मुख्यपृष्ठ › दैनंदिन बायबल पाठ › एप्रिल 2027 › 7 एप्रिल
ऑर्थोडॉक्स दिनदर्शिका · 25 मार्च (जुनी पद्धत)
ऑर्थोडॉक्स दैनंदिन पाठ — 7 एप्रिल 2027
बुधवार · महान लेंतचा चौथा आठवडा · स्वर 3
सण आणि संत
The Annunciation of our Most Holy Lady, Theotokos and Ever-Virgin Mary
महान लेंत
मासे चालतात
हे मठाच्या नियमानुसार आहे. पॅरिशमध्ये उपवासाचे प्रमाण आपल्या पापकबुलीच्या धर्मगुरूसोबत, आरोग्य, वय आणि परिस्थितीनुसार ठरवले जाते.
दिवसाची वाचने
प्रातःप्रार्थना: शुभवर्तमान (शुभवार्तेच्या सणासाठी)
39त्या दिवसात मरीया उठली आणि घाईने यहूदीया प्रांताच्या डोंगराळ भागातील एका नगरात गेली. 40तिने जखऱ्याच्या घरात प्रवेश केला आणि अलीशिबेला अभिवादन केले. 41जसे मरीयेचे अभिवादन अलीशिबेने ऐकले तिच्या उदरातील बाळाने उडी मारली आणि अलीशिबा पवित्र आत्म्याने भरली. 42ती उंच स्वर काढून मोठ्याने म्हणाली, “स्त्रियांमध्ये तू धन्यवादित आहेस आणि तुझ्या पोटचे फळ धन्य आहे. 43माझ्या प्रभूच्या मातेने मजकडे यावे हा मान मला कोठून?” 44जेव्हा तुझ्या अभिवादनाची वाणी माझ्या कानी पडली, तेव्हा माझ्या उदरातील बाळाने आनंदाने उडी मारली 45जिने विश्वास ठेवला ती धन्य आहे, कारण ज्या गोष्टी प्रभूने तिला सांगितल्या त्याची पूर्णता होईल? 46मरीया म्हणाली, “माझा जीव प्रभूला थोर मानतो, 47आणि देव जो माझा तारणारा याच्या ठायी माझा आत्मा आनंदीत झाला आहे. 48कारण त्याने आपल्या दासीची दैन्य अवस्था पाहीली. आतापासून मला सर्व पिढ्या धन्य म्हणतील. 49कारण जो सर्वसमर्थ आहे त्याने माझ्यासाठी मोठी कामे केली आहेत; आणि त्याचे नाव पवित्र आहे. 56अलीशिबेबरोबर तीन महीने राहिल्यानंतर मरीया आपल्या घरी परत गेली.
सहावा तास
21कारण पाहा, परमेश्वर पृथ्वीतल्या राहणाऱ्यांच्या अन्यायाबद्दल शिक्षा करण्यास आपले स्थान सोडून येत आहे. मारल्या गेलेल्यांचे रक्त पृथ्वी प्रगट करेल, आणि आपल्या वधलेल्यांना यापुढे झाकून ठेवणार नाही. 27:1त्या दिवशी लिव्याथान जो चपळ सर्प, जो वाकडा सर्प लिव्याथान त्यास परमेश्वर आपल्या कठोर व मोठ्या व दृढ तलवारीने शिक्षा करणार आणि समुद्रातील प्राणी त्यास मारील. 2तेव्हा लोक रम्य द्राक्षमळ्याबद्दलचे गाणे म्हणतील. 3“मी परमेश्वर, तिची नीगा राखणारा, मी प्रत्येक क्षणी तिला पाणी घातले; त्यामुळे कोणीही तिला दुखावणार नाही, म्हणून मी रात्र दिवस तिचे राखण करतो. 