मुख्यपृष्ठ › दैनंदिन बायबल पाठ › एप्रिल 2027 › 21 एप्रिल
ऑर्थोडॉक्स दिनदर्शिका · 8 एप्रिल (जुनी पद्धत)
ऑर्थोडॉक्स दैनंदिन पाठ — 21 एप्रिल 2027
बुधवार · महान लेंतचा सहावा आठवडा · स्वर 5
सण आणि संत
Apostles of the Seventy Herodion (Rodion), Agabus, Asyncritus, Rufus, Phlegon and Hermes (1st C)
महान लेंत
कडक उपवास (कोरडे अन्न: भाकर, भाज्या, फळे)
हे मठाच्या नियमानुसार आहे. पॅरिशमध्ये उपवासाचे प्रमाण आपल्या पापकबुलीच्या धर्मगुरूसोबत, आरोग्य, वय आणि परिस्थितीनुसार ठरवले जाते.
दिवसाची वाचने
सहावा तास
1गळा काढून रड, दम धरू नको, रणशिंगाप्रमाणे तुझा आवाज मोठा कर. माझ्या लोकांनी केलेल्या चुका त्यांना सांग आणि याकोबाच्या घराण्यास त्यांची पापे दाखव. 2तरी ते मला रोज शोधतात आणि माझे ज्ञानाचे मार्ग जाणून घ्यायला त्यांना आनंद होतो. अशा राष्ट्राप्रमाणे ज्याने देवाच्या आज्ञांचे पालन करण्याचे सोडले नाही आणि न्यायीपणाचा सराव केला. ते धार्मिकतेने न्याय करण्यास मला विचारतात, परमेश्वराकडे जाणे त्यांना आवडते. 3ते म्हणतात, “आम्ही का उपास केला, पण ते तू पाहिले नाहीस? आम्ही का आपणाला नम्र केले, तू त्याची दखल घेतली नाहीस?” पाहा! “उपासाच्या दिवशी तुम्ही तुमच्याच गोष्टींमध्ये आनंद पावता आणि तुमच्या सर्व कामकऱ्यांना छळता.” 4पाहा! तुम्ही विवाद व भांडण यासाठी आणि तुमच्या दुष्टतेच्या हातांनी मारण्यासाठी तुम्ही उपास करता. तुमचा आवाज उच्चस्थानी ऐकू जावा, म्हणून तुम्ही आजच्याप्रमाणे उपवास करणार नाही. 5या अशाप्रकारचा उपास मला हवा आहे काय, ज्यात मनुष्याच्या जीवास पीडा व्हावी? आपले डोके लव्हाळ्यासारखे खाली लववणे आणि आपल्या खाली गोणताट व राख पसरवणे, तू खरच याला उपास म्हणतोस, तो दिवस जो परमेश्वरास आनंदीत करेल? 6“या प्रकारचा उपवास मी निवडलेला नाही, दुष्टतेच्या बेड्या तोडणे, जोखडाचे बंद सोडणे व पीडितांना मोकळे करणे व तुम्ही प्रत्येक जोखड मोडावे हाच मी निवडलेला उपास नाही काय? 7भुकेलेल्यांना तुम्ही आपल्या घासातील घास द्यावा, बेघरांना तुमच्या घरात आसरा द्यावा, हे असे नाही काय? जेव्हा तू कोणी उघडा पाहतोस तर त्यास कपडे द्यावे, आणि आपणाला स्वतः:च्या नातेवाईकांपासून लपवून ठेवू नये.” 8तू असे करशील तेव्हा पहाटेच्या प्रकाशाप्रमाणे तुझा प्रकाश उगवेल, आणि तुझे आरोग्य लवकर उजळेल. तुझा चांगुलपणा तुझ्यापुढे चालेल आणि परमेश्वराचे गौरव तुझा पाठीराखा होईल. 9तेव्हा तू परमेश्वरास हाक मारशील आणि परमेश्वर उत्तर देईल. तू त्याची आरोळी करशील आणि तो म्हणेल, मी इथे आहे. जर तू आपल्या मधून जोखड, बोट दाखवने, दुष्टपणाचे भाषण काढून टाकशील. 10जर तू भुकेल्यांना मदत केली आणि दुःखी लोकांची गरज पूर्ण केली, तेव्हा तुझा प्रकाश अंधकारात चमकून उठेल, आणि तुझा अंधकार मध्यान्हीच्या सूर्यप्रकाशाप्रमाणे तळपेल. 11तेव्हा परमेश्वर तुला सतत मार्गदर्शन करेल, आणि ओसाड प्रदेशात तो तुझ्या आत्म्याला तृप्त करील, आणि तुमची हाडे मजबूत करील. भरपूर पाणी मिळणाऱ्या बागेप्रमाणे तुम्ही व्हाल. आणि ज्या झऱ्याचे पाणी कधी आटत नाही, अशा सतत वाहणाऱ्या झऱ्याप्रमाणे तुम्ही व्हाल.
