Bible Explorer अ‍ॅप मिळवा

मुख्यपृष्ठ › दैनंदिन बायबल पाठ › एप्रिल 2027 › 13 एप्रिल

ऑर्थोडॉक्स दिनदर्शिका · 31 मार्च (जुनी पद्धत)

ऑर्थोडॉक्स दैनंदिन पाठ — 13 एप्रिल 2027

मंगळवार · महान लेंतचा पाचवा आठवडा · स्वर 4

सण आणि संत

St. Hypatius the Wonderworker and Bishop of Gangra († c. 326)

महान लेंत

कडक उपवास (कोरडे अन्न: भाकर, भाज्या, फळे)

हे मठाच्या नियमानुसार आहे. पॅरिशमध्ये उपवासाचे प्रमाण आपल्या पापकबुलीच्या धर्मगुरूसोबत, आरोग्य, वय आणि परिस्थितीनुसार ठरवले जाते.

दिवसाची वाचने

सहावा तास

यश 40:18–31

18तर मग तुम्ही देवाची तुलना कशाशी कराल? तर त्याची तुलना कोणत्या प्रतिमेशी करणार? 19मूर्ती! कारागीराने ओतून केली आहेः सोनार तिला सोन्याने मढवतो आणि तिच्यासाठी चांदीच्या साखळ्या ओततो. 20जो अर्पण देण्यास असमर्थ असा गरीब तो न कुजणारे लाकूड निवडतो; न पडणारी मूर्ती बनविण्यासाठी तो निपूण कारागीर शोधतो. 21तुम्हास माहीत नाही काय? तुम्ही ऐकले नाही काय? तुम्हास सुरवातीपासून सांगितले नाही काय? पृथ्वीचा पाया घातल्यापासून हे तुम्हास समजले नाही काय? 22जो पृथ्वीच्या वरील नभोमंडळावर बसतो तो हाच आहे आणि त्याच्यापुढे रहिवासी टोळासारखे आहेत. तो आकाश पडद्याप्रमाणे ताणतो आणि त्यामध्ये राहण्यासाठी तंबूप्रमाणे पसरतो. 23तो अधिपतींना काहीही नसल्यासारखे कमी करतो आणि पृथ्वीच्या अधिपतींना अर्थशून्य करतो. 24पाहा, ते केवळ लावले आहेत; पाहा, ते केवळ पेरले आहेत; पाहा त्यांनी केवळ भूमीत मूळ धरले आहे, तो त्यांच्यापुढे त्यावर फुंकर घालतो आणि ते सुकून जातात व वादळ त्यांना धसकटासारखे उडवून नेते. 25“तर तुम्ही माझी तुलना कोणाशी कराल? माझ्यासारखा कोण आहे? असे तो पवित्र प्रभू म्हणतो. 26आकाशाकडे वर पाहा! हे सर्व तारे कोणी निर्माण केले आहेत? तो त्याच्या निर्मीतीचे मार्गदर्शन करून बाहेर नेतो आणि त्या सर्वांना नावाने बोलावतो. त्याच्या सामर्थ्याच्या महानतेमुळे आणि प्रबळ सत्ताधीश आहे म्हणून, त्यातला एकही उणा नाही. 27हे याकोबा, तू असे का म्हणतोस, आणि इस्राएलास जाहीर करतोस, माझे मार्ग परमेश्वरापासून गुप्त आहेत आणि माझा देव माझ्या समर्थनाविषयी लक्ष देत नाही? 28तुला माहीत नाही काय? तू ऐकले नाही काय? परमेश्वर हा सनातन देव, पृथ्वीच्या सीमा निर्माण करणारा, थकत किंवा दमत नाही; त्याच्या बुद्धीला मर्यादा नाही. 29तो थकलेल्यांना शक्ती देतो; आणि निर्बलांस नवचैतन्य देऊन ताकद देतो. 30तरुण लोकही थकतात आणि दमतात, आणि तरुण माणसे अडखळतात आणि पडतात. 31पण जे कोणी परमेश्वराची प्रतीक्षा करतात ते त्यांची नवीन शक्ती संपादन करतील; ते गरुडासारखे पंखांनी वर उडतील; ते धावतील तरी दमणार नाहीत; ते चालतील तरी गळून जाणार नाहीत.