4मी रागवलेलो नाही, लढाईत माझ्यापुढे काट्यांची झाडे व काटेरी झाडे कोण ठेवील! पण युध्दात मी त्याच्या विरूद्ध चाल करून जाईल आणि मी त्यास जाळून नष्ट करून टाकीन. 5अथवा त्याने माझ्याशी समेट करावा म्हणून त्याने माझ्या संरक्षणाला धरावे, त्याने माझ्याशी शांती प्रस्थापीत करावी. 6येणाऱ्या दिवसात याकोब मुळावेल, इस्राएल उमलेले व त्यास नवीन पालवी फुटेल, आणि ते जगाची पाठ फळांनी भरतील.” 7काय परमेश्वराने याकोबावर आणि इस्राएलावर हल्ला केला, जसा त्याने त्यांच्यावर हल्ला करणाऱ्यांवर हल्ला केला? अथवा यांनी ज्यांचा वध केला आहे त्यांच्या वधाप्रमाणे यांचा वध करण्यात आला आहे काय? 8याचप्रकारे तुम्ही याकोब आणि इस्राएलाला दूर पाठवून अचूक मापदंडांनी त्यांचा विरोध केला आहे. पुर्वेच्या वाऱ्याच्या दिवशी त्यांना तो प्रचंड वाऱ्याने दूर करतो. 9याकरीता याकोबाच्या अपराधांना क्षमा कशी केली जाईल, आणि त्याचे पाप दूर करण्याचे फळ हेच आहे. तो वेदीचे सर्व दगड खडूच्या चूर्ण केलेल्या चुनखड्यासारखे करेल, आणि तसेच अशेरा देवीचे खांब किंवा धूप वेदीही उभ्या राहणार नाहीत.
संध्याप्रार्थना: वाचन
18नोहाबरोबर त्याचे पुत्र तारवाबाहेर आले; त्यांची नावे शेम, हाम व याफेथ अशी होती. आणि हाम हा कनानाचा पिता होता 19हे नोहाचे तीन पुत्र होते, आणि यांच्यापासूनच सर्व पृथ्वीवर लोकविस्तार झाला. 20नोहा शेतकरी बनला, आणि त्याने एक द्राक्षमळा लावला. 21तो थोडा द्राक्षरस प्याला आणि तो धुंद झाला. तो त्याच्या तंबूत उघडा-वाघडा पडला होता. 22तेव्हा कनानाचा पिता हाम याने आपला पिता उघडा-वागडा पडलेला असल्याचे पाहिले व त्याने तंबूच्या बाहेर येऊन ते आपल्या भावांना सांगितले. 23मग शेम व याफेथ यांनी एक कपडा घेतला व तो आपल्या खांद्यावर ठेवून ते पाठमोरे तंबूत गेले. अशा प्रकारे त्यांनी आपल्या पित्याची नग्नता झाकली; पाठमोरे असल्यामुळे ती त्यांना दिसली नाही. 24जेव्हा नोहा नशेतून जागा झाला, तेव्हा आपला धाकटा मुलगा हाम याने काय केले हे त्यास समजले. 25तेव्हा नोहा म्हणाला, “कनान शापित होवो, तो आपल्या भावाच्या गुलामातील सर्वांत खालचा गुलाम होवो.” 26तो म्हणाला, “शेमाचा देव परमेश्वर धन्यवादित असो. कनान त्याचा सेवक होवो. 27देव याफेथाचा अधिक विस्तार करो, आणि शेमाच्या तंबूत तो त्याचे घर करो. कनान त्यांचा सेवक होवो.” 28पूरानंतर नोहा तीनशे पन्नास वर्षे जगला; 29नोहा एकूण नऊशें पन्नास वर्षे जगला; मग त्यानंतर तो मरण पावला. 10:1नोहाच्या शेम, हाम व याफेथ या मुलांचे वंशज हे आहेत. पुरानंतर त्यांना मुले झाली.
