Bible Explorer अ‍ॅप मिळवा

मुख्यपृष्ठ › दैनंदिन बायबल पाठ › सप्टेंबर 2027 › 20 सप्टेंबर

ऑर्थोडॉक्स दिनदर्शिका · 7 सप्टेंबर (जुनी पद्धत)

ऑर्थोडॉक्स दैनंदिन पाठ — 20 सप्टेंबर 2027

सोमवार · पेन्टेकॉस्टनंतरचा 14वा आठवडा · स्वर 4

सण आणि संत

Forefeast of the Nativity of the Theotokos

उपवास

उपवास नाही

हे मठाच्या नियमानुसार आहे. पॅरिशमध्ये उपवासाचे प्रमाण आपल्या पापकबुलीच्या धर्मगुरूसोबत, आरोग्य, वय आणि परिस्थितीनुसार ठरवले जाते.

दिवसाची वाचने

प्रेषितांचे पत्र

2 करिं 12:10–19

10आणि म्हणून ख्रिस्तासाठी आजारात, अपमानात, आपत्तीत, पाठलागात आणि दुःखात मी संतुष्ट असतो कारण मी जेव्हा अशक्त असतो तेव्हाच सशक्त आहे. 11मी मूढ बनलो, असे बनण्यास तुम्ही मला भाग पाडले; तुम्ही माझ्याविषयी खातरी द्यायला पाहिजे होती कारण मी काहीच नसलो, तरी त्या अतिश्रेष्ठ प्रेषितांपेक्षा मी कोणत्याही गोष्टीत कमी नाही. 12चिन्हे, अद्भूते व सामर्थ्याची कृत्ये यांच्या योगाने खऱ्या प्रेषितांची चिन्हे खरोखरच सर्व सहनशीलतेने तुम्हामध्ये घडविण्यात आली. 13कारण मी आपला भार तुम्हावर टाकला नाही, या एका गोष्टीशिवाय तुम्ही दुसर्‍या कोणत्या गोष्टीत दुसर्‍या मंडळ्यांपेक्षा कमी आहात? मला या अपराधाची क्षमा करा. 14बघा, मी तिसर्‍या वेळी तुमच्याकडे येण्यास तयार आहे आणि तुमच्यावर भार घालणार नाही; कारण मी तुमच्यापासून काही मिळवू पाहत नाही, तर मी तुम्हास मिळवू पाहतो कारण मुलांनी आई-वडीलांसाठी साठवू नये पण आई-वडीलांनी मुलांसाठी साठवले पाहिजे. 15मी तुमच्या जीवांसाठी फार आनंदाने खर्च करीन आणि स्वतः सर्वस्व खर्ची पडेन. मी तुमच्यावर अतिशयच प्रीती करतो म्हणून तुम्ही माझ्यावर कमी प्रीती करता की काय? 16असो, मी तुमच्यावर भार घातला नाही, पण मी धूर्त असल्यामुळे मी तुम्हास युक्तीने धरले. 17मी तुमच्यासाठी ज्यांना पाठवले अशा कोणाकडून मी तुमचा फायदा घेतला काय? 18मी तीताला विनंती केली आहे आणि मी एका बंधूला त्याच्याबरोबर पाठवत आहे. तीताने तुमच्याकडून फायदा मिळवला काय? आम्ही एकाच आत्म्याने चाललो नाही काय? एकाच चालीने चाललो नाही काय? 19तुम्हास इतका वेळ वाटत असेल की आम्ही तुमच्यापुढे आमचे समर्थन करीत आहोत, आम्ही देवासमोर ख्रिस्ताच्या ठायी बोलत आहो आणि प्रियांनो या सर्व गोष्टी तुमच्या उन्नतीसाठी आहेत.

प्रेषितांचे पत्र (मंगळवारसाठी)

2 करिं 12:20–13:2

20कारण मला भीती वाटते की, मी येईन तेव्हा, मी अपेक्षा करीत असेन तसे, कदाचित्, तुम्ही मला आढळणार नाही; आणि तुम्ही अपेक्षा करणार नाही असा मी तुम्हास आढळेन. कदाचित्, तुमच्यात कलह, ईर्ष्या, राग, विरोध, स्वार्थी महत्त्वकांक्षा, कुरकुरी, गर्व, अफवा व गोंधळ मला आढळून येतील. 21किंवा मी पुन्हा येईन तेव्हा माझा देव तुमच्यासमोर मला लीन करील आणि ज्यांनी पाप केले असून आपण केलेल्या अमंगळपणाचा, व्यभिचाराचा व कामातुरपणाचा ज्यांनी पश्चात्ताप केलेला नाही अशा पुष्कळ जणांसाठी मला शोक करावा लागेल. 13:1मी आता तिसर्‍या वेळी तुमच्याकडे येत आहे. दोन किंवा तीन साक्षीदारांच्या तोंडून प्रत्येक शब्द सिद्ध होईल. 2ज्यांनी पूर्वी पाप केले होते त्यांना आणि दुसर्‍या सगळ्यांना मी अगोदर सांगितले होते आणि दुसर्‍या वेळी स्वतः आलो होतो तेव्हाप्रमाणे आता दूर असताना मी आधी सांगतो की, मी जर पुन्हा आलो तर गय करणार नाही.

