Bible Explorer अ‍ॅप मिळवा

मुख्यपृष्ठ › दैनंदिन बायबल पाठ › सप्टेंबर 2027 › 19 सप्टेंबर

ऑर्थोडॉक्स दिनदर्शिका · 6 सप्टेंबर (जुनी पद्धत)

ऑर्थोडॉक्स दैनंदिन पाठ — 19 सप्टेंबर 2027

रविवार · स्वर 4

सण आणि संत

पेन्टेकॉस्टनंतरचा 13वा रविवार

उपवास

उपवास नाही

हे मठाच्या नियमानुसार आहे. पॅरिशमध्ये उपवासाचे प्रमाण आपल्या पापकबुलीच्या धर्मगुरूसोबत, आरोग्य, वय आणि परिस्थितीनुसार ठरवले जाते.

दिवसाची वाचने

प्रातःप्रार्थनेचे दुसरे शुभवर्तमान

मार्क 16:1–8

1शब्बाथाचा दिवस संपला तेव्हा मग्दालीया नगराची मरीया, याकोबाची आई मरीया आणि सलोमी यांनी त्यास लावण्याकरिता सुगंधी तेल विकत आणले. 2आणि आठवड्याच्या पहिल्या दिवशी, अगदी पहाटे सूर्योदयाच्या वेळी त्या कबरेकडे गेल्या. 3त्या एकमेकीस म्हणत होत्या की, कबरेच्या तोंडावरून आपणासाठी धोंड कोण बाजूला लोटील? 4नंतर त्यांनी वर पाहिले आणि त्यांना धोंड दूर लोटलेली आढळली. ती फारच मोठी होती. 5त्या कबरेत आत गेल्या तेव्हा त्या चकित झाल्या. त्यांना एक तरुण पुरूष उजव्या बाजूस बसलेला आढळला. त्याने पांढरा शुभ्र झगा घातला होता. 6तो त्यांना म्हणाला, भयभीत होऊ नका, तुम्ही नासरेथकर येशू जो वधस्तंभावर खिळला होता त्याचा शोध करीत आहात. पण तो उठला आहे. येथे नाही. त्यांनी त्यास ठेवले होते ती जागा पाहा. 7जा आणि त्याच्या शिष्यांना व पेत्रालाही सांगा की, तो तुमच्या अगोदर गालील प्रांतात जात आहे, त्याने तुम्हास सांगितल्याप्रमाणे तेथे तो तुम्हास दृष्टीस पडेल. 8मग त्या बाहेर गेल्या आणि भीतीमुळे कबरेपासून पळाल्या. त्यांना आश्चर्य वाटले. त्यांनी कोणाला काहीही सांगितले नाही कारण त्या भयभीत झाल्या होत्या.

प्रेषितांचे पत्र

1 करिं 16:13–24

13सावध असा, तुमच्या विश्वासात बळकट राहा. धैर्यशील व्हा. सशक्त व्हा. 14प्रत्येक गोष्ट जी तुम्ही कराल ती प्रीतीत करा. 15आता बंधूंनो स्तेफनाच्या घराण्याविषयी तुम्हास चांगली माहिती आहे. ते अखया प्रांतातील प्रथमफळ आहे; आणि पवित्रजनांच्या सेवेसाठी त्यांनी स्वतःला वाहिले आहे. मी तुम्हास विनंती करतो की, 16प्रत्येकजण जो या कार्यात सामील होतो व प्रभूसाठी श्रम करतो अशा लोकांच्या तुम्हीसुद्धा अधीन व्हा. 17स्तेफन, फर्तूनात आणि अखायिक हे आल्याने मला आनंद झाला कारण त्यांनी माझ्यासाठी जे केले ते तुम्ही करू शकला नसता. 18कारण त्यांनी माझा व तुमचा आत्मा प्रफुल्लीत केला आहे. अशा लोकांस मान्यता द्या. 19आशियातील मंडळ्या तुम्हास नमस्कार सांगतात. अक्विला, प्रिस्कील्ला व जी मंडळी त्यांच्या घरात जमते, ती प्रभूमध्ये तुम्हास नमस्कार सांगतात, 20सर्व बंधू तुम्हास नमस्कार सांगतात, पवित्र चुंबनाने एकमेकांना अभिवादन करा. 21मी, पौल स्वतः माझ्या स्वतःच्या हाताने हा सलाम लिहीत आहे. 22जर कोणी प्रभूवर प्रीती करीत नाही, तर तो शापित होवो, “मारानाथा; हे प्रभू ये” 23प्रभू येशूची कृपा तुम्हाबरोबर असो! 24ख्रिस्त येशूमध्ये माझी प्रीती तुम्हा सर्वांबरोबर असो. आमेन.

शुभवर्तमान

मत्त 21:33–42

33“हा दुसरा दाखला ऐकाः एक मनुष्य होता, त्याचे शेत होते. त्याने आपल्या शेतात द्राक्षे लावली. त्याभोवती कुंपण घातले आणि द्राक्षरसाकरिता कुंड तयार केले आणि माळा बांधला, मग त्याने आपला मळा काही शेतकऱ्यांना खंडाने करायला दिला, मग तो दुसऱ्यादेशी निघून गेला. 34जेव्हा द्राक्षे तोडणीचा हंगाम जवळ आला, तेव्हा त्या मनुष्याने आपला वाटा आणण्याकरिता काही चाकर शेतकऱ्याकडे पाठवले. 35परंतु शेतकऱ्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. एकाला मार दिला तर दुसऱ्या चाकराला जिवे मारले. नंतर तिसऱ्याला दगडमार करून ठार केले. 36मग शेतकऱ्यांकडे त्या मनुष्याने आणखी एकदा चाकर पाठवले. पहिल्यापेक्षा त्याने जास्त चाकर पाठवले पण त्या शेतकऱ्यांनी त्यांना तशीच वागणूक दिली. 37नंतर, त्याने त्याच्या स्वतःच्या मुलाला त्यांच्याकडे पाठवले, तो म्हणाला, ‘निश्चितच ते माझ्या मुलाचा मान राखतील.’ 38पण जेव्हा शेतकऱ्यांनी त्याच्या मुलाला पाहिले तेव्हा ते एकमेकास म्हणू लागले, ‘हा तर मालकाचा मुलगा आहे. तो वारस आहे. चला आपण त्यास ठार करू व त्याचे वतन घेऊ.’ 39त्यांनी त्यास धरले व द्राक्षमळ्याच्या बाहेर फेकले व त्यास ठार मारले. 40मग द्राक्षमळ्याचा मालक परत येईल तेव्हा या शेतकऱ्यांचे काय करील?” 41यहूदी मुख्य याजक लोक आणि पुढारी म्हणाले, “तो त्या लोकांस खात्रीने मरणदंड देईल कारण ते दुष्ट होते. नंतर तो आपला द्राक्षमळा दुसऱ्यास खंडाने देईल. हंगामाच्या दिवसात जे त्याच्या पिकाची वाटणी देतील, अशांना तो ते देईल.” 42येशू त्यांना म्हणाला, “तुम्ही शास्त्रलेखात कधी वाचले नाही काय? ‘बांधणाऱ्यांनी नाकारलेला दगड कोनशिला झाला आहे. हे प्रभूने केले आणि आमच्या दृष्टीने हे अद्भूत आहे.’

तारखा रशियन मंडळीच्या ज्युलियन दिनदर्शिकेनुसार आहेत (सर्बियन आणि जॉर्जियन मंडळ्या आणि आथोस पर्वत यांच्याप्रमाणे): मंडळीच्या दिनदर्शिकेतील 6 सप्टेंबर म्हणजे नागरी दिनदर्शिकेतील 19 सप्टेंबर. नवी दिनदर्शिका पाळणाऱ्या मंडळ्या (ग्रीस, रोमानिया, बल्गेरिया, युक्रेन…) ठरावीक तारखेचे सण आणि संत त्याच नागरी तारखेला, 13 दिवस आधी, पाळतात, आणि त्यांचे काही पाठ वेगळे आहेत; ईस्टर आणि त्यावर अवलंबून असलेले दिवस सारखेच आहेत.

स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क