संध्याप्रार्थना: वाचन
23शहाणा मनुष्य आपले ज्ञान गुप्त ठेवतो, पण मूर्खाचे हृदय मूर्खपणा ओरडून सांगते. 24उद्योग्याचे हात अधिकार चालवतील, पण आळशाला गुलामासारखे राबावे लागेल. 25मनुष्याचे हृदय काळजीच्या भाराने त्यास खाली दाबून टाकते, पण चांगला शब्द त्यास आनंदित करतो. 26नीतिमान आपल्या मित्राला मार्ग दाखवतो, पण दुष्टाचे मार्ग त्यांना बहकावतो. 27आळशी आपण धरलेली शिकार भाजित नाही, पण उद्योगी मनुष्य मौल्यवान संपत्ती संपादन करतो. 28न्यायीपणाच्या मार्गात जीवन सापडते, आणि त्यांच्या वाटेत मरण नाही. 13:1सुज्ञ मुलगा आपल्या पित्याचे शिक्षण ऐकतो, परंतु निंदक निषेध ऐकत नाही. 2आपल्या तोंडच्या फळांनी मनुष्य चांगल्या गोष्टींचा आनंद घेतो, पण अविश्वासणाऱ्याची भूक जुलूम आहे. 3जो आपले तोंड सांभाळतो तो आपल्या जीवाचे रक्षण करतो, परंतु जो आपले तोंड उघडतो तो स्वतःचा नाश करून घेतो. 4आळशाची भूक हाव धरते पण त्यास काही मिळत नाही, पण उद्योग्याची भूक पूर्णपणे तृप्त होते. 5नीतिमान लबाडीचा तिरस्कार करतो, पण दुर्जन जे लाजिरवाणे आहे ते करतो, आणि स्वतःला किळसवाणे करतो. 6नीतिमत्ता सात्विक मार्गाने चालणाऱ्यांचे रक्षण करते, पण पाप्याला त्याचे पाप उलथून टाकते. 7जो कोणी आपणाला संपन्न करतो, पण त्यांच्याजवळ मात्र काहीच नसते, आणि जो कोणी सर्वकाही देऊन टाकतो, खरोखर तो अजून श्रीमंत आहे. 8श्रीमंत मनुष्यास जिवाची खंडणी त्याची संपत्ती आहे, पण गरीब मनुष्यास अशा प्रकारच्या धमक्या कधीच मिळत नाहीत. 9नीतिमानाचा प्रकाश आनंदाने प्रकाशतो, पण दुष्टाचा दीप मालवला जाईल.
संध्याप्रार्थना: वाचन (शुभवार्तेच्या सणासाठी)
1तेव्हा मोशे आपला सासरा इथ्रो जो मिद्यानी याजक याचा कळप चारत होता. मोशे रानाच्या मागे, देवाचा डोंगर होरेब येथवर आपला कळप घेऊन गेला. 2तेव्हा परमेश्वराच्या दूताने त्यास एका झुडपातून निघणाऱ्या अग्नीच्या ज्वालेत दर्शन दिले. मोशेने पाहिले की, झुडूप अग्नीने जळत होते, परंतु ते जळून भस्म होत नव्हते. 3मोशे म्हणाला, “मी त्या बाजूला वळतो आणि हे मोठे आश्चर्य जाऊन पाहतो की, हे झुडूप जळून नष्ट का होत नाही.” 4मोशे झुडूपाजवळ येत आहे हे परमेश्वराने पाहिले. तेव्हा झुडपातून देवाने त्यास हाक मारून म्हटले, “मोशे! मोशे!” आणि मोशे म्हणाला, “हा मी इथे आहे.” 5देव म्हणाला, “तू इकडे जवळ येऊ नकोस, तर तुझ्या पायातल्या चपला काढ; कारण ज्या जागी तू उभा आहेस ती भूमी पवित्र आहे. 6तो आणखी म्हणाला, मी तुझ्या पित्याचा देव-अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव व याकोबाचा देव आहे.” तेव्हा मोशेने आपले तोंड झाकून घेतले. कारण देवाकडे पाहायला तो घाबरला. 7परमेश्वर म्हणाला, “मिसरामध्ये माझ्या लोकांचा जाच मी खरोखर पाहिला आहे; आणि मुकादमांच्या त्रासामुळे त्यांनी केलेला आकांत मी ऐकला आहे; त्यांचे दु:ख मी जाणून आहे. 8त्यांना मिसऱ्यांच्या हातून सोडवून त्यांना त्या देशातून चांगल्या व मोठ्या देशात, दुधामधाचे प्रवाह ज्यात वाहत आहेत, कनानी, हित्ती, अमोरी, परिज्जी, हिव्वी व यबूसी यांच्या प्रदेशात घेऊन जावे म्हणून मी उतरलो आहे.