संध्याप्रार्थना: वाचन
26योसेफ घरी आला तेव्हा त्या भावांनी त्याच्यासाठी आपल्यासोबत आणलेली भेट त्याच्या हातात दिली व त्यांनी त्यास भूमीपर्यंत खाली वाकून नमन केले. 27मग योसेफाने ते सर्व बरे आहेत ना, याची विचारपूस केली. तो म्हणाला, “तुमचा बाप, ज्यांच्याबद्दल तुम्ही मागे मला सांगितले होते, तो बरा आहे का? तो अजून जिवंत आहेत का?” 28त्यांनी उत्तर दिले, “तुमचा दास, आमचा बाप, सुखरूप आहे. तो अजून जिवंत आहे.” त्यांनी खाली वाकून नमन केले. 29मग त्याने नजर वर करून आपल्या आईचा मुलगा आपला भाऊ बन्यामीन याला पाहिले. तो म्हणाला, “तुम्ही मला ज्याच्याविषयी सांगितले तो हाच का तुमचा धाकटा भाऊ?” नंतर तो म्हणाला, “माझ्या मुला, देव तुझ्यावर कृपा करो.” 30मग योसेफ घाईघाईने खोलीबाहेर निघून गेला. आपला भाऊ बन्यामीन याच्यासाठी त्याची आतडी तुटू लागली आणि कोठे तरी जाऊन रडावे असे त्यास वाटले. तो आपल्या खोलीत गेला व तेथे रडला. 31मग तोंड धुऊन तो परत आला. मग स्वतःला सावरून तो म्हणाला, “जेवण वाढा.” 45:1आता मात्र योसेफाला आपल्याजवळ जे उभे होते त्या सर्व सेवकांसमोर दुःख रोखून धरता येईना. तो मोठ्याने रडला. तो म्हणाला, “येथील सर्व लोकांस येथून बाहेर जाण्यास सांगा.” तेव्हा तेथील सर्वजण निघून गेले. केवळ त्याचे भाऊच त्याच्यापाशी राहिले. मग योसेफाने आपली ओळख त्यांना दिली. 2तो मोठ्याने रडला. मिसर देशाच्या लोकांनी व फारो राजाच्या घराण्यातील लोकांनीही त्याचे रडणे ऐकले. 3मग योसेफ आपल्या भावांना म्हणाला, “मी योसेफ आहे. माझा बाप अजून जिवंत आहे काय?” परंतु त्याचे भाऊ त्यास काही उत्तर देऊ शकले नाहीत. त्याच्या समोर ते फार घाबरले होते. 4तेव्हा योसेफ आपल्या भावांना म्हणाला, “मी विनंती करतो जरा इकडे माझ्याजवळ या.” तेव्हा ते त्याच्या जवळ गेले. आणि तो त्यांना म्हणाला, “तुमचा भाऊ योसेफ मीच आहे. ज्याला तुम्ही मिसरी लोकांस विकले. 5आता त्यासाठी काही खिन्न होऊ नका किंवा आपल्या स्वतःवर संताप करून घेऊ नका. मी येथे यावे व त्यामुळे आपणा सर्वांचे प्राण वाचावेत ही देवाचीच योजना होती. 6हा दुष्काळ आता दोन वर्षे पडला आहे आणि आणखी पाच वर्षे पेरणी किंवा कापणी होणार नाही. 7देवाने मला तुमच्या आधी येथे पाठवले आहे, यासाठी की, तुमचा पृथ्वीवर बचाव होऊन तुम्ही शेष रहावे आणि तुम्हास जिवंत ठेवून तुमची वंशवृद्धी होऊ द्यावी. 8मला येथे पाठवण्यात तुमचा दोष नव्हता तर ही देवाची योजना होती. देवाने मला फारोच्या वडिलासमान केले आहे. त्यामुळे मी फारोच्या घरादाराचा धनी आणि सर्व मिसर देशाचा अधिकारी झालो आहे.” 9योसेफ म्हणाला, “तर आता ताबडतोब माझ्या बापाकडे जाण्यास निघा. त्यास सांगा की, तुमचा मुलगा योसेफ याने तुम्हास संदेश पाठवला आहे. देवाने मला अवघ्या मिसर देशाचा धनी केले आहे. तर माझ्याकडे खाली निघून या. उशीर करू नका. 