मुख्यपृष्ठ › दैनंदिन बायबल पाठ › एप्रिल 2027 › 15 एप्रिल
ऑर्थोडॉक्स दिनदर्शिका · 2 एप्रिल (जुनी पद्धत)
ऑर्थोडॉक्स दैनंदिन पाठ — 15 एप्रिल 2027
गुरुवार · महान लेंतचा पाचवा आठवडा · स्वर 4
सण आणि संत
क्रेतचे संत अंद्रिया यांचा महान कॅनन
महान लेंत
उपवास: तेलासह
हे मठाच्या नियमानुसार आहे. पॅरिशमध्ये उपवासाचे प्रमाण आपल्या पापकबुलीच्या धर्मगुरूसोबत, आरोग्य, वय आणि परिस्थितीनुसार ठरवले जाते.
दिवसाची वाचने
सहावा तास
5परमेश्वर देव हे म्हणत आहे, ज्याने आकाश निर्माण केले आणि त्यास विस्तारीले; ज्याने पृथ्वी पसरली आणि ज्यामध्ये जीवन दिले आहे; तो त्यावरील लोकांस श्वास देतो आणि त्यावर राहणाऱ्यांना जिवन देतो; 6मी, परमेश्वराने, तुला न्यायानुसार बोलाविले आहे आणि तुझा हात धरीन. मी तुझे रक्षण करीन आणि तुला लोकांसाठी करार व परराष्ट्रीयांसाठी प्रकाश देणारा असे करीन. 7आंधळ्यांचे डोळे उघडावे, बंदिवानांना अंधारकोठडीतून आणि अंधारात बसलेल्यांना बंदीगृहातून सोडवावे. 8“मी परमेश्वर आहे, हे माझे नाव आहे; आणि मी आपले गौरव दुसऱ्यांबरोबर किंवा कोरीव मूर्तीबरोबर आपली स्तुती वाटून घेणार नाही. 9पाहा, पूर्वीच्या गोष्टी घडून चुकल्या आहेत, आता मी नवीन घटनेबद्दल जाहीर करतो. त्या होण्यापूर्वी मी त्याबद्दल तुम्हास सांगत आहे.” 10परमेश्वरास नवीन गाणे गा, आणि पृथ्वीच्या शेवटापासून, जे तुम्ही खाली समुद्रात जाता आणि त्याच्यात जे आहे ते सर्व, किनाऱ्यावरील देश आणि तेथे राहणारे त्याची स्तुती करा. 11वाळवंटांनो आणि नगरांनो आरोळी मारा, ज्या खेड्यात केदार राहतो, मोठ्याने आनंदाने ओरडा! सेलात राहणाऱ्यांनो गायन करोत, डोंगरमाथ्यावरून आरोळी करोत. 12त्यांना परमेश्वरास गौरव देऊ द्या आणि किनाऱ्यावरील देशात त्याची स्तुती जाहीर करोत. 13परमेश्वर शूर योध्द्याप्रमाणे बाहेर जाईल; तो युद्धवीरासारखा पुढे जाईल. तो आपल्या आवेशाने उत्तेजित होईल. तो ओरडेल, होय! तो आपल्या युद्धाची मोठ्याने ओरडून गर्जना करील; तो आपल्या शत्रूंना आपले सामर्थ्य दाखवील. 14बराच वेळ मी काही बोललो नाही; मी स्तब्ध राहिलो आणि स्वतःवर संयम ठेवला; आता मी प्रसूतिवेदना होणाऱ्या स्त्रीसारखा मोठ्याने ओरडेन, मी उसासे व धापा टाकीन. 15मी टेकड्या आणि पर्वत उध्वस्त करीन आणि त्यांचे सर्व झाडेझुडपे मी सुकवून टाकीन; आणि मी नद्यांची बेटे करीन आणि पाणथळ जमीन कोरडी करीन. 16मी आंधळ्यांना माहीत नसलेल्या मार्गाने आणीन, त्यांना माहीत नसलेल्या वाटेने मी त्यांना नेईन, मी त्यांच्यापुढे अंधाराचा प्रकाश करीन, वाकडी ठिकाणे सरळ करीन. या गोष्टी मी करीन आणि मी त्यांना सोडणार नाही.
संध्याप्रार्थना: वाचन
20मग परमेश्वर म्हणाला, “सदोम व गमोरा यांच्या दुष्टाईचा आक्रोश मोठा आहे, आणि त्यांचे पाप फार गंभीर असल्या कारणाने, 21मी आता तेथे खाली जाईन आणि त्यांच्या पातकाचा जो बोभाटा माझ्या कानी आला आहे त्याप्रमाणेच त्यांची करणी आहे का हे पाहीन. तसे नसेल तर मला समजेल.” 22मग ती माणसे तेथून वळून आणि सदोम नगराकडे गेली, परंतु अब्राहाम परमेश्वरापुढे तसाच उभा राहिला. 23मग अब्राहाम परमेश्वराजवळ जाऊन म्हणाला, “तू दुष्टाबरोबर नीतिमानांचाही नाश करशील काय? 24कदाचित त्या नगरात पन्नास नीतिमान लोक असतील तर त्या नगराचा तू नाश करणार काय? तू त्या नगरात राहणाऱ्या पन्नास नीतिमान लोकांसाठी नगराचा बचाव करणार नाहीस काय? 25असे करणे तुझ्यापासून दूर असो. दुष्टाबरोबर नीतिमानाला मारणे म्हणजे नीतिमानाला दुष्टासारखे वागवणे हे तुझ्यापासून दूर असो! जो तू संपूर्ण पृथ्वीचा न्यायाधीश आहेस, तो तू योग्य न्याय करणार नाहीस काय?” 26परमेश्वर म्हणाला, “या सदोम शहरात मला पन्नास नीतिमान लोक सापडले तरीही त्यांच्यासाठी मी संपूर्ण स्थळाचा बचाव करीन.” 27अब्राहामाने उत्तर देऊन म्हटले, “पाहा मी केवळ धूळ व राख आहे, तरी प्रभूजवळ बोलायला धजतो! 28समजा जर पाच लोक कमी असतील म्हणजे फक्त पंचेचाळीसच चांगले लोक असतील तर? त्या पाच कमी असलेल्या लोकांकरता तू सर्व नगराचा नाश करशील काय?” आणि तो म्हणाला, “मला पंचेचाळीस लोक चांगले आढळले तर मी नगराचा नाश करणार नाही.” 29पुन्हा तो परमेश्वरास म्हणाला, “आणि जर तेथे तुला चाळीसच चांगले लोक आढळले तर? संपूर्ण शहराचा तू नाश करशील काय?” परमेश्वर म्हणाला, “जर मला चाळीसच लोक चांगले आढळले तरीही, मी शहराचा नाश करणार नाही.” 30तो म्हणाला, “प्रभू, कृपा करून तुला राग न यावा म्हणजे मी बोलेन. तेथे फक्त तीसच मिळाले तर?” परमेश्वर म्हणाला, “जर तीस चांगले लोक असतील तरीही मी तसे करणार नाही.” 31तो म्हणाला, “मी प्रभूशी बोलायला धजतो! समजा तेथे कदचित वीसच मिळाले तर?” परमेश्वराने उत्तर दिले, “त्या वीसांकरताही मी नगराचा नाश करणार नाही.” 32शेवटी तो म्हणाला, “प्रभू, कृपा करून माझ्यावर रागावू नकोस, मी शेवटी एकदाच बोलतो. कदाचित तुला तेथे दहाच लोक मिळाले तर?” परमेश्वर म्हणाला, “त्या दहांकरताही मी नगराचा नाश करणार नाही.” 33मग परमेश्वराने अब्राहामाशी बोलणे संपविल्याबरोबर तो लगेच निघून गेला, आणि अब्राहाम आपल्या तंबूकडे परत आला.
संध्याप्रार्थना: वाचन
17दुष्कर्मापासून वळणे हा सरळांचा राजमार्ग आहे, जो आपल्या मार्गाकडे लक्ष ठेवतो तो आपला जीव राखतो. 18नाशापूर्वी गर्व येतो, आणि मनाचा ताठा अधःपाताचे मूळ आहे. 19गर्विष्ठांबरोबर राहून लूट वाटून घेण्यापेक्षा दीनांबरोबर विनम्र असणे चांगले. 20जो कोणी जे काही चांगले आहे ते शोधतो, त्यास शिकवीले त्याचे निरीक्षण करतो, आणि जो परमेश्वरावर विश्वास ठेवतो तो आनंदीत होतो. 21जो मनाचा सुज्ञ त्यास समंजस म्हणतात, आणि मधुर वाणीने शिकवण्यची क्षमता वाढते. 22ज्यांच्याकडे सुज्ञान आहे त्यास ती जीवनाचा झरा आहे, पण मूर्खाचे मूर्खपण त्याची शिक्षा आहे. 23सुज्ञ मनुष्याच्या हृदयापासून त्याच्या मुखास शिक्षण मिळते; आणि त्याच्या वाणीत विद्येची भर घालते. 24आनंदी शब्द मधाचे पोळ अशी आहेत, ती जिवाला गोड व हाडांस आरोग्य आहेत. 25मनुष्यास एक मार्ग सरळ दिसतो, पण त्याचा शेवट मृत्यूमार्गाकडे आहे. 26कामगाराची भूक त्याच्यासाठी काम करते; त्याची भूक त्यास ते करायला लावते. 27नालायक मनुष्य खोड्या उकरून काढतो, आणि त्याची वाणी होरपळणाऱ्या अग्नीसारखी आहे. 28कुटिल मनुष्य संघर्ष निर्माण करतो, आणि निंदा करणाऱ्या जवळच्या मित्रांना वेगळे करतो. 29जुलमी मनुष्य आपल्या शेजाऱ्याशी लबाड बोलतो, आणि जो मार्ग चांगला नाही अशात त्यास नेतो. 30जो कोणी मनुष्य कुटिल गोष्टीच्या योजणेला डोळे मिचकावतो; जो आपले ओठ आवळून धरतो तो दुष्कर्म घडून आणतो. 31पिकलेले केस वैभवाचा मुकुट आहे; नीतिमत्तेच्या मार्गाने चालण्याने तो प्राप्त होतो. 32ज्याला लवकर राग येत नाही तो योद्धापेक्षा, आणि जो आत्म्यावर अधिकार चालवतो तो नगर जिंकऱ्यापेक्षा उत्तम आहे. 33पदरात चिठ्ठ्या टाकतात, पण त्यांचा निर्णय सर्वस्वी परमेश्वराकडून आहे. 17:1एखाद्या घरात पूर्ण मेजवानीची मुबलकता असून त्यामध्ये संघर्ष असला तर त्यापेक्षा कोरड्या भाकरीचा तुकडा शांतीने खाणे उत्तम आहे. 2शहाणा सेवक लज्जास्पद वागणाऱ्या मुलावर अधिकार चालवीन आणि एका भावाप्रमाणे वतनाचा भागीदार होईल. 3चांदी मुशीत आणि सोने भट्टीत तावून पाहतात, पण परमेश्वर हृदय शुध्द करतो. 4जो मनुष्य वाईट करतो तो दुष्ट वाणीला कान देऊन ऐकतो; जे वाईट गोष्टी सांगतात ते लबाड लक्ष देऊन ऐकतो. 5जो कोणी गरीबांची थट्टा करतो तो त्याच्या निर्माणकर्त्याचा अपमान करतो, आणि जो दुसऱ्याच्या आपत्तीने आनंदित होतो त्यास शिक्षा झाल्यावाचून राहणार नाही. 6नातवंडे वृद्धांचा मुकुट आहेत, आणि आईवडील आपल्या मुलांस वैभव आणतात. 7उत्कृष्ट बोलणे मूर्खास शोभत नाही; तसेच राज्यकर्त्याला खोटे ओठ किती तरी कमी शोभतात. 8लाच देणाऱ्याच्या दृष्टीने ती जादूच्या खड्यांसारखी आहे; जिकडे तो वळतो तिकडे तो यशस्वी होतो. 9जो कोणी एखाद्याच्या अपराधाकडे दुर्लक्ष करतो तो प्रेम शोधतो, पण जो कोणी गत गोष्टी घोकत बसतो तो जवळच्या मित्रास अंतरतो. 10मूर्खाच्या मनात शंभर फटके ठसतात, यापेक्षा निषेध बुद्धिमान मनुष्याच्या मनावर अधिक खोलवर ठसतो. 11वाईट मनुष्य केवळ बंड करायचे शोधतो, म्हणून क्रूर निरोपे त्याच्याविरुध्द पाठवण्यात येईल. 12मूर्खतेत खितपत असलेल्या मूर्खाची भेट होण्यापेक्षा जिचे पिल्ले चोरून नेली आहेत अशा अस्वलीची गाठ पडलेली बरी. 13जो कोणी बऱ्याची फेड वाईटाने करील, त्याच्या घरातून वाईट कधी जाणार नाही. 14कोणीतरी धरणाला छिद्र पाडून पाणी वाहू द्यावे, तसे भांडणाला सुरवात होण्यासारखे आहे, म्हणून भांडण होण्यापूर्वीच त्यापासून दूर निघून जा. 15जो कोणी दुष्टाला निर्दोष ठरवतो किंवा नीतिमानाला दोषी ठरवतो, या दोन्ही लोकांचा परमेश्वरास तिटकारा आहे. 16मूर्खाला बुद्धी नसताना तो ज्ञानाविषयी शिक्षण घेण्यासाठी पैसा का देतो, जेव्हा त्याची ते शिकण्याची क्षमता नाही? 17मित्र सर्व वेळी प्रीती करतो, आणि भाऊ संकटाच्या वेळेसाठी जन्मला आहे.
तारखा रशियन मंडळीच्या ज्युलियन दिनदर्शिकेनुसार आहेत (सर्बियन आणि जॉर्जियन मंडळ्या आणि आथोस पर्वत यांच्याप्रमाणे): मंडळीच्या दिनदर्शिकेतील 2 एप्रिल म्हणजे नागरी दिनदर्शिकेतील 15 एप्रिल. नवी दिनदर्शिका पाळणाऱ्या मंडळ्या (ग्रीस, रोमानिया, बल्गेरिया, युक्रेन…) ठरावीक तारखेचे सण आणि संत त्याच नागरी तारखेला, 13 दिवस आधी, पाळतात, आणि त्यांचे काही पाठ वेगळे आहेत; ईस्टर आणि त्यावर अवलंबून असलेले दिवस सारखेच आहेत.
स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क