संध्याप्रार्थना: वाचन (शुभवार्तेच्या सणासाठी)
22परमेश्वराने सुरवातीपासून आपल्या पुरातन कृत्यातले पहिले कृत्य असे मला निर्माण केले. 23अनादिकाली, प्रारंभापासून पृथ्वीच्या पूर्वी माझी स्थापना झाली. 24जलाशय नव्हते, पाण्याने भरलेले झरे नव्हते. तेव्हा माझा जन्म झाला; 25पर्वत स्थापित झाले त्यापूर्वी, आणि टेकड्यापूर्वी, माझा जन्म झाला. 26परमेश्वराने पृथ्वी व शेत किंवा पृथ्वीवरची पहिली धूळ निर्माण करण्याआधीच मी जन्मले. 27जेव्हा त्याने आकाशाची स्थापना केली तेव्हा मी तिथे होते, जेव्हा त्याने जलाशयाची वर्तुळाकार सीमा आखली. 28जेव्हा त्याने आकाश वर स्थापित केले तेव्हा मी होते आणि, जेव्हा जलाशयाचे झरे जोराने वाहू लागले. 29जेव्हा त्याने सागराच्या पाण्याला सीमाबध्द केले तेव्हा ही मी होते. पाण्याने त्याच्या आज्ञेच उल्लंघन करून पसरू नये, आणि जेव्हा त्याने आज्ञा केली पृथ्वीचा पाया जेथे असायला पाहिजे तेथे मी होते. 30तेव्हा मी त्याच्याजवळ कुशल कारागिर होते, दिवसेंदिवस मी आनंदाने भरत होतो, मी त्याच्यासमोर सर्वदा हर्ष करीत असे.
प्रेषितांचे पत्र (शुभवार्तेच्या सणासाठी)
11जो लोकांस पवित्र करतो व ज्यांना पवित्र करण्यात आले आहे, ते सर्व एकाच कुटुंबाचे आहेत या कारणासाठी तो त्यांना बंधू म्हणण्यास लाजत नाही. 12तो म्हणतो, मी तुझ्या नावाची थोरवी माझ्या बंधूंना सांगेन मी मंडळीसमोर तुझी स्तुती गाईन. 13तो आणखी म्हणतो, “मी माझा विश्वास त्याच्यावर ठेवीन.” आणि तो पुन्हा म्हणतो, येथे मी आहे आणि माझ्याबरोबर देवाने दिलेली मुले आहेत. 14म्हणून मुले रक्त व मांस यांची बनलेली असल्याने तोही त्यांच्यासारखा रक्तमांसाचा झाला, येशूने हे यासाठी केले की, ज्याच्याकडे मरणाची सत्ता आहे, अशा सैतानाचा मरणाने नाश करावा. 15आणि जे लोक त्यांच्या सर्व आयुष्यात मरणाचे भय ठेवून त्याचे दास असल्यासारखे जगत होते त्यांना मुक्त करावे. 16कारण खरे पाहता, तो देवदूतांच्या साहाय्यास नाही, तर अब्राहामाचे जे वंशज आहेत त्यांना तो मदत करतो, 17या कारणासाठी देवाच्या सेवेतील दयाळू व विश्वासू असा महायाजक होण्यासाठी आणि लोकांच्या पापांसाठी प्रायश्चित करण्यासाठी येशूला सर्व गोष्टींमध्ये आपल्या बांधवांसारखे होणे अत्यंत आवश्यक होते. 18कारण ज्याअर्थी येशूला स्वतः परीक्षेला व दुःखसहनाला तोंड द्यावे लागले, त्याअर्थी ज्यांना आता परीक्षेला तोंड द्यावे लागत आहे त्यांना मदत करण्यास तो समर्थ आहे.