10तुम्ही माझ्याजवळ गोशेन प्रांतात राहा. आणि तुम्ही, तुमची मुले, नातवंडे तसेच तुमची शेरडेमेंढरे, गुरेढोरे आणि जे काही तुमचे आहे ते माझ्याजवळ राहील. 11येणाऱ्या दुष्काळाच्या पाच वर्षात मी तुम्हास सर्व प्रकारचा पुरवठा करीन त्यामुळे तुम्हावर व तुमच्या कुटुंबावर सर्व काही गमावून गरीब होण्याची वेळ येणार नाही. 12पाहा, माझे तोंड तुम्हाशी बोलत आहे हे तुमचे डोळे, व माझा भाऊ बन्यामीन याचे डोळे पाहत आहेत. 13मिसर देशातील माझे वैभव आणि तुम्ही येथे जे जे पाहिले आहे त्यासंबंधी माझ्या बापाला सांगा. आता लवकर जाऊन माझ्या बापाला माझ्याकडे खाली घेऊन या.” 14मग त्याने आपला भाऊ बन्यामीन याला मिठी मारली आणि गळ्यात पडून रडला, आणि बन्यामीनही त्याच्या गळ्यात पडून रडला. 15मग त्याने आपल्या प्रत्येक भावाला मिठी मारली व त्यांचे मुके घेतले आणि तो रडला. यानंतर त्याचे भाऊ त्याच्याबरोबर बोलू लागले. 16“योसेफाचे भाऊ त्याजकडे आले आहेत” अशी बातमी फारो, त्याच्या घरची मंडळी व त्याचे सेवक यांना समजली त्यामुळे त्या सर्वांना आनंद झाला.
संध्याप्रार्थना: वाचन
23जो कोणी आपले तोंड व जीभ सांभाळतो, तो संकटापासून आपला जीव वाचवतो. 24गर्विष्ठ व घमेंडखोर मनुष्यास उद्दाम असे नाव आहे. तो गर्वाने उद्धट कृती करतो. 25आळशाची वासना त्यास मारून टाकते; त्याचे हात काम करण्यास नकार देतात. 26तो सर्व दिवस हाव आणि अधिक हाव धरतो, परंतु नीतिमान देतो आणि मागे धरून ठेवत नाही. 27दुर्जनांचे यज्ञार्पण वीट आणणारे असते, तर मग तो यज्ञ दुष्ट हेतूने आणतो ते किती अधिक वीट असे आहे. 28खोटा साक्षीदार नाश पावेल, पण जो कोणी ऐकतो त्याप्रमाणे सर्व वेळ तसे बोलतो. 29दुष्ट मनुष्य आपले मुख धीट करतो, पण सरळ मनुष्य आपल्या मार्गाचा नीट विचार करतो. 30परमेश्वराविरूद्ध शहाणपण, बुद्धि किंवा युक्ती ही मुळीच उभी राहू शकत नाहीत. 31लढाईच्या दिवसासाठी घोडा तयार करतात, पण तारण परमेश्वराकडून आहे. 22:1चांगले नाव विपुल धनापेक्षा आणि सोने व चांदीपेक्षा प्रीतीयुक्त कृपा निवडणे उत्तम आहे. 2गरीब आणि श्रीमंत यांच्यात हे सामाईक आहे, त्या सर्वांचा निर्माणकर्ता परमेश्वर आहे. 3शहाणा मनुष्य संकट येताना पाहून लपतो, पण भोळे पुढे जातात आणि त्यामुळे दुःख सोसतात. 4परमेश्वराचे भय नम्रता आणि संपत्ती, मान आणि जीवन आणते.
तारखा रशियन मंडळीच्या ज्युलियन दिनदर्शिकेनुसार आहेत (सर्बियन आणि जॉर्जियन मंडळ्या आणि आथोस पर्वत यांच्याप्रमाणे): मंडळीच्या दिनदर्शिकेतील 8 एप्रिल म्हणजे नागरी दिनदर्शिकेतील 21 एप्रिल. नवी दिनदर्शिका पाळणाऱ्या मंडळ्या (ग्रीस, रोमानिया, बल्गेरिया, युक्रेन…) ठरावीक तारखेचे सण आणि संत त्याच नागरी तारखेला, 13 दिवस आधी, पाळतात, आणि त्यांचे काही पाठ वेगळे आहेत; ईस्टर आणि त्यावर अवलंबून असलेले दिवस सारखेच आहेत.
स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क