Bible Explorer अ‍ॅप मिळवा

मुख्यपृष्ठ › दैनंदिन बायबल पाठ › फेब्रुवारी 2027 › 26 फेब्रुवारी

कॅथलिक दिनदर्शिका

दैनंदिन बायबल पाठ (कॅथलिक) — 26 फेब्रुवारी 2027

शुक्रवार · उपवासकाळाचा दुसरा आठवडा

सण आणि संत

उपवासकाळाच्या दुसऱ्या आठवड्याचा शुक्रवार

आठवड्याचा दिवस · उपासनेचा रंग: जांभळा

उपवास आणि प्रायश्चित्त

मांसत्याग

प्रत्येक शुक्रवार प्रायश्चित्ताचा दिवस आहे; तो कसा पाळायचा ते प्रत्येक बिशप परिषद ठरवते: मांसत्याग किंवा प्रायश्चित्ताचे दुसरे एखादे कृत्य. उपवास 18 ते 59 वयासाठी बंधनकारक आहे, मांसत्याग 14 वर्षांपासून.

दिवसाची वाचने

पहिले वाचन

उत्प 37:3–4, 12–13, 17–28

3इस्राएल सर्व मुलांपेक्षा योसेफावर अधिक प्रीती करीत असे कारण तो त्याचा म्हातारपणाचा मुलगा होता. त्याने योसेफाला एक सुंदर पायघोळ झगा बनवून दिला होता. 4आपला बाप आपल्या इतर भावांपेक्षा योसेफावर अधिक प्रीती करतो हे त्याच्या भावांना दिसले म्हणून ते त्याचा द्वेष करीत आणि त्याच्याशी प्रेमाने बोलत नसत. 12एके दिवशी योसेफाचे भाऊ आपल्या बापाची मेंढरे चारावयास शखेम येथे गेले. 13इस्राएल योसेफाला म्हणाला, “तुझे भाऊ शखेम येथे आपली मेंढरे चारावयास गेले आहेत ना? चल, मी तुला तेथे पाठवत आहे.” योसेफ त्यास म्हणाला, “मी तयार आहे.” 17तो मनुष्य म्हणाला, “ते येथून गेले आहेत. आपण दोथान गावामध्ये जाऊ असे त्यांना बोलताना मी ऐकले.” म्हणून मग योसेफ आपल्या भावांच्या मागे गेला व ते त्यास दोथानात सापडले. 18त्याच्या भावांनी योसेफाला दुरून येताना पाहिले आणि कट करून त्यास ठार मारण्याचे ठरवले. 19त्याचे भाऊ एकमेकांना म्हणाले, “हा पाहा, स्वप्ने पाहणारा इकडे येत आहे. 20आता चला, आपण त्यास ठार मारून टाकू आणि त्यास एका खड्ड्यात टाकून देऊ. आणि त्यास कोणा एका हिंस्र पशूने खाऊन टाकले असे आपल्या बापाला सांगू. मग त्याच्या स्वप्नांचे काय होईल ते आपण पाहू.” 21रऊबेनाने ते ऐकले आणि त्यास त्यांच्या हातातून सोडवले. तो म्हणाला, “आपण त्यास ठार मारू नये.” 22रऊबेन त्यांना म्हणाला, “रक्त पाडू नका. त्यास रानातल्या या खड्ड्यात टाका, परंतु त्याच्यावर हात टाकू नका.” आपल्या भावांच्या हातातून सोडवून त्यास त्याच्या बापाकडे परत पाठवून द्यावयाचे असा त्याचा बेत होता. 23योसेफ त्याच्या भावांजवळ येऊन पोहचला तेव्हा त्यांनी त्याचा सुंदर झगा काढून घेतला. 24नंतर त्यांनी त्यास एका खोल खड्ड्यात टाकून दिले. तो खड्डा रिकामा होता, त्यामध्ये पाणी नव्हते. 25ते भाकरी खाण्यास खाली बसले. त्यांनी वर नजर करून पाहिले, तो पाहा, इश्माएली लोकांचा तांडा मसाल्याचे पदार्थ व सुगंधी डिंक व बोळ लादलेल्या उंटांसहीत गिलाद प्रदेशाहून येत होता. ते खाली मिसर देशाकडे चालले होते. 26तेव्हा यहूदा त्याच्या भावांना म्हणाला, “आपल्या भावाला ठार मारून आणि त्याचा खून लपवून ठेवून आपल्याला काय फायदा? 27चला, आपण त्यास या इश्माएली लोकांस विकून टाकू, आपण आपल्या भावावर हात टाकू नये. कारण तो आपला भाऊ आहे, आपल्याच हाडामांसाचा आहे.” त्याच्या भावांनी त्याचे ऐकले. 28ते मिद्यानी व्यापारी जवळ आल्यावर त्या भावांनी योसेफाला खड्ड्यातून बाहेर काढले व त्या इश्माएली व्यापाऱ्यांना वीस चांदीची नाणी घेऊन विकून टाकले. ते व्यापारी योसेफाला मिसर देशास घेऊन गेले.