शुभवर्तमान

मार्क 4:10–23

10तो एकांती असता त्याच्याबरोबर बारा जणांसह जे होते त्यांनी त्यास दाखल्यांविषयी विचारले. 11तो त्यांना म्हणाला, “देवाच्या राज्याचे रहस्यदान तुम्हास दिले आहे, परंतु बाहेरच्यांना सर्वकाही दाखल्यांनी सांगण्यात येते. 12यासाठी की त्यांनी पाहत असता पाहावे परंतु त्यांना दिसू नये, आणि ऐकत असता त्यांनी ऐकावे, पण समजू नये. नाही तर कदाचित त्यांची माने फिरतील आणि देव त्यांना क्षमा करील.” 13तो म्हणाला, “हा दाखला तुम्हास समजला नाही काय, तर मग इतर बाकीचे दाखले तुम्हास कसे समजतील? 14पेरणारा वचन पेरतो. 15वाटेवर वचन पेरले जाते तेथील लोक हे आहेत की, त्यांनी ऐकल्याबरोबर सैतान येऊन त्यांच्यातले पेरलेले वचन हिरावून घेतो. 16तसेच खडकाळ जमिनीत पेरलेले हे आहेत की, वचन ऐकताच ते आनंदाने ग्रहण करतात; 17तथापि त्यांच्यामध्ये मूळ नसल्याकारणाने ते थोडा काळच टिकाव धरतात; मग वचनामुळे संकट आले किंवा छळ झाला म्हणजे ते लगेच अडखळतात. 18काटेरी झुडपांमध्ये पेरलेले हे आहेत की, ते वचन ऐकून घेतात, 19परंतु संसाराची चिंता, संपत्तीचा मोह व इतर गोष्टींचा लोभ ही त्यांच्यामध्ये शिरून वचनाची वाढ खुंटवतात आणि ते निष्फळ होते. 20चांगल्या जमिनीत पेरलेले हे आहेत की, ते वचन ऐकून त्याचा स्वीकार करतात मग कोणी तीसपट, कोणी साठपट, कोणी शंभरपट असे पीक देतात.” 21आणखी येशू त्यास म्हणाला, “दिवा मापाखाली किंवा पलंगाखाली ठेवण्यासाठी आणतात काय? दिवठणीवर ठेवावा म्हणून आणतात ना? 22प्रत्येक गोष्ट जी झाकलेले आहे ती उघड होईल आणि प्रत्येक गुप्त गोष्ट जाहीर होईल. 23ज्याला कान आहेत तो ऐको.”

शुभवर्तमान (मंगळवारसाठी)

मार्क 4:24–34

24तो त्यास म्हणाला, “तुम्ही जे काही ऐकता त्याविषयी सावध राहा, ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हास मापून देण्यात येईल. 25कारण ज्याच्याजवळ आहे त्यास आणखी दिले जाईल व ज्या कोणाजवळ नाही त्याच्यापासून जे आहे तेही काढून घेतले जाईल.” 26आणखी तो म्हणाला, “देवाचे राज्य असे आहे की, जणू काय एखादा मनुष्य जमिनीत बी टाकतो. 27रात्री झोपी जातो व दिवसा उठतो आणि ते बी रुजते व वाढते हे कसे होते हे त्यास कळत नाही. 28जमीन आपोआप पीक देते, पहिल्याने अंकुर, मग कणीस, मग कणसात भरलेला दाणा. 29पीक तयार होते तेव्हा तो त्यास लगेच विळा लावतो कारण कापणीची वेळ आलेली असते.” 30आणखी तो म्हणाला, “आपण देवाच्या राज्याची तुलना कशासोबत करू शकतो किंवा कोणत्या दाखल्यात ते मांडावे? 31ते मोहरीच्या दाण्यासारखे आहे. जो जमिनीत पेरतेवेळी पृथ्वीवरील सर्व दाण्यात सर्वात लहान असला तरी, 32तो पेरल्यावर उगवून सर्व झाडांत मोठा होतो. त्यास मोठ्या फांद्या येतात आणि आकाशातील पाखरे त्याच्यावर घरटी बांधू शकतात.” 33असले पुष्कळ दाखले देऊन, जसे त्यांच्याने ऐकवले तसे, तो त्यांना वचन सांगत असे. 34आणि दाखल्यावाचून तो त्यांच्याबरोबर बोलत नसे. परंतु एकांती तो आपल्या शिष्यांना सर्वकाही समजावून सांगत असे.

तारखा रशियन मंडळीच्या ज्युलियन दिनदर्शिकेनुसार आहेत (सर्बियन आणि जॉर्जियन मंडळ्या आणि आथोस पर्वत यांच्याप्रमाणे): मंडळीच्या दिनदर्शिकेतील 7 सप्टेंबर म्हणजे नागरी दिनदर्शिकेतील 20 सप्टेंबर. नवी दिनदर्शिका पाळणाऱ्या मंडळ्या (ग्रीस, रोमानिया, बल्गेरिया, युक्रेन…) ठरावीक तारखेचे सण आणि संत त्याच नागरी तारखेला, 13 दिवस आधी, पाळतात, आणि त्यांचे काही पाठ वेगळे आहेत; ईस्टर आणि त्यावर अवलंबून असलेले दिवस सारखेच आहेत.

स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क