शुभवर्तमान (शुभवार्तेच्या सणासाठी)
24त्या दिवसानंतर त्याची पत्नी अलीशिबा गरोदर राहिली व पाच महिने लपून राहिली, ती म्हणाली, 25लोकांमध्ये माझा होणारा अनादर दूर करण्यासाठी प्रभूने माझ्याकडे पाहिले तेव्हा त्याने माझ्यासाठी असे केले. 26अलीशिबेच्या गरोदरपणाच्या सहाव्या महिन्यात देवाने गब्रीएल दूताला गालील प्रांतातील नासरेथ नावाच्या गावी, 27एका कुमारीकडे पाठवले. तिची दाविदाच्या घराण्यातील योसेफ नावाच्या मनुष्याशी मागणी झाली होती आणि त्या कुमारीचे नाव मरीया होते. 28देवदूत तिच्याकडे येऊन म्हणाला, अभिवादन! तुझ्यावर कृपा झालेली आहे. प्रभू तुझ्याबरोबर आहे. 29परंतु ती त्याच्या शब्दाने अस्वस्थ झाली आणि या अभिवादनाचा अर्थ काय असावा याचे ती नवल करू लागली. 30देवदूत तिला म्हणाला, “मरीये, भिऊ नकोस, देवाने तुझ्यावर कृपा केली आहे. 31पाहा! तू गरोदर राहशील आणि तुला मुलगा होईल त्याचे नाव तू येशू ठेव. 32तो महान होईल व त्यास थोर देवाचा पुत्र म्हणतील आणि प्रभू देव त्यास त्याचा पिता दावीद याचे राजासन देईल. 33तो याकोबाच्या घराण्यावर सर्वकाळासाठी राज्य चालवील आणि त्याच्या राज्याचा अंत होणार नाही.” 34तेव्हा मरीया दूताला म्हणाली, हे कसे होईल? कारण मला पुरूष ठाऊक नाही. 35देवदूत तिला म्हणाला, पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि थोर देवाचे सामर्थ्य तुझ्यावर सावली करील आणि म्हणून जे पवित्र बाळ जन्मास येईल, त्यास देवाचा पुत्र म्हणतील. 36बघ, तुझी नातेवाईक अलीशिबा ही सुद्धा म्हातारपणात गरोदर असून तिला पुत्रगर्भ राहीला आहे आणि जिला वांझ म्हणले जाई तिला आता सहावा महिना आहे. 37कारण देवाला कोणतीही गोष्ट अशक्य नाही. 38मरीया म्हणाली, खरोखर “मी प्रभूची दासी आहे, आपल्या म्हणण्याप्रमाणे मला होवो.” मग देवदूत तिच्यापासून निघून गेला.
तारखा रशियन मंडळीच्या ज्युलियन दिनदर्शिकेनुसार आहेत (सर्बियन आणि जॉर्जियन मंडळ्या आणि आथोस पर्वत यांच्याप्रमाणे): मंडळीच्या दिनदर्शिकेतील 25 मार्च म्हणजे नागरी दिनदर्शिकेतील 7 एप्रिल. नवी दिनदर्शिका पाळणाऱ्या मंडळ्या (ग्रीस, रोमानिया, बल्गेरिया, युक्रेन…) ठरावीक तारखेचे सण आणि संत त्याच नागरी तारखेला, 13 दिवस आधी, पाळतात, आणि त्यांचे काही पाठ वेगळे आहेत; ईस्टर आणि त्यावर अवलंबून असलेले दिवस सारखेच आहेत.
स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क