प्रतिसाद स्तोत्र

स्तोत्र 105:16–21

16त्याने त्या देशात दुष्काळ आणला. त्याने त्यांचा भाकरीचा पुरवठा तोडून टाकला. 17त्याने त्यांच्यापुढे एक मनुष्य पाठवला; योसेफ गुलाम म्हणून विकला गेला. 18त्यांचे पाय बेड्यांनी बांधले होते; त्यास लोखंडी साखळ्या घातल्या होत्या. 19त्याचे भाकीत खरे होण्याच्या वेळेपर्यंत, परमेश्वराच्या वचनाने त्यास योग्य असे सिद्ध केले. 20तेव्हा राजाने माणसे पाठविली आणि त्यांना सोडवीले; लोकांच्या अधिपतीने त्यांना सोडून दिले. 21त्याने त्यास आपल्या घराचा मुख्य, आपल्या सर्व मालमत्तेवर अधिकारी नेमले,

शुभवर्तमान

मत्त 21:33–43, 45–46

33“हा दुसरा दाखला ऐकाः एक मनुष्य होता, त्याचे शेत होते. त्याने आपल्या शेतात द्राक्षे लावली. त्याभोवती कुंपण घातले आणि द्राक्षरसाकरिता कुंड तयार केले आणि माळा बांधला, मग त्याने आपला मळा काही शेतकऱ्यांना खंडाने करायला दिला, मग तो दुसऱ्यादेशी निघून गेला. 34जेव्हा द्राक्षे तोडणीचा हंगाम जवळ आला, तेव्हा त्या मनुष्याने आपला वाटा आणण्याकरिता काही चाकर शेतकऱ्याकडे पाठवले. 35परंतु शेतकऱ्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. एकाला मार दिला तर दुसऱ्या चाकराला जिवे मारले. नंतर तिसऱ्याला दगडमार करून ठार केले. 36मग शेतकऱ्यांकडे त्या मनुष्याने आणखी एकदा चाकर पाठवले. पहिल्यापेक्षा त्याने जास्त चाकर पाठवले पण त्या शेतकऱ्यांनी त्यांना तशीच वागणूक दिली. 37नंतर, त्याने त्याच्या स्वतःच्या मुलाला त्यांच्याकडे पाठवले, तो म्हणाला, ‘निश्चितच ते माझ्या मुलाचा मान राखतील.’ 38पण जेव्हा शेतकऱ्यांनी त्याच्या मुलाला पाहिले तेव्हा ते एकमेकास म्हणू लागले, ‘हा तर मालकाचा मुलगा आहे. तो वारस आहे. चला आपण त्यास ठार करू व त्याचे वतन घेऊ.’ 39त्यांनी त्यास धरले व द्राक्षमळ्याच्या बाहेर फेकले व त्यास ठार मारले. 40मग द्राक्षमळ्याचा मालक परत येईल तेव्हा या शेतकऱ्यांचे काय करील?” 41यहूदी मुख्य याजक लोक आणि पुढारी म्हणाले, “तो त्या लोकांस खात्रीने मरणदंड देईल कारण ते दुष्ट होते. नंतर तो आपला द्राक्षमळा दुसऱ्यास खंडाने देईल. हंगामाच्या दिवसात जे त्याच्या पिकाची वाटणी देतील, अशांना तो ते देईल.” 42येशू त्यांना म्हणाला, “तुम्ही शास्त्रलेखात कधी वाचले नाही काय? ‘बांधणाऱ्यांनी नाकारलेला दगड कोनशिला झाला आहे. हे प्रभूने केले आणि आमच्या दृष्टीने हे अद्भूत आहे.’ 43म्हणून मी तुम्हास सांगतो की, देवाचे राज्य तुमच्याकडून काढून घेण्यात येईल आणि जे राष्ट्र त्यातली फळे देईल त्यास ते दिले जाईल. 45येशूने सांगितलेले दाखले मुख्य याजकांनी आणि परूश्यांनी ऐकले. येशू त्यांच्याविषयी बोलत आहे हे त्यांनी ओळखले. 46त्यांना येशूला अटक करायचे होते. पण त्यांना लोकांचे भय वाटत होते, कारण लोक येशूला संदेष्टा मानीत होते.

सामान्य रोमन दिनदर्शिका; बिशपांची परिषद काही सण (प्रभूचे प्रकटीकरण, स्वर्गारोहण, ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त) रविवारी हलवू शकते किंवा स्वतःचे सण जोडू शकते. पाठसंग्रह: रविवारचे चक्र B, आठवड्याच्या दिवसांचे वर्ष I.

स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क