्यासमोर खाल्ला. 44तो त्यांना म्हणाला, “याच त्या गोष्टी ज्या मी तुम्हाबरोबर असताना सांगितल्या होत्या की, मोशेचे नियमशास्त्र, संदेष्टे आणि स्तोत्रे यामध्ये माझ्याविषयी जे सांगितले आहे ते सर्व पूर्ण झालेच पाहिजे.” 45नंतर शास्त्रलेख समजण्यासाठी त्याने त्यांची मने उघडली. 46मग तो त्यांना म्हणाला, “पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, ख्रिस्ताने दुःख भोगावे आणि मरण पावलेल्यातून तिसऱ्या दिवशी उठावे, 47आणि यरूशलेम शहरापासून आरंभ करून सर्व राष्ट्रास त्याच्या नावाने पश्चात्ताप व पापांची क्षमा घोषित करण्यात यावी. 48या गोष्टींचे तुम्ही साक्षी आहात. 49पाहा, माझ्या पित्याने देऊ केलेली देणगी मी तुमच्याकडे पाठवतो; तुम्ही स्वर्गीय सामर्थ्याने युक्त व्हाल तोपर्यंत या शहरात राहा.” 50नंतर तो त्यांना बाहेर दूरवर बेथानीपर्यंत घेऊन गेला आणि त्याने हात वर करून आशीर्वाद दिला. 51तो आशीर्वाद देत असतानाच तोपर्यंत आकाशात घेतला गेला. 52नंतर त्यांनी त्याची उपासना केली व ते मोठ्या आनंदाने यरूशलेम शहरास परतले. 53आणि ते परमेश्वराच्या भवनात देवाचा धन्यवाद सतत करत राहिले.

प्रेषितांचे पत्र

1 करिं 6:12–20

12“सर्व गोष्टी मला कायदेशीर आहेत,” पण सर्व गोष्टी माझ्या हिताच्या नसतात, “सर्व गोष्टी मला कायदेशीर आहेत,” पण मी त्यातील कोणत्याच गोष्टींच्या अधीन होणार नाही. 13अन्न पोटासाठी आहे आणि पोट अन्नासाठी आहे पण देव त्या दोघांचाही नाश करील. पण व्यभिचारासाठी शरीर नाही, तर शरीर प्रभूसाठी आहे आणि शरीरासाठी प्रभू आहे. 14आणि देवाने प्रभूला उठवले आणि तो त्याच्या सामर्थ्याने आपल्यालासुद्धा उठवील. 15तुमची शरीरे ख्रिस्ताचे अवयव आहेत, हे तुम्हास माहित नाही काय? मग मी ख्रिस्ताचे अवयव घेऊन ते वेश्येचे अवयव करू काय? तसे न होवो. 16तुम्ही हे जाणत नाही का की, जो वेश्येशी जोडला जातो तो तिच्याशी शरीराने एक होतो? कारण तो म्हणतो की, ती दोघे एकदेह होतील. 17पण जो प्रभूशी जोडला जातो तो त्याच्याशी आत्म्याने एकरूप होतो. 18व्यभिचारापासून दूर पळा. जे दुसरे कोणतेही पाप मनुष्य करतो ते त्याच्या शरीराबाहेर होते पण व्यभिचार करणारा आपल्या स्वतःच्या शरीराविरुद्ध पाप करतो. 19किंवा तुम्ही हे जाणत नाही का की, तुमचे शरीर हे देवाकडून मिळालेल्या व तुमच्यात असलेल्या पवित्र आत्म्याचे निवासस्थान आहे? आणि तुम्ही आपले स्वतःचे नाही? 20कारण तुम्हास मोल देऊन विकत घेतले आहे; म्हणून तुम्ही आपल्या शरीराने देवाचे गौरव करा.

शुभवर्तमान

लूक 15:11–32

11मग येशू म्हणाला, “एका मनुष्यास दोन पुत्र होते. 12त्या दोघांपैकी धाकटा पुत्र म्हणाला, बाबा, मालमत्तेतला माझा वाटा मला द्या. आणि मग त्यांच्या वडिलांनी आपली संपत्ती दोघा मुलांमध्ये वांटून दिली. 13त्यानंतर काही दिवसानंतर लागलीच धाकट्या मुलाने आपले सर्व गोळा केले आणि तो दूरदेशी निघून गेला. तेथे त्याने त्याची सर्व संपत्ती चैनीत व मौजमजेचे जीवन जगून उधळून टाकली. 14त्याने सर्व पैसे खर्चून टाकले आणि मग त्या देशात भयंकर दुष्काळ पडला व त्यास गरज भासू लागली. 15त्या देशातील एका नागरिकाजवळ तो गेला आणि त्याचा आश्रय धरुन राहीला. त्या नागरीकाने त्यास आपल्या शेतात डुकरे चारावयास पाठवले. 16तेव्हा कोणी त्यास काहीही न दिल्याने, डुकरे ज्या शेंगा खातात त्या खाऊन तरी आपले पोट भरावे अशी त्यास फार इच्छा होई. 17नंतर तो शुद्धीवर आला व स्वतःशीच म्हणाला, माझ्या पित्याच्या घरी कितीतरी नोकरांना पुरुन उरेल इतके अन्न आहे आणि पाहा मी तर येथे भूकेने मरत आहे! 18आता, मी उठून आपल्या पित्याकडे जाईन आणि त्यास म्हणेन, बाबा, मी स्वर्गाविरुद्ध आणि तुमच्याविरुध्द पाप केले आहे. 19तुमचा मुलगा म्हणवून घेण्याच्या योग्यतेचा मी राहीलो नाही. मला आपल्या रोजंदारीवरील एखाद्या नोकरासारखे ठेवून घ्या. 20मग तो धाकटा मुलगा उठला व आपल्या पित्याकडे गेला. तो त्याच्या घरापासून दूर असतांनाच, त्याच्या पित्याने त्यास पाहिले आणि त्यास त्याचा कळवळा आला आणि धावत जाऊन त्याच्या गळ्यात पडला व त्याचे पुष्कळ मुके घेतले. 21मुलगा त्यास म्हणाला, बाबा, मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्याविरुध्द पाप केले आहे. आता तुमचा मुलगा म्हणवून घेण्याचा मला अधिकार नाही. 22परंतु पिता आपल्या नोकरांस म्हणाला, त्वरा करा, चांगला झगा आणून त्यास घाला. त्याच्या हातात अंगठी आणि पायात जोडे घाला. 23आणि मोठी मेजवानी करा, आपण खाऊ आणि आनंद करू! 24कारण हा माझा मुलगा मरण पावला होता पण जिवंत झाला आहे! तो हरवला होता, पण आता सापडला आहे व ते आनंद करू लागले. 25यावेळेस, त्याचा वडील मुलगा शेतात होता. तो घराकडे परतला आणि घराजवळ आल्यावर, त्याने गायनवादन व नाचण्याचा आवाज ऐकला. 26त्याने एका नोकराला बोलावून विचारले, हे सर्व काय चालले आहे? 27तो नोकर त्यास म्हणाला, तुमचा भाऊ आला आहे. तो तुमच्या पित्याला सुखरुप परत मिळाला म्हणून त्यांनी मोठी मेजवानी ठेवली आहे. 28तेव्हा तो रागे भरला आणि तो आत जाईना. तेव्हा त्याचा पिता बाहेर येऊन त्यास समजावू लागला. 29परंतु त्याने पित्याला उत्तर दिले, पाहा, इतकी वर्षे मी तुमची सेवाचाकरी केली आहे व कधीही तुमची आज्ञा मोडली नाही! मित्रांबरोबर आनंद करण्यासाठी तुम्ही मला कधी साधे करडूसुद्धा दिले नाही. 30आणि ज्याने तुमची सर्व संपत्ती वेश्यांवर उधळली तो तुमचा मुलगा परत आला तेव्हा तुम्ही त्याच्यासाठी मोठी मेजवानी केली. 31तेव्हा पित्याने त्यास म्हणाले, बाळा, तू नेहमीच माझ्याबरोबर आहेस आणि जे माझे आहे ते सर्व तुझे आहे. 32परंतु आज आपण आनंद आणि उत्सव केला पाहिजे कारण हा तुझा भाऊ मरण पावला होता तो जिवंत झाला आहे. तो हरवला होता, तो सापडला आहे.”

तारखा रशियन मंडळीच्या ज्युलियन दिनदर्शिकेनुसार आहेत (सर्बियन आणि जॉर्जियन मंडळ्या आणि आथोस पर्वत यांच्याप्रमाणे): मंडळीच्या दिनदर्शिकेतील 15 फेब्रुवारी म्हणजे नागरी दिनदर्शिकेतील 28 फेब्रुवारी. नवी दिनदर्शिका पाळणाऱ्या मंडळ्या (ग्रीस, रोमानिया, बल्गेरिया, युक्रेन…) ठरावीक तारखेचे सण आणि संत त्याच नागरी तारखेला, 13 दिवस आधी, पाळतात, आणि त्यांचे काही पाठ वेगळे आहेत; ईस्टर आणि त्यावर अवलंबून असलेले दिवस सारखेच आहेत.

स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क