संध्याप्रार्थना: वाचन

उत्प 15:1–15

1या गोष्टी घडल्यानंतर अब्रामाला दृष्टांतात परमेश्वराचे वचन आले. तो म्हणाला, “अब्रामा, भिऊ नको. मी तुझे संरक्षण करीन आणि तुला फार मोठे प्रतिफळ देईन.” 2अब्राम म्हणाला, “हे प्रभू परमेश्वरा, मी अजून निपुत्रिक आहे, आणि माझ्या घराचा वारस दिमिष्क शहरातील अलिएजर हाच होईल, तेव्हा तू मला काय देणार?” 3अब्राम म्हणाला, “तू मला संतान दिले नाहीस म्हणून माझ्या घराचा कारभारीच माझा वारस आहे.” 4नंतर, पाहा, परमेश्वराचे वचन अब्रामाकडे आले. तो म्हणाला, “हा मनुष्य तुझा वारस होणार नाही, तर तुझ्या पोटी येईल तोच तुझा वारस होईल.” 5मग त्याने त्यास बाहेर आणले, आणि म्हटले, “या आकाशाकडे पाहा, तुला तारे मोजता येतील तर मोज.” तो त्यास म्हणाला, “असे तुझे संतान होईल.” 6त्याने परमेश्वरावर विश्वास ठेवला. आणि तो विश्वास त्याचा प्रामाणिकपणा असा मोजण्यात आला. 7परमेश्वर त्यास म्हणाला, “हा देश तुला वतन करून देण्याकरता खास्द्यांच्या ऊर देशातून तुला आणणारा मीच परमेश्वर आहे.” 8तो त्यास म्हणाला, “हे प्रभू परमेश्वरा मला हे वतन मिळेल हे मी कशावरून समजू?” 9तो त्यास म्हणाला, “माझ्यासाठी तीन वर्षांची एक कालवड, तीन वर्षांची एक शेळी, तीन वर्षांचा एक एडका तसेच एक होला व एक पारव्याचे पिल्लू आण.” 10त्याने ते सर्व त्याच्याकडे आणले आणि त्यांना चिरून त्या प्रत्येकाचे दोन दोन तुकडे केले व प्रत्येक अर्धा भाग दुसऱ्या अर्ध्या भागासमोर ठेवला. पण पक्षी त्याने चिरले नाहीत; 11कापलेल्या प्राण्यांचे मांस खाण्याकरिता पक्ष्यांनी त्यावर झडप घातली, परंतु अब्रामाने त्यांना हाकलून लावले. 12नंतर जेव्हा सूर्य मावळू लागला, तेव्हा अब्रामाला गाढ झोप लागली आणि पाहा निबिड आणि घाबरून सोडणाऱ्या काळोखाने त्यास झाकले. 13मग परमेश्वर अब्रामाला म्हणाला, “तुला या गोष्टी समजल्या पाहिजेत; तुझे वंशज जो देश त्यांचा नाही त्या अनोळखी देशात राहतील आणि ते तेथे गुलाम होतील आणि चारशे वर्षे त्यांचा छळ होईल. 14परंतु ज्याने त्यांना गुलाम बनवले त्या राष्ट्राचा मी न्याय करीन, आणि मग आपल्या बरोबर पुष्कळ धन घेऊन ते त्या देशातून निघतील. 15तू स्वतः फार म्हातारा होऊन शांतीने आपल्या पूर्वजांकडे जाशील आणि चांगला म्हातारा झाल्यावर तुला पुरतील.

संध्याप्रार्थना: वाचन

नीति 15:7–19

7ज्ञानाचे ओठ विद्येविषयीचा प्रसार करते, पण मूर्खाचे हृदय असे नाही. 8दुष्टाच्या अर्पणाचा परमेश्वर द्वेष करतो, पण सरळांची प्रार्थना त्याचा आनंद आहे. 9दुष्टांच्या मार्गाचा परमेश्वरास वीट आहे, पण जे नीतीचा पाठलाग करतात त्यांच्यावर तो प्रीती करतो. 10जो कोणी मार्ग सोडतो त्याच्यासाठी कठोर शासन तयार आहे, आणि जो कोणी सुधारणेचा तिरस्कार करतो तो मरेल. 11अधोलोक आणि विनाशस्थान परमेश्वरापुढे उघडे आहे; तर मग मनुष्यजातीच्या वंशाची अंतःकरणे त्याच्या दृष्टीपुढे किती जास्त असली पाहिजेत? 12निंदकाला शिक्षेची चीड येते; तो सुज्ञाकडे जात नाही. 13आनंदी हृदय मुख आनंदित करते, पण हृदयाच्या दुःखाने आत्मा चिरडला जातो. 14बुद्धिमानाचे हृदय ज्ञान शोधते, पण मूर्खाचे मुख मूर्खताच खाते. 15जुलूम करणाऱ्याचे सर्व दिवस दुःखकारक असतात, पण आनंदी हृदयाला अंत नसलेली मेजवाणी आहे. 16पुष्कळ धन असून त्याबरोबर गोंधळ असण्यापेक्षा ते थोडके असून परमेश्वराचे भय बाळगणे चांगले आहे. 17पोसलेल्या वासराच्या तिरस्कारयुक्त मेजवाणीपेक्षा, जेथे प्रेम आहे तेथे भाजीभाकरी चांगली आहे. 18रागीट मनुष्य भांडण उपस्थित करतो, पण जो रागास मंद आहे तो मनुष्य भांडण शांत करतो. 19आळशाची वाट काटेरी कुंपणासारखी आहे, पण सरळांची वाट राजमार्ग बनते.

तारखा रशियन मंडळीच्या ज्युलियन दिनदर्शिकेनुसार आहेत (सर्बियन आणि जॉर्जियन मंडळ्या आणि आथोस पर्वत यांच्याप्रमाणे): मंडळीच्या दिनदर्शिकेतील 31 मार्च म्हणजे नागरी दिनदर्शिकेतील 13 एप्रिल. नवी दिनदर्शिका पाळणाऱ्या मंडळ्या (ग्रीस, रोमानिया, बल्गेरिया, युक्रेन…) ठरावीक तारखेचे सण आणि संत त्याच नागरी तारखेला, 13 दिवस आधी, पाळतात, आणि त्यांचे काही पाठ वेगळे आहेत; ईस्टर आणि त्यावर अवलंबून असलेले दिवस सारखेच आहेत.

स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क