Bible Explorer अ‍ॅप मिळवा

मुख्यपृष्ठ › दैनंदिन बायबल पाठ › मे 2027 › 16 मे

कॅथलिक दिनदर्शिका

दैनंदिन बायबल पाठ (कॅथलिक) — 16 मे 2027

रविवार · पास्काकाळाचा सातवा आठवडा

सण आणि संत

पेन्टेकॉस्ट रविवार

महासण · उपासनेचा रंग: लाल

दिवसाची वाचने

पहिले वाचन

प्रेषि 2:1–11

1नंतर पेन्टेकॉस्ट म्हणजे पन्नासावा दिवस आला तेव्हा ते सर्व एकत्र जमले असताना. 2अकस्मात मोठ्या वाऱ्याच्या सुसाट्यासारखा आकाशातून नाद झाला, व ज्या घरात ते वसले होते ते सर्व त्याने भरले. 3आणि वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नीच्या जीभांसारख्या जीभा त्यांना दिसल्या, व प्रत्येकावर त्या एकएक अशा बसल्या. 4तेव्हा ते सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जसजशी त्यांना वाचा दिली, तसतसे ते निरनिराळ्या भाषांतून बोलू लागले. 5त्यावेळेस आकाशाखालच्या प्रत्येक राष्ट्रातील भक्तिमान यहूदी यरूशलेम शहरात राहत होते. 6तो नाद झाल्यावर लोकसमुदाय एकत्र होऊन गोंधळून गेला, कारण प्रत्येकाने त्यांना आपआपल्या भाषेत बोलताना ऐकले. 7ते सर्व आश्चर्याने थक्क होऊन; म्हणाले, “पाहा, हे बोलणारे सर्व गालील प्रांतातील ना? 8तर आपण प्रत्येकजण आपआपली जन्मभाषा ऐकतो हे कसे? 9पार्थी, मेदी, एलामी, मेसोपटेम्या, यहूदीया, कप्पदुकिया, पंत, आशिया, 10फ्रुगिया, पंफुलिया, मिसर व कुरणेच्या जवळचा लिबुवा देश ह्यात राहणारे, यहूदी व यहूदीयमतानूसारी असे रोमन प्रवासी, 11क्रेतीय, अरब, असे आपण त्यांना आपआपल्या भाषांत देवाची महत्कृत्ये सांगताना ऐकतो.”

प्रतिसाद स्तोत्र

स्तोत्र 104:1, 24, 29–31, 34

1हे माझ्या जिवा, परमेश्वराचा धन्यवाद कर. हे परमेश्वरा, माझ्या देवा, तू अत्यंत थोर आहेस; तू तेजस्विता आणि गौरव पांघरले आहेस. 24हे परमेश्वरा, तुझी कृत्ये किती अधिक आणि किती विविध प्रकारची आहेत! ती सर्व तुझ्या ज्ञानाने केली आहेत; पृथ्वी तुझ्या समृद्धीने भरली आहे. 29जेव्हा तू आपले तोंड लपवतोस तेव्हा ते व्याकुळ होतात; जर तू त्यांचा श्वास काढून घेतला, तर ते मरतात आणि परत मातीस मिळतात. 30जेव्हा तू आपला आत्मा पाठवतोस, तेव्हा ते उत्पन्न होतात, आणि तू भूप्रदेश पुन्हा नवीन करतोस. 31परमेश्वराचे वैभव सर्वकाळ राहो; परमेश्वरास आपल्या निर्मितीत आनंद होवो. 34माझे विचार त्यास गोड वाटो; परमेश्वराजवळ मला आनंद होईल.

दुसरे वाचन

गल 5:16–25

16म्हणून मी म्हणतो, आत्म्याच्या प्रेरणेने चाला, म्हणजे तुम्ही देहाची वासना पूर्ण करणारच नाही. 17कारण देहवासना देवाच्या आत्म्याविरुद्ध आहे आणि आत्मा देहवासनेविरुद्ध आहे; हे परस्परांस विरूद्ध आहेत, यासाठी की जे काही तुम्ही इच्छिता ते तुम्ही करू नये. 18तुम्ही देवाच्या आत्म्याच्या प्रेरणेने चालवलेले आहात तर तुम्ही नियमशास्त्राच्या अधीन नाही. 19आता देहाची कामे उघड आहेत आणि ती हीः व्यभिचार, अमंगळपणा, कामातुरपणा, 20मूर्तीपूजा, जादूटोणा, वैर, कलह, ईर्ष्या, राग, विरोध, फुटी, गट, 21मत्सर, धुंदी, दंगल आणि ह्यांसारखी आणखी; ह्यांविषयी मी जसे पूर्वी सांगितले होते तसे आता आधी सांगतो की, या गोष्टी करणार्‍यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही. 22पवित्र आत्म्याच्याद्वारे निष्पन्न होणारे फळही आहेत प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, 23सौम्यता, इंद्रियदमन हे आहे; अशांविरूद्ध नियमशास्त्र नाही. 24जे ख्रिस्त येशूचे आहेत त्यांनी देहाच्या भावना व वासनांसहित देहस्वभावाला वधस्तंभावर खिळले आहे. 25आपण जर देवाच्या आत्म्याच्या सामर्थ्याने जगतो तर आपण आत्म्याच्या प्रेरणेनेच चालावे.

शुभवर्तमान

योहा 15:26–27; 16:12–15

26पण जो पित्यापासून निघतो, ज्याला मी पित्यापासून तुम्हाकडे पाठवीन तो कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा येईल तेव्हा तो माझ्याविषयी साक्ष देईल. 27आणि तुम्ही पहिल्यापासून माझ्याबरोबर आहात म्हणून तुम्हीही साक्ष द्याल.” 16:12मला तुम्हास अजून पुष्कळ गोष्टी सांगावयाच्या आहेत पण तुम्ही आताच त्या सहन करू शकणार नाही. 13पण तो सत्याचा आत्मा येईल तेव्हा तो तुम्हास मार्ग दाखवून सर्व सत्यात नेईल, कारण तो आपल्या स्वतःचे सांगणार नाही; तर जे ऐकेल तेच सांगेल आणि होणार्‍या गोष्टी तुम्हास कळवील. 14तो माझे गौरव करील, कारण जे माझे आहे त्यातून घेऊन ते तो तुम्हास कळवील. 15जे काही स्वर्गीय पित्याचे आहे ते सर्व माझे आहे; म्हणून मी म्हणालो की, जे माझे आहे त्यांतून घेऊन ते तुम्हास कळवील.

सामान्य रोमन दिनदर्शिका; बिशपांची परिषद काही सण (प्रभूचे प्रकटीकरण, स्वर्गारोहण, ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त) रविवारी हलवू शकते किंवा स्वतःचे सण जोडू शकते. पाठसंग्रह: रविवारचे चक्र B, आठवड्याच्या दिवसांचे वर्ष I